मोबाइल नव्हते तेव्हा… तेव्हाही संपर्क परिपूर्णच!

मोबाइलने आज आपलं जग पूर्ण बदलून टाकलंय. संपर्क ही इतकी सहजसोपी गोष्ट झाली आहे की एकेकाळी मोबाइल नव्हते तेव्हा लोक ट्रेकला जाण्याआधी, जाताना आणि गेल्यावर एकमेकांशी संपर्क कसा साधायचे असा प्रश्न पडावा. म्हणूनच मोबाइल नव्हते तेव्हाच्या काळाची सफर-

मोबाइलने आज आपलं जग पूर्ण बदलून टाकलंय. संपर्क ही इतकी सहजसोपी गोष्ट झाली आहे की एकेकाळी मोबाइल नव्हते तेव्हा लोक ट्रेकला जाण्याआधी, जाताना आणि गेल्यावर एकमेकांशी संपर्क कसा साधायचे असा प्रश्न पडावा. म्हणूनच मोबाइल नव्हते तेव्हाच्या काळाची सफर-
पस्तीसेक र्वष झाली असतील त्या घटनेला. तीस मित्र-मैत्रिणींचा ग्रुप घेऊन वनट्री हिलमार्गे माथेरानला गेलो होतो. रात्री तीनच्या दरम्यान गाडी कर्जतला पोहोचली. ताबडतोब आम्ही चालायला सुरुवात केली. थांबत विश्रांती घेत अकरा तासांनंतर दुपारी दोन वाजता माथेरान स्टेशनपाशी आलो. सोबतचे डबे उघडून सगळ्यांनी उदराग्नी शांत केला. वर भरपूर पाणी ढोसलं आणि तास-दीड तासाने परतीच्या प्रवासाची तयारी सुरू झाली. काढलेले शूज पायात घालून मंडळी लेस बांधत असतानाच मी सूचना द्यायला लागलो. आता ‘अमन लॉज’ स्टेशनपर्यंत रेल्वे रुळाला समांतर चालत राहायचं, रेल्वे मार्गाची साथ अजिबात सोडायची नाही. पुढे दस्तुरीवरून मातीच्या रस्त्यानं चालत नेरळ गाठायचं. ‘थांबू नका, दमू नका साडेसहाची गाडी मिळाली तर आपण साडेआठ-नऊपर्यंत घरी पोहोचू.’ सगळ्यांनी सूचना ऐकली असेल असं समजून मी ऑर्डर सोडली, ‘चला निघा आता’. पाठीवर सॅक मारून निघालेल्यांबरोबर मीही चालायला लागलो. ‘उताराचा रस्ता आहे, वाट सरळ आहे, चुकण्याची शक्यता अजिबात नाही’ असा विचार करून मी माझा वेग वाढविला. तशी सगळीच मंडळी थट्टा-मस्करी करीत फर्लाग-दीड फर्लागाच्या टप्प्यात चालत होती. दोन-अडीच तासांत आम्ही नेरळ स्टेशनवर पोहोचलोसुद्धा! खाली आलेल्यांची मोजणी केली तर चार डोकी कमी असल्याचं लक्षात आलं. पुन्हा मोजणी केली, पण तीसपर्यंत आकडा येईना. मग खिशातील यादी काढून हजेरी घेतली तेव्हा दोन मुली आणि दोन मुलगे आले नसल्याचं निश्चित झालं. ‘हळू चालणारी’ म्हणून प्रसिद्ध असलेली ती चौघं ‘येतील अध्र्या तासात’ म्हणून आम्ही प्लॅटफॉर्मवरच्या मोकळ्या जागेत सॅक डोक्याखाली घेऊन पाय लांब केले. अर्धा तास सरला, तास उलटला, सात वाजले. प्लॅटफॉर्मवरचे दिवे लागले तरी चौघेजणं आली नाहीत म्हटल्यावर डोक्यात प्रश्नांची गरगर सुरू झाली. ‘जंगलात वाट चुकले का? कडय़ाकडे गेले नसतील ना? एखादं सरपटणारं जनावर पायात आलं नसेल ना..? की..’ जसजसा वेळ पुढे सरकत होता तशी छातीतील धडधड वाढत होती. काळोख इतका झाला होता की, माथेरानचा अख्खा डोंगर त्यात विरून गेला होता. ‘त्यांना शोधण्यासाठी मागे जायचं तर कुठवर जायचं?’ शेवटी ‘आणखी अर्धा तास वाट पाहावी असं ठरलं. थट्टा-मस्करी करणारे सगळेच आता मुके झाले होते. मुदतीचा अर्धा तास संपला. आता लीडर म्हणून मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार होता. मी बरोबरच्या दोघांना म्हणालो, ‘चला रे..’ बॅटऱ्या हाती घेऊन आम्ही माथेरानच्या रस्त्याला लागलो. एखादा किलोमीटर गेलो असू आणि चार आकृत्या समोरच्या काळोखातून पुढे येताना दिसल्या. आम्ही नावानं हाका मारल्या तेव्हा त्यांनी क्षीण ‘ओ’ दिला. माझ्या जीवात जीव आला. ‘काय रे कुठे थांबला होता?’ ते चौघे जवळ आली तेव्हा मी दमात घेतलं.‘थांबलो कुठे? चालतोच आहेत.. रेल्वे ट्रॅकवरून.’

