विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

गेले सुमारे सव्वा वर्ष सारे जग ज्या कोविडला सामोरे जात आहे, त्या महासाथीने संपूर्ण जगालाच एका वेगळ्या वळणावर आणून उभे केले आहे. हे वळण असे आहे की, इथून पुढे अनेक महत्त्वाचे बदल आपल्याला वैयक्तिक स्तरावर एवढेच नव्हे तर कुटुंबापासून ते जागतिक व्यवहारांपर्यंत पाहावे लागणार आहेत. या बदलांनी आपल्या सर्वाच्या नित्यसवयींपासून ते व्यवहारांपर्यंत सारे काही बदलणार आहे. अनेकांची तर आताच ओढाताण होण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांना या कोविडचा जबर फटका बसला आहे. पण ज्यांना असा फटका बसलेला नाही त्यांनी हुश्श म्हणण्याचीही वेळ नाही. कारण भविष्य कुणालाच माहीत नाही. आज संपूर्ण जग अनिश्चिततेच्या गर्तेत सापडले आहे. अशा वेळेस जगात ज्याचे सोंग कुणालाच आणता येत नाही, त्या पैशांचे काय करायचे? म्हणजे सध्या हाती असलेल्या किंवा भविष्यात येऊ घातलेल्या पैशांचे काय करायचे किंवा सध्याच्या या कोविड महासाथीला सामोरे जाण्यासाठी आपल्या हाती कोणती ढाल असणार इथपर्यंत अनेक प्रश्न सतावत आहेत. यासाठी अर्थ-वित्त नियोजनाच्या क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांशी संपर्क साधून ‘लोकप्रभा’ने कोविड काळातील गुंतवणूकविषयक काळजीसाठी या विशेषांकाचा घाट घातला!

Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
nitin gadkari
चावडी: मी प्रचार (नाही) करणार!
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?
Due to the spread of concreting material on the highway traffic is still obstructed
महामार्गावर काँक्रिटीकरणाच्या साहित्याचा पसारा; वाहतुकीला अडथळे कायम

कोविड काळाने नेमकी कोणती समीकरणे बदलली आहेत, याचा वेध घेणारे तीन महत्त्वाचे लेख यात समाविष्ट आहेत. यात तृप्ती राणे यांनी साध्या पण युक्तीच्या अशा महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. तर नेमके काय बदलले आहे याचे भान कौस्तुभ जोशी यांनी त्यांच्या लेखात दिले आहे. मात्र ते केवळ त्यावरच थांबलेले नाहीत तर त्यांनी या काळातील आचरण करायचा अष्टांग मार्गही सांगितला आहे. कोविड काळात अतिमहत्त्वाचे ठरते आहे ते विमाकवच. कारण अनेकांना कोविड काळातील आरोग्य खर्चानेच घेरी यायची बाकी आहे. तर कोविडचे विमाकवच कुठे, कसे मिळणार आणि त्या संदर्भात घ्यावयाची काळजी या साऱ्याचे मार्गदर्शन विमातज्ज्ञ भक्ती रसाळ यांनी केले आहे.

अनेक वाचक आजही पारंपरिक गुंतवणूक मार्गाचाच वापर करत आहेत. तर नव्या पिढीला पारंपरिक मार्गाची फारशी माहिती नाही. कोविडोत्तर काळात पीपीएफ, एनएससी, पोस्टातील गुंतवणुकीपासून ते युलिपपर्यंत कोणते पर्याय आहेत व त्यातील काय, किती योग्य याचे विश्लेषण उदय तारदाळकर यांनी केले आहे. अनेकांना पन्नाशीत निवृत्तीची चिंता वाटते तर काहींना पन्नाशीपर्यंत गुंतवणुकीचा विचार करण्यासारखी परिस्थितीच नसते. मग या अवस्थेत काय कराल याचे मार्गदर्शन किरण हाके यांच्या लेखात आहे. तर बदललेल्या करविकल्पाची सविस्तर चर्चा प्रवीण देशपांडे यांनी त्यांच्या लेखात केली आहे. विवरणपत्र भरणाऱ्या प्रत्येकासाठीच हा लेख महत्त्वाचा ठरावा.

कोविड काळात सारे उद्योग बंद होते तरी शेअर बाजार मात्र चढाच होता. त्याचेही विश्लेषण करणारा लेख अंकात आहे. शेअर बाजाराशी संबंधित चर्चेत नेहमीच प्राण्यांची नावे येतात त्याचा काय संबंध हेही उलगडणारा लेख आहे. महत्त्वाचा ठरावा तो अजय वाळिंबे यांचा लेख. यात सध्याच्या अनिश्चित वातावरणात निर्धास्तपणे गुंतवणूक करता येतील असे दहा शेअर्स त्यांनी सुचविले आहेत. अनेकांनी युलिपच्या गुंतवणुकीवर भर दिला आहे. त्यात कोणती सावधानता बाळगावी यावर डॉ. ऊर्मिला अजय यांचाही लेख महत्त्वाचा आहे.

हा गुंतवणूक विशेषांक वाचल्यानंतर वाचकांना एका गोष्टीची खात्री निश्चितच पटेल, ती म्हणजे तुकोबांच्या अभंगातील ओळी आजही तेवढय़ाच लागू आहेत.

जोडोनिया धन उत्तम वेव्हारे

उदास विचारे वेच करी!