क्लाऊड कॉम्प्युटिंग हे मोबाइल आणि कॉम्प्युटरचं जीवन आहे, असं विधान आजकाल आपल्याला सहज ऐकायला मिळत. तसा क्लाऊड कॉम्प्युटिंगचा गेल्या काही वर्षांत लोकांमध्ये बऱ्यापैकी प्रसार झाला आहे. परंतु अजूनही बऱ्याच लोकांना क्लाऊड म्हणजे काय, याची फारशी माहिती नसते. उंच पर्वतांवर ढगांमध्ये तुमचा लॅपटॉप घेऊन बसणे म्हणजे क्लाऊड कॉम्प्युटिंग का? किंवा मग रॉकेट किंवा विमानात बसून कॉम्प्युटिंग करणे म्हणजे क्लाऊड कॉम्प्युटिंग का? आपण क्लाऊड कीबोर्डवर प्रत्यक्षात टाइप करू शकतो का? याचा आपल्याला काही उपयोग होऊ शकतो का, असे अनेक प्रश्न आपल्या मनात येणे साहजिक आहे, म्हणूनच जाणून घेऊ या आपल्याला क्लाऊड कॉम्प्युटिंग सुविधा कशा प्रकारे वापरता येऊ शकते? कोणती सुविधा वापरावयाची? क्लाऊड कॉम्प्युटिंग म्हणजे काय?
क्लाऊड कॉम्प्युटिंग म्हणजे आपल्या गरजेची माहिती दूरच्या कोणत्या तरी कॉम्प्युटरवर साठवणे जी माहिती आपल्याला कधीही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून सहजरीत्या मिळवता येऊ शकते. क्लाऊड म्हणजे तो दूरवरचा कॉम्प्युटर आणि त्या कॉम्प्युटरशी म्हणजेच क्लाऊडशी कनेक्ट होण्यासाठी बऱ्याचदा फक्त इंटरनेट असले की पुरेसे ठरते. याचे साधे-सोपे उदाहरण म्हणजे जी-मेल, गुगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्स.. यावर आपण आपली माहिती टाकून जतन करून ठेवू शकतो.
क्लाऊड काम कसे करते.?
क्लाऊडचे कार्य समजावून घेण्यासाठी एक उदाहरण बघू या. आपल्या सगळ्यांकडे इलेक्ट्रिसिटी आहे. पण वीज तयार करणारे मोठमोठे टर्बाइन्स, मॅग्नेट्स, तारा आपल्या घरात असण्याची आपल्याला गरज नसते. कारण आपल्या घरात येणारी वीज आपल्याला तयार करावी लागत नाही. ती आपल्यासाठी कुणी तरी दूरवर तयार करतो आणि आपल्यापर्यंत पोहोचवितो आणि त्या बदल्यात आपण त्याला योग्य तेवढे पैसे मोजतो. आता हीच गोष्ट कॉम्प्युटरला लागू करा. तुमच्या कॉम्प्युटरला लागणारी मेमरी ही तशी अपुरी पडणारी गोष्ट असते आणि त्यांची पोर्टेबिलिटीसुद्धा मर्यादित असते. म्हणजे घरच्या कॉम्प्युटरमध्ये साठविलेला डेटा आपल्याला ऑफिसमध्ये पाहावयाचा असेल तर पेन ड्राइव्हसारखे हार्ड ड्राइव्ह घेऊन फिरावे लागते. शिवाय या गोष्टी बॅगेमधली जागा अडवून ठेवतात. परंतु आता तेच काम क्लाऊड तुमच्यासाठी करेल. म्हणजे तुमचा सगळा महत्त्वाचा डेटा दूर कुठे तरी स्टोअर होईल. तो इंटरनेट आणि तुमचं युजरनेम आणि पासवर्ड वापरून तुम्हाला कुठूनही मिळवता येईल. तुम्ही पाठविलेला डेटा जगभर पसरलेल्या सिक्रेट रो हाऊसमध्ये स्टोअर होतो. तुमची माहिती कुठल्या रो हाऊसमध्ये आहे हे सांगणं जरा मुश्कील असतं, कारण तो एकाच वेळी बऱ्याच ठिकाणी सेव्ह केला जातो. आणि तुमच्या मागणीनुसार ती कुठेही मिळवता येऊ शकते.
