08 July 2020

News Flash

गांगरलेली मुलं आणि गोंधळलेले पालक

मुठीतल्या मोबाइलमध्ये सगळी दुनिया सामावली जात असताना त्या वेगावर स्वार होणाऱ्या भल्याभल्यांची तंतरली आहे. अशा वेळी घराघरातल्या लहानग्यांचं नेमकं काय होत असेल? पोनरेग्राफी, व्यसनं, तथाकथित...

| November 14, 2014 01:31 am

lp18मुठीतल्या मोबाइलमध्ये सगळी दुनिया सामावली जात असताना त्या वेगावर स्वार होणाऱ्या भल्याभल्यांची तंतरली आहे. अशा वेळी घराघरातल्या लहानग्यांचं नेमकं काय होत असेल? पोनरेग्राफी, व्यसनं, तथाकथित प्रेमप्रकरणं हे लहान वयातच जे येऊ नये ते सगळं येऊन आदळत असताना त्याला सामोऱ्या जाणाऱ्या आजच्या किशोरवयीन पिढीचं आजचं वास्तव काय आहे? या मुलांचं काय चाललंय ते पालकांना समजतंय की तेही गोंधळून गेलेत? त्यांनी आपल्या मुलांना कसं सांभाळायला हवं?

काही महिन्यांपासून व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणारा एक संदेश..
‘‘एका लहान मुलाची निरागस प्रार्थना..
देवा माझ्या बाबाच्या मोबाइलमधील सर्व मुलींना थंडीपासून बचाव करता येतील असे कपडे दे. त्या खूपच गरीब आहेत बिचाऱ्या..’’
मिनिटागणिक भरकटणाऱ्या आणि दोन घटका मौज म्हणून वाचल्या जाणाऱ्या संदेशाप्रमाणे हादेखील आला आणि विरून गेला. त्यामागचा गर्भितार्थ किती जणांच्या लक्षात आला? बाबाचा मोबाइल नंगूपंगू चित्रांनी भरलेला आहे हे वास्तव ठसठशीतपणे अधोरेखित करणारा हा संदेश किती जणांनी गांभीर्याने घेतला? घरातील छोटय़ाशा निरागस घटकाला त्यातील लैंगिकता समजली नाही, पण त्याहून थोडय़ा मोठय़ा, लैंगिकतेची जाणीव झालेल्या मुलाने ही चित्रं बघितली असतील, तर त्याची प्रतिक्रिया काय असेल?
व्हॉट्सअ‍ॅप अथवा तत्सम माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहचलेला हा संदेश एका अर्थाने डोळे उघडणाराच आहे. गेल्या काही वर्षांत किशोरवयीन मुलं चुकली आहेत, भरकटलेली आहेत, व्यसनांच्या विळख्यात अडकलेली आहेत हा जो सूर वारंवार ऐकू येतो त्यावर चर्चा करताना खरं त्याच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे आणि या चर्चेची मुळे अशा छोटय़ाछोटय़ा घटकांमध्ये दडलेली आहेत.
आजच्या समाजात लक्षणीयरीत्या प्रभावी असणारं तरुणांचं वास्तव आज समाजाच्या सर्वच स्तरांना धडका देत असताना आजचा पालक हडबडतो आहे. आपली मुलं हाताबाहेर गेली म्हणून गोंधळून जात आहे, तर दुसरीकडे आम्ही काय गैर केलं म्हणून पौगंडावस्थेतील पिढी गांगरून जात आहे. आणि संपूर्ण समाजालाच कीड लागली म्हणून माध्यमं आगपाखड करू लागली आहेत. आमच्यावेळी असं काही नव्हतं म्हणून जुणेजाणते मध्येच आपल्या मतांची पिंक टाकून जात आहेत आणि गदारोळाचं चित्र उभं राहू लागलं आहे. तर सुजाण पालक विचार करू लागलेत, की सारंच संपलं आहे का? की काही आशेचा किरण बाकी आहे? आशेचे किरण तर अनेक आहेत. किशोरांच्या आयुष्यात प्रभावी असणाऱ्या या घटकांना ठामपणे तोंड देऊन त्यावर मात करणारीदेखील अनेक घरं आहेत. आपल्या पाल्याला चांगलेपणाची जाणीव करून देऊन त्यावर उपाय शोधणारे आणि समर्थपणे पुढे जाणारे पालकदेखील याच जगात आहेत. म्हणजेच आजचा हा समाज हा या दोहोंमध्ये विभागला आहे.

