भक्ती बिसुरे – response.lokprabha@expressindia.com

चीनच्या वुहान प्रांतातून सुरू झालेला करोना विषाणुसंसर्ग आता जपान, द. कोरिया, अमेरिका, इराण, इटलीसह जगातील अनेक देशांमध्ये पसरला आहे. भारताचाही अर्थातच त्यात समावेश आहे. ९ मार्च रोजी पुण्यामध्ये करोनाचे दोन रूग्ण आढळल्याने आता या संसर्गाची लागण झालेले ४६ रुग्ण भारतात आढळले आहेत. यांमध्ये प्रामुख्याने केरळ, राजस्थान, दिल्ली, तेलंगणा, पंजाब राज्यांतील रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे देशात भीती आणि संभ्रमाचं वातावरण आहे. सोशल मीडियावरून सुरू असलेली माहितीची, खरं तर अफवांची देवाणघेवाण बघता, ही भीती आणि संभ्रम करोनाइतकीच भयंकर आहे. या विषाणूचा प्रसार केवळ वुहानशी संपर्क आलेल्या किंवा करोना संसर्ग असलेल्या देशांमध्ये जाऊन आलेल्या प्रवाशांनाच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतरांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन आरोग्य यंत्रणांकडून करण्यात येत आहे. करोना आजाराचं स्वरूप, भारतातील सद्य:स्थिती आणि नागरिकांनी घ्यायची खबरदारी, याबाबत ‘लोकप्रभा’ने डॉ. राजेश कार्यकत्रे यांच्याशी संवाद साधला. डॉ. कार्यकत्रे हे पुणे येथील ससून सर्वोपचार रुग्णालयाचे उपअधिष्ठाता आहेत, तसेच बी. जे. मेडिकल कॉलेजच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत.

भारतातही आता करोना रुग्णांची संख्या वाढते आहे. आपल्या देशातील परिस्थिती खरोखरच गंभीर आहे का?

सोमवार, ९ मार्चच्या आकडेवारीनुसार भारतात ४६ रुग्णांना करोना संसर्गाची लागण झाली आहे. यातील बहुसंख्य रुग्ण केरळ, तेलंगणा, राजस्थान आणि दिल्लीत आहेत. मात्र, केंद्र सरकार आणि राज्य सरकारतर्फे करोनाला प्रतिबंध करण्यासाठी संपूर्ण उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. देशातील परिस्थिती गंभीर नाही. चीन किंवा इतर देशांतून आलेल्या प्रवाशांची तपासणी, त्यांना विलग ठेवणे अशी सर्व खबरदारी काटेकोरपणे घेण्यात येत आहे. त्यामुळे ज्यांनी परदेश प्रवास केला आहे आणि विषाणूजन्य आजाराची लक्षणे आहेत, असे रुग्ण बाहेर फिरत असण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

जागतिक परिस्थितीबाबत तुमचे विश्लेषण काय?

एवढय़ा देशांमध्ये पसरला असला, तरी जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप करोनाची ‘साथ’ म्हणून घोषणा केलेली नाही. आजार सौम्य आहे. त्याच्यातील मृत्यूचा दर हादेखील जागतिक स्तरावर दोन टक्के किंवा त्याहून कमी आहे. सार्स विषाणूच्या संसर्गात मृत्युदर तब्बल १०टक्के एवढा होता. हाय रिस्क ग्रुप प्रकारात मोडणारे, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, कर्करोग, रक्तदाब, मधुमेहाचे रुग्ण असलेले नागरिक यांचं रुग्ण म्हणून प्रमाण अधिक आहे. मृतांमध्येदेखील इतर गुंतागुंतीचे आजार असलेले, रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेले रुग्ण जास्त आहेत. मात्र, आजाराच्या साथीपेक्षा अफवा आणि चुकीच्या माहितीची साथ अधिक गंभीर आहे.

समाजमाध्यमांवरून पसरवल्या जाणाऱ्या माहितीत तथ्य आहे का?