भेटीचं स्थळ, गाडीची वेळ, उतरण्याचं स्थानक, एस्टीचं टायमिंग या गोष्टींबरोबर गाडीच्या कोणत्या डब्यातून प्रवास करायचा आहे हेही ठरलेलं असायचं. त्यात कधीही बदल केला जात नसे. त्यामुळे मधल्या स्टेशनवर चढणारी मंडळी ठरलेल्या गाडीत, ठरलेल्या डब्यात चढायची.

‘म्हणजे तुम्ही रेल्वे ट्रॅकने चालत आलात?’ आणखी एक प्रश्न.
‘तूच तर सांगितलं होतंस ना रेल्वे ट्रॅकची साथ सोडू नका म्हणून.’
मी माझ्याच कपाळावर हात मारून घेतला. अर्धीच सूचना ऐकून ती चार मंडळी रुळावरून चालत अमन लॉज स्टेशनच्या पुढे चालत राहिली आणि चार-पाच किलोमीटरचं अधिक अंतर चालून नेरळला दोन तास उशिरा आली होती.
आजच्या मोबाइलच्या जमान्यात असं घडलं असतं तर चुकलेल्या मंडळींशी काही सेकंदांत संपर्क साधता आला असता आणि सूचना देऊन त्यांना योग्य मार्गावर आणताही आलं असतं. मात्र मोबाइल्सची ओळखही नसलेल्या त्या जमान्यात असे चुकामुकीचे प्रसंग हाताच्या मोजण्याइतकेच घडायचे. त्याला कारण होती ती त्या काळातील गिर्यारोहकांच्या संस्था आणि क्लब्सची कार्यपद्धती शिस्त.
महाराष्ट्रातील गिरिभ्रमणाचा विचार करता १९८०-९०च्या दशकात हायकिंग ट्रेकिंगचा छंद असा काही वेगानं पसरला होता की, आज अमृतमहोत्सवी टप्पा ओलांडणाऱ्या अनेक गिर्यारोहण संस्था आणि हायकर क्लब्सची स्थापना त्याच काळात झाली होती. शनिवार-रविवारी ही सगळी भटकी मंडळी सह्य़गिरीच्या दऱ्याखोऱ्यात, कडय़ाकपारींतून भटकताना दिसायची. संपर्काची साधनं मर्यादित स्वरूपात असतानाही गिरिभ्रमणाचे, ट्रेकिंगचे कार्यक्रम अगदी शिस्तबद्ध पद्धतीने होत असायचे.
मालाडची ‘नेचर्स लव्हर्स’ हल्ली एसएमएसच्या माध्यमातून आपले कार्यक्रम आणि उपक्रम सभासदांपर्यंत पोहोचवित असली तरी तीस-पस्तीस वर्षांपूर्वीची त्यांची संपर्काची पद्धत वेगळी होती.