पालकांचा एकमेकांतील तुटलेला संवाद
विवाहबाह्य़ संबंध हा केवळ मालिकांमध्ये, कथा-कादंबऱ्यांमध्ये दिसणारा घटक आज अनेकांच्या आयुष्यात चोरपावलांनी आला असल्याचं अनेक मानसोपचारतज्ज्ञ नमूद करतात. विवाहबाह्य़ संबंध म्हणजे केवळ शारीरिक संबंध असं त्याचं स्वरूप नसून त्याला मानसिक भावभावनांचेदेखील पदर आहेत. दिवसातील बहुतांश काळ नोकरी-व्यवसायासाठी बाहेर असल्यामुळे जसा पालकांचा मुलांबरोबरचा संवाद तुटत चालला आहे तसाच त्याचा परिणाम पालकांच्या एकमेकांतील संवादावरदेखील झाला आहे. परिणामी मुलं ज्या परिस्थितीतून जात आहेत त्याच परिस्थितीत आपणदेखील असल्याचं अनेक पालकांना वाटू शकतं. अर्थात मुलं जशी भरकटतात तसे आपणदेखील भरकटू शकतो किंवा भरकटलेले आहोत, हेच अनेकांना लक्षात येत नाही.
आज अशा विवाहबाह्य़ संबंधांनी अनेक घरांत विसंवादाचं वादळ निर्माण होत असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. स्वत:ची संवादाची गरज म्हणून कदाचित अनेक पालक यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न करतील, पण हेच आपली मुलं करीत असताना आपण त्याकडे कसं पाहणार आहोत, हा प्रश्न प्रत्येकाने एकदा तरी स्वत:ला विचारून पाहण्याची गरज आहे; अन्यथा अनुकरण हा तर मुलांचा स्थायिभाव असतो, हे विसरून चालणार नाही.

