भगवान मंडलिक – response.lokprabha@expressindia.com

मागील वर्षभरात करोना महासाथीने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या. मनुष्यजातीवर आलेले हे संकट रोखण्याची क्षमता कोणत्याही जात, धर्म वा पंथामध्ये नाही. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी माणसाकडे असलेली एकमेव शक्ती म्हणजे मानवता. याची जाणीव झाल्यामुळे देशभरात ठिकठिकाणी जात, धर्म, पंथांच्या भिंती ओलांडून लोक एकत्र येताना दिसत आहेत. मुंबईजवळील कल्याणमधील तय्यबजी ट्रस्ट ही  संस्थादेखील आपल्या परीने करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहे.  संबंधित मृतदेह कोणती जात, धर्म, पंथाच्या व्यक्तीचा आहे हे न पाहता केवळ मानवतेच्या भावनेतून या संस्थेतील मंडळी अंत्यसंस्काराचे काम करत आहेत.

गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून मुंबईसह कल्याण, डोंबिवली, ठाणे शहर परिसरांत करोना रुग्ण आढळून येऊ लागले. शासकीय यंत्रणांची करोना नियंत्रणासाठी धावपळ सुरू झाली. अनेक वैद्यकीय, सामाजिक, स्वयंसेवी संस्था, राजकीय संस्था करोनाच्या भीतीने उडालेल्या हाहाकारामुळे हतबल झालेल्यांना आपापल्या परीने आधार देण्याचा प्रयत्न करू लागल्या. अनेक मजूर पायपीट करत परप्रांतांमधील आपले घर गाठण्याचा प्रयत्न करू लागले. अचानक सर्व व्यवहार ठप्प झाल्याने अनेक घरांमध्ये उपासमार सुरू झाली. हातावर पोट असणाऱ्यांच्या घरात संध्याकाळी चूल पेटेनाशी झाली. अशा कुटुंबाना मदत करण्यासाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेतला होता. कल्याणमधील तय्यबजी ट्रस्टनेही यासाठी हातभार लावला होता. या ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी जामा मशिदीच्या माध्यमातून कल्याण परिसरातील गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप केले.

ते करत असताना ट्रस्टचे पदाधिकारी तारीक मेमन, डॉ. अश्रम मेमन, शबीब बड्डी यांच्या लक्षात आले की, करोना रुग्णाचा मृत्यू झाल्यावर त्याचे नातेवाईक अंत्यविधी किंवा दफनविधीसाठी उपस्थित राहू शकत नाहीत. या महासाथीत मृत्यू झालेल्या कोणत्याही रुग्णाचा अंत्यसंस्कार हा त्याच्या धर्म परंपरा, रीतिरिवाजाप्रमाणे झाला पाहिजे, त्याची हेळसांड होता कामा नये, असा त्यांनी विचार केला. त्यातूनच तय्यबजी ट्रस्टने गेल्या एप्रिल-मे महिन्यात कल्याणमधील बाजारपेठ हद्दीतील करोनाने मृत्यू झालेल्या मुस्लिम व्यक्तींचे दफन करण्याचे काम हाती घेतले.

जूनपासून कल्याण परिसरातील करोना रुग्णांचे प्रमाण वाढू लागले, तसे मृत्यूचे प्रमाणही वाढले. मुस्लीम मोहल्ल्यात घराघरात करोना रुग्ण आढळत होते. त्यांचा करोनाने मृत्यू झाल्यानंतर त्यांचे कुटुंबातील सदस्य पार्थिवाजवळही जाऊ शकत नव्हते आणि अंत्यसंस्कारही करू शकत नव्हत. अशा वेळी तारीक मेमन, शबीब बड्डी यांनी करोनाग्रस्त मुस्लीम व्यक्तीचे दफन ट्रस्टमार्फत करण्याचा निर्णय घेतला. रुग्णाचा करोनाने मृत्यू झाला तरी त्याचे अंत्यसंस्कार व्यवस्थित झाले पाहिजेत म्हणून पार्थिव उचलून नेण्यासाठी जनादा (तिरडी), कापड, अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य यांची जमवाजमव केली. या कामासाठी पहेश उल्लुँख, शकील चुनचून या कार्यकर्त्यांची मदत घेतली.

तारीक मेमन हे कापड व्यावसायिक आहेत. त्यांनी स्वत:च्या गोदामातून अंत्यविधीसाठी लागणाऱ्या कापडाचे तागे दिले. पार्थिव वाहून नेण्यासाठी वाहन उपलब्ध करून दिले. कामगारांसाठी वाहनाची व्यवस्था केली. खड्डे खोदण्यासाठी कामगारांचे पथक तयार केले. कोणत्याही शासकीय यंत्रणेचे साहाय्य न घेता तय्यबजी ट्रस्टने स्वत:ची यंत्रणा उभी केली. कोणाकडूनही एक पैसा न घेता ही सेवा द्यायची असा निर्धार या मंडळींनी केला. कामगारांचे मानधन, जेसीबीचे इंधन, इतर खर्च ट्रस्टने उचलला.

