21 August 2019

News Flash

शिवप्रेमाचा लज्जास्पद लिलाव

एका विदेशस्थ भारतीयाने तेथील भारतीयांना प्रेरणादायी ठरावे आणि मायदेशाची आठवण सतत राहावी यासाठी प्रसिद्ध भारतीय चित्रकारांकडून स्वातंत्र्यसंग्रामाशी संबंधित नेत्यांची चित्रे करवून घेण्याचा निर्णय...

| July 11, 2014 01:32 am

एका विदेशस्थ भारतीयाने तेथील भारतीयांना प्रेरणादायी ठरावे आणि मायदेशाची आठवण सतत राहावी यासाठी प्रसिद्ध भारतीय चित्रकारांकडून स्वातंत्र्यसंग्रामाशी संबंधित नेत्यांची चित्रे करवून घेण्याचा निर्णय घेतला. या चित्रांच्या प्रिंट्स काढून त्याची विक्री करण्यात येणार होती. या प्रिंट्स भारतीयांनी घरोघरी लावाव्यात आणि भारताची आठवण जिवंत ठेवावी व मनात ऋण राहावेत, अशी त्यामागची धारणा होती. त्यासाठी एका सुप्रसिद्ध चित्रकाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र चितारण्यास सांगण्यात आले. बाबासाहेबांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा प्रसंग म्हणजे महाडच्या चवदार तळ्यावरचा. त्या प्रसंगाची निवड करण्यात आली. आजवर काही चित्रकारांनी हा प्रसंग चित्रितही केला आहे. ही काही पहिलीच वेळ नव्हती त्यावरचे प्रसंगचित्र करण्याची; पण या चित्रकाराने केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र विशेष गाजले. कारण इतरांनी केवळ चवदार तळ्याच्या पाश्र्वभूमीवर बाबासाहेब दाखवले होते.
यापूर्वीच्या चित्रात जशी पाश्र्वभूमी होती तसेच चित्रण इतरांनी केले होते. मात्र हा चित्रकार वेगळा ठरला, त्याचे चित्रही खूप वेगळे ठरले, कारण तो मुळात अभ्यासपूर्ण काम करणारा सृजनशील चित्रकार होता. चित्राचे काम मिळाल्यानंतर या चित्रकाराने थेट चवदार तळे गाठले आणि त्या परिसराचा अभ्यास केला. ज्या वेळेस तो प्रसंग घडला त्या वेळची परिस्थिती आणि आताची यात जमीनअस्मानाचे अंतर आहे. आजूबाजूला जुनी घरे जाऊन नव्या पद्धतीची घरे आली आहेत. मग कळणार कसे की, जुनी घरे कशी होती. मग बाबासाहेबांचा प्रसंग घडला त्या वेळेस तेथे असलेली आणि आज हयात असलेली व्यक्ती त्यांनी शोधून काढली. त्यांच्याकडून त्या वेळच्या घरांच्या रचनेची माहिती घेतली. जुन्या पद्धतीची रचना असलेली चवदार तळ्याच्या परिसरातील घरे शोधली. त्यांच्याकडून संपूर्ण परिसर कसा होता त्याचे वर्णन घेतले, त्यानुसार स्केचिंग केले. ते त्यांना दाखवले आणि या साऱ्या अभ्यासप्रक्रियेतून पुढे जात ते चित्र साकारले. अर्थातच हे एवढे सारे केल्यानंतर त्या सिद्धहस्त चित्रकाराच्या हातातून एक अनमोल कलाकृती न साकारते तर नवलच होते. ते चित्र केवळ अभ्यासपूर्णच नव्हते तर कलात्मक पातळीवरील उत्तम चित्राचे सर्व निकष पूर्ण करणारे होते. या सिद्धहस्त चित्रकाराचे नाव आहे वासुदेव कामत. ‘लोकप्रभा’च्या वाचकांना कामत यांचे नाव काही नवीन नाही. ‘लोकप्रभा’च्या प्रेमाखातर अनेकदा कामत यांनी त्यांच्या अनमोल चित्रांचा वापर करण्याची परवानगी मुक्तहस्ताने दिली आणि ‘लोकप्रभा’नेही त्यांचा मान राखत दरखेपेस चित्र वापरताना त्यांचा स्पष्ट उल्लेख करत त्यांच्या स्वामित्व हक्कास बाधा पोहोचू दिली नाही.