या परिस्थितीवर मात करणं शक्य आहे, पण त्यासाठी गरज आहे ती परिस्थितीचे साकल्याने आकलन करण्याची, ती अभ्यासण्याची आणि त्यावर उत्तर शोधण्याची. म्हणूनच ‘लोकप्रभा’ने याच विषयावर मानसोपचारतज्ज्ञ, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्याशी चर्चा करून या विषयाची व्याप्ती समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
साधारण १९९१च्या आसपास जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला देशात सुरुवात झाल्यानंतर नोकरी व्यवसायाच्या संधी वाढू लागल्या, मध्यमवर्गीयांच्या हाती चार पैसे अधिक खेळू लागले. शहरीकरणाचा वेग वाढला आणि परिणामी आपल्या सर्वाचे आयुष्य गतिमान झालं. गावखेडय़ांचा आणि मध्यम शहरांचा प्रवास महानगरांच्या दिशेने होऊ लागला. या साऱ्या प्रवासात तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आणि इंटरनेटसारख्या माहितीच्या महाजालाने आपलं जगणं व्यापून टाकलं. ऑनलाइन हा परवलीचा शब्द बनून गेला. शहरीकरणाचा प्रचंड वेग आणि त्या वेगाला नव्या जीवनशैलीची (पाश्चिमात्य प्रभावाच्या) जोड मिळत गेली. प्रगतीच्या या वेगात अनेक चांगल्या गोष्टी आल्या तशा वाईटदेखील आल्या. त्यामुळेच केवळ चित्रपटात दिसणाऱ्या, अप्राप्य अशा गोष्टी सहज उपलब्ध होऊ लागल्या. तळहातावरील मोबाइलच्या चार-पाच इंचाच्या पडद्यात सारं विश्व सामावू लागलं. आजवर जुन्या पिढीने संस्काराच्या वर्खाखाली झाकून ठेवलेल्या गोष्टींना आव्हान मिळू लागलं. अर्थात पूर्वीदेखील हे सारं होतच होतं, पण फरक इतकाच की आजच्या इतकं एक्सपोजर तेव्हा नव्हतं. चोरून मारून जे काही मिळेल तेवढंच. आज या सर्वच बऱ्यावाईटांचा मारा महासागराच्या लाटांप्रमाणे आपणावर आदळू लागला आहे. नेमकं काय घ्यायचं आणि काय सोडायचं हेच अनेकांना कळेनासं झालं. ज्याला त्याला जसं जमेल तसं जो तो हवं नको करू लागला. त्यातच जुन्या संस्काराच्या प्रभावाखालील पिढी गोंधळात पडली आणि नव्या जुन्या जीवनशैलीच्या कात्रीत सापडलेली तरुणांची पिढी गांगरून गेली.
या साऱ्या घटनांचे मनोवैज्ञानिक विश्लेषण विचार करायला लावणारं आहे. ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी सांगतात की, ‘‘पहिलं प्रेम, पहिलं चुंबन, पहिली सिगारेट, पहिली दारू, पहिलं व्यसन करण्याचं पूर्वीचं वय कमी होऊन आज १३-१४ वयापर्यंत येऊन ठेपलं आहे. अगदी नववी-दहावीतील मुला-मुलींनी एकत्र येऊन दारू पिणं (ड्रिंक्स घेणं) हे आज अगदी सर्वच स्तरातील घरांत आणि शहरांत आढळणारं ढळढळीत वास्तव आहे. त्यातच अमली पदार्थाच्या वाढत्या फैलावाची त्याला जोड मिळाली आहे.’’ वयाच्या विशीपर्यंत दोन वेळा ब्रेकअप होणं हेदेखील सर्रास होऊ लागल्याचं डॉ. शेट्टी नमूद करतात. ते सांगतात की, ‘‘स्मार्टफोनमुळं आज प्रेमाचं पॅकेजच तयार झालं आहे. बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड आहे हा आजचा स्टेटस सिम्बॉल झाला आहे. तर जोडीला प्रेम, व्यसन, व्हिडीओ गेम हे तणाव दूर करण्याचे पर्याय ठरू लागले आहेत.’’
शालेय वयात व्यसनांच्या विळख्यात अडकण्याची शक्यता अधिक असल्याचं शिक्षकदेखील नमूद करतात. सुगंधी सुपारीपासून सुरू झालेला प्रवास गुटखा, सिगारेटपर्यंत कधी जाऊन पोहोचतो हेच कळत नाही. पौगंडावस्थेत प्रेमात पडणे, त्याचा मानसिक त्रास होणे, कधी कधी ते शरीरसंबंधापर्यंत पोहोचणे आणि त्यातून अनेक प्रश्न निर्माण होणे, सिगारेट, गुटखा, अमली पदार्थाचे व्यसन लागणे, नैराश्यामुळे पाल्याने पोनरेग्राफीच्या आहारी जाणे, अ‍ॅडिक्ट होणे, नैराश्यामुळे आत्महत्येच्या प्रयत्नांपर्यंत मजल जाणे, lp19किशोरांच्या जगात डोकावल्यावर मानसोपचारतज्ज्ञांपुढे येणारं हे आजचं वास्तव काही प्रमाणात तरी हादरवून सोडणारं आहे.
अर्थात हे काही सरसकट दृश्य नाही; पण त्याचा समाजातील प्रभाव जाणवण्याइतपत निश्चितच असल्याचं सारेच तज्ज्ञ कबूल करतात. त्यामुळेच मुलं चुकली कुठे हे शोधण्यापेक्षा हे सारं या पातळीपर्यंत आलं कसं, नेमकं काय घडलं, हे तपासणं आणि हे आपल्या घरी घडू नये आणि घडलंच तर त्याला सामोरे कसे जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
पण माध्यमातून सनसनाटी बातम्या येऊ लागल्या, की साहजिकच एक सामूहिक भीती पसरू लागते. त्यातच बहुतांश वेळा माध्यमांकडून अशा घटनांची मांडणी ही जगबुडी आल्याच्या भाषेतच केली जात असल्याचं मानसोपचारतज्ज्ञ सांगतात. त्यातच यापैकी एखादी जरी घटना स्वत:च्या घरात घडली, की मग मी मी म्हणणाऱ्या थोरामोठय़ांचा तोल जातो. हे असं कसं झालं, आम्ही तर इतकं काही करतो, पण आमच्या संस्कारी घरात हे असं काही? आज अनेक पालकांची हीच स्थिती आहे; पण नेमकी हीच वेळ पालकांनी सावरण्याची असल्याचे सारेच मानसोपचारतज्ज्ञ आवर्जून सांगतात. आपल्या पाल्यावर भडकून न जाता, त्याच्या चुकांसाठी त्याला दोष न लावता त्याला समजून घेणं हीच पहिली महत्त्वाची पायरी असल्याचं डॉ. हरीश शेट्टी सांगतात. ‘‘अशी एखादी घटना घडणे हे संकट न मानता त्याला संधी मानून आपल्या पाल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे,’’ असं ते नमूद करतात.