मे महिन्यापासून तारीकभाई, शबीबभाई, पहेशभाई आणि शकीलभाई यांनी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम सुरू केले. दिवस-रात्र हे काम सेवाभावी वृत्तीने सुरू होते. २४ तास करोना वातावरणात राहायचे असल्याने त्यांनी वाहन हेच आपले घर केले होते. कब्रस्तानात एक खड्डा खोदण्यासाठी पाच ते सहा तास लागायचे. पावसाळ्याच्या दिवसात माती चिकट झालेली असते. त्यामुळे खड्डे खणताना खूप त्रास व्हायचा. ऑगस्टनंतर तर करोनाग्रस्त रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले. हाताने खड्डे खोदणे अशक्य होऊ लागले. अखेर जेसीबीने खड्डे खोदले जाऊ लागले. ते काम झाले की रुग्णालयात जाऊन किंवा रुग्णाच्या घरी जाऊन पार्थिव आणून दफन केले जायचे.

हे काम सुरू असतानाच करोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णाचे पार्थिव नेण्यासाठी आणखी आठ ते दहा नातेवाईकांनी  कार्यकर्त्यांशी संपर्क साधलेला असायचा. रुग्णालयांना तर संबंधित मृतदेह रुग्णालयातून बाहेर काढण्याची घाई असायची. तय्यबजी ट्रस्टची मंडळी असा मृतदेह आणण्यासाठी एखाद्या रुग्णालयात गेली की मृत व्यक्ती ही हिंदू असल्याचे त्यांच्या लक्षात यायचे. अशा वेळी धर्म वगैरे विचार न करता तो मृतदेह रुग्णालयातून ताब्यात घेऊन हिंदू स्मशानभूमीत नेला जायचा. तेथे त्याच्यावर तेथील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या मदतीने हिंदू प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार केले जायचे. त्या वेळी संबंधित मृत व्यक्तीचे नातेवाईक तिथे उपस्थित असतीलच असे नाही. तरीही ते विधी यथोचित पार पाडले जात. अशा वेळी आम्ही धर्म, जाती, पंथ असा भेदभाव केला नाही, असे तारीक मेमन सांगतात.

‘मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा’ हेच ब्रीद समोर ठेवून आम्ही काम करीत आहोत. ऑक्टोबरनंतर करोना मृत्यूचे प्रमाण कमी होऊ लागले. त्यानंतरही आम्हाला करोनाग्रस्त व्यक्तीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याचे बोलावणे आले तरी आम्ही त्याला कधीही नकार दिला नाही. आजही आमचे हे काम सुरू आहे. गेल्या वर्षभरात आम्ही हिंदू तसेच मुस्लीम समाजातील करोनाने मरण पावलेल्या एक हजारांहून अधिक व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले आहेत. मनुष्यजातीवर कोसळलेले हे संकट आज ना उद्या दूर होईलच, पण जात, धर्म, पंथ यांच्यापलीकडे जाऊन मनुष्य धर्माची विनम्र सेवा केल्यावर जे समाधान, आत्मिक आनंद मिळतो, त्याची तुलना इतर कशातच होऊ शकत नाही, असे शबीब बड्डी सांगतात.

तय्यबजी ट्रस्टचे काम

दहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट गरजू, गरीब घटकांना शालेय शिक्षण, आरोग्यसेवा यासाठी आर्थिक मदत करण्याचे आहे. अनेक कुटुंबीयांची मुलांना शाळेत पाठविण्याची इच्छा असते, पण त्यांच्याकडे शाळेत शुल्क भरण्यासाठी पैसे नसतात. त्यांना आर्थिक मदत करणे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलणे, अशी गरजू कुटुंबे शोधून त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे असे काम या संस्थेकडून सुरू आहे. काही आजारी व्यक्तींवर उपचार करणे त्यांच्या कुटुंबियांना आर्थिकदृष्टय़ा शक्य नसते. अशा कुटुंबांना संबंधित रुग्णावर उपचारासाठी आर्थिक मदत करणे, कल्याण परिसरात उपचार उपलब्ध नसतील तर मुंबईतील अद्ययावत रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत करणे अशी कामे ही संस्था गेली अनेक वर्षे करीत आहे. तारीक मेमन, शबीब बड्डी हे या संस्थेचे प्रमुख विश्वस्त आहेत.