क्लाऊड कॉम्प्युटिंगचा उपयोग काय?
तसे याचे फायदे बरेच असतात. समजा तुमच्या एखाद्या फॅमिली फोटोची एकच कॉपी तुमच्या कॉम्प्युटरवर असेल आणि काही कारणास्तव तुमचा कॉम्प्युटर बंद पडला किंवा तुमचा फॅमिली फोटो जर कायमचा डिलीट झाला तर तुमच्या आठवणी पुन्हा कधीच पाहता येणार नाहीत पण जर तोच फोटो जर तुम्ही क्लाऊडवर अपलोड केलात तर तो तुम्हाला कधीही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून मिळवता येऊ शकतो.
मोठी फाईल शेअर करणे हा क्लाऊडचा सर्वात मोठा फायदा समजला जातो. समजा, तुमच्याकडे असलेला तुमच्या लग्नाचा व्हिडीओ दूर राहणाऱ्या मित्राला दाखवायचा आहे परंतु तुम्ही तो मेल करू शकत नाही, कारण त्याला मर्यादा असते मग अशा वेळी आपण आपला व्हिडीओ क्लाऊडवर अपलोड करायचा आणि त्याची लिंक मित्राला पाठवायची आणि तुमचा मित्र सहजरीत्या तो व्हिडीओ पाहू शकतो. (तो ते क्लाऊड वापरत नसला तरी हे शेअरिंग करता येते)
आपण सहा जण मिळून एखाद्या प्रोजेक्टवर काम करीत आहात आणि सगळ्यांना मिळून प्रेझेंटेशन तयार करावयाचे आहे. परंतु आपण सारे वेगवेगळ्या ठिकाणी राहत असाल तर क्लाऊड तुमची मदत करू शकतो. म्हणजे क्लाऊडवरच प्रोजक्ट तयार करायचा आणि सहा जणांना फाईल शेअर करायची. प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार त्यात हवे ते इनपुट्स देऊ शकतो आणि त्यावर चर्चादेखील करू शकतो.
मोठा बिझनेस असणाऱ्या कंपन्यांना याचा खूप फायदा होतो. एकाच वेळी अनेक ग्राहकांना सेवा सुरळीतपणे पुरविण्यासाठी मोठमोठे सव्‍‌र्हर मशीन्स एकाच वेळी चालविणं गरजेचं असतं. ते कंपनीसाठी अतिशय खर्चीक काम ठरतं, पण क्लाऊडमुळे अनेक कंपन्यांचा सव्‍‌र्हर चालविण्याचा व त्यांच्या मेन्टेनन्ससाठीचा खर्च वाचविता येतो. शिवाय क्लाऊड अ‍ॅक्सेसेबल, तसंच  कमी खर्चीक असून, तो पूर्ण कार्यक्षमतेने सेवा पुरवितो. यामध्ये काही धोकेदेखील असू शकतात पण त्यांचे प्रमाण फारच कमी आहे.
क्लाऊड सुविधेसाठी पैसे मोजावे लागतात का?
प्रत्येक वेळी नाही. म्हणजे जवळजवळ सगळ्या क्लाऊड सुविधा पुरविणाऱ्या कंपन्या आपल्या युजर्ससाठी फ्री स्पेस देत असतात त्यामुळे त्यांचे अ‍ॅप डाऊनलोड करायचे. त्यांच्या वेबसाइटवर लॉग-इन करायचे आपला लॉग-इनआयडी आणि पासवर्ड वापरून आपण कोणत्याही डिव्हाइस (काही सुविधा विशेष डिव्हाइससाठी सेवा पुरवितात) वरून आपली माहिती अ‍ॅक्सेस करू शकता. परंतु यामध्ये आपल्याला मर्यादित मेमरी उपलब्ध होते ती वेगवेगळ्या कंपन्यांची वेगवेगळी असते. उदा. गुगल ड्राइव्ह आपल्याला १५ जीबी मोफत जागा उपलब्ध करून देतो, ड्रॉपबॉक्स आपल्याला दोन जीबी जागा उपलब्ध करून देतो आणि आपल्यामुळे एखादा मित्र ती सुविधा वापरू लागला तर आपली मेमरी लिमिट वाढविली जाते.