संवाद साधण्याची मोहीम उघडावी लागेल
शालेय वयात आईबाबांपेक्षा मुलांचा शाळेत अधिक काळ व्यतीत होत असतो. अशा वेळेस शिक्षकांशी असणारे संबंध हा खूप महत्त्वाचा घटक आहे. एके काळी शाळेतला शिक्षक हा मुलांच्या सर्वागीण जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत असे. मुलांच्या वागण्या-बोलण्यावर त्याचा प्रभाव असे. मुलांच्या अडचणी त्याला माहिती असत. त्यावरील उपाय शोधण्याचा तो प्रयत्न करीत असे. आज हा शिक्षक-विद्यार्थ्यांमधील संवाद काही प्रमाणात तरी तुटला आहे. इतकेच नाही तर आजचा शिक्षक या बाबत काहीसा उदासीनच झाला आहे, असे गेली २३ वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे बोरीवली येथील मंगूबाई दत्तानी विद्यालयातील शिक्षक प्रदीप तांबे सांगतात. जे काही त्याच्या समोर घडतंय त्यापुढे तो काही प्रमाणात तरी हतबल झाला आहे, असं म्हणावं लागेल. किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी शिक्षक हा खरं तर मित्रासारखा वाटला पाहिजे. पण आज ही परिस्थिती नसल्याचं ते नमूद करतात.
शालेय शिक्षणात आलेलं व्यापारीकरण यासाठी कारणीभूत आहे का, तर ते काही प्रमाणात खरं असल्याचं शिक्षकांशी चर्चा केल्यावर लक्षात येतं. नवनवीन शैक्षणिक धोरणांचा (नापास करायचं नाही, रागवायचं नाही, मनोभंग, तेजोभंग होऊ द्यायचा नाही) परिणामदेखील यावर झाल्याचं ते सांगतात. अर्थात नव्या पिढीतील शिक्षकाला याचं नीट आकलन न होणं हेदेखील यामागचं महत्त्वाचं कारण असल्याचं ते नमूद करतात. आदरयुक्त भीती आणि दहशत यातील फरक नव्या पिढीच्या शिक्षकांना उमगत नसल्याचं हे द्योतक आहे.
शालेय वयात मुलांनी भरकटण्याला दोन गोष्टी कारणीभूत असल्याचं प्रदीप तांबे नमूद करतात. घरातील विसंवादाला मुलं मित्रांमध्ये उत्तर शोधायचा प्रयत्न करतात. अशा वेळेस आपल्यावर असणारी बंधनं झुगारून देणाऱ्या मुलांकडे झुकण्याची प्रवृत्ती वाढत जाते. हाच प्रभाव मुलींच्या बाबतीत प्रेमात पडण्याला कारणीभूत ठरतो. मग अशा हिरोगिरी करणाऱ्या मुलांच्या जाळ्यात अडकण्याचा संभव वाढतो. त्यातच शाळांमधून दिल्या जाणाऱ्या लैंगिक शिक्षणाचा दर्जा पुरेसा म्हणण्याइतकादेखील नाही. किंबहुना मुलांच्या भावना, न्यूनगंड यांचा विचार करता त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी आजचं लैंगिक शिक्षण आणि शिक्षक दोघंही कमी पडतात, असं तांबे सर सांगतात. इतकंच नाही तर शिक्षकांना हे शिक्षण देताना कसं बोलायचं याबद्दलच न्यूनगंड असल्याचं ते नमूद करतात. तो आधी दूर करावा लागेल. या विषयावरील प्रशिक्षित व्यक्ती शिकवताना मात्र मुलं खुलेपणाने चर्चा करीत असल्याचं दिसून येत असल्याचा अनुभव ते सांगतात.
त्यामुळेच शालेय प्रशासन, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद वाढण्यासाठीचे प्रयत्न मोहीम म्हणून राबवण्याची आत्यंतिक गरज असल्याचं प्रदीप तांबे प्रतिपादन करतात.

