शैलजा तिवले – response.lokprabha@expressindia.com
दीड वर्षांहूनही अधिक काळ कोविडच्या भीतीने कोंडलेले सर्व जण पुन्हा दैनंदिन आयुष्याकडे वळत असताना करोना पुन्हा ओमायक्रॉन या नव्या अवतारात जगापुढे उभा ठाकला आहे. त्याचे रूप किती विक्राळ असेल, तो किती वेगाने पसरेल याबाबत ठोस अभ्यासपूर्ण माहिती अद्याप जगापुढे आली नसली तरी विषाणू अधिक शक्तिशाली झाला असेल का, याविषयी सर्वत्र धाकधूक आहे.  

कर्नाटकात दोन व्यक्तींना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे गुरुवारी आढळले. भारतात आढळलेले हे पहिले दोन रुग्ण आहेत. यापैकी एक रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून प्रवास करून आला होता, तर दुसरा रुग्ण आरोग्य कर्मचारी आहे. त्याने परदेश प्रवास केलेला नाही. त्यामुळे कर्नाटकात समूह संसर्ग सुरू झाला आहे का, याची माहिती येत्या काळात घेतली जाण्याची शक्यता आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना कोविडचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. ओमायक्रॉनची संसर्गसाखळी तयार होऊ लागली असून ती तोडण्यासाठी प्रवासी आणि बाधितांचे विलगीकरण, निदान यावर पुढील काही दिवस जोमाने काम करावे लागणार आहे.

दक्षिण आफ्रिकेतील ग्वान्टेंग प्रांतात आढळलेले करोनाचे उत्परिवर्तित रूप बी.१.१.५२९ हे डेल्टापेक्षाही घातक असल्याचा दावा तेथील आरोग्य अधिकाऱ्यांनी केल्यानंतर जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आणि परिणामी जगभरातील भांडवली आणि तेलबाजार गडगडले. जागतिक आरोग्य संघटनेनेही तातडीने बैठक बोलावून या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. या नव्या रूपाचे नामकरण ओमायक्रॉन असे करण्यात आले. युरोपीय देशांसह अन्यही काही देशांनी आफ्रिकेतील देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर लगोलग बंदीही घातली. कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसताना अशी बंदी घालण्याच्या निर्णयावर जागतिक आरोग्य संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. हा विषाणू किती घातक आहे, त्याच्या प्रसाराचा वेग डेल्टापेक्षाही अधिक आहे का, या विषाणूविरोधात लशीची परिणामकारकता किती, याबाबत सध्या अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

उत्परिवर्तन का होते? करोना विषाणू गेली दोन वर्षे जगाला भेडसावत आहे. एखादा विषाणू बराच काळ वातावरणात वावरत असेल, तर त्याविरोधात सामूहिक प्रतिकारशक्ती तयार होते. या शक्तीला अधिक ताकदीने प्रतिरोध करण्यासाठी वातावरणात असलेला विषाणू त्याच्या अंतर्गत रचनेत काही बदल करतो. याला उत्परिवर्तन (म्युटेशन) असे म्हटले जाते. आत्तापर्यंत करोनामध्ये विविध प्रकारची उत्पर्तिने झाली आहेत. यामध्ये त्याच्या काटेरी आवरणाच्या प्रथिनांमध्ये एक ते दोन प्रकारचे बदल झालेले आढळले आहेत. ओमायक्रॉनच्या प्रथिनांमध्ये मात्र ३२ प्रकारचे बदल झाले आहेत. त्यामुळे हा विषाणू आजवरच्या उत्परिवर्तापेक्षा वेगळा आहे. भारतात उगम झालेल्या डेल्टामध्ये दुहेरी उत्परिवर्तन झाले होते. ओमायक्रॉनविषयी अद्याप पुरेशी माहिती उपलब्ध नाही.  जसजशी माहिती मिळेल, तशी हे चिंताजनक उत्परिवर्तन आहे की नाही, याबाबत अधिक स्पष्टता येईल, असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