‘मंगळवार हा आमचा मीटिंगचा दिवस असायचा’ नितीन जाधव ‘नेचर लव्हर्स’बद्दल सांगत होते. ‘अॅड. बळवंत मंत्रींच्या ऑफिसमध्ये आम्ही सगळे न चुकता मंगळवारी हजर असायचो. त्या बैठकीत वेगवेगळ्या कार्यक्रमा-उपक्रमावर चर्चा व्हायची. ट्रेकिंग प्रोग्रॅम्सची आखणी त्याच बैठकीत व्हायची. भ्रमंतीचं ठिकाण, जमण्याची जागा, दिवस, वेळ, अंदाजे खर्च या सगळ्या गोष्टी ठरवून लीडर म्हणून एखाद्या सभासदावर त्या कार्यक्रमाची जबाबदारी दिली जायची. एकाच बैठकीत पुढील तीन महिन्यांचे कार्यक्रम ठरायचे. त्या कार्यक्रमाचं सक्र्युलर-माहितीपत्रक काढलं जायचं. मीटिंगला येणाऱ्या सभासदांना भ्रमण कार्यक्रमांची माहिती मिळायचीच शिवाय प्रत्येकाला ती पत्रकं घरच्या पत्त्यावर पाठविलीही जायची. मीटिंगमध्येच कोण कोण येणार? हेही सांगितलं जायचं. आणि एकदा का सभासदानं येण्याचं कबूल केलं की तो यायचाच. आयत्या वेळी ‘नाही येत’ म्हणून सांगायची पद्धत त्या वेळी नव्हती.’
जवळजवळ सर्वच हायकर्स क्लब्सचे साप्ताहिक बैठकीचे दिवस आणि जागा ठरलेल्या असायच्या. पिनॅकल क्लबच्या संतोष कल्याणपूर यांनी सांगितलं, ‘दादर पूर्वेला स्टेशनला लागूनच असलेल्या मारुती मंदिरासमोर आज जे साऊथ इंडियन हॉटेल आहे तिथं पूर्वी इराण्याचं हॉटेल होतं. दर गुरुवारी सात नंतर आम्ही तिथं जमायचो. तासाभरात मीटिंगला आलेल्यांची संख्या वीसचा आकडा पार करून जायची. सुरुवातीला हॉटेल मालकानं आम्हाला सहन केलं पण, पुढे पुढे त्यानं ‘उठा, निघा’ अशी भुणभुण लावायला सुरुवात केली. उगीच किटकिट नको म्हणून पुढे आम्ही मीटिंगची जागा बदलली. आणि दर गुरुवारी प्लाझा समोरच्या कोतवाल गार्डनमध्ये बैठक घ्यायला सुरुवात केली. आम्ही त्या वेळी कीर्ती कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही गिर्यारोहणाचे धडे देत होतो. क्लबच्या सभासदांबरोबर ती मुलंही गुरुवारी कोतवाल उद्यानात हजर व्हायची. संपर्कासाठी या बैठकांची आम्हाला खूपच मदत झाली.’
स्लीपर हायकर्सचे सभासद सुरुवातीला वांद्रय़ाच्या नंदादीप उद्यानात जमायचे. पुढे त्यांनीही बुधवारचा दिवस मीटिंगचं ठिकाण म्हणून कोतवाल गार्डन निश्चित केलं. पनवेलचे निसर्गमित्र पनवेलमध्येच देवरूखकरांच्या घरी आठवडय़ातून एकदा जमून निसर्गासंबंधीची फिल्म पाहताना तीन महिने आधीच भ्रमंतीचे कार्यक्रम निश्चित करून पत्रकं सभासदांना टपालानं पाठवून द्यायचे. तर ‘शैलभ्रमर’ने बैठकींसाठी चर्चगेट बी रस्त्यावर असलेलं युनिव्हर्सिटीचं क्लब हाऊस निवडलं होतं. साप्ताहिक बैठकींमुळे सभासदांपर्यंत कार्यक्रम पोहोचवणं, कामांची आखणी, भेटीची ठिकाणं ठरवणं सहज शक्य होऊन जायचं. एखादा सभासद बैठकीला येऊ शकला नाही तर नियमित पाठविल्या जाणाऱ्या सक्र्युलर्समुळे त्याला ट्रेकिंगचा कार्यक्रम कळायचा आणि आठ-दहा दिवस काही नाहीच कळलं तर मित्रांच्या ऑफिसमध्ये फोन करून तो ट्रेकिंग प्रोगॅ्रमची माहिती मिळवायचा.
