lp52मी फादर जोसेफ. या शहरात, या चर्चमध्ये येऊन पाच वर्षे झालीत. आमचा समाजबांधव तसा कमीच. या गावात सुमारे सहाशे घरं, कुटुंबं असतील, अर्थात चर्च एकच. दर रविवारी सर्व येशुभक्त या चर्चमध्ये सकाळी आठ वाजता एकत्र जमतात. गीत, प्रार्थना, बायबलचे वाचन, सर्व जगासाठी येशूची आळवणी करतो. सर्वाना प्रेमाचा संदेश पोहोचवू या, सर्वाना सुखी बघण्याची शक्ती, ताकद, दृष्टी दे. हीच प्रार्थना. अनेक रविवार गेले. मला आठवतो इस्टर डे. अशीच प्रार्थना संपविली, शेवटी देणगीचा डबा एका भक्ताला फिरवण्यास सांगितला आणि मी स्वत: एका कोपऱ्यात उभा राहून आशीर्वाद देत होतो. सर्व लेकरं गेली नंतर सवयीप्रमाणे कन्फेशन बॉक्सकडे नजर टाकली. एक पस्तिशीतली युवती, पांढरी साडी परिधान केलेली उभी होती. ‘‘सर, आर चाइल्ड. आय अ‍ॅम.’’
बॉक्सजवळ मी गेलो. ती आतमध्ये होती.
‘‘नेम प्लीज.’’
‘‘डॉ. मेरी डिकास्टा.’’ ती उत्तरली. ‘‘सर, आय विल एक्सप्लेन इन मराठी.’’
मी संमती दिली. ‘‘हं बोला मॅडम मी मराठी जाणतो.’’
‘‘सर मी मेरी डिकास्टा. मेडिकल पॅ्रक्टिशनर आहे. माझे पती जोसेफ हेदेखील एक निष्णात सर्जन होते.’’
‘‘सर्जन होते म्हणजे आता ते..?’’ मी विचारणा केली.
‘‘..नो. ही इज नो मोअर. ते हयात नाहीत.’’ ती उत्तरली. तिच्या बोलण्यात एक ठामपणा, खरेपणा मला जावणत होता.
‘‘कधी आणि कसे गेले?’’ माझा प्रश्न.
‘‘मीच स्वत: त्याला मारले, चार तासांपूर्वी. तेच कन्फेस करायचं आहे.’’
मी हादरलो. एक मर्डर कन्फेस करायचा आणि मग मला काहीच सुचत नव्हतं. ‘‘तुम्ही पोलीस स्टेशनला जायला हवं होतं.’’ मी म्हणालो.
‘‘तिकडे पण मी जाणार आहे. पण आपल्याशी मन मोकळं करावं. मन, आत्मा, शरीर याचं द्वंद्व आपल्याजवळ व्यक्त करावं म्हणूनच मी येथे आले.’’
ही मेरी स्वत:च्याच पतीचा मर्डर करणारी आणि दुसरी मेरी येशूची आई मायाममता यांची मूर्ती. एक आश्चर्य, भयावह गूढ व्यक्ती. देवाची लीला अगाध आहे. एका जीवाला दुसऱ्या जीवाने संपविले. का कशासाठी? अनेक प्रश्न आणि त्याची उत्तरं ही मेरी देणार.
‘‘सर मी मेरी डिकास्टा फक्त खरं आणि खरंच सांगणार आहे. माझा इतिहास, वर्तमान आणि त्यावरून माझा भविष्यकाळ निश्चित होणार आहे.’’
‘‘..’’
‘‘सर एक प्रश्न, एखाद्या माणसाला त्याच्या व्याधीपासून मुक्ती देणे हे सत्कार्य होऊ शकते का?’’
‘‘तुमचे सर्व कथन संपल्यावर ते सांगता येईल. आपण कन्फेस करा..’’
