डॉ. गिरीश वालावलकर – response.lokprabha@expressindia.com

संसर्गजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी सक्षम आणि सुयोग्य प्रतिकारशक्ती प्राप्त करून देणारे जैविक औषध म्हणजे लस! कोणत्याही रोगापासून बचाव करण्यासाठी वापरली जाणारी लस ही तोच रोग निर्माण करणाऱ्या जिवाणू, विषाणू किंवा सूक्ष्मजीव जंतू यांच्या अशक्त वा मृत पेशींपासून तयार केली जाते. काही लसींमध्ये केवळ तो रोग पसरवणारं विष किंवा घटक वापरले जातात, परंतु त्यांचा प्रभाव कमी केलेला असतो. त्यामुळे शरीरात गेल्यावरसुद्धा ते रोगाचा प्रादुर्भाव करू शकत नाहीत .

लस शरीरात टोचण्याच्या क्रियेला लसीकरण म्हटल जातं. लसीकरणामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्तीला त्या अपायकारक जंतू किंवा घटकांची माहिती आणि त्यावर मात करण्याचा अनुभव व सराव मिळतो. त्यामुळे लसीकरण केलेल्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या शरीरात पुढे कधी होत नाही. म्हणूनच लसीकरण हा कोणत्याही संसर्गजन्य रोगापासून बचाव करण्याचा सर्वात परिणामकारक मार्ग मानला जातो.

‘लसीं’ची जागतिक बाजारपेठ म्हणजे त्यांची जगभरातील मागणी, आज वार्षिक तीन लाख १७ हजार कोटी रुपयांची आहे. २०२४ पर्यंत ती चार लाख ४६ हजार कोटींपर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे. भारतामध्ये गेल्या वर्षी सुमारे आठ हजार कोटी रुपयांच्या लसींची विक्री झाली.

जगातल्या प्रत्येक माणसाला लसींची गरज आहे, त्यामुळे जगाची लोकसंख्या वाढते त्याच प्रमाणात लसींची मागणीसुद्धा नसर्गिकपणे वाढत जाते. त्या खेरीज, नव्या प्रकारचे सूक्ष्मजीव कार्यरत होत असतात आणि त्यातून कधी स्थानिक, कधी देशांतर्गत तर कधी जागतिक पातळीवर नव्या प्रकारच्या रोगांच्या साथीचा उद्रेक होत राहतो. उपलब्ध लसींबरोबरच, या नव्या रोगांच्या विरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती मिळविण्यासाठी नव्या लसींची गरज पडत असते. त्यामुळे लसींचा उद्योग कायमच अत्यंत गतिशील आणि सातत्याने वाढत जाणारा ठरला आहे.

लस उत्पादनाच्या उद्योगामध्ये ब्रिटनची ‘ग्लॅक्सो स्मिथकलाइन’, अमेरिकेच्या ‘मर्क’ व ‘फायझर’ फ्रान्सची ‘सनॉफी’ या कंपन्यांचं वर्चस्व आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारताने लस संशोधन आणि उत्पादनामध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. चीन भारताशी तीव्र स्पर्धा करत वेगवेगळ्या देशांच्या बाजारपेठांमध्ये शिरकाव करायचा कसून प्रयत्न करतो आहे. कामाचा एक भाग म्हणून मध्यंतरी मी चीनमधील सूक्ष्मजंतुंसंबंधी संशोधन करून, त्यावर लस किंवा जैविक औषधे तयार करणाऱ्या काही मान्यवर औषध कंपन्यांना भेटी दिल्या. त्यांचे कारखाने भारतीय कंपन्यांच्या कारखान्यांपेक्षा १० ते १५ पट मोठे होते. घाऊक प्रमाणावर उत्पादन केल्यामुळे ते त्यांच्या औषधांचे दर कमी ठेवू शकतात. पण गुणवत्ता आणि संशोधनातील कौशल्य आणि प्रगती यामुळे भारतीय कंपन्यांनी प्रतिष्ठित आणि महाकाय बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्पध्रेला समर्थपणे तोंड देऊन जागतिक बाजारपेठेत स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. भारतीय कंपन्यांनी उत्पादन केलेल्या लसींपकी जवळपास ६५ टक्के लसी परदेशात निर्यात केल्या जातात. आज ‘युनिसेफ’सारखी आंतरराष्ट्रीय संघटना त्यांच्या एकूण गरजेपकी ६० टक्के लसी भारतीय कंपन्यांकडून विकत घेते.