‘भेटीचं स्थळ, गाडीची वेळ, उतरण्याचं स्थानक, एस्टीचं टायमिंग या गोष्टींबरोबर गाडीच्या कोणत्या डब्यातून प्रवास करायचा आहे हेही ठरलेलं असायचं. त्यात कधीही बदल केला जात नसे. त्यामुळे मधल्या स्टेशनवर चढणारी मंडळी ठरलेल्या गाडीत, ठरलेल्या डब्यात चढायची. गर्दीमुळे एखाद्याला तो डबा पकडणं अशक्य झालं तर शेवटच्या स्टेशनवर उतरून तो आम्हाला येऊन मिळायचा.’ शैलभ्रमरच्या अशोक पवार-पाटीलनं मोहिमेच्या ‘प्रवासा’ची माहिती सांगितली. तर ‘निसर्गमित्र पनवेल’चा धनंजय मदन म्हणाला, ‘एकदा का भेटीची वेळ आणि पुढच्या टप्प्यावर जाण्याची गाडी ठरली की त्या वेळेपर्यंत आणि ठरलेली एसटी सुटेपर्यंत लीडरला थांबावंच लागायचं. बरीचशी मंडळी आलीत म्हणून आधीची एस्टी पकडून पुढे निघू या असा निर्णय शक्यतो घेतला जायचा नाही. त्यामुळे एखादा सहकारी मागे राहिला असं क्वचितच घडायचं.’
‘गाडी-एस्टीतून उतरल्यावर ट्रेक सुरू करण्यापूर्वी सर्व सहभागींना आपल्याला कुठं जायचं आहे, वाटेवर कुठे कुठे चुकण्याची शक्यता आहे, महत्त्वाच्या खाणा-खुणा कोणत्या आहेत हे अगदी सविस्तरपणे समजावून सांगितलं जायचं. शेवटचा टप्पा दिसत असेल तर तो दाखवितानाच तिथवर नेणारा मार्गही सांगितला जायचा. त्यामुळे ट्रेकरुटवर भरकटण्याची शक्यता नसायची. ‘वाय झेड’मधून आम्ही इतके ट्रेक केले पण माणसं वाट चुकलीत असं कधी झालं नाही’, ऋ षीकेश यादवने आपला अनुभव सांगितला. संतोष कल्याणपूर म्हणाला, ‘ट्रेक सुरू करण्याआधीच आम्ही पुढचा आणि मागे राहणारा असे दोन लीडर ठरविलेले असायचे. भटकण्यासाठी आलेल्यांना सक्त ताकीद दिली जायची की, पुढच्या लीडरच्या पुढे कुणीही जायचं नाही आणि मागच्या लीडरच्या मागे राहायचं नाही. त्यामुळे ट्रेकरुटवर लीडर इतक्याच जबाबदारीनं सहभागी सदस्यही वागायचे.’
आता मोबाइल्सच्या मदतीनं आपण कुठे आहोत हे समजू शकतं आणि इच्छित स्थळी कसं जायचं याचा मार्गही मिळू शकतो. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी नव्या भटक्यांसाठी सह्य़ाद्री तसा ‘अनोळखी’च असायचा. मग ट्रेकला निघण्यापूर्वी वाटा-रस्त्याची माहिती घ्यावी लागायची. त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांची मदत घेतली जायची.
‘आता गिरिभटकंतीबद्दल माहिती सांगणारी शेकडो पुस्तकं बाजारात आलीत. त्या काळात आमच्यासाठी हरीश कापडियांचं ‘ट्रेक सह्य़ाद्री’ खूपच मार्गदर्शक ठरलं. त्या पुस्तकातील वर्णन आणि टप्पे स्मरणात ठेवूनच आम्ही सह्य़ाद्री च्या दऱ्याखोऱ्यांत फिरले.’ बाळा पांचाळ म्हणाला.