संभ्रम

या विषाणूबाबत विविध मतमतांतरे सध्या समोर येत आहेत. दक्षिण आफ्रिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांनी या विषाणूच्या संसर्गाचा वेग डेल्टापेक्षाही अधिक असून तो अनेक पटींनी घातक असल्याचे सांगितले आहे. लस घेतलेल्यांनाही संसर्गाचा धोका असून तरुणांना अधिक प्रमाणात संसर्ग होत असल्यामुळे अधिक चिंताजनक असल्याचेही तेथील संशोधनकांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे विषाणूत उत्परिवर्तन झाल्याचे निदर्शनास आणणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील मेडिकल असोसिएशनने मात्र विषाणूचा हा प्रकार अत्यंत सौम्य असल्याचे म्हटले आहे. आत्तापर्यत आढळलेल्या रुग्णांपैकी एकाही रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासलेली नाही. एकाही रुग्णाचा मृत्यूदेखील झालेला नाही. ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने तीव्र डोकेदुखी, मळमळ, थकवा जाणवणे हीच प्रमुख लक्षणे दिसून आली आहेत. चव न समजणे, वास न येणे ही लक्षणे आढळलेली नाहीत. या नव्या प्रकाराबाबत विनाकारण भीती पसरविल्याचेही मत संघटनेने व्यक्त केले आहे.

ओमायक्रॉनमुळे डेल्टा संपण्याची शक्यता

दक्षिण आफ्रिकेतील विषाणूतज्ज्ञांच्या मते, ओमायक्रॉनच्या संसर्गाची लक्षणे सौम्य स्वरूपाची असली, तरी तो वेगाने पसरत आहे. त्यामुळे सध्या जगभरात थैमान घातलेल्या डेल्टाला संपवण्यासाठी ओमायक्रॉन फायेदशीर ठरू शकेल आणि ही सकारात्मक बाब असेल.

घाबरू नये, सतर्कता बाळगणे गरजेचे

‘भारतात सध्या तरी ८० टक्के रुग्ण हे डेल्टा विषाणूचा संसर्ग झालेले आहेत. नवा विषाणू कितपत घातक आहे, याबाबत पुरेशी माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही. ज्या देशांत रुग्ण आढळले आहेत, तिथून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवून सतर्कता बाळगणे गरजेचे आहे,’ असे राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

‘दक्षिण आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये सुमारे ३० टक्के लसीकरण झाले आहे. युरोपात सध्या वाढती रुग्णसंख्या आणि मृत्युदर यामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. तिथेही लसीकरण न झालेल्या भागांमध्येच हा प्रश्न उद्भवला आहे. तसेच आता विषाणूचे निदान होऊन आठ दिवस झाले तरी रुग्णांमध्ये तीव्र लक्षणांचे प्रमाण किंवा मृत्यूचे प्रमाण वाढलेले नाही. आजवर आढळलेल्या रुग्णांपैकी बहुतेक रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे या विषाणूची घातकता डेल्टाच्या तुलनेत कमी असल्याचे सध्या दिसते. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, परंतु सावधानता बाळगणे आवश्यक आहे,’ असे मत मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले.

मुखपट्टीचा योग्य वापर हाच सुरक्षित उपाय

‘करोना प्रसाराची साखळी तोडण्यासाठी आणि उत्परिवर्तित विषाणूचा उद्रेक होऊ नये यासाठी मुखपट्टीचा वापर, हात वारंवार स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर पाळणे आणि गर्दी टाळणे या करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन काटेकोरपणे करणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचा विषाणू आला तरी मुखपट्टीचा योग्य वापर केल्यास निश्चितच संरक्षण मिळते,’ अशी माहिती कोविड-१९ कृतीदलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी दिली.

एस जनुकीय आरटीपीसीआर चाचण्या म्हणजे काय?

करोना विषाणूच्या निदानासाठी केल्या जाणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीमध्ये एस, एन, ई हे जनुकीय घटक असतात. ओमायक्रॉनची बाधा झालेल्या व्यक्तीच्या आरटीपीसीआर चाचणीमध्ये एस हा जनुकीय घटक अस्तित्त्वात नसल्याचे बहुतेक प्रयोगशाळांच्या अहवालात निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा जनुकीय घटक आरटीपीसीआर चाचणीत न आढळल्यास रुग्णाला ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली आहे, असे सूत्र प्राथमिक पडताळणीसाठी वापरता येईल, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांत म्हटले आहे. परंतु अंतिम निर्णयासाठी जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेिन्सग) चाचण्या करणे आवश्यक आहे, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

आपल्याकडे वापरल्या जाणाऱ्या बहुतांश चाचणी संचांमध्ये एस या जनुकीय घटकाचा वापर केलेला नाही. त्यामुळे ओमायक्रॉनचे निदान वेगाने करण्यासाठी आता कस्तुरबा आणि केईएमच्या प्रयोगशाळांमध्ये एस जनुकीय घटकाचा वापर केलेले संच उपलब्ध करण्यात आले आहेत. हे संच वापरून परदेशातून आलेल्या बाधित प्रवाशांच्या चाचण्या करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ही चाचणी आरटीपीसीआर चाचणीप्रमाणेच आहे. एस जनुकीय घटक करोना विषाणूच्या काटेरी प्रथिनांशी निगडित आहेत. परंतु या चाचणीची अचुकता १०० टक्के नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला ओमायक्रॉनची बाधा झाली आहे का, हे जनुकीय क्रमनिर्धारणानंतरच स्पष्ट होईल, असे केईएमच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. गीती नटराज यांनी सांगितले.