आज आपण १०० वर्षांचं आयुष्य दहा वर्षांत जगू पाहात आहोत. जगण्याची गतीच इतकी वाढली आहे की, आपल्याला स्वत:कडेदेखील पाहायला वेळ नाही. त्यातूनच पालक-पाल्यातील, आई-बाबांमधील संवाद तुटतो आहे. डॉ. हरीश शेट्टी सांगतात की, ‘‘हे तुटणं गंभीर आजारापेक्षादेखील गंभीर आहे; पण आपण तुटलो आहोत हेच अनेक जण मान्य करत नाहीत ही सध्याची स्थिती आहे.’’ आज जे चित्र दिसते ते असे की, आठवडय़ातून एक-दोनदा मुलांबरोबरचे हॉटेलिंग किंवा मॉलमधील शॉपिंग किंवा पिकनिक हेच संवादाचे साधन मानण्याची अनेक पालकांची समजूत असते, तर आमच्या घरात कसलेही बंधन नाही, आम्ही सगळे मिळून दारू पितो, आम्ही एकदम फॉरवर्ड विचारांचे आहोत, असे सांगणारे पालकदेखील कमी नाहीत. अर्थात या मोकळेपणाच्या पलीकडे जाऊन संवाद कितपत होतो याचं उत्तर फारसं सकारात्मक नाही. आज हा संवादच सर्वात अधिक महत्त्वाचा आहे. संवादातील अडथळे आणि परिमाणं स्थलकालपरत्वे बदललेले आहेत हेच अनेकांना उमगत नाही. त्यामुळेच आधी आपलं तुटलेपण मान्य करायला हवं आणि एकदा का हे तुटलेपण मान्य केलं, की बाकीचे प्रश्न सुटणे सोपे होते, असंच तज्ज्ञांचं सांगणं आहे.
दारू एकत्र पिण्याने समस्या सुटतात, असा जावईशोध लावणाऱ्यांनी खरं तर गंभीरपणे विचार करायला हवा, कारण जर आपला संवाद त्याआधीच असेल, बऱ्या-वाईटाची जाण झाली असेल, तर तुम्हाला एकत्र दारू पिण्याची गरजच भासणार नाही, हे तज्ज्ञ नमूद करतात. जगात खूप चांगल्या गोष्टी आहेत हे जर मुलाला दाखवून दिलं, तर दारूएकत्र पिण्याची गरज भासेल काय, हा प्रश्न पालकांनी स्वत:ला विचारावा लागेल.
आज आपल्या समाजाची रचना बदलत चालली आहे. नातेवाईक तर दूरच, पण शेजाऱ्यांशी संपर्कदेखील कमी झाला आहे. इंटरनेटनं तर सगळं जगच व्हच्र्युअल करून टाकलं आहे. शेअरिंगसाठी फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅपचे पर्याय आले, तसे संवादाच्या काही पारंपरिक पद्धती मोडीत निघू लागल्या. अनेक वेळा आपल्या आईबापाजवळ बोलता यायचे नाही, ते व्यक्त होण्यासाठी नात्यातलाच नाही, तर आईबाबांच्या मित्रपरिवारातला एक काका, मामा, आजोबा कोणी तरी असायचा, जो या साऱ्या भावना समजून घ्यायचा, त्यातून निचरा व्हायचा. गरज पडलीच तर त्यांच्या आईबाबांशी बोलायचा आणि समस्या निकाली निघायची. lp23आज हा घटक कमी होत चालला आहे. पूर्वी काका, मामाचा हा बफर हा कुशनसारखा कामी यायचा. आज असे किती बफर शिल्लक आहेत? त्याचे उत्तर जर नकारार्थी असेल, तर ते पुनस्र्थापित करण्याचं काम पालकांना ठरवून करावे लागणार आहे.
आपल्या समाजात संस्कारांचं महत्त्व वेळोवेळी बिंबवलं आहे; पण कधी कधी संस्कारामध्ये एक प्रकारचं दडपण असल्याचं अनेकांचं मत आहे. संस्कार कितीही उच्च असले तरी आज बाह्य़ शक्तींचा रेटाच इतका प्रचंड आहे, की वाममार्गाकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. वयात येण्याचं प्रमाण आणि करिअरच्या वाटेवर स्थिर होत विवाहबंधनात अडकण्याच्या टप्प्यापर्यंतचा काळ खूप मोठा झाला आहे. या काळात संस्कार आणि बाह्य़ शक्तीचं द्वंद्व सुरूच असतं. संस्काराचा बडगा हा नाही म्हटले तरी करिअरच्या वाटेवर काही प्रमाणात तरी शिथिल होतो. आर्थिकदृष्टय़ा सुस्थापित असणं मुलांना वाममार्गाला खेचू शकतं.

