News Flash

खुश तो बहुत होंगे आप!

एखादा स्विच दाबल्याप्रमाणे रस्त्यांवरून गाडय़ा, माणसं, त्यांचा कोलाहल, प्रदूषण सगळंच गायब झालंय.

खुश तो बहुत होंगे आप!
दुकानाबाहेर एक वेगळाच प्राणी उभा असल्याचं पाहून जपानमधला एक चिमुकला जागीच थांबला. नेहमीच्याच रस्त्यावर त्याने हरीण मुक्तपणे फिरताना पाहिलं होतं.

विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com

एखादा स्विच दाबल्याप्रमाणे रस्त्यांवरून गाडय़ा, माणसं, त्यांचा कोलाहल, प्रदूषण सगळंच गायब झालंय. आपल्यासाठी हे सारं अजबच! पण पार्क केलेल्या गाडीवर अचानक एखादा मोर पिसारा मिरवत बसलेला दिसला तर? जिथे साधी चिमणीही फिरकत नाही, तिथे थेट मोर दिसणं म्हणजे ‘धक्कादायकच’! पण तसं घडतंय खरं! जगाच्या कानाकोपऱ्यांत अनेक प्राणी, पक्षी सध्या पिंजऱ्यात अडकलेल्या माणसांना पाहायला फिरतायत. आपल्याला मोकळ्या रानातून उचलून पिंजऱ्यात डांबणाऱ्या, आपल्या हक्काच्या घरांवर कुऱ्हाड चालवून स्वतचे इमले बांधणाऱ्या माणसांना असं अडकून पडलेलं पाहून खूश तर नक्कीच झाले असतील ते!

रस्ते, इमारती, कारखाने.. खरं तर हे सगळं अनैसर्गिकच! आपणच आपलं ठरवून टाकलं की, हे अख्खं जग आपल्याचसाठी निर्माण झालंय आणि आपल्याच भोवती फिरतंय. माणूस हाच या सृष्टीचा केंद्रबिंदू. पण आपण म्हणालो, म्हणून वास्तव बदलत नाही ना! प्रगतीच्या नावाखाली आपण पसारा करत गेलो, निसर्गाला मागे मागे ढकलत राहिलो. आज अत्यंत नाइलाजाने, केवळ अपरिहार्यता म्हणून हा पसारा गुंडाळून ठेवण्याची वेळ आपल्यावर आली आहे.

रहदारीच्या रस्त्यावर तासन्तास एकही माणूस नाही, हे दृश्य आपल्यासाठी जेवढं अपरिचित, तेवढंच या निर्मनुष्य पाश्र्वभूमीवर एखादा वन्य प्राणी दिसणंही आश्चर्यजनक! पण गेल्या काही दिवसांत करोनाने हे घडवून आणलंय. सापळे-जाळ्या लावून आपल्याला पकडणारी, कधी बंदुकीच्या एका छऱ्र्यात सहज जीव घेणारी, मोकळ्या रानातून उचलून पिंजऱ्यात कैद करणारी आणि पिंजऱ्याबाहेर उभं राहून आपली गंमत पाहणारी माणसं स्वतच पिंजऱ्यात अडकलेली पाहून निसर्गाचे हे सर्व घटक खूशच झाले असतील!

साधारण आठ-दहा दिवसांपूर्वी मुंबईच्या पारसी कॉलनी भागात तीन-चार मोर दिसले. पार्क केलेल्या वाहनांवर बसलेले, रस्त्यावर बागडणारे मोर हे तिथल्या रहिवाशांसाठी आश्चर्यकारक दृश्य होतं. अनेकांनी तो क्षण मोबाइल कॅमेऱ्यात टिपला आणि समाजमाध्यमांवरही प्रसारित केला. डॉल्फिन पाहण्यासाठी मुंबईकरांना थेट रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गातले शांत-स्वच्छ किनारे गाठावे लागतात. पण गेल्या काही दिवसांत मुंबईच्या किनाऱ्यांवरही डॉल्फिन दिसल्याची दृश्ये समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. मलबार हिल आणि मरिन ड्राइव्ह परिसरात हे केवळ अशक्य वाटणारं दृश्य दिसलं. हरिणांचा एक कळप तिरुपतीतल्या मुख्य रस्त्यांवर फिरताना दिसला, तर कालिकतच्या रस्त्यांवर दुर्मीळ होण्याच्या मार्गावर असलेलं कस्तुरी मांजर फिरत असल्याचा व्हिडीओ नेटकऱ्यांनी व्हायरल केला. नोइडाच्या रस्त्यांवर नीलगायी दिसल्या तर काही ठिकाणी रानगवे दिसले.