‘‘सर मी एक निष्णात डॉक्टर आहे. माझे पतीदेखील एक्सपर्ट स्त्रीरोगतज्ज्ञ, सर्जन होते. पंधरा वर्षांपूर्वी आमचं लव्ह मॅरेज झालं. मेनरोडला आमचं अद्ययावत मोठं हॉस्पिटल आहे. रुग्णांची सेवा करण्याचं व्रत आम्ही अंगीकारलं होतं. २४ तास सेवा, आय.सी.यू.चीदेखील व्यवस्था आहे. येशूच्या कृपेमुळे सेवा करण्याची शक्ती, कुशलता आणि अचूक निदान यामुळे गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत रुग्णसेवा आम्ही देत असू. जोसेफ एकदम मास्टर, स्त्रीरोगतज्ज्ञ. डिलिव्हरीमध्ये त्याचा खास हातखंडा.’’
‘‘एस, ऐकून आहे त्याची ख्याती. प्लीज सर्व लवकर सांगा.’’ मी विनंती केली.
‘‘थोडं सावकाश, म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सहज मिळेल.’’ तिने सांगितले. ‘‘भूतकाळावर वर्तमान अवलंबून असते आणि भविष्यही. किमान दोनशे रुग्णांना रोज आम्ही सेवा देत असू. यात मुख्य वाटा जोसेफचा fingure tip success. मला त्याचा हेवा वाटण्यापेक्षा अभिमान वाटायचा. येशूचं रुग्णाचं दु:ख नाहीसं करावं हाच मंत्र आम्ही अंगीकारला होता. सर माणसाला सर्व गोष्टींची सवय व्हायला हवी.’’
‘‘प्लीज मला तत्त्वज्ञान नका ऐकवू. कृपया थोडक्यात..’’ मी तिला ब्रेक लावला. कारण मला इतर कामे होती. पण ऐकण्याची उत्सुकतादेखील होती. कारण तिने तिच्या पतीचा खून केला होता. स्वत:च वैधव्याला आमंत्रण दिलं होतं.
‘‘तो शेवटचा दिवस आठवतो. १४ ऑगस्ट १९९६ शनिवार. तोपर्यंत त्याच्यातला उत्साह, जोम, जिद्द, आत्मविश्वास, पूर्ण, पूर्ण ढासळला आणि उरला एक जिवंत मांसाचा गोळा. आज पंधरा वर्षे सांभाळला. वाटलं अचानक येशूची कृपा होईल. माझा जोसेफ, उमदा जोसेफ मला परत मिळेल. सॉरी आय एम नॉट.’’
ती रडू लागली, मी स्तब्ध झालो. ‘‘कूल डाऊन. माय डॉटर. शांत शांत. सविस्तर सर्व हकिगत मला सांगा, मी मला शक्य असेल तेवढी मदत करेन. त्याआधी तुमच्या अश्रूंना पूर्ण वाट करून द्या, मग सावकाश सांगा.’’ मी तिला धीर दिला.
सागराचा तळ आणि माणसाचं मन, अंतरंग याचा वेध घेता येत नाही हेच खरं. मनात एक विचार येतो, माफीचा विचारापेक्षा आपण गुन्हाच करू नये, असं का वाटत नाही? नंतर पश्चात्ताप कशासाठी? माणूस हा षड्रिपूंनी ग्रासलेला आहे, म्हणून कदाचित होत असावे. पाच मिनिटांनंतर ती शांत झाली व पुढे सांगू लागली.
‘‘सर, मला जोसेफचा अभिमान आहे, पण माझी जीवलग मैत्रीण वंदना जोशी. तिची मुलगी संध्या पहिल्या बाळंतपणासाठी आमच्या हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केली. केस विचित्र म्हणजे कॉम्प्लिकेटेड होती. बी.पी. हाय, मूल आडवं. एक तर मूल वाचेल, नाही तर आई. जोसेफने खूप प्रयत्न केला, पण नो, सॉरी, प्रथम मूल वाचेल कदाचित. सर मूल आणि आई दोन्ही गेले. शांत झाले. माझ्या मैत्रिणीनं हंबरडा फोडला आणि त्याच वेळी जोसेफ मोठय़ाने ओरडला, ‘ओह नो. सॉरी.’ बस, सर ते त्याचे शेवटचे बोलणे. हा आघात तो सहन करू शकला नाही. ती आई आणि मूल संपले त्याचबरोबर माझा जोसेफ संपला. त्याची वाचा, हालचाल, बुद्धी सर्व संपलं. मी त्याच्या जवळ गेले, त्याचं सांत्वन केलं, समजूत घातली पण व्यर्थ. त्या क्षणापासून जासेफ म्हणजे एक सजीव गोळा तयार झाला.’’