गोंधळ सावरणारे पाच हायजिन
गांगरलेल्या मुलांच्या आणि गोंधळलेल्या पालकांच्या आजच्या परिस्थितीवर नव्या काळानुसार उपाय सुचवताना डॉ. हरीश शेट्टी पाच प्रकारचे हायजिन पाळण्याची गरज मांडतात. इमोशनल हायजिन, गॅझेट हायजिन, फिजिकल हायजिन, फिस्कल हायजिन आणि फॅमिली हायजिन.
गॅझेट हायजिनमध्ये लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाइल या सर्व गॅझेटचा वापर हॉलमध्येच करण्यावर कटाक्ष असावा. इंटरनेटवर काय पाहावं, काय पाहू नये हे आपल्या पाल्यास समजावून सांगावं. रात्री झोपण्यापूर्वी सर्व मोबाइल एकत्र असावेत. पालकांनीदेखील अत्यंत महत्त्वाचं काम नसेल तर फोन घेऊ नयेत.
फिस्कल हायजिनमध्ये घरातील सर्व आर्थिक व्यवहार मुलांना माहीत असावेत. मुलांसमोर आर्थिक विषयांवर पालकांनी आपापसांत ताशेरे ओढू नयेत. आर्थिक निर्णयात त्यांचा समावेश असावा. आर्थिक अडचणीदेखील मुलांना माहिती करून द्याव्यात, कदाचित तेदेखील एखादा चांगला मार्ग सुचवू शकतील.
फॅमिली हायजिनमध्ये प्रत्येक सणामध्ये पालकांनी मुलांबरोबर असलंच पाहिजे, तसेच घरातील एखाद्या व्यक्तीच्या आजाराप्रसंगी हॉस्पिटलमध्येदेखील मुलांना बरोबर ठेवावं. एक कुटुंब म्हणून त्यांना सर्व सुख-दु:खाची जाणीव असणं अत्यंत गरजेचं आहे.

मग त्या काळात आपल्या पाल्याने त्याची ती आर्थिक, शारीरिक ताकद कशी वापरायची? मानसोपचार तज्ज्ञ डॉ. वैशाली देशमुख एक गोष्ट प्रामुख्याने नमूद करतात. ‘‘आत्मकेंद्रित आयुष्याची सवय न लावणं गरजेचं आहे. मी, माझा, माझं करिअर, पैसा, गाडी, घर यापलीकडे जाताना त्याच्या क्षमतेला वाव देण्यासाठी या lp20चक्राच्या बाहेरचं त्याला पाहायला शिकविण्याची गरज आहे. त्यातूनच इतर मोहांकडे वळण्याची त्याची शक्यता कमी होऊ शकते.’’
मात्र त्यासाठी गरज असते ती मुळात संवादातून हा विश्वास तयार करण्याची. त्यासाठी मात्र ठरवून काही गोष्टी करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. हरीश शेट्टी नमूद करतात. रोज अर्धा तास जरी आपल्या मुलांशी आपण गप्पागोष्टी केल्या तरी खूप काही साध्य होऊ शकते, असे त्यांचे मत आहे. आम्ही रोजच आमच्या मुलांशी दिवसातून दहा वेळा मोबाइलवर बोलतो, असे सांगणारे पालक यावर आक्षेप घेऊ शकतात. पण मोबाइलवरून नेमके काय बोलतो हे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळेच पालकांनी काय आणि कसे बोलावे याचे प्रशिक्षण द्यावे लागते, असे डॉ. शेट्टी आवर्जून सांगतात. ‘‘दिवसभरातील हे बोलणे बऱ्याच वेळा कामाचे असते. त्यात संवाद कमी आणि विचारणा अधिक असते. मुलांच्या मानसिक पातळीवर (ट्रान्स) जाऊन संवाद साधला तर अर्थातच तुम्हाला अनेक गोष्टी न विचारतादेखील कळू शकतात, ज्या मोबाइलच्या संवादात होत नाहीत आणि त्यासाठी दिवसातला अर्धा तास तरी देणं गरजेचं असल्याचा फॉम्र्युला डॉ. शेट्टी सांगतात. आपल्यापाठी कोणी तरी आहे, आपल्या भावना शेअर करण्याचं ठिकाण हे आपले पालक आहेत, ही जर मानसिकता तयार झाली तर मग शेअिरगसाठी बाहेर शोधाशोध करायची गरजच राहणार नाही.
अर्थात या संवादाला दुसरादेखील पैलू आहे. कितीही मोकळा संवाद असला तरी आपला पाल्य आपल्याशी कधी कधी मोकळेपणाने बोलतोच, असे होत नाही. किंबहुना काही गोष्टी तो झाकूनच ठेवतो किंवा गरज पडली तरच व्यक्त करतो. पण एखादी गंभीर घटना घडल्यावर हा संवादाचा धागाच कामी येऊ शकतो, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वैशाली देशमुख आवर्जून सांगतात. मी अडचणीत असेन तर आईबाबा मला मदत करतील, हा विश्वास पाल्याला आश्वस्त करू शकतो, असे त्या नमूद करतात.
पण आज परिस्थिती अशी आहे की जगण्याच्या धावपळीत पालकांना वेळ नाही. शाळा, खासगी शिकवणी आणि घरी आईने अभ्यास घेणं अशा तिहेरी शाळेत मुलं अडकली आहेत. रात्री आई मोबाइलवर व्यस्त असते, वडील उशिरा घरी येतात, मग मुलांना रात्रीच वेळ मिळतो. अशा वेळी मोबाइल अथवा कॉम्प्युटर लॅपटॉपला चिकटणे हे मुलांच्या बाबतीत हमखास घडते. मग त्याला घरातील लोकांपेक्षा बाहेरील लोकांशी शेअरिंग करणं आवडू लागतं. पण आज बाहेर सारं काही आलबेल नाही. चांगली संगत असेल तर मुलं सावरू शकतं, पण तसे नसेल चार जण जे करतात तेच करण्याची प्रवृत्ती बळावू शकते आणि नेमकी हीच वेळ सावरायची असल्याचं मानसोपचारतज्ज्ञ सांगतात.

