कॉम्रेड शरद पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या सहवासात वावरलेल्या एका तरुण कार्यकर्त्यांने अनुभवलेले शरद पाटील शब्दबद्ध केले आहेत.

जवळपास दहा वर्षांनंतर गेल्या वर्षी ‘असंतोष’वर पाय ठेवत होतो. ‘असंतोष’ बंगल्यामागच्या ‘जयंत विहार’वर कॉ. शरद पाटील यांचे वास्तव्य होते हे माहीत होते म्हणून थेट तिथेच गेलो. कॉ. नजुबाई गावीत दरवाजातच उभ्या होत्या. सकाळी दहाचा सुमार. एप्रिलचाच महिना. धुळ्यातील कडक ऊन. दरवाजालाच लागून असलेल्या टेबलावर कॉ. शरद पाटील न्याहारी करत होते. नोकरीनिमित्त धुळ्याबाहेर पडल्यानंतर इतक्या वर्षांनंतर ‘असंतोष’वर पाय ठेवत असल्याने अपराधीपणाची भावना तर होतीच, पण ओळखतील तरी का, हाही प्रश्नच होता. दरवाजातून हाकलून लावण्याचीही भीती होतीच. ‘असंतोष’वरून असे किती तरी जण अपमानित होऊन बाहेर पडलेले पाहिलेले- ऐकलेले होते. आमची चाहूल लागली. नजुबाई हसल्या. ‘ये गणेश’ म्हणाल्या. ‘कोण आहे?’ म्हणत त्यांनी चौकशी केली. ‘आपला गणेश आहे’ त्या म्हणाल्या. खुर्चीवर उजवा हात-पाय पसरून कॉम्रेड बसलेले होते. गणेश म्हणताच हसले. म्हणजे हाकलून लावण्याची, अपमानित होण्याची भीती पळून गेली. ‘स्टेडियमवर फिरायला जात होतो तेव्हा तुझी आई भेटायची. तुझ्याबद्दल सांगायची. आता फिरणं बंद झालं.’ लकवा झालेल्या उजव्या हाताकडे पाहत निर्देश करतात. ‘पण नजूला तुझी आई भेटते. तुझ्याबद्दल तिला सांगते. मग नजू मला सांगते. गणेशची आई भेटली म्हणून.’ सोबत असलेल्या राजेंद्र जगताप यांच्याकडे पाहत ‘यांचा परिचय?’ असा प्रश्न विचारता मी परिचय करून दिला. ‘कवी आहेत. झेडपीमधून आताच रिटायर्ड झालेत. सीपीएममध्ये होते.’ सीपीएमचं नाव काढताच ७८ सालीच आपण सीपीएम सोडल्याचे शरद पाटील यांनी सांगितलं. जातीच्या प्रश्नावर सीपीएममध्ये झालेला संघर्ष सांगितला. इतकी वर्षे धुळ्यात राहूनही आपला परिचय कसा झाला नाही म्हणून राजेंद्र जगतापांकडे पाहिले. गणेश आला आहे, चहा ठेवशील की नाही असे म्हणत नजुबाईंकडे त्यांनी पाहिले. बोलताना बोबडी वळत होती. शब्दांचा उच्चार नीट होत नव्हता. लकव्यामुळे उजव्या हाताची हालचाल बंद झाली होती. सहा फुटी उंचीचा कॉ. शरद पाटील यांचा देह खुर्चीवर अशा विपन्नावस्थेत जखडलेला पाहवत नव्हता.