मी फक्त ऐकत होतो, कहाणी एका डॉक्टरीणबाईची. जिने आपल्याच पतीला संपवलं. एक कन्फेशन पूर्ण, शिवाय काहीच सांगता येणार नव्हतं. ‘‘रोज सकाळी त्याला लहान मुलाप्रमाणे स्नान वगैरे घालून तयार करायचे. हॉस्पिटलमध्ये माझ्या शेजारी बसवायचे. प्रत्येक पेशंटला मी तपासायचे आणि ट्रिटमेंट लिहून द्यायची, जासेफला दाखवायची, पण जोसेफचा नो रिप्लाय, एक ढिम्म, नजर कुठे तरी छताकडे आणि बोलणं तर बंदच. शेवटी संध्याकाळी त्याला हलवून हलवून विचारायची अरे एकदा तरी बोल ना माझ्याशी, एकदा तरी हात वर करून मिठीत घे, जवळ घे मला, रागव. नाही. तो म्हणजे एक जिवंत गोळा झाला होता, संवेदनाशून्य, भावनाशून्य. रोज हीच दिनचर्या. आशा एकच, एकदा तरी अचानक हा पूर्वीसारखा होईल. दहा वर्षे त्याला वागवला. अनेक ट्रिटमेंट, डॉक्टर झाले पण व्यर्थ.’’
‘‘मेरी मॅडम प्लीज थोडक्यात सांगितलं तर..’’ मी तिला ब्रेक लावला.
‘‘यस सर,’’ ती म्हणाली. ‘‘मी मी त्याला का संपविलं तेदेखील महत्त्वाचं आहे, म्हणूनच थोडं विस्ताराने सांगते आहे. त्याचे एक मित्र डॉ. अनिल माने ब्रेन सर्जरीमध्ये मास्टर. त्यांच्याकडे ट्रिटमेंटसाठी गेलो. त्यांनी जोसेफला तपासलं, एम.आर.आय. काढला. त्यांना सर्व हकिकत सांगितली. ते म्हणाले, ‘हा आणि मी कॉलेजला बरोबर होतो. एक ब्रिलियंट चॅप ओन्ली जोसेफ ही त्याची ख्याती होती. यश हे त्याच्या बोटावर नाचत असे. अपयश स्वप्नातदेखील अशक्य. असा त्याचा माइंड सेटअप होता, म्हणून हे अपयश तो पचवू शकला नाही. परिणामी ही लूज हीज ब्रेन कंट्रोल ऑफ मेमरी, व्हिजन अ‍ॅण्ड स्पीच. सॉरी अनरिकव्हरेबल केस.’ मी थक्क झाले. माझ्या पायाखालची जमीनच खचली. मी त्याला उपाय विचारला. तो म्हणाला, देवाने काही चमत्कार केला तरच, अन्यथा नाही. तुम्ही दहा वर्षे वाट पाहिलीत आणखी काही वर्षे.
मी म्हणाले, सर हा जिवंत मांसाचा गोळा मी किती दिवस सांभाळायचा आणि कदाचित मी संपले तर याच्याकडे कोण बघणार. मला कदाचित रुग्णसेवा करता येणार नाही. सर मला एक विचारायचं आहे.’’
मी फक्त श्रवणभक्तीच करत होतो. ती मला काय विचारणार कल्पनाच नव्हती आणि त्याचे उत्तर मी देऊ शकेन याची खात्री नव्हती, तरीदेखील तिला होकार दिला.