गेम अ‍ॅडिक्शन…
इंटरनेटच्या महास्फोटाने ज्या काही चांगल्या-वाईट सुविधा निर्माण केल्या त्यांपैकी व्हिडीओ गेम्सनी आज सर्वच वयोगटांतील मुलांचा ताबा घेतला आहे. तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलेलं हे करमणुकीचं साधन आज सर्वव्यापी झालं आहे. नैराश्यावर हमखास उपाय म्हणूनदेखील हा रामबाण इलाज समजण्याची प्रवृत्ती रूढ झाली आहे. त्यामुळे आम्ही दारू पीत नाही, अमली पदार्थ घेत नाही, पोनरेग्राफी पाहत नाही, आम्ही तर केवळ करमणूक म्हणून गेम खेळतो अशी बतावणी अनेक घरांत दिसून येते. त्यातूनच मग रात्रंदिवस व्हिडीओ गेम्सच्या जाळ्यात अडकायला होतं. हे अ‍ॅडिक्शन इतकं आहे की दारूची बाटली काढून घेतल्यावर दारूच्या अधिन माणसांची प्रतिक्रिया असते तीच प्रतिक्रिया कॉम्प्युटर बंद केल्यावर या लोकांची होते. असं डॉ. हरीश शेट्टी सांगतात. त्यातही हुशार विद्यार्थी हुशारीने गेम्स खेळून गेम रँकर होतात. त्यामागील गणित मांडताना डॉ. शेट्टी सांगतात की, आज तंत्रज्ञान ज्या वेगाने विकसित होत आहे त्या वेगाने क्लासरूम विकसित होत नाही. विद्यार्थ्यांच्या हुशारीला योग्य वाव न देणाऱ्या शाळा अनेक आहेत. पोनरेग्राफी, व्यसनं, प्रेम प्रकरणं, अमली पदार्थाच्या जोडीनेच या विषयाकडेदेखील लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असल्याचं त सांगतात.