खरं तर गेल्या दोन-तीन वर्षांपासून कॉ. शरद पाटील यांच्या प्रकृतीच्या तक्रारी वाढल्या होत्या. अर्धागवायूचा झटका आल्याचे समजले होते, तसेच विस्मरणाच्याही तक्रारी होत्या. मध्येच देहभान विसरतात असेही ऐकायला येत होते. या अशा बातम्या जेव्हा कानावर यायच्या तेव्हा काळीज चर्र्र व्हायचे. ज्या महापंडिताने भल्या भल्यांची भंबेरी उडविली, कशाचीही तमा बाळगली नाही, असंख्य सभा गाजवल्या. मैदानी सभा जिंकायची ज्याची हातोटी होती, अशा फडर्य़ा वक्त्याच्या तोंडून नीट शब्द उच्चारला जात नाही हे पाहणे-ऐकणेच नकोसे वाटत होते. त्यामुळेच ‘असंतोष’वर जाणे टाळत होतो. व्यवसायानिमित्ताने दहा वर्षांपूर्वीच मुंबईत आल्याने ‘असंतोष’शी संपर्क तुटला होता; परंतु वर्षांतून कधी तरी दोन-चार दिवस जाणं व्हायचं. पण असंतोषवर जाणं टाळत होतं. शारीरिक विपन्नावस्थेतील कॉ. शरद पाटील पाहायला मन धजावत नव्हतं. कवी असलेल्या राजेंद्र जगताप यांची शरद पाटलांना भेटण्याची तीव्र इच्छा होती. कॉ. शरद पाटील, राजेंद्र जगताप आणि मी एकाच रस्त्यावर म्हणजे वाडीभोकर रोडवरच वास्तव्याला होतो. दहा मिनिटांच्या अंतरावरील ही घरं. तरीही जगताप कॉ. पाटील यांना गेल्या ३५-४० वर्षांच्या धुळ्याच्या वास्तव्यात भेटला नव्हता. कॉम्रेडच्या असंख्य सभा ऐकल्या, सर्व पुस्तके वाचली. पण एवढय़ा थोर विद्वानासमोर आपण जाऊन त्यांचा वेळ कशाला घ्या हा त्यामागे विचार होता. वाडीभोकर रोडवरून कॉम्रेड जेव्हा चालत जात, तेव्हा असंख्य लोकांच्या नजरा त्यांच्याकडे जात. ‘कॉम्रेड चाललेत’ असे इशाऱ्याने, डोळ्याने एकमेकांना खुणावले जायचे. सभेला कॉम्रेड येणार म्हटल्यावर अनेक जण हातातली सतरा कामं सोडून कॉम्र्रेडना ऐकायला जात. मात्र, यातील फारच थोडे कॉम्रेडच्या जवळ जात. अनेक जण लांबच राहत. अशा लांब राहणाऱ्यांपैकी जगताप एक. कॉम्रेडच्या प्रकृतीच्या बातम्या जेव्हा येत तेव्हा माझ्याप्रमाणे अस्वस्थ होणाऱ्यांपैकी जगतापही एक. गेल्या वर्षी धुळ्यात चार दिवसांसाठी गेलो असता स्वस्तिक चौकात ‘बामसेफ’च्या कार्यकर्त्यांकडून कॉम्रेडच्या प्रकृतीची बातमी समजली. रवींद्र मोरे या ज्येष्ठ कार्यकर्त्यांने आप्पासाहेबांचा उजवा हात चालत नसल्याचे सांगितले. नवीन खंडाच्या लिखाणाला सुरुवात करताच हात बधीर झाल्याचे सांगितले. त्यांनी फिडेल कॅस्ट्रोला पत्र लिहिल्याचे सांगितले तेव्हा मन अधिकच अस्वस्थ झाले. जगताप म्हणाला, ‘चल उद्याच भेटू. खूप वर्षांची इच्छा आहे.’
