विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. त्यामुळे गोष्टी वेळच्या वेळेस कराव्यात. वेळ टळून गेल्यानंतर त्या करण्यात काहीच अर्थ नाही, असे म्हटले जाते. राज्यातील करोनासंबंधित र्निबध शिथिल करण्याची वेळ टळून गेली असे होऊ द्यायचे नसेल तर त्यासाठी हीच वेळ आहे! करोनाने केवळ वैयक्तिक आयुष्ये, कुटुंबे एवढीच पणाला लागली नाहीत तर त्याचा भार राज्य आणि केंद्र सरकारवरही आला. सरकार किती मदत करणार याला नेहमीच मर्यादा असतात. सरकारच शंभर टक्के सारे काही करेल असे या भूतलावर कुठेही काहीही अस्तित्वात नाही. त्यामुळे सरकारला हा भार हलका करायचा असेल तर ती घडी समीप येऊन केव्हाचीच उभी आहे. निर्णय घेणे सरकारहाती आहे. त्यालाही सबळ कारण हवे असेल तर आता तेही हाती आहे. राष्ट्रीय सेरो सर्वेक्षणानुसार दोनतृतीयांश भारतीयांमध्ये आता करोनाची प्रतिपिंडे तयार झाली आहेत. यापूर्वीच्या सेरो सर्वेक्षणात केवळ सक्रिय तरुणांचाच समावेश होता. मात्र या खेपेस त्यामध्ये वय वर्षे सहा ते पौगंडावस्थेतील मुलांचाही समावेश होता. त्यांच्यामध्येही अध्र्याहून अधिक मुलांमध्ये प्रतिपिंडे तयार झाल्याचे या शास्त्रीय सर्वेक्षणामध्ये स्पष्ट झाले आहे. एका बाजूस आता लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्याही हळूहळू का होईना पण वाढते आहे. त्यामुळे र्निबध शिथिल करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने आत्मविश्वासपूर्ण पावले टाकण्यास काहीच हरकत नाही.

र्निबध शिथिल करण्यासाठी पावले उचलायलाच हवीत यासाठीचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे सध्या चार वाजेपर्यंतचे र्निबध असतानाही राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सहा ते आठ वाजेपर्यंत दुकाने सुरूच असतात. पोलीसही त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. कदाचित नागरिक ज्या अवस्थेतून जात आहेत त्याबद्दल त्यांनाही कणव असावी. र्निबधांची ऐशी की तैशी करण्यास यापूर्वीच सुरुवात झाली आहे.

नागरिकांचे हे वर्तन हे काही बंड म्हणून आलेले नाही तर अनेकांच्या बाबतीत ती त्यांची अगतिकता आहे. आणि आता र्निबधांनीही परिसीमाच गाठल्यासारखी अवस्था आहे. अर्थचक्र वेगात पुढे जाणे ही अनेकांची वैयक्तिक, कुटुंबाची एवढेच नव्हे तर राज्य व केंद्र सरकारचीही गरज आहे. अन्यथा तिजोरी केवळ रितीच होत राहील. ती भरली जाणेही तेवढेच आवश्यक आहे.

सर्वाधिक चिंतेचा विषय आहे तो शिक्षण क्षेत्राचा. तिथे गेली दोन वर्षे विद्यार्थी शाळा- महाविद्यालयांबाहेर आहेत. शिक्षण ऑनलाइन सुरू असले तरी त्याला अनेक मर्यादा आहेत. तसेच सुरू राहिले तर प्रत्यक्ष परीक्षांशिवाय उत्तीर्ण होत बाहेर येणाऱ्या पिढय़ा हे समाजासाठी काही चांगले लक्षण नसेल. कारण ‘परीक्षेविण बांधले दृढ नाणे, परी सत्य मिथ्या कसे कोण जाणे?’ हे समर्थवचन हे जागतिक सत्य आहे. त्यामुळे त्याला या विद्यार्थ्यांना आयुष्यात सामोरे जावेच लागेल. त्या वेळेस त्यांची पंचाईत होऊ नये, याची काळजीही आताच घ्यायला हवी.

पलीकडे सामान्य माणसेही आता या र्निबधांमुळे हैराण झाली आहेत. किती काळ असाच घरबसल्या काढणार असा प्रश्न आहे. पहिल्या लाटेत तर र्निबध हाच मोठा उपाय होता. दुसऱ्या लाटेमध्येही र्निबध हीच सुरुवात योग्य होती. पण आता लसीकरणही वाढले आहे, नागरिक हतबल होत आहेत आणि अर्थचक्राने वेग घेणे ही आपली सर्वाचीच गरज आहे. अशा वेळेस आजुबाजूची परिस्थिती चांगल्या अर्थाने बदलते आहे, असे शास्त्रीय सर्वेक्षणही म्हणत असेल तर आणखी किती काळ वाट पाहणार?

मुख्यमंत्र्यांना त्यांचे विस्तारित कुटुंबच असलेल्या राज्यातील जनतेची काळजी आहे, यात दुमत नाही. पण अनावश्यक काळजीने भुके मरण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये हीदेखील मग त्यांचीच जबाबदारी ठरते. त्यामुळे त्यासाठीची प्रेरणाही मनाच्या श्लोकांमधूनच मिळू शकते.. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे मना तुचि शोधूनी पाहे!