‘कधी कधी आम्ही एखादं अनोळखी ठिकाण निवडायचो. मग गावातील वाटाडय़ांना विचारीत, प्रसंगी त्यांना सोबत घेऊन डोंगरवाटा शोधत पुढे पुढे जायचो,’ रवींद्र पाटील त्यांच्या ट्रेकिंगच्या आठवणी सांगत होते. वाट चुकण्याबद्दल मत मांडताना ते पुढे म्हणाले, ‘पठार, कातळ, पाणवठे, जुनाट वृक्ष, देवळं, घुमटय़ा अशा खुणांमुळे आमचा मार्ग सुकर आणि सोपा व्हायचा. कधी कधी अचानक एखाद्या ठिकाणी दोन वाटा फुटायच्या तिथं योग्य वाटेवर खूण म्हणून डहाळय़ा, वाळलेलं गवत नाहीतर दगडांची लगोरी उभी करण्याची पद्धत होती. त्यामुळे मागून येणाऱ्यांना नेमकी वाट सहज समजून यायची. कधी कधी रात्रीच्या प्रवासाची वेळ आली तर दिशा निश्चित करण्यासाठी डोंगरांचे आकार उपयोगी पडायचे. आकाशातील ताऱ्यांच्या स्थितीमुळेही दिशा कळू शकतात. त्यासाठी भटक्यांना आकाशगंगेचं जुजबी ज्ञान असणं उपयोगी ठरतं.’
एखाद्या नवीन ठिकाणी किंवा जुन्याच ठिकाणी नवीन वाटेनं जाणारी काही भटकी मंडळी घरी परतल्यावर ट्रेक रूटचा नकाशा काढून तो आपल्या ट्रेकर मित्रांना पाठवीत असत. नेपाळमधील लांगटांग खोऱ्यात प्रथमच जाऊन आल्यानंतर संतोष सराफने त्या रूटचा कच्चा नकाशा तयार केला आणि मित्र-परिचितांना पाठविला. ट्रेकच्या सुरुवातीला असलेल्या धुनशे बाजार गावात राहणाऱ्या आणि लांगटांग ट्रेकसाठी संतोषला मदत करणाऱ्या बद्री धिमिरे नावाच्या शिक्षकांनी संतोषच्या त्या नकाशाची मदत घेऊन लांगटांग व्हॅली ट्रेकसाठी येणाऱ्या भटक्यांची व्यवस्था आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचा व्यवसायच सुरू केला. सह्य़ाद्रीतील काही भटक्यांनी नकाशांसह प्रसिद्ध केलेल्या सविस्तर लेखांमुळेही अनेक गिरिभटक्यांची भटकंती बिनचूक होत असे.

पूर्वी साप्ताहिक बैठकांमुळे माणसं एकत्र यायची, मनानं जोडली जायची. वसा घेतल्यागत डोंगरदऱ्या भटकायची, क्लबने खांद्यावर दिलेली कामं टाळाटाळ न करता करायची. कितीही अडचणी असल्या तरी ट्रेकिंग प्रोगॅ्रमला वेळेवर हजर व्हायची.

चोख आखणी आणि शिस्तपालन करूनही रस्ता चुकण्याचे प्रसंग घडतच नव्हते असं नाही. रात्रीच्या वेळी रानात चुकलेल्यांना वाटेवर आणण्यासाठी गवत-पानं-काटक्या जाळाव्या लागत असत. एखादा गट चुकीच्या मार्गानं गेला असं समजलं की ‘एऽओ, एऽओ’ चे हाकारे दिले जायचे. सादाची दिशा लक्षात घेऊन चुकलेल्यांचा प्रतिसाद यायचा. एक एक शब्द उच्चारीत ‘कुठून कुठे वळायचं’ याच्या सूचना दिल्या जायच्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रुपमधील सगळे एकत्र गोळा झाल्यावरच पुढे प्रस्थान केले जायचं.
‘त्या काळात कित्येकांच्या घरी साधे टेलिफोनही नव्हते. मग एखाद्याच्या ऑफिसमध्ये फोन करून निरोप सांगितला जायचा. त्यानं तो निरोप पुढे कुणाकुणाला सांगायचा आणि कुणी कोणतं काम करायचं हे आधीच ठरलेलं असल्यामुळे निरोपापासून कामांपर्यंत सगळय़ा गोष्टी रीतसर होऊन जायच्या. हीच निरोपाची पद्धत त्या काळात सगळेच क्लब्स अवलंबायचे.