‘असंतोष’वर जाणे अनेकांना वाघाच्या गुहेत जाण्यासारखे वाटायचे आणि तसे वाटणेही स्वाभाविक होते. वैचारिक क्षेत्रात संपूर्ण देशभरात प्रचंड दरारा असलेले व्यक्तिमत्त्व अशी कॉम्रेडची ओळख. अशा महापंडितासमोर आपण काय बोलणार, असा अनेकांचा समज. तसेच फक्त श्रवणभक्ती करणाऱ्याला कॉम्रेड पायरीवरही उभे करत नसत. कार्यकर्त्यांला कॉम्रेडच्या कसोटय़ांवर उतरावे लागत असे. या कसोटय़ांवर नापास झालेल्या कार्यकर्त्यांचा असा काही पाणउतारा होई की आयुष्यात तो कधी ‘असंतोष’च काय, पण वाडीभोकर रोडवर पाय ठेवायचीही िहमत करायचा नाही. असे िहमत हरलेले असंख्य जण धुळेच काय, संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात आहेत. सुदैवाने माझ्या बाबतीत तसे नव्हते. ‘असंतोष’चे दार मी कधीही, केव्हाही उघडू शकतो एवढी ‘हिंमत’ माझ्यात होती. म्हणूनच दहा वर्षांनंतर ‘असंतोष’वर पाय ठेवला होता. तेवढय़ाच अगत्याने बोलणे सुरू होते. दहा वर्षांपूर्वी जशा चर्चा व्हायच्या, नवनवे विचार ऐकायला मिळायचे तसाच प्रसंग आताही अनुभवत होतो. फक्त त्यांना शब्द नीट उच्चारता येत नव्हते. बोलताना ते मध्येच थांबत असत. कोणता मुद्दा होता हे त्यांना आठवत नसे. ज्यांच्या जिभेवर शब्द लीलया नाचत असत ते शब्द अडखळत येत होते. अशा विकलांग अवस्थेत कॉम्रेडला पाहायचे नव्हते. म्हणून असंतोषवर जाणे टाळत होतो. तत्पूर्वी वर्षभरापूर्वी फक्त ‘असंतोष’वरून नजर टाकत असू. समोरच्या चहाच्या टपरीवर तास दोन तास बसत असू. कॉम्रेड कधी तरी गॅलरीत येतील आणि दिसतील असे आम्हा दोघांना वाटायचे. पण तशी भेट झालीच नाही. कॉम्रेड आम्हाला गॅलरीतून दिसलेच नाहीत. म्हणून ‘असंतोष’वरच जायचे ठरवले होते. फार तर काय होईल हाकलून देतील, तरी चालेल. तेवढंच डोळा भरून तरी कॉम्रेडला पाहणे होईल, अशी धारणा आणि मानसिकता दोघांनी केलीच होती. पण तसं झालंच नाही. दहा-बारा वर्षांपूर्वी जशा चर्चा व्हायच्या, गप्पा व्हायच्या तशीच आताही परिस्थिती होती. फरक फक्त कॉम्रेडच्या शारीरिक दुर्बलतेचा झाला होता.
गप्पांचा तोच उत्साह होता. ‘फिडेल कॅस्ट्रोला पत्र लिहिलंय. समाजवाद स्त्रियाच आणू शकतात. पुरुष नाही. पुरुष विषमताच आणणार. त्याला लिहिलंय स्त्रियांच्या हातात सत्ता दे. वाट पाहतोय त्याच्या पत्राची. बघू काय करतो ते.’ कॉम्रेड आपल्याच नादात, तंद्रीत बोलत होते. ‘दिग्नाग, धर्मकीर्ती, वधूबंधू सूर्य होते.. सूर्य.. स्वयंप्रकाशित. चंद्रासारखे परप्रकाशित नाही. स्वयंभू सूर्य. दिग्नागचे नेणीवशास्त्र..’ अशा एक ना अनेक विषयांवर चर्चा. ‘समाजवाद स्त्रियाच राबवू शकतात. सत्ता त्यांच्याच ताब्यात हवी’ ते पुन:पुन्हा सांगत होते. नजूबाई चहा घेऊन आल्या. कॉम्रेडसाठी दुधाचा मोठा कप. बधीर झालेल्या उजव्या हातावर जाड हातरुमालाची घडी ठेवली. ‘गरम दूध सांडलं तरी भान राहत नाही. कप हातात नीट धरता येत नाही.’ नजूबाईंनी माहिती पुरवली. कप टेबलावर ठेवला. ‘कप नीट धरा’ म्हणून नजूबाईंनी बजावलं. कॉम्रेडनी पुन्हा स्त्रियांनीच समाजवाद राबवावा म्हणून सांगितलं. नजूबाईंचं कपकडे लक्ष. ‘नीट धरा’ म्हणाल्या. ‘अरे, इथे स्त्रियांच्या समाजवादाची चर्चा चालली आहे आणि तुला कपाची पडली आहे’.. अशा स्वत:च्याच विनोदावर ते हसले. हसतानाही त्यांची खिन्नता प्रकर्षांने जाणवली. त्यांनी नवीन खंड लिहायला घेतला होता. दोन पानं लिहिली होती. लिहिता हात काल संध्याकाळी बधीर झाला होता. ‘हात उचलताच येत नाही’ म्हणत खिन्नतेने हाताकडे ते बघत होते. नव्या खंडाच्या लिखाणाचे कागद टेबलावरच होते. त्यांचं इंग्रजीत लिखाण सुरू असायचं. तासभर झाला. मध्येच चर्चा, मध्येच थांबणं सुरू होतं. खिडकीतून बाहेर पाहिलं. ‘इतका वेळ झाला, तुम्ही अजून परिचय नाही दिला’, असा सवाल कॉम्रेडनी आम्हा दोघांकडे पाहून केला. त्यांच्या या प्रश्नावर मन गलबलून गेलं. स्वत:ला सावरत ‘अप्पा, मी गणेश, गणेश निकुंभ’. मी नाव सांगितलं. ते प्रसन्न हसले. ‘तुझी आई भेटायची स्टेडियमवर. आता फिरणं बंद झालं. नजूला भेटते. नजू मला सांगते, गणेशची आई भेटली.’ तासाभरापूर्वी जे सांगितलं होतं तेच त्यांनी पुन्हा सांगितलं. आता उठावंसं वाटलं. पळून जावंसं वाटलं. असा कॉम्रेड पाहायची इच्छाच नव्हती माझी. मग पुन्हा त्यांना आठवलं, मघाशी परिचय दिला होता म्हणून. ‘मेंदू काम करत नाही. दगा द्यायला लागलाय’ असं म्हणत त्यांनी डाव्या हाताची बोटं कपाळावर आपटली. ‘तुम्हा मुंबईच्या लोकांना तुमच्या नोकऱ्या सांभाळूनही काही तरी करता येईल’ असं म्हणाले. मध्येच त्यांना सचिन माळी आठवला. नक्षलवादी म्हणून अटक झालेला कार्यकर्ता. ‘सचिनचं पुस्तक वाचलं का?’ त्यांनी विचारलं. मी नकार दिला. कसला रे तू? म्हणे शरद पाटलांचा शिष्य? ते पुस्तक वाच. इथे होतं, थांब मी शोधतो.’ मग टेबलावरची पुस्तकं शोधली. ‘कुणी तरी नेल’ं म्हणाले. ‘आठवत नाही. त्या पुस्तकावर परिसंवाद ठेवायला सांगितलं आहे. (आनंद) तेलतुंबडे, निलोफरला (भागवत) बोलवायला सांगितलंय. जबरदस्त पुस्तक आहे. माझ्या कम्युनिस्ट पक्षाच्या उभ्या आयुष्यात महात्मा फुलेंवर कोणी कम्युनिस्ट माणसाने असं पुस्तक लिहिलं नाही,’ अशा तुटक तुटक बोबडी वळणाऱ्या शब्दांत कॉम्रेडनी कौतुक केलं. कोणाचं कौतुक करणारे कॉम्रेड क्वचितच दिसले आतापर्यंत. पण या पुस्तकाचं कौतुक तोंडभरून. मी ते वाचलं नसल्याचं त्यांना आश्चर्य वाटलं. महात्मा फुलेंना खरा वारसदार मिळाला म्हणत कौतुक केलं. ‘आगामी काळ आपलाच येणार आहे. जगाचं चित्र मला दिसतं आहे. शोधत येतील लोक शरद पाटलांना. पुढचा काळ असाच येणार आहे. शरद पाटलांशिवाय पर्याय नाही जगाला,’ ते ठामपणे म्हणाले. ‘बुद्ध जगातला सर्वश्रेष्ठ पुरुष. त्याखालोखाल मार्क्‍स. बाकी कोणीच नाही. पुढच्या काळात सर्व बाद ठरतील. फुले-आंबेडकरही बाद ठरतील. फक्त बुद्ध आणि मार्क्‍सच राहतील. मी फोटोही काढून टाकले बाकीच्यांचे.’ समोर िभतीकडे त्यांनी निर्देश केला. िभतीवर फक्त बुद्ध आणि मार्क्‍सच्याच तसबिरी होत्या.