भारतामध्ये काही उद्योजकांनी लस उद्योगामध्ये देदीप्यमान यश मिळवलं आहे. वरदाप्रसाद रेड्डी यांनी १९९१ साली हैद्राबादमध्ये ‘शांता बायोटेक’ या कंपनीची स्थापना करून ‘हिपॅटायटीस बी’ या काविळीची लागण करणाऱ्या विषाणूवर परिणामकारक लस शोधून काढली. तिला जगभर उत्तम प्रतिसाद मिळाला. पुढे २००४ साली ‘सनॉफी’ या लस उत्पादनातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या कंपनीने ‘शांता बायोटेक’चे समभाग विकत घेण्यासाठी वरदाप्रसाद रेड्डी यांना साडेतीन हजार कोटी रुपये इतकी मोठी रक्कम दिली. अमेरिकेत उच्चशिक्षण घेऊन परतलेल्या कृष्णा एल्ला आणि सौ. सुचित्रा एल्ला यांनी १९९६ साली ‘भारत बायोटेक’ नावाची ‘लसी’ विकसित करणारी कंपनी सुरू केली. आज त्या कंपनीची वार्षिक उलाढाल ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे ‘भारत बायोटेक’ने गेल्या वर्षी चक्क ‘ग्लॅक्सो’चाच एक कारखाना विकत घेतला. पुण्यातील उद्योजक सायरस पुनावाला यांनी १९६६ साली ‘सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ या विविध रोगांवर लस तयार करणाऱ्या कंपनीची स्थापना केली. आज सायरस पुनावाला भारतातील सातव्या क्रमांकाचे आणि जगातील १७० क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. या सर्व उद्योजकांनी उद्योगाची पाश्र्वभूमी नसताना, केवळ स्वकर्तृत्वावर मिळवलेलं एवढं प्रचंड यश नव्या उद्योजकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे!

लस निर्माण करण्याचा उद्योग हा संशोधनावर अधिष्ठित उद्योग आहे. कोणत्याही प्रकारची लस विकसित करण्यासाठी सूक्ष्मजीवशास्त्र, जीवरसायनशास्त्र आणि शरीरशास्त्र या सर्वाचं सखोल ज्ञान असणारे शास्त्रज्ञ, आधुनिक उपकरणे असलेली अद्ययावत प्रयोगशाळा आणि ती उपकरणं कौशल्याने हाताळणारे तंत्रज्ञ यांची आवश्यकता असते. लस उद्योगातील कंपन्या त्यांच्या एकूण उत्पन्नापकी १५ ते २५ टक्के रक्कम संशोधनावर खर्च करतात. प्रयोगशाळेत तयार झालेली लस कारखान्यात मोठय़ा प्रमाणावर निर्माण करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री उभी करणं, नवी लस बाजारपेठेत आणण्यापूर्वी तिच्या चाचण्या घेणं आणि आवश्यक त्या सरकारी परवानग्या मिळवणं या सर्वासाठी, दीर्घ मुदतीची, मोठी आर्थिक गुंतवणूक करणं अनिवार्य असतं. परंतु जेव्हा संशोधन यशस्वी होऊन विकसित झालेली लस रोगावर मात करते तेव्हा कंपनीला प्रचंड मोठा नफा मिळतो. तसेच त्यामुळे असाध्य वाटणारा रोग नियंत्रणात येतो.

