श्रावण म्हणजे काय असे कोणालाही विचारले तरी सर्वाच्या समोर निसर्गाचं मनमोहक रूप उभे राहते. श्रावण म्हणजे हिरवळ, श्रावण म्हणजे मनमोहक पाऊस, श्रावण म्हणजे ऊन-पावसाचा खेळ, अशी किती तरी श्रावणाची रूपे आपणाला सांगता येतील. श्रावण म्हणजे एक मांगल्याचे प्रतीक असलेला महिना असे वर्णन करता येईल. जो तो आपापल्या परीने व्रतवैकल्य उपासतापास करीत असतो. माणसाच्या गरजा या वेगवेगळ्या असतात आणि या गरजा माणसाला आनंद निर्माण करून देत असतात. जगात सुखी असा कोण आहे हे सांगणे अवघड आहे. त्यामुळे माणसांच्या गरजांच्या चक्राप्रमाणे त्याचा आनंद सादर होतो. म्हणून श्रावण तुम्हाला कसा वाटला, कसा भावला हे माणसागणिक अगदी वेगवेगळे असते.
मुळात श्रावण हा शब्दच ऊर्जा देणारा आहे. अगदी गरिबापासून श्रीमंतापर्यंत श्रावण हा मनाच्या कोपऱ्यात अगदी घर करून बसलेला असतो. श्रावण हा शब्द येताच प्रथम ‘श्रावणात घननिळा बरसला..’ हे लताताईंचे शब्द आपल्या ओठावर तरळू लागतात. श्रावण हा ऋतूच आपल्याला प्रेमाचा गोड संदेश देत असतो. निसर्गाची किमया म्हणावी तर या दिवशी उधळण करत असतो. सारा निसर्ग जणू नवचतन्याने न्हाऊन गेलेला असतो.
निसर्गाने कोकणावर जणू अलंकाराची उधळणच केली आहे. माझ्यासारख्या कोकणात गाव असणाऱ्या माणसाला कोकणातील रूप भावले नाही असे होणारच नाही. आज मी पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईला आलो तरी माझे मन हे कोकणातील नयनरम्य अशा निसर्गातच अडकले. माझ्या कोकणची माती मला नेहमीच साद घालत असते. म्हणून मला भावलेला श्रावण म्हणजे लहानपणी कोकणात घालवलेले ते मनमोहक श्रावणाचे दिवस आजही माझ्या मनात अगदी जाखडी नृत्याप्रमाणे नाचत असतात.
श्रावण म्हटले की आजही माझ्या डोळ्यासमोर कोकणातील नयनरम्य निसर्ग ठाण मांडून उभा राहत असतो. श्रावणात भूमी हिरवागार शालू नेसून अगदी नव्या नवरीसारखी नटलेली असते. नद्या-नाले वाहत असतात. धबधबे तर किती बघू आणि किती नको असे वाटत असते. भातलावणीची कामे आटोपून नाचणी टोवण्याची कामे सुरू झालेली असतात. शेतकरी कामात अगदी गढून गेलेला असतो आणि या काळात त्याला आनंद देण्याचे काम हा श्रावण करत असतो. श्रावणात येणारे सण हे कोकणात अगदी आनंदाने साजरे केले जातात. सण कसे साजरे केले जातात हे आपल्याला कोकणात दिसून येतं, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. या काळात रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, नागपंचमी, जन्माष्टमी, दहीकाला हे सण कसे साजरे करावेत याचा आदर्श आपण कोकणातून घ्यावे. कुठलाही गाजावाजा न करता अगदी भक्तिभावाने हे सण साजरे केले जातात.
कोकण हा भौगोलिकदृष्टय़ा डोंगर-नद्या-नाले- टेकडय़ा यांनी व्यापलेला आहे. श्रावणामध्ये नसíगक सृष्टीचा आस्वाद घेताना अगदी दृष्टी कमी पडते. लहानपणी अगदी १५-१६ वर्षांचा असताना कोकणातील हे दिवस मी अनुभवले आहेत आणि त्याच काळात मी अनुभवलेला श्रावण हा स्मरणीय आहे. आमची शाळा घरापासून जवळजवळ पाच ते सहा किलोमीटर लांब होती. त्यामुळे शाळेत जाताना नद्या-नाले आणि डोंगर याच्याशी जणू दोस्ती झाली होती आणि त्यामध्ये श्रावण हा अगदी दुधामध्ये साखर टाकणारा होता. हिरवागार निसर्ग वाहणाऱ्या नद्या-नाले हे सगळं अगदी विलोभनीय होते. श्रावणात पडणारा पाऊस हादेखील जणू जिवलग वाटणारा सखा असतो. कोणतेही नुकसान न पोहोचवणारा पाऊस अगदी उना बरोबर लपंडाव खेळत असतो.
श्रावण सुरू झाला म्हणजे सणावारांची सुरुवात होत असे. आपल्या सासरहून प्रेमाने राखी बांधायला येणारी बहीण आई-वडिलांकडून हट्टाने मागून तिच्या ओवाळणीत टाकलेला एक रुपया आणि प्रेमाने बहिणीने बांधलेली राखी आजही स्मरणात आहे. संध्याकाळी सहकुटुंब समुद्रावर जाऊन दिलेला नारळ अगदी आजही लक्षात आहे. नागपंचमीची मज्जा तर विचारू नका. दहा-दहा दिवस अगोदर माती आणून बनवलेला नाग, त्याचे रंगकाम आणि नागपंचमीच्या दिवशी बसवलेला नाग त्याची पूजा दिवसभर नागाजवळ बसून केलेली राखण आजही लक्षात आहे. नागपंचमीच्या दिवसापासून जाखडी नृत्याची तालीम सुरू होत असे ती अगदी गणपती येईपर्यंत. जन्माष्टमीच्या दिवशी जागवलेली रात्र आणि दुसऱ्या दिवशी साजरा करण्यात येणारा दहीहंडी उत्सव हा जणू एकात्मतेचे प्रतीक असे. दही-हंडी उत्सव कसा साजरा करावा हे आजच्या शहरातील लोकांनी गावातील लोकांकडून शिकले पाहिजे. श्रावणी सोमवार आणि शनिवार या दिवशी पकडलेले उपवास, त्या दिवशी लवकर सुटणारी शाळा आणि शाळा सुटल्यावर आईवडिलांना शेतावर मदत करायला जाणे या गोष्टी अगदी मनाला आनंद देणाऱ्या असायच्या. श्रावणात घडणाऱ्या विलोभनीय अशा गणपतीच्या मूर्ती आणि त्या घडवण्यात लागणारा हातभार हा खरंच आनंद देणारा होता.
असा हा विलोभनीय श्रावण अगदी सर्वाना हवाहवासा वाटतो. आजच्या या सिमेंटच्या युगात खरंच ती मजा हरवल्यासारखी वाटते. मुंबईमधले सण आता कृत्रिम वाटू लागले आहेत. अशा वेळी खरंच मी माझ्या लहानपणचे कोकणातले श्रावणातले विलोभनीय असे दिवस आठवतात. खरंच ते दिवस माझ्या मनाला भावलेले होते. तेच दिवस माझ्या आयुष्यात इंद्रधनुष्याप्रमाणे रंग भरतील यात शंका नाही.
कमलेश नवाळे

Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा
5th April Panchang Papmochani Ekadashi Rashi Bhavishya
५ एप्रिल पंचांग: पापमोचनी एकादशी तुमच्या राशीला लाभणार का? मेष ते मीन राशीपैकी कुणाला लाभेल विठ्ठलाची कृपा?
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?