‘दलितांनी आंबेडकरांची भक्ती सोडल्याशिवाय त्यांना मुक्ती मिळणार नाही. भक्ती सोडली तरच दलितांना मुक्ती मिळेल’ हे कॉम्रेड आवेशात सांगत होते. ‘सर्व कालबाहय़ होणार. सौत्रांतिक मार्क्‍सवाद हाच अंतिम. तोच खरा समाजवाद.’ आपल्याच नादात कॉम्रेड बोलत राहिले. त्यांचा एकेक शब्द कानात साठविण्याचा माझा आटोकाट प्रयत्न होता. दोन वाजत आलेले होते. चार तास झाले होते. कॉम्रेड त्याच अवस्थेत खुर्चीवर बसलेले होते. निघण्याची चुळबुळ केली. ‘निघा’ म्हणाले. ‘किती दिवस आहेस आणखी?’ असंही विचारलं. उद्यालाच निघायचं होतं, पण असंच सांगितलं ‘दोन दिवस आहे अजून.’ ‘अजून आहेस तर उद्या ये, डॉक्टर घोगरे येणार आहेत. तुझीही भेट होईल. नितांत प्रेम करतो माझ्यावर’ असं म्हणाले. मी निरोप घेतला. वर्षभरानंतर आता अप्पासाहेबांनीच जगाचा निरोप घेतला. मैदानी सभा गाजविणारे, विद्यापीठीय प्राध्यापकांना, विचारवंतांना लोळवणारे कॉम्रेडच सदैव डोळ्यांसमोर दिसतात.
( लेखक कॉ. शरद पाटील प्रणीत सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या संस्थापकांपैकी एक आहेत.)

ratnagiri sindhudurg lok sabha marathi news
रत्नागिरीत महायुतीपुढे कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे आव्हान
vijaysinh mohite patil marathi news, vijaysinh mohite patil solapur lok sabha marathi news
मोहिते-पाटलांच्या महायुती नेत्यांशी गाठीभेटी, भाजप सावध; राजन पाटलांना प्रचारात जुंपले
kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

नाकारलेले आणि ‘स्वीकारलेले’ पुरस्कार
कॉम्रेड शरद पाटील यांचे वेगळेपण सुरू होते ते त्यांच्या ‘असंतोष’ या बंगल्याच्या नावावरून. धुळ्यातील देवपूर भागातील वाडीभोकर रोडवरील ‘असंतोष’ हा बंगला केवळ धुळ्यातीलच नव्हे, तर देशातील अनेक मान्यवरांच्या उत्सुकतेचा विषय होता. या उत्सुकतेला दोन प्रमुख कारणे होती. एक तर वैचारिक क्षेत्रात कॉ. पाटील यांचा प्रचंड दरारा होता. त्यामुळे वैचारिक मतभेद असणारी मंडळी दबकून राहात म्हणून ‘असंतोष’पासून चार हात दूर राहात, तसेच दुसरे कारण म्हणजे शरद पाटील यांचा स्वभाव. कधी कोणाचा कशावरून पाणउतारा होईल याचा भरवसा नसायचा. त्यामुळे ‘असंतोष’वर पाय ठेवायला अनेक जण कचरत असत. अगदी व्याख्यानाचं निमंत्रण द्यायला आलेल्या माणसांच्या बोलण्यात जराही विसंगती आढळली तरी ‘गेट आऊट’ म्हणायलाही ते कमी करत नसत. त्यामुळे त्यांच्या या स्पष्टवक्तेपणाची ‘कीर्ती’ सर्वदूर पसरली होती. पुरस्कार स्वीकारण्यापेक्षा नाकारण्यावरच त्यांचा अधिक भर असायचा. कोणी पुरस्कार देण्याची भाषा जरी केली