भारताबाहेरही हीच स्थिती आहे. दुकानाबाहेर एक वेगळाच प्राणी उभा असल्याचं पाहून जपानमधला एक चिमुकला जागीच थांबला. नेहमीच्याच रस्त्यावर त्याने हरीण मुक्तपणे फिरताना पाहिलं होतं. नॉर्थ वेल्समधल्या रहिवाशांनी जेव्हा केवळ डोंगराळ भागांतच राहणाऱ्या केसाळ मेंढय़ा शहरातल्या रस्त्यांवर फिरताना पाहिल्या तेव्हा ते चकितच झाले. पॅरिसच्या काही शहरी भागांत रानडुक्करं दिसली, तर कुठे बदकांचे थवे रस्त्यावर रांगेत फिरताना आढळले. इंग्लंडमध्ये चक्क कोल्हा तर श्रीलंकेतही रस्त्यावर हरिण फिरत होतं. पोलंडमध्येही हरणांचे कळप दिसले.

एकीकडे माणसांपासून चार हात लांब राहणारे हे प्राणी आपल्याला मोकळं रान मिळाल्याचं पाहून सुखावले असताना, दुसरीकडे माणसाळलेले प्राणी मात्र गोंधळून गेले आहेत. ‘इतना सन्नाटा क्यू है?’ याचा शोध घेत ते आपल्या नेहमीच्या वस्त्या सोडून इकडे तिकडे भरकटलेले दिसत आहेत. भटके कुत्रे, मांजरी, माकडं, बदकं, कबुतरं ही आपल्याला खाऊ घालणारी गर्दी अचानक गायब झाल्याने चिंतेत आहेत. पोटापाण्याची सोय करण्यासाठी ते अन्नाच्या शोधात भटकताना दिसत आहेत. पर्यटकांची गर्दी कमी झालेल्या थायलंडच्या रस्त्यांवर माकडांच्या झुंडी बसलेल्या दिसत आहेत. लंडनमध्ये एका प्राणिसंग्रहालयातली काही हरणे गवताच्या शोधात शहरातल्या उद्यानांत फिरत आहेत. प्राणिसंग्रहालयांत राहणारे आणि सदैव माणसांच्या कोलाहलाने वेढलेले प्राणीही या अचानक झालेल्या बदलांनी गोंधळून गेले आहेत. अर्थात, त्यांना मिळालेल्या या एकांताचे काही फायदेही दिसू लागले आहेत. हाँगकाँगमधली एका पांडा मादीला गर्भधारणा झाली आहे.

जी जागा पूर्वी सर्वाचीच, म्हणजे माणसाप्रमाणेच प्राण्यांचीही होती, ती आपण बळकावली. स्वतसाठी सुविधांचा पसारा मांडताना वन्यजीवांवर अन्याय केला. आज ते स्वतच्या या जागेवर दावा करतायत. ठिकठिकाणची टाळेबंदी कधी उठेल आणि जग पुन्हा कधी पूर्वीसारखं धावू लागेल..आज कोणतेही अंदाज बांधता येणं शक्य नाही. पण जेव्हा हे होईल, तेव्हा या प्राणी-पक्ष्यांचं काय, हा प्रश्न आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2020 8:36 am

Web Title: cornovirus pandemic wild animals and birds are moving freely in cities dd70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ..आणि ते बरे झाले!
2 आरोग्य : सर्वाना हवंय हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन
3 राशिभविष्य : दि. १० ते १६ एप्रिल २०२०
Just Now!
X