या साऱ्याचा इथे स्पष्ट उल्लेख करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वासुदेव कामत यांनी चितारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्राच्या प्रकरणात कॉपीराइट्स अर्थात स्वामित्व हक्काचा भंग झाल्याचा अतिशय गंभीर स्वरूपाचा आरोप होतो आहे. खरेतर स्वामित्व हक्काचा भंग हा कायदेशीर गुन्हा आहे. मात्र खून किंवा चोरी-दरोडा अशा प्रकरणांकडे जेवढे गांभीर्याने पाहिले जाते तेवढे गांभीर्य आज आपण कलाप्रकारांच्या बाबतीत मात्र पाळताना दिसत नाही. कलेच्या बाबतीत तर काय असे होतच असते, असे समाज नेहमी म्हणतो. पण आपण जगभरातील प्रगत समाजाचा एक आढावा घेतला तर असे लक्षात येईल की, सांस्कृतिक बाबींचे मूल्य नेमके जाणून त्यांची जपणूक करतो तोच समाज खऱ्या अर्थाने पुढारलेला किंवा सुसंस्कृत समाज म्हटला जातो. या पुढारलेल्या किंवा सुसंस्कृत समाजात कलेला अनन्यसाधारण असे महत्त्व असते. तुमच्या समाजातील कलेची स्थिती ही तुमचे पुढारलेपण किंवा सुसंस्कृतपणा सांगत असते, हे जगन्मान्य तत्त्व आहे. या जगन्मान्य तत्त्वाला आपल्या समाजात मात्र पुरता हरताळ फासला गेला आहे, हे आजवर अनेकदा सिद्ध झाले असून वासुदेव कामत यांच्या गाजलेल्या शिवचित्राबाबतीत घडलेला प्रकार हा त्या निंदनीय बाबीवर शिक्कामोर्तब करणाराच आहे.
युती शासनाच्या काळात वासुदेव कामत यांनी ‘म्हाडा’साठी म्हणून एक शिवचित्र चितारले. आजवरच्या शिवचित्रांमध्ये हे सर्वाधिक वेगळे ठरणारे चित्र होते. कारण प्रथमच शिवाजी महाराज भारतीय बैठकीच्या पद्धतीत बसलेले त्यात दाखविण्यात आले होते. प्रसिद्ध कलावंत आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या चित्राला मंजुरी दिली. त्यातील भारतीय बैठकीची पद्धती त्यांना विशेष आवडली होती. या चित्राचे स्वामित्व हक्क एका करारानुसार कामत यांनी ‘म्हाडा’ला बहालही केले.
काही काळानंतर या चित्राचे अनोखेपण आणि त्याचे विक्रीमूल्य काही जणांच्या लक्षात आले. त्याचे थेट फोटो काढून त्याच्या प्रतींची विक्री करण्यास सुरुवात झाली. विजय खिलारे या बहाद्दराने तर (वाचा कव्हरस्टोरी) ‘म्हाडा’ने परवानगी नाकारल्यानंतरही त्या चित्राचा फोटो काढला आणि स्वत: चित्रकार नसतानाही किंवा कामत यांनी हे चित्र त्यांच्यासाठी काढलेले नसतानाही त्या स्वामित्व हक्काच्या अर्जावर मालक या रकान्यामध्ये स्वत:चेच नाव देऊन त्या चित्राचे स्वामित्व हक्क मिळवले. कायद्याने स्वामित्व हक्क मिळाल्यानंतर त्या बाबतीत इतर कुणीही काहीही करू शकत नाही. मात्र या बाबतीत मुळातच स्वामित्व हक्क मिळवताना खिलारे यांनी भारत सरकारपासून मूळ माहिती म्हणजेच मूळ चित्र हे वासुदेव कामत यांचे असल्याची माहिती शिताफीने दडवून ठेवल्याचा आरोप आहे. कारण मूळ चित्र कामत यांचे आहे हे उघड झाले असते आणि म्हाडाकडे त्या चित्राचे स्वामित्व हक्क असल्याचा करार आहे, हेही उघड झाले असते तर खिलारे यांना स्वामित्व हक्क मिळालेच नसते. किंबहुना त्यामुळेच त्यांनी हा बनाव रचल्याचा आरोप आहे.
हे करत असताना खिलारे यांनी महाराष्ट्रातील शिवप्रेमाचा भावनिक आसरा घेतल्याचाही आरोप होतो आहे. कारण त्यांनी हे करत असताना घरोघरी शिवप्रतिमा पोहोचवावी हा आपला प्रामाणिक हेतू असल्याचे सांगितले. पण मग हेतू प्रामाणिक होता तर मूळ माहिती दडवून का ठेवली, हा प्रश्न राहतोच. शिवाय वासुदेव कामत यांनी शिवप्रेमापोटी नवे चित्र का करून घेत नाही, असा प्रश्न विचारला त्याला उत्तर देणे टाळत खिलारे यांनी हा चित्रफोटोद्वारे कॉपी करण्याचा अप्रामाणिक मार्ग का स्वीकारला, या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर नाही. शिवछत्रपतींच्या प्रसारासाठी अप्रामाणिक मार्गाचा वापर तर छत्रपतींनीही निषिद्धच मानला असता.