तरी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जायचा. त्यामुळे तशी ‘िहमत’ अपवादानेच कोणी केली असेल. नाही म्हणायला त्यांच्या ‘मार्क्‍सवाद-फुले-आंबेडकरवाद’ या गं्रथाला महाराष्ट्र राज्याचा वैचारिक क्षेत्रातला उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला होता. वर्तमानपत्रातून सर्वत्र बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. आता कॉ. शरद पाटील हा पुरस्कार स्वीकारतात का याची उत्सुकता सर्वानाच होती; परंतु त्याच दिवशी पत्रक प्रसिद्ध करून महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार त्यांनी नाकारला. मनोहर जोशी तेव्हा मुख्यमंत्री होते. त्यांच्याच शासन काळात म्हणजे पुरस्कार जाहीर होण्याच्या काही महिने अगोदर घाटकोपर येथील रमाबाईनगरात गोळीबार झाला होता. या हत्याकांडात अकरा दलितांचा बळी गेला होता. ‘दलितांच्या रक्ताने ज्या मनोहर जोशी यांचे हात माखलेले आहेत, त्या जोशी सरकारचा पुरस्कार आपण नाकारत असल्याचे’ शरद पाटील जाहीर केले. या पत्रकावरून आंबेडकरवादी सुखावले, तर युती समर्थक दुखावले. काही पत्रकारांना प्रश्न पडला पुरस्कार नाकारायचाच होता तर युती सरकारकडे पुरस्कारासाठी पुस्तक का पाठवले? त्यांनी कॉ. पाटील यांच्याकडे तशी विचारणा करून मुलाखत घेतली. तेव्हा आपण कधीही पुरस्कारासाठी पुस्तक पाठवत नसल्याचे सांगत आपल्या संमतीविना प्रकाशकांनी हे पुस्तक युती सरकारकडे पाठविल्याचे त्यांनी नमूद केले. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर जे लेखक पुरस्कार समारंभाला येत नाही त्यांना घरपोच पुरस्कार आणि त्याची रक्कम पाठविली जाते. सरकारने मग असा पोस्टाने पुरस्कार पाठवला तर तो स्वीकारणार का, हा पत्रकारांचा दुसरा प्रश्न होता. तेव्हाही ठाम नकार देत पुरस्कार परत पाठवणार, मात्र रक्कम स्वीकारणार असल्याचे सांगितले. पुरस्कार नाकारणार आणि रक्कम स्वीकारणार ही विसंगती नाही का, असे विचारल्यावर तो सरकारचा पैसा नाही तर जनतेचा पैसा आहे, असे सांगितले. या दोन-चार प्रश्नांवरून पत्रकारांना ‘बातमी’ मिळाली होती. बातमी कशी ट्विस्ट करायची हे पत्रकारांना बरोबर ठाऊक होते. त्यांनी पुरस्कार नाकारणार पण रक्कम स्वीकारणार, अशा बातम्या- मुलाखती छापल्या. रमाबाईनगर हत्याकांडाला गौण लेखले. कॉ. शरद पाटील यांना ज्या वेळी सरकारचा हा पुरस्कार जाहीर झाला होता, त्याच वेळी मराठवाडय़ातील एका प्रख्यात आंबेडकरवादी विचारवंतालाही पुरस्कार जाहीर झाला होता. तो त्यांनी नाकारला नाही तर थेट समारंभाला हजेरी लावून विनम्रपणे स्वीकारला होता.
कॉ. शरद पाटील यांचा असा ‘स्वभाव’ होता.