एस जनुकीय चाचणी तपासणीचे फायदे

मुंबईत कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेमध्ये जनुकीय क्रमनिर्धारण प्रयोगशाळा उपलब्ध आहे. परंतु ही चाचणी करण्यासाठी एका वेळी ३५० नमुने यंत्रामध्ये देणे आवश्यक असते. तसेच या चाचणीचे अहवाल येण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. सध्या परदेशातून येणाऱ्या आणि बाधित असणाऱ्या प्रवाशांची संख्या तुलनेने फार कमी आहे. त्यामुळे मोजक्या नमुन्यांसाठी जनुकीय क्रमनिर्धारण करणे शक्य नाही. एस जनुकासह आरटीपीसीआर चाचणी करणे तुलनेने सोपे आहे. तसेच याचे अहवालही काही तासांत उपलब्ध होऊ शकतात. ओमायक्रॉनचा संसर्ग  झाल्याचे निदान यामुळे वेगाने करता येईल. ओमायक्रॉन संशयित म्हणून या रुग्णांचे तातडीने विलगीकरण करणे आणि संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यास मदत होईल. त्याद्वारे या नव्या विषाणूचा प्रसार रोखणे शक्य होईल. यानंतर खात्री करण्यासाठी जनुकीय क्रमनिर्धारण केले जाईल, अशी माहिती पालिकेचे सहायक आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

बाधित प्रवाशांचे जनुकीय क्रमनिर्धारण

आफ्रिकेसह ओमायक्रॉनचा प्रसार झालेल्या अन्य देशांतून राज्यात आलेल्या प्रवाशांपैकी नऊ प्रवासी कोविडग्रस्त असल्याचे आढळले आहे. यातील चार प्रवासी मुंबईतील असून यातील एका रुग्णाची एस जनुकीय चाचणी झाली आहे. यामध्ये एस जनुक अस्तित्वात असल्याचे आढळले आहे, तर इतर तीन जणांच्या चाचण्यांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. परदेशातून आलेल्या सर्व बाधितांचे जनुकीय क्रमनिर्धारण केले जात आहे.

प्रवाशांचा पाठपुरावा आव्हानात्मक

ओमायक्रॉनमुळे जगभरात पसरलेल्या भीतीचे पडसाद देशातही उमटले. केंद्रीय आरोग्य विभागाने देशभरात सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले. परदेशातून आलेल्या प्रवाशांच्या चाचण्या, तपासण्यांवर भर देण्यासह जनुकीय चाचण्यांवरही लक्ष देण्याच्या सूचना दिल्या गेल्या. परंतु परदेशातून आलेल्या प्रवाशांचे विलगीकरण, आरटीपीसाआर चाचण्या, आंतरराष्ट्रीय प्रवासावरील र्निबध याबाबतची ठोस नियमावली जाहीर करण्यास मात्र केंद्रीय आरोग्य विभागाला तीन दिवस लागले. नाताळच्या सुट्टीमुळे गेल्या काही दिवसांत भारतात हजारो प्रवासी आले आहेत आणि येत आहेत. या पाश्र्वभूमीवर याबाबत तातडीने निर्णय होणे गरजेचे होते. राज्यानेही केंद्राच्या सूचनेनुसार तातडीने आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या तपासण्या, आलेल्या प्रवाशांची माहिती घेण्यास सुरुवात केली असली तरी केंद्राच्या सूचना येईपर्यंत जोखमीच्या गटातील अनेक देशांमधून आलेले प्रवासी विविध राज्यांमध्ये दाखल झाले आहेत. गेल्या तीन दिवसांत या विषाणूचा फैलाव १२हून अधिक देशांमध्ये झाला आहे. त्यामुळे जोखमीच्या देशांची यादी दिवसेंदिवस वाढत असून बारकाईने लक्ष ठेवाव्या लागणाऱ्या प्रवाशांची संख्याही अनेक पटींनी वाढत आहे. या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करताना  स्थानिक संस्थांच्या नाकीनऊ आले आहेत. त्यात आफ्रिकेसह या अन्य जोखमीच्या देशांमधून आलेल्या प्रवाशांचेही संस्थात्मक विलगीकरण करावे का, यावरही विचार केला जात आहे. संस्थात्मक विलगीकरण करायचे असल्यास त्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून देणे हेदेखील आव्हानात्मक आहे. एक किंवा अगदी कमी संख्येने रुग्ण आढळलेल्या देशांमधील प्रवाशांचेही १४ दिवस संस्थात्मक विलगीकरण करावे का, असे अनेक प्रश्न सध्या स्थानिक संस्थांपुढे आहेत. हा सर्व गोंधळ लक्षात घेता पुढील आठ ते दहा दिवसांत रुग्णसंख्या वेगाने न वाढल्यास काळजी करण्याची आवश्यकता नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

