प्रा. डॉ. प्रतिमा वाघ – response.lokprabha@expressindia.com

सध्या आपण सर्वात जास्त कोणती माहिती मिळवत असू तर ती असते करोनाबद्दलची. जीवन मरणाचा प्रश्न आहे तो!  करोना कोणाला गाठतो, पुरुषांना कसा जास्त, तुलनेत महिलांना कसा कमी, भारतीय वंशाच्या लोकांमध्ये जगाच्या तुलनेत कशी बरी परिस्थिती आहे, आपल्याला दिल्या गेलेल्या बीसीजीने बहुतेक भारतीयांना वाचवले असावे का? व्हिटॅमिन डीने करोनाला अटकाव घालता येईल का? लहान मुले त्याच्या परिघातून कशी सुटत चालली आहेत. मधुमेही आणि स्थूल मंडळींशी तो कसा जवळीक दाखवतो.. इत्यादी इत्यादी.  थोडक्यात विषय असा, की अशी जी माहिती मिळवणे चालू आहे, त्यातूनच या आजारापासून वाचण्यासाठीचा मार्ग मिळवण्याचा आपला जो जीवघेणा अट्टहास आहे त्याला जरा शास्त्रशुद्ध पाया घालून दिला की जो काही अभ्यास पुढे येतो तो म्हणजे ‘एपिडेमिओलॉजी’ (epi-upon, demio-people, logy-study), एक अत्यंत महत्त्वाची अशी ही वैद्यकीय शाखा, संपूर्ण समाजाच्या मदतीशिवाय पूर्णत्वास न जाऊ शकणारी अशी!

एपिडेमिओलॉजी म्हणजे एखाद्या आजार/ रोगाचा किंवा ज्याने जीवसृष्टीच्या आरोग्यास बाधा पोहोचते अशा कुठल्याही परिस्थितीच्या कारणांचा तसंच त्याच्या परिणामांचा लोकसहभागातून केलेला/झालेला सखोल अभ्यास. ‘झालेला’ अशासाठी की अनेकदा ती परिस्थिती उद्भवल्यावर माणसाला शहाणपण येतं, जे सद्यस्थितीत आपल्या कोरोनास लागू पडत आहे.

एपिडेमिओलॉजिकल सव्‍‌र्हेचा निष्कर्ष म्हणजे मुळात अगदी तावून सुलाखून निश्चित केलेली जीव वाचवण्याची प्रणाली असल्याने अर्थातच वेळखाऊ असते, मात्र हातात ठोस काही पडेपर्यंत हानी सहन करण्यापलीकडे मानवजात काही करू शकत नाही. आज आपण अगदी त्या स्थितीतून जात आहोत.