१९०० ते १९८० या काळात देवीच्या रोगाने जवळपास तीन कोटी लोकांचा मृत्यू झाला आणि त्यापेक्षा सुद्धा कितीतरी जास्त लोकांच्या चेहऱ्यावर देवीचे व्रण कायमचे राहिले. लसीकरणामुळे त्यानंतर देवीच्या रोगाचं जगातून उच्चाटन झालं. १९८८ सालापर्यंत प्रत्येक वर्षी जगभरात सरासरी साडेतीन ते चार लाख बालकांना पोलिओने अपंगत्व येत असे. १९८८ साली पोलिओच्या लसीकरणाची जागतिक पातळीवर सुरुवात झाली. त्यानंतर पोलिओग्रस्तांची संख्या वेगाने कमी होत गेली. गेल्या वर्षी जगात फक्त बावीस लोकांना पोलिओची बाधा झाली. लसीकरणामुळेच भारत आता पोलिओमुक्त झाला आहे.

यामुळे लस विकसित करण्याच्या संशोधनाला आणि उद्योगाला साहाय्य करण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संशोधन संस्था आणि त्या-त्या देशांची सरकारे नेहमीच तयार असतात. आज जगभरात उद्रेक झालेल्या ‘करोना’ विषाणूवर लस शोधण्यासाठी फ्रान्समधील ‘पाश्चर इन्स्टिटय़ूट’ किंवा अमेरिकेतील ‘केसर परमेनेट वॉिशग्टन हेल्थ रिसर्च इन्स्टिटय़ूट’सारख्या मान्यवर संशोधन संस्थांनी पुढाकार घेतला आहे. भारतामध्ये अनेक कंपन्या संशोधनासाठी मुंबईतील ‘हाफकिन इन्स्टिटय़ूट’ किंवा ‘कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च’शी (सीएसआयआर) संबंधित प्रयोगशाळांचे सहकार्य घेतात. कंपनीकडे एखादी उपयोगी लस किंवा तत्सम औषधांवर संशोधन आणि त्यानंतर त्याचे उत्पादन करण्याचा योग्य आणि आश्वासक प्रस्ताव असेल तर दिल्ली येथील ‘डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी’ किंवा ‘डिपार्टमेंट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’ यासारख्या संस्था त्यासाठी नाममात्र व्याजदराने, दीर्घ मुदतीचे कर्ज देतात.

जिवाणू, त्यांच्या संसर्गातून उद्भवणारे रोग, त्या रोगांवर प्रतिकारक लस शोधणाऱ्या औषध कंपन्या आणि त्या देशांची सरकारे या सर्वाबाबत बऱ्याचवेळा अनेक वाद आणि प्रवाद निर्माण होत आले आहेत. एड्सचा संसर्ग करणारा व्हायरस हा मानवाने जेनेटिक इंजिनीअरिंगच्या साहाय्याने निर्माण केलेला कृत्रिम व्हायरस आहे आणि त्याची निर्मिती एका सनिकी प्रयोगशाळेत झाली किंवा काही वर्षांपूर्वी जगात पसरेला ‘स्वाइन फ्लू’ हा वास्तवात होता त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक संहारक आहे असं भासवलं गेलं. त्यातून त्या रोगावर लस आणि औषधे देणाऱ्या कंपन्यांनी, त्या साथीच्या काळात, जवळपास ८० हजार कोटी रुपयांची कमाई केली. यासारख्या प्रवादांमधील सत्यासत्यता कधीच स्पष्टपणे समोर येणार नाही. पण या लसींनीच आपल्याला देवीसारख्या आयुष्य विरूप करणाऱ्या जीवघेण्या रोगापासून संरक्षण दिलं. पोलिओला दूर करून आपलं आयुष्य सुदृढ केलं. गोवर, गालगुंड, टायफॉइड, आणि कांजिण्याच्या वेदनांपासून आपलं बालपण मुक्त केलं. ही वस्तुस्थिती आपल्या डोळ्यांसमोर आहे. म्हणूनच लसींचा हा उद्योग स्पर्धा आणि आर्थिक गणितं, या पलीकडे जाऊन संपूर्ण मानवजातीच्या कल्याणला कारणीभूत ठरत असलेला उदात्त उद्योग आहे!