ओमायक्रॉन नाव का?

करोनाच्या विविध उत्परिवर्तित रूपांची वैज्ञानिक नावे सामान्यपणे वापरणे गोंधळात टाकणारे ठरू शकते. त्यांचा उल्लेख करणे अधिक सोपे व्हावे यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने ग्रीक अक्षरांवरून त्यांची नावे निश्चित केली आहेत. आजवर झालेल्या उत्परिवर्तनांना अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा अशी नावे देण्यात आली होती. अशी १२ प्रकारची उत्परिवर्तने आढळली आहेत. १२व्या म्युटेशनचे नाव म्यु होते. या क्रमानुसार नव्याने आढळलेल्या म्युटेशनचे नाव न्यु (ठ४) किंवा क्षी (्र) असायला हवे होते. परंतु न्यु हे नवीन या शब्दाशी मिळतेजुळते आहे तर क्षी हे आडनाव असल्यामुळे ही दोन्ही नावे देणे आरोग्य संघटनेने टाळले असून यापुढील अक्षर ओमायक्रॉनचे नाव या उत्परिवर्तनाला दिले आहे.

लशीपासून संरक्षण मिळेल का?

विषाणूची बाधा लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांनाही होत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. या विषाणूमध्ये अनेक प्रकारची उत्परिवर्तने झाली आहेत. सध्या उपलब्ध लशी त्यावर फारशा परिणामकारक ठरणार नाहीत, असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. फायझर, बायोएनटेक या लस उत्पादक कंपन्यांनी नव्या उत्परिवर्तनांवर परिणामकारक लशींची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेतला असला तरी या प्रक्रियेसाठी काही महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. करोनाच्या जुन्या रूपांपासून निर्मिती केलेल्या लशीची वर्धक मात्रा कितपत फायदेशीर असेल, असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दक्षिण आफ्रिकेने कमी रुग्णसंख्या असतानाही या नव्या प्रकाराचा शोध तातडीने घेतला. त्याबाबत जगालाही वेळेत सतर्क केले. खरतर ही सकारात्मक बाब आहे. परंतु आज याच देशावर जगातील अनेक देश भीतीमुळे र्निबध घालत आहेत. जगाचे हे रूप करोनाने वेळोवेळी दाखवून दिले. ओमायक्रॉनचे हे पुन्हा एक वादळ ठरेल का, याचे ठोस उत्तर सध्या तरी कोणाकडेही नाही. ते पुढच्या काही दिवसांत मिळू शकेल, मात्र तोवर या नव्या उत्परिवर्तनाविषयीची धाकधूक कायम राहणार आहे.

करोनाची विविध उत्परिवर्तने

  • अल्फा  (बी.१.१.७) – २०२०च्या शेवटच्या काळात ब्रिटनमध्ये आढळला.
  • बीटा (बी.१.३५१) – २०२०च्या सुरुवातीच्या काळात दक्षिण आफ्रिकेत आढळला.
  • गॅमा(पी.१) – २०२०च्या शेवटच्या काळात ब्राझीलमध्ये आढळला
  • डेल्टा(बी.१.६१७.२) – २०२०च्या शेवटच्या काळात हा भारतात आढळला असून जगभरात पसरला आहे.
  • लॅमडा (सी.३७) – २०२० मध्ये पेरू देशात आढळला.
  • म्यु (बी.१.६२१) – २०२१च्या सुरुवातीच्या काळात कोलंबियामध्ये आढळला.
  • ओमायक्रॉन (बी.१.१.१५९) – नोव्हेंबर २०२१ मध्ये दक्षिण आफ्रिकेत आढळला.