कशी करायची सुरुवात?
आपण सर्वप्रथम ठरवायचे की कोणत्या कंपनीची क्लाऊड सुविधा आपल्याला वापरावयाची आहे. आणि त्यानुसार आपण त्यानुसार आपण त्यांच्या वेबसाइटवर जाऊन लॉग-इन करायचे. आपण अ‍ॅण्ड्रॉइड वापरत असाल तर प्ले स्टोअर वरून त्या कंपनीचे अ‍ॅप डाऊनलोड करून घ्यायचे आणि आपले फोटो, व्हिडीओ, महत्त्वाच्या फाईल्स क्लाऊडवर सेव्ह करून आपण कोठूनही अ‍ॅक्सेस करू शकतो. काही महत्त्वाच्या कंपन्या आणि त्यांच्या वेबसाइट्स, तसेच त्या कंपन्या किती फ्री डेटा उपलब्ध करून देतात याबद्दल-
गुगल ड्राइव्ह : सर्वात लोकप्रिय आणि सर्वात उत्तम सेवा पुरविणाऱ्यांपैकी एक म्हणजे गुगल ड्राइव्ह. याच कंपनीने आताच गुगल फोटोज सुविधा अनलिमिटेड स्टोअरेज कॅपेसिटीसह उपलब्ध करून दिली आहे परंतु गुगल ड्राइव्हवर आपण सर्व प्रकारच्या फाईल्स डेटा स्टोअर करू शकतो.
https://www.google.com/drive/ -15gb
ड्रॉपबॉक्स : गुगल ड्राइव्हप्रमाणेच सर्व प्रसिद्ध व मुख्य म्हणजे सर्व प्रकारच्या प्लॅटफॉर्मवरून सहज अ‍ॅक्सेसकरिता येणारी सुविधा म्हणजे ड्रॉपबॉक्स
https://www.dropbox.com/ – 2gb
मायक्रोसॉफ्ट वन ड्राइव्ह : मायक्रोसॉफ्ट हे मोठे नाव असले तरी यांच्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार कंपनीला वाटल्यास ते तुमचा डेटा हवा तेव्हा मिळवू शकतात. म्हणूनही बऱ्याचदा वन ड्राइव्ह वापरणारे विचार करतात परंतु जर आपली माहिती इतकी काही गुप्त नसेल तर मायक्रोसॉफ्ट वन ड्राइव्ह हा उत्तम पर्याय आहे.
https://onedrive.live.com/about/en-us/ -15gb
कॉपी : वन ड्राइव्ह आणि ड्रॉपबॉक्स प्रमाणेच कॉपीदेखील सेवा पुरविते. याचे वैशिष्टय़ म्हणजे आपण एखादी फाईल एखाद्या व्यक्तीने फक्त वाचायची की त्याला ती संपादित करण्याची परवानगी द्यायची याचे नियंत्रण आपल्या हाती असते.
https://www.copy.com/page/home;section:landing -15gb
मेगा : ही कंपनी ही क्लाऊड सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देताना सुरक्षिततेचे आणि गुप्तता राखण्याचे वचन देते. आपण याचा पासवर्ड चुकून विसरलात तर आपण यावर साठविलेला डेटा कधीच परत मिळवू शकत नाही, कारण कंपनी आपल्या अकाऊंटचे पासवर्ड लॉग-इन डिटेल्स स्वत:कडे बाळगत नाही, असा कंपनीचा दावा आहे. यावर बऱ्याच लोकांनी टीका केली आहे, काहीही असले तरी सध्या मोफत सर्वाधिक स्टोरेज लिमिट मेगा आपल्याला उपलब्ध करून देत आहे.
https://mega.co.nz/ -50gb
तर मग सुरू करा क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि व्हा बदलत्या जमान्याचे साक्षीदार..
प्रशांत जोशी – response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व टेकफंडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cloud computing
First published on: 12-06-2015 at 01:02 IST