केवळ एवढय़ावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी खोटेपणा करून मिळवलेल्या चित्राला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी मोठा सोहळाही घडवून आणला. त्यात बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या महनीय व्यक्तीलाही ते चित्र देऊन गौरविले. ही सारी शिताफी असल्याचा आरोप खिलारे यांच्यावर होतो आहे. कारण शिवचरित्राच्या बाबतीत बाबासाहेब हे अंतिम शब्द मानले जातात व महाराष्ट्र त्यांच्यावर व शिवचरित्रावर प्रेम करतो. बाबासाहेबांचा सत्कार म्हणजे त्या चित्राच्या बनवेगिरीला प्रतिष्ठा असेच समीकरण असल्याचा आरोप आता कलाक्षेत्रातून होतो आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना हे कळल्यानंतर ते या प्रकरणाचा निषेध व्यक्त करतील, अशी कलाक्षेत्राला अपेक्षा आहे. शिवछत्रपतींचे नाव घेऊन भावनांना हात घालायचा आणि त्यापाठी लाखोंचे व्यवहार करायचे ही सपशेल फसवणूक आहे.
चित्रकाराच्या बाबतीत यातील सर्वात वेदनादायी प्रकार म्हणजे हे डच चित्रकाराने काढलेले जुने चित्र आहे, असे सांगून त्याची तडाखेबंद विक्री करण्यात आली. ज्या सोहळ्यात त्याची विक्री झाली, त्याचे चित्रणही उपलब्ध आहे. नाव शिवाजी महाराजांचे घ्यायचे आणि चित्रकारांचा अशा प्रकारे धडधडीत अपमान करायचा ही नवी उदयाला येत असलेली संस्कृती महाराष्ट्रासाठी केवळ निंदनीय अशीच आहे. शिवछत्रपतींच्या प्रसारास या राज्यात कुणीच विरोध करणार नाही. वासुदेव कामतही म्हणतात की, छत्रपतींच्या प्रसारासाठी या चित्राचा वापर होणार असेल तर ते चांगलेच आहे. पण कायदा धाब्यावर बसवून आणि बनवेगिरी करून हे सारे होणार असेल तर ते छत्रपतींनाही अमान्यच असेल, कारण शिवरायांनी कधीच अप्रामाणिकपणा केला नाही. म्हणूनच तर महाराष्ट्र त्यांना वंदनीय मानतो. खरेतर भारतीय स्वामित्व हक्क कायदा, १९५७ आता २०१२ च्या सुधारणेनंतर अधिक कडक आणि परिपूर्ण होण्याच्या वाटेवर आहे. या सुधारणेदरम्यान दोन पावले सरकारने अधिक पुढे टाकली असून त्याद्वारे नैतिक अधिकार नावाची नवीन संकल्पना आणि अधिकार बहाल केले आहेत. म्हणजेच चित्रकार किंवा लेखकाने स्वामित्व हक्क कुणालाही दिलेले असले तरी त्या कलाकृती किंवा साहित्यकृतीवर त्याचा नैतिक अधिकार राहतो, असे कायद्यातील ही सुधारणा सांगते. त्यामुळेच आताच्या विद्यमान स्वामित्व हक्क कायद्यानुसार, ‘म्हाडा’कडे याचे स्वामित्व हक्क असले तरी चित्रकार म्हणून वासुदेव कामत यांचे नैतिक अधिकार अबाधित राहतात. वासुदेव कामत हे केवळ रूढार्थाने चित्रकार नाहीत, तर सृजनशीलतेच्या बाबतीतही अभ्यासपूर्ण मेहनत घेणारे चित्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्याच बाबतीत हा प्रकार घडावा हे केवळ निंदनीय नव्हे तर राज्यातील शिवप्रेमींसाठीही लज्जास्पद आहे. हा प्रकार तात्काळ थांबविण्यासाठी आता खरेतर राज्य सरकारनेच पावले उचलायला हवीत, कारण ‘म्हाडा’ झोपलेले आहे. शिवछत्रपतींची प्रतिमा हा राज्यासाठी संवेदनशील मुद्दा आहे. या चित्रामध्ये काही बदल करून त्यात मोडी अक्षरे घुसडवण्यात आली आहेत. भविष्यात अशा चित्रांवरून समाजमन कलुषित होणे टाळणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. शिवाय सुसंस्कृत समाजात कलावंतांचे अधिकार अबाधित राखणे हेही सामाजिक कर्तव्यच आहे. शिवछत्रपतींचा महाराष्ट्र भविष्यात याचे भान राखेल व पुरेशी काळजी घेईल, अशी अपेक्षा आहे.
 

First Published on July 11, 2014 1:32 am

Web Title: copyright act