तिचा प्रश्न होता, ‘‘समजा आपल्याला एखादा गळू झाला, त्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो आहे. अशावेळी आपण तो गळू कापून टाकतो. वेदना संपवितो. तसा हा माझ्या संसाराला लागलेला एक टय़ुमर. त्याला कसा बरा करायचा हाच विचार, पण माने डॉक्टरांनी जेव्हा ते शक्य नाही असं सांगितलं तेव्हा मनाशी ठरवलं, आजच या प्रकरणाचा कायमचा निकाल लावायला हवा. शिवाय जर त्याला काही संवेदना असती तर तोदेखील म्हणाला असता, जर मी दुसऱ्यांसाठी काहीच करू शकत नसेन तर या शरीराचा काय उपयोग. एक मांसाचा गोळा, हा त्याज्य करणे हेच आवश्यक आहे. Please allow me a death, only death. हाच आवाज कानात घुमत होता. पण दुसरा विचार मनात यायचा, आपण वैधव्याला आमंत्रण देत आहोत, हे योग्य नाही. या दरम्यान माने मला काय समजवत होते ते मला काहीच उमजत नव्हते. ते म्हणाले, यावर वैद्यकशास्त्रात काहीच उपाय नाही. तुम्हाला शेवटपर्यंत सांभाळावं लागेल. देव तुम्हाला ते सामथ्र्य देवो. विचारांचे काहूर, काहीच सुचत नव्हतं. फक्त एकच ध्यास. जोसेफला यातून बरं करायचं किंवा मुक्ती द्यायची. तो म्हणजे एक जिवंत पुतळा. मेलेल्या माणसांचे पुतळेच शोभून दिसतात. शेवटी मी एक पॉयझनची सिरिंज भरली. हात थरथरत होता, पण निश्चय ठाम होता. त्याचा दंड पकडला आणि सिरिंज रिकामी केली. त्याने एक जोरात हुंदका दिला, बस. सारं शांत.. शांत झालं.
डॉ. अनिल म्हणाले, मेरी हा.. हा खून झाला. क्लीअर मर्डर. यातून तू काय साधलंस, वैधव्य आणि एक खुनी. मी, मला हे योग्य वाटत नाही. मी आत्ताच पोलिसांना फोन करतो आणि तुला पोलिसांच्या ताब्यात देतो. तू इथून कुठेच जाऊ शकत नाहीस.
तुम्ही पोलिसांना फोन करा. पण फक्त एकच विनंती मला फादरजवळ, जिझससमोर कन्फेस करू द्या. कारण याशिवाय माझ्याजवळ काहीच पर्याय नाही, नव्हता. मी उत्तरले. अन् इथे आले.
फादर माझं कन्फेशन संपलं. आता मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. एक- मी जोसेफचा खून केला का त्याला मुक्ती दिली? दोन- त्या जिवंत मांसाच्या गोळय़ाचा कुणालाच फायदा नाही, अशावेळी त्याचा नाश करणं हा खून कसा, मी चुकले की बरोबर? मी जर चूक केली, गुन्हा केला तर त्याचे प्रायश्चित्त, शिक्षेस मी तयार आहे.’’
‘‘माय चाइल्ड, मे गॉड ब्लेस यू. तू स्वत: इथे आलीस, तुला तुझ्या कृत्याचं वाईट वाटलं. ठीक आहे. पण मुली जिझस म्हणतो, रुग्णाची सेवा करणं, त्याची व्यथा कमी करणं हे एक पुण्याचं काम आहे. पण जिवंत जिवाचा प्राण घेणं नाही. तू हे एक पाप केलंस, पण दुसऱ्या अर्थानं तू त्याच्या वेदनेला संपविलं, त्याला मुक्ती दिलीस, याला कदाचित पुण्य म्हणता येईल. पण कायद्याने हा गुन्हाच ठरतो. दुसऱ्याला इच्छामरण देण्याची तरतूद नाही. याला माफी नाही, शिक्षा ही होणारच. त्याला सामोरी जा. जिझस तुला सामथ्र्य देवो.’’
तिने येशूला प्रेअर म्हटली, मला नमस्कार केला आणि चर्चच्या दारापर्यंत मी तिच्या पाठमोऱ्या व्यक्तित्वाला पाहात होतो. मनात एकच प्रश्न, तिने हे योग्य केलं कदाचित, तरीही ती दोषीच. असंही कन्फेशन असतं कधी तरी. ज्याला अनेक उत्तरं असतात, पण जे नको असतं तेच निश्चित करावं लागतं.
शरद वसंत तिळवणकर response.lokprabha@expressindia.com