मागील काही दिवसांत सोशल मीडियावर दिली जाणारी माहिती ही मोठय़ा प्रमाणात अफवा या प्रकारातील आहे. त्यामुळे त्या माहितीत तथ्य आहे हे म्हणणं चुकीचं ठरेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावर करोना या आजाराबाबत शास्त्रशुद्ध माहितीदेखील उपलब्ध आहे, मात्र ती कधीही पसरवली जात नाही. त्यामुळे समाजमाध्यमांवरून येणाऱ्या नकारात्मक माहितीवर विश्वास ठेवू नये. मांसाहार केल्याने करोना संसर्ग पसरतो या अफवेमुळे नियमितपणे मांसाहार करणाऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. त्याचा परिणाम म्हणून कुक्कुटपालन, मका, सोयाबीनची शेती यांवर संकट कोसळलं आहे. प्रत्यक्षात भारतीय मांसाहार आणि करोना संसर्गाचा काहीही संबंध नाही. चीनमध्ये केला जाणारा मांसाहार आणि भारतातील मांसाहार यांच्यात प्रचंड फरक आहे, त्यामुळे मांसाहार न करण्यास कोणतेही कारण नाही, समाजमाध्यमांच्या माहितीवर विसंबून राहू नये.

महाराष्ट्रात संसर्ग आला, तर त्याचा सामना करण्यासाठी यंत्रणा म्हणून आपण तयार आहोत का?

चीन किंवा इतर परदेशांतून आलेल्या सर्व प्रवाशांची काटेकोर तपासणी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात येत आहे. दिल्ली आणि इतर राज्यांत रुग्ण आढळल्यानंतर आता नागपूर, पुणे या विमानतळांवरही प्रवाशांची तपासणी केली जात आहे. परदेश प्रवासाची, परदेशी प्रवाशांच्या संपर्कात येण्याची पाश्र्वभूमी असलेल्या प्रवाशांमध्ये ताप, सर्दी, खोकला अशी विषाणूजन्य आजाराची लक्षणं आढळली असता, त्यांना थेट नजीकच्या रुग्णालयात विलगीकरण कक्षात पाठवण्यात येत आहे. संसर्ग असलेले रुग्ण बाहेर मिसळण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग सर्वच स्तरांवर योग्य ती खबरदारी घेत आहे. यंत्रणा म्हणून गरज भासल्यास करोनाचा सामना करण्यासाठी आपण संपूर्ण तयार आहोत, फक्त नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता यंत्रणेला सहकार्य करावे.

विषाणूचा प्रसार नेमका कसा होतो, पारंपरिक औषधांचा उपयोग शक्य आहे का?

करोनाच्या संशयित रुग्णांमध्ये प्रामुख्याने सर्दी, पडसे हाच त्रास दिसतो. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या तपासण्या केल्यानंतर रुग्णाला करोनाचा संसर्ग आहे की नाही हे निश्चित होते. मात्र स्थानिक रुग्णांमध्ये लक्षणे आढळली असता त्या व्यक्तीचा वुहानशी संपर्क आला होता का, परदेश प्रवास झाला आहे का हेच पाहिले जाणार आहे. हा विषाणू हवेमार्फत पसरत असल्याने प्राथमिक खबरदारी घेणे पुरेसे आहे. शक्य तेवढय़ा वेळा साबण लावून हात स्वच्छ धुणे, चेहरा, नाक, डोळे यांना सतत हात न लावणे, खोकताना, िशकताना हातरुमाल वापरणे ही खबरदारी करोनासाठीच नव्हे तर नेहमीच घेतली असता विषाणूजन्य आजारांपासून लांब राहणे शक्य होते.  अ‍ॅलोपॅथी प्रकारातील औषधे असंख्य चाचण्या आणि संशोधनाअंती वापरात येतात, तसे संशोधन इतर पॅथींवर झालेले नसते, त्यामुळे त्यांची उपयुक्तता सिद्ध झालेली नाही.

मास्क नेमका कोणी वापरावा?

सर्वसामान्य, निरोगी नागरिकांनी स्वच्छ धुतलेला हातरुमाल वापरणे पुरेसे आहे. बाजारात एन-९५ मास्क खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दीकरत आहेत असं समजतं, मात्र ते मास्क केवळ रुग्णांची सेवा-शुश्रूषा करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी आहेत. नागरिकांनी ते अनावश्यक खरेदी करून बाजारात तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मास्क विक्री न करण्याच्या सूचना अन्न आणि औषध प्रशासनाने केल्या आहेत. मास्कचा अनावश्यक वापर इतर तक्रारींना निमंत्रण देऊ शकतो हे नागरिकांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

घटनाक्रम

१ डिसेंबर : ‘द लान्सेट जर्नल’च्या मतानुसार प्रथमच ‘करोना’ विषाणूचा अभ्यास सुरू करण्यात आला.

८ डिसेंबर : चीनमधील वुहान शहरात प्रथमच एका रुग्णावर करोनासंदर्भात तपासणी करण्यात आली.

२९ डिसेंबर : चीनमधील हुबेई शहारातील एका स्थानिक रुग्णालयात चार रुग्णांवर उपचार करताना ‘करोना’ हा विषाणू प्रथमच अधोरेखित केला.