त्या काळात मुलांच्या बरोबरीनं मुलीही मोठय़ा संख्येनं ट्रेकिंगला यायच्या. त्या मुलींची जबाबदारी संस्थेवरच असायची. उशीर झाला तर मुलींना सुखरूप घरी सोडण्याची कामगिरी क्लबचे सदस्यच करीत असत. क्लबमधील वातावरण कौटुंबिक स्वरूपाचं असल्यामुळे मुलींचे पालकही निश्चिंत असायचे.
जी पद्धत गिरिभ्रमण कार्यक्रमांसाठी वापरली जायची, त्याच पद्धतीनं गिर्यारोहण मोहिमांची आखणीही व्हायची. सामानांच्या याद्या, प्रत्येकानं सांभाळायच्या जबाबदाऱ्या, अपघात न होण्यासाठी घ्यावयाची काळजी, अचानक एखादी अडचण उभी ठाकली तर उचलावयाची पावले या सगळय़ांची नेमकी आखणी आगाऊ होत असल्यामुळे मोबाइलसारखी संपर्क साधनं नसतानाही सह्य़ाद्री आणि हिमालयातील मोहिमा अगदी नीटपणे पार पडायच्या.
‘हिमालयातील शिखर मोहिमांमध्ये कित्येकदा आम्ही पाच पाच, सहा सहा कॅम्प सेट केलेत. एका कॅम्पवरून दुसऱ्या कॅम्पवर सामान वाहून नेण्यासाठी लोड फेऱ्या सतत चालूच असायच्या,’ हृषीकेश यादव हिमालयातील आरोहण मोहिमांसंबंधी सांगत होता, ‘लोड फेऱ्यांच्या दरम्यान एक क्लायंबर दुसऱ्याला प्रत्यक्ष भेटत नसायचा. त्यावर उपाय म्हणून कॅम्पवर ठरल्या जागी चिठ्ठय़ा ठेवल्या जायच्या. त्या चिठ्ठय़ांतील सूचनेप्रमाणे सगळी कामं बिनबोभाट होऊन जायची. आजही त्याच पद्धतीनं हिमालयातील मोहिमा पार पडत असतात.’
गिर्यारोहणाचं तंत्र वापरून दरीत पडलेले मृतदेह वर काढण्याची कामगिरी पार पाडतानाही गिर्यारोहकांकडून कधी चुका झाल्या नाहीत. कोकण कडय़ावर पडलेलं अरविंद बर्वे नावाच्या गिर्यारोहकाचा मृतदेह काढताना वॉकीटॉकीचा वापर करण्यात आला होता. मात्र मोहिमेत सहभागी झालेले गिर्यारोहक पूर्णपणे त्या संपर्क साधनावर विसंबून राहिले नव्हते. प्रत्येक टप्प्यावर थांबलेल्या सदस्यानं केव्हा काय करायचं हे आधीच ठरलेलं होतं. ‘रेस्क्यू ऑपरेशन’मध्ये सहभागी असलेल्यांची संख्या पन्नासच्या घरात होती. त्या सर्वाना नीटपणे मुख्य तळावर पोहोचता यावं म्हणून दोन दिवस आधीच वाटेवर चुन्यानं दिशा दाखविणारे बाण रंगविले होते.
हे सगळं जरी असलं तरी काही प्रस्तरारोहणातील अपघात संपर्काअभावी उशिरा कळण्याच्याही घटना त्या काळात घडल्या. अशी एक घटना दिलीप झुंजाररावकडून ऐकायला मिळाली.