एपिडेमिओलॉजीचा इतिहास ग्रीक हिप्पोकॅट्र्स पासून सुरू होतो. पहिलावहिला एपिडेमिओलॉजिस्टचा मान यांस जायचे कारण यांच्या मते हवा, आग, पाणी आणि पृथ्वी तत्त्वं या चार गोष्टींचे संतुलन बिघडले की आजार निर्माण होतो आणि यातून बरे व्हायचे असेल तर त्यांच्यापकी कोणाला तरी बाहेरचा रस्ता दाखवावा अथवा कोणा एकास पायघडय़ा घालाव्या. (आज हे लागू पडते. करोना विषाणूस, जो हवेत आहे, शरीरात आहे त्यास काढून टाका त्याचबरोबर पृथ्वीतत्त्वास पायघडय़ा अंथरा ) ख्रिस्तपूर्व ४६०च्या काळातील ही गोष्ट,  यानंतर १८०२ मध्ये म्हणजेच अनेक शतकानंतर पुन्हा या शास्त्राचा उल्लेख बघायला मिळतो, तो स्पॅनिश फिजिशियन विलाल्बाच्या एका थिअरीत. त्यावेळी मानवाच्या सुखासीन आयुष्य जगण्याच्या सवयीमुळे आजारांना निमंत्रण मिळते असा सार्वत्रिक समज होता (खरे तर आजही ‘यात काय संशय?’ अशीच परिस्थिती आहे, असो) यानंतर महत्त्वाचे काम झाले ते १९ व्या शतकात ब्रिटनमध्ये! एपिडेमिओलॉजी शाखेचा खरा पाया रचणाऱ्या जॉन स्नो यांचा कॉलरा साथीचा अभ्यास आजही दिशा दाखवणारा ठरावा अशी त्याची महती! १८५४ च्या सुमारास प्रजेच्या अस्वच्छतेमुळे लंडनमधील थेम्स नदीच्या पाण्याने प्रदूषणाचा उच्चांक गाठलेला होता आणि कॉलराची साथ पसरली. यापूर्वी मानवी आजारांसाठी फक्त प्रदूषित हवेस जबाबदार धरण्यापर्यंतचाच अभ्यास असल्याने पाण्याविषयी कोणाला संशयही नव्हता. थेम्स नदीचे पाणी हॅण्डपम्पामार्फत शहराला पुरवणाऱ्या दोन कंपन्या आपले काम करीत असताना पहिल्यांदा जॉन स्नो यांनी या साथीच्या प्रकरणात लक्ष घातले. शहरातल्या ब्रॉड स्ट्रीट भागात मृत्यूने थमान घातलेले होते. या परिसरातील प्रत्येक घराघरांत जाऊन त्यांनी सर्व माहिती गोळा केली, या भागाचा एक िबदू नकाशा तयार केला. (हा व्होरनोई मॅप म्हणून ओळखला जातो) हे सर्व करत असताना त्यांच्या असे लक्षात आले की जास्तीत जास्त मृत्यू त्या रस्त्यावर असलेल्या एका हॅण्डपम्प सभोवताली असणाऱ्या घरांमधले आहेत. प्रयोगादाखल त्यांनी त्या हॅण्डपम्पचे हॅण्डल काढून तो निरुपयोगी केला, इतरत्रही पाण्यामध्ये क्लोरीन टाकायचा प्रयोग केला आणि मृत्युदर कमी झाला. पाणीपुरवठादार कंपन्यांचा लेखाजोखा घेताना लक्षात आले की, नदीच्या वरच्या भागातला पाणीपुरवठा ज्या भागात झाला होता तिथला मृत्यूदर, शहरातून वाहणाऱ्या नदीच्या पाण्याचा वापर करणाऱ्यांच्या तुलनेत कमी होता. शिवाय एक निरीक्षण असेही, की ब्रॉड स्ट्रीटवरील एका बिअर कंपनीच्या कामगारांना कॉलराची बाधा झाली नव्हती, तेव्हा असे का म्हणून याचाही अभ्यास करणे आले. या कामगारांना बिअर रिचवायला डेली अलाउन्स मिळत असल्याने ते पाण्याऐवजी बीयर गटकावत, त्यामुळे ते कॉलरापासून वाचल्याचे निदर्शनास आले. हा सर्व अभ्यास एपिडेमिओलॉजीचा पाया ठरला.

स्नोपाठोपाठ डॅनिश फिजिशियन स्लेजनरचे जन्मजात बाळांना धनुर्वातापासून वाचवण्याचे काम यावरच आधारित ठरले. हंगेरियन सेमेल्वीसने र्निजतुकीकरणावर भर दिल्याने अनेक बालकांचे प्राण वाचवता आले. पुन्हा मधला काळ या सर्व कामांकडे डोळेझाक करण्यात गेला. १८६५ मध्ये लिस्टरने हे काम पुनर्जीवित केले.

२० व्या शतकात रोनाल्ड रॉसने या शास्त्राला गणितीय पद्धतीची जोड देऊन ते भक्कम केले. एपिडेमिओलॉजीला कलाटणी मिळाली ती १९५४ च्या सुमारास. तोपर्यंतचा अभ्यास झाला होता तो जिवाणू, विषाणू व त्यांच्या साथी टाळणे याच संदर्भातला होता. कर्करोगासारखी बडी धेंडे अजून त्या कक्षेच्या बाहेरच होती. रिचर्ड डॉल आणि ए. बी. हिल या ब्रिटिश जोडगोळीने फुप्फुसाच्या कर्करोगावर काम सुरू केले होते. या कर्करोगाचे मूळ सापडत नव्हते आणि ब्रिटन, अमेरिकेत हा कर्करोग बराच हातपाय पसरवू लागलेला असताना लंडनमधील २० रुग्णालयांमधील रुग्णांचा येथे अभ्यास करण्यात आला. या कर्करोगाच्या रुग्णांबरोबरच इतर आजारांचे रुग्ण तुलनेसाठी निवडण्यात आले. तीन पानी प्रश्नावली तयार करण्यात आली, डॉक्टरांच्या अभ्यास गटाच्याही मुलाखती घेतल्या. सर्व रुग्णांचे वय, लिंग, सवयी या सर्व गोष्टींचा ताळेबंद घेतला, दर दिवसाला किती सिगारेट्सचा धुराडा केला म्हणजे फुप्फुसाचा कर्करोग होईल या निष्कर्षांप्रत मंडळी पोहोचली आणि सर्वात शेवटी संख्याशास्त्राचा वापर करत धूम्रपान आणि फुप्फुसाचा कर्करोग यातील नातं स्पष्ट झालं. तंबाखू उद्योगाने अर्थातच हे नातेसंबंध खोटे ठरवण