३१ डिसेंबर : चीनच्या अधिकाऱ्यांनी जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) वुहान शहरात आढळेल्या करोना विषाणूबद्दल सतर्क केले.

१ जानेवारी : करोना विषाणूंचे केंद्र म्हणून वुहान शहरातील होलसेल ‘सीफूड मार्केट’ची ओळख पटली. त्यामुळे ते संपूर्ण शहरच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

१३ जानेवारी : थायलंडमध्ये प्रथमच या विषाणूने ६१ वर्षीय महिलेचा बळी घेतला.

१७ जानेवारी : थायलंडमध्येच वुहान शहरात राहणारा ६९ वर्षीय पुरुष रुग्ण दगावला.

१८ जानेवारी : करोना विषाणूने तिसरा रुग्ण दगावला.

२० जानेवारी : चीनमध्ये करोना रोगाचे वर्ग-अ आणि वर्ग-ब, असे दोन प्रकार घोषित करण्यात आले.

२१ जानेवारी : चीनमध्ये २९१ जणांना करोनाची बाधा झाली. त्यामध्ये वुहानमधील १५ वैद्यकीय कर्मचाऱ्यांनादेखील त्याची बाधा झाली.

२२ जानेवारी : करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कसा रोखायचा, या विषयावर जागतिक आरोग्य संघटनेची बैठक झाली. त्याच वेळी चीनमध्ये ४४० रुग्ण आढळले तर, ६ जण मृत्युमुखी पडले. याच पाश्र्वभूमीवर कोरियाने आपल्या देशात पर्यटकांना येण्यास मज्जाव केला.

२३ जानेवारी : चीनमध्ये रुग्णांची संख्या ५७१ वर पोहोचली, तर त्यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला. तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या बैठकीमध्ये सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर न करण्याचा निर्णय घेतला.

२४ जानेवारी : चीनने विदेशी पर्यटकांना १२ शहरांमध्ये येण्यास बंदी घातली. त्या वेळी रुग्णांची संख्या ८३०, तर मृतांची संख्या २५ वर गेली.

२५ जानेवारी : प्रथमच रुग्णांवर उपचार करणारा डॉक्टर करोनाच्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडला.

२६ जानेवारी : चीनने ऑनलाइन आणि ऑफलाइन ??बाजाराच???? वन्य प्राण्यांच्या व्यापारावर बंदी घातली.

२७ जानेवारी : युनायटेड स्टेट्सने २० विमानतळांवर प्रवाशांची तपासणी यंत्रणा वाढवली.

२८ जानेवारी : चीनने जागतिक आरोग्य संघटनेच्या करोना विषाणूवर संशोधन करणाऱ्या टीमला मदत करण्याचे आश्वासन केले.

२९ जानेवारी : ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’ने पुराव्यांच्या आधारे करोनाचा विषाणू संसर्गजन्य असल्याचे जाहीर केले.

३० जानेवारी : भारतात प्रथमच रुग्ण आढळला. या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेने ‘सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ जाहीर केली. रशियाने चीनच्या प्रवाशांना येण्यास बंदी घातली.

३ फेब्रुवारी : जी-७ देशांच्या आरोग्य मंत्रालयांनी करोना विषाणूविरोधात एकमेकांना साहाय्य करण्याचे ठरविले.

४ फेब्रुवारी : जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत ६७५ दशलक्ष डॉलर खर्च करण्याचे घोषित केले.

११ फेब्रुवारी : जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणू २०१९ ला ‘सीओव्हीआयडी-१९’ असे संक्षिप्त नाव दिले. या दिवशी मृतांची संख्या १००० वर गेली.

१४ फेब्रुवारी : चीनने १७०० हून जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे घोषित केले.

१९ फेब्रुवारी : करोना विषाणूमळे मृतांची संख्या २००० हून अधिक झाली.

२६ फेब्रुवारी : जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखाली गेलेल्या तज्ज्ञांनी आपला रिपोर्ट सादर केला. त्या वेळी डब्ल्यूएचओने जाहीर केले की, २५ फेब्रुवारी या दिवशी चीनच्या बाहेर इतर देशांमध्ये करोनाचा पादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली.

३ मार्च : करोना विषाणू जगभरात ७४ देशांमध्ये पसरलेला आहे. आतापर्यंत ९२ हजार २६९ रुग्ण करोनाने ग्रस्त झालेले आहेत. तर, त्यात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ३१३२ इतकी आहे.

संकलन : अर्जुन नलवडे