‘हॉलिडे हायकर्स क्लबने १९७८ साली रायगडजवळचा लिंगाणा सुळका प्रथम सर केला. सह्य़ाद्रीतील या कठीण मोहिमेला वर्तमानपत्रातून खूपच प्रसिद्धी मिळाली. त्या मोहिमेत सहभागी असलेल्या संतोष गुजरने एका वर्षांनंतर एकटय़ानंच हा सुळका सर करण्याचा निर्णय जाहीर केला. क्लबच्या जाणत्या गिर्यारोहकांनी आणि संतोषच्या कुटुंबीयांनी विरोध करूनही संतोषनं निर्णय बदलला नाही. शेवटी आम्ही विलास जोशीला संतोष सोबत पाठविलं. विलासला रायगडावर थांबायला सांगून संतोष ‘सोलो क्लायंबिंग’ करायला लिंगाण्याकडे गेला. लिंगाणा सर केल्यानंतर भवानी टोकापाशी थांबलेल्या विलासला संतोष खाणाखुणा करून कळविणार होता. पण ते घडलंच नाही. दोन दिवस उलटून लिंगाणाच्या माथ्यावर संतोष दिसला नाही तेव्हा विलास हबकला. महाडला येऊन त्यानं मुंबईला कळविलं तोपर्यंत आणखी दोन दिवस निघून गेले. लिंगाणा सर करताना अपघात होऊन संतोष गेला होता.’ हे सांगताना दिलीप काही क्षण थांबला. मग त्यानं २००३ची गोष्ट सांगायला सुरुवात केली. लिंगाणा आरोहणास २५ वर्षे झाली म्हणून मूळ मोहिमेत सहभागी असलेले काही सदस्य, त्यांचे कुटुंबीय यांना एकत्र करून आम्ही २००३ मध्ये लिंगाणाची रौप्यमहोत्सवी आरोहण मोहीम आखली आणि लिंगाण्याच्या माथ्यावर पोहोचलो. त्या मोहिमेत मूर्ती नावाच्या क्लबच्या सभासदाचा मुलगा होता. लिंगाण्याच्या माथ्यावर असताना मोबाइलवरून त्यानं आईला फोन लावला, ‘मम्मा आय अॅम ऑन द टॉप ऑफ लिंगाणा पिनॅकल.’ पंचवीस वर्षांत गिर्यारोहण क्षेत्रातही मोठा बदल झाला होता.’
आज संपर्काची दुनिया कल्पनेपलीकडे बदललीय. सेकंदभरात जगातील कोणतीही माहिती आपल्या हातातील मोबाइलवरून मिळू शकते. त्यात सह्य़ाद्रीचे डोंगर-कडे आणि ढोरवाटाही आल्याच. माहितीचं क्षेत्र इतकं रुंदावलं की पूर्वीसारखा पूर्वतयारीतील अर्लटनेस काही प्रमाणात का होईना कमी झाला. अर्था अजची पिढी या तंत्रज्ञानाचा वापर पुरेपुर करुन घेत आहे हे नक्की.
पण ‘पूर्वी साप्ताहिक बैठकांमुळे माणसं एकत्र यायची, मनानं जोडली जायची. वसा घेतल्यागत डोंगरदऱ्या भटकायची, क्लबने खांद्यावर दिलेली कामं टाळाटाळ न करता करायची. कितीही अडचणी असल्या तरी ट्रेकिंग प्रोगॅ्रमला वेळेवर हजर व्हायची. तसंच कारण असलं तर ‘येता येणार नाही’ म्हणून ट्रेकच्या आधी दोन दिवस निरोप धाडायची. आयत्या वेळी नकार कळविताना अपराधी व्हायची. आता हायकिंग-ट्रेकिंगमध्ये पूर्वीसारखी बांधीलकी राहिली नाही.’ असाच सूर जवळजवळ सर्वच जुनेजाणते लावीत असतात.
शेवटी एकच, एखादा छंद जेव्हा मनाचा तळ गाठतो तेव्हा तो मनापासून जोपासला जातो. मोबाइलचं युग यायच्या आधी संपर्क, दळणवळण, वाहतुकीची साधनं कमी असूनही निसर्ग सान्निध्यासाठी वेडी झालेली माणसं, उन्ह, वारा, पाऊस, पाणी कशा-कशाची पर्वा न करता आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही चुका न करता सह्य़गिरीच्या अंगाखांद्यावर झपाटल्यागत भटकत होती आणि रानावनाच्या भेटीचा आनंद मनसोक्त घेत होती. अर्थात मोबाइल असो कींवा नको डोंगराशी बांधीलकी महत्त्वाची.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Connect when mobile was not existing

ताज्या बातम्या