त्यांना ‘महाराष्ट्र फाउंडेशन’तर्फे असाच एक पुरस्कार जाहीर झाला होता. ‘महाराष्ट्र फाउंडेशन’तर्फे जीवन गौरव या सर्वोच्च पुरस्कारासह अन्य पुरस्कार दिले जातात. पन्नास हजार रोख असे या ‘अन्य’ पुरस्काराचे स्वरूप होते. मात्र पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कॉ. शरद पाटील यांनी तो लगेच नाकारला. पुरस्कार द्यायचाच असेल तर सर्वोच्च ‘जीवन गौरव’ पुरस्कार द्या. तो मी स्वीकारणार. नाही तरी यापूर्वी फाउंडेशनतर्फे जे जीवन गौरव पुरस्कार दिले गेले ते माझ्यापेक्षा कमी वकुबाच्या माणसांना दिले गेले आहेत, अशी भूमिका संयोजकांकडे पत्राद्वारे मांडली तसे पत्रकही प्रसिद्धीला दिले. त्यानंतर मात्र संयोजकांनी जीवन गौरव जाहीर केला नाही. कारण जीवन गौरव द्यायचे नाव संयोजन समितीने निश्चित केले होते, त्यामुळे यंदा नाही पुढच्या वर्षी तुम्हाला जीवन गौरव देतो असे सांगण्यात आले. आपल्या कार्याचे अशा पद्धतीने कोणी मूल्यन करत असेल तर ते त्यांना बिलकूल खपत नसे. तातडीने त्यांनी नकार दिला. जीवन गौरव हवा तर यंदाच द्या, अन्यथा तुमचा पुरस्कार तुम्हालाच लखलाभ होवो, असे जाहीर करून टाकले. त्यामुळे कॉ. शरद पाटील यांच्या ‘स्वभावा’ची आणखीनच जोरदार चर्चा झाली. अशा ‘स्वभावा’च्या कॉ. शरद पाटील यांना महाराष्ट्र इतिहास परिषदेचा ‘श्रेष्ठ इतिहासकार’ हा पाच हजार रुपयांचा पुरस्कार यंदा जाहीर झाला. अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात उपचार सुरू असताना आयुष्याच्या शेवटच्या घटिका जवळ येत असताना त्यांना या पुरस्काराची विचारणा झाली. मेंदूवर शस्त्रक्रिया झालेली, अर्धागवायूचा झटका आलेला अशा अवस्थेत व्हीलचेअरवर बसवून रुग्णालयाच्या दाराजवळ आणून हा पुरस्कार दिला गेला. त्यांना दिलेल्या ‘मानपत्रा’चे वाचन करण्यात आले. तशा सर्वत्र बातम्या झळकल्या. त्यानंतर वाई येथील महर्षी विठ्ठल रामजी िशदे यांच्या नावाचा १५ हजार रुपयांचा पुरस्कारही जाहीर झाला. हा समारंभ वाई येथे डॉ. बाबा आढाव यांच्या उपस्थितीत होणार होता. या समारंभाला हजर राहणे कॉ. शरद पाटील यांना अशक्य होते. अर्धागवायूच्या झटक्याने त्यांचे बोलणेही नीट समजत नव्हते. बोबडी वळत होती. शब्दांवर कमालीचे प्रभुत्व असणाऱ्या या थोर विचारवंताची शारीरिक विकलांगता आमच्यासारख्या त्यांच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्यांना व्यथित करत होती. अशा स्थितीत त्यांना हे दोन पुरस्कार देण्यात आले, जाहीर झाले. कॉ. शरद पाटील यांचा ‘स्वभाव’ माहीत असतानाही त्यांना हे दोन पुरस्कार देण्यात आले ते खरोखरच ‘हिंमतवान’ म्हणायला हवेत. तसेच कॉम्रेड पाटील यांच्या वतीने त्यांच्या ज्या शिष्यांनी हे पुरस्कार स्वीकारले, त्यांच्याही िहमतीला दाद द्यावी लागेल. आयुष्यभर पुरस्काराकडे पाठ फिरवणाऱ्या कॉम्रेड पाटील यांच्या शारीरिक विकलांग अवस्थेचा गैरफायदा घेऊन तर हे पुरस्कार ‘प्रदान’ केले नाहीत नाही, अशी शंका बळावते.