अर्थात त्यासाठीच गरज आहे ती रिकनेक्शनची. आणि हा उपाय तुम्ही स्वत:पासून करायचा आहे त्यासाठी बाहेर जायची गरज नाही, असं डॉ. हरीश शेट्टी सांगतात. ‘‘कोणावर तरी दोषारोप करण्यापेक्षा धोका ओळखून त्यावर उपाय करणे महत्त्वाचं आहे. आपल्याकडून होणारी सकारात्मक अशी अगदी छोटीशी वर्तणूकदेखील lp21मुलांना योग्य मार्गाला लावू शकते. वेळ नाही म्हणून जर रोज अर्धा तास मुलांना देता येणार नाही, असे कारण सांगणारे अनेक पालक आहेत. पण अशा वेळेस दुसऱ्या एखाद्या निर्थक गोष्टीसाठी दिला जाणारा वेळ वापरा. ‘स्टील युवर टाइम अ‍ॅण्ड होल्ड यूअर टाइम’ हे सूत्र वापरण्याची गरज आहे. त्यातून तुम्हाला हमखास वेळ सापडेल. अगदी छोटय़ा छोटय़ा विषयांवर मारलेल्या गप्पादेखील खूप काही साध्य करू शकतात.’’ डॉ. शेट्टी पुढे सांगतात की मुलांमध्ये सामाजिक एकत्रितपणाची भावना रुजवा. छोटय़ा छोटय़ा सामाजिक कार्यक्रमात त्यांना सामील करा. समूहाची भावना त्यातून तयार होईल. अर्थात याच गोष्टी पालकांसाठीदेखील लागू होतात. आपल्या समस्यांसाठी संपूर्ण समाजाने एकत्र येणं हेदेखील गरजेचं आहे. संवादाची कमतरता असते तेथे मांडीवर डोकं ठेवून हळुवार गप्पा हा मुंडी मांडी फिलॉसॉफीचा वापर हा त्यातलाच एक प्रकार आहे.
आजची परिस्थिती अशी आहे की पालक आपल्या मुलांसाठी अनेक सुविधा द्यायला तयार असतात. चांगली शाळा, क्लासेस, छंद वर्ग, शिबिरं वगैरे वगैरे.. आम्हाला जे मिळालं नाही ते आमच्या मुलांना मिळावं ही त्यामागची त्यांची प्रामाणिक भावना. पण नेमकं काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं हेच न कळणारे पालकदेखील अधिक आहेत. आपल्याला मिळालं नाही ते द्यावं हे मान्य, पण आपल्याला जे संस्कार मिळाले ते त्यांना मिळावेत म्हणून आपण काय करतो हे ते स्वत:ला विचारतात का? आपण जर आयुष्यात सक्षमपणे, सुजाणपणे वावरत आहोत तर आपल्याला जे मिळालं ते आधी द्यावं आणि मग न मिळालेल्या गोष्टींकडे वळावं हे श्रेयस्कर.
याचाच संदर्भ सन्मानाने जगणं म्हणजे काय हे शिकवण्याशी निगडित असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. इन्स्टिंक्टच्या पलीकडचे सवंगपणाविरहित जीवन काय आहे, त्यातील आत्मिक आनंद मुलांना उमगू देणं हेच तर खरं पालकत्व असल्याचं ते नमूद करतात. मान्य आहे आज समाजात गढूळपणा वाढला आहे. स्वच्छ पाणी मिळणार नाही, पण त्याचा बाऊ करायचं कारण नाही. आचार-विचारात समृद्धी असेल, शांत स्वच्छपणे विचार केलात तर पाणी स्वच्छ करायला उसंत तरी मिळेल, हे सत्य आपणास उमगायला lp22हवं. आणि त्यासाठी कोठेही बाहेर जाण्याची गरज नाही. स्वत:मध्येच सारी उत्तरं तुम्हाला मिळतील.
अर्थात याच समाजात अनेक घटक असे आहेत की ज्यांनी या साऱ्या प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांना मार्ग दाखविणारे कोणी ना कोणी तरी होते. सरतेशेवटी बालमानसोपचारतज्ज्ञांनी दिलेलं एक महत्त्वाचं उदाहरण येथे द्यावंसं वाटतं. आई सोडून गेलेली, वडील व्यसनात बुडालेले, मार्गदर्शन करणारं कोणी नाही, असा एक मुलगा भविष्यात अत्यंत यशस्वी होतो. गावाला वाटत असतं की हा नक्की बिघडणार, वाममार्गाला लागणार पण त्याला मिळालेलं यश पाहून हे कसं काय साध्य केलंस हा प्रश्न येतोच. तो सांगतो, ‘‘आई निघून गेलेली, वडील रोज रात्री दारू पिऊन यायचे. पण आल्यावर मला ते सांगायचे, मुला माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तु माझं सर्वस्व आहेस. माझ्यावर प्रेम करणारं कोणी तरी आहे, माझी काळजी घेणारं कोणी तरी आहे, माझं म्हणून सांगू शकणारं कोणी तरी आहे, हेच माझ्यासाठी आश्वासक होतं. त्याच्याच जोरावर मी आज इथवर आलो.
शेवटी इतकंच सांगावंसं वाटतं की सारं काही संपलेलं नाही. बदलत्या काळानुसार आव्हानं बदलत जाणार आहेत, त्यांना स्वीकारत त्यावर उपाय कसा शोधता येईल, हे महत्त्वाचं आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्यातच दडलेली आहेत. गरज आहे ती मनातील गोंधळ दूर करून आजच्या गांगरलेल्या पिढीला सावरण्याची, त्यासाठी बाहेरून कोणीच येणार नाही हे काम पालकांनाच करावं लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2014 1:31 am

Web Title: confused children and parents
Next Stories
1 परखड शास्त्रीय माहितीची गरज
2 चित्रपटांतून उलगडणारं ‘त्यांचं’ भावविश्व
3 सोळाव्या वर्षी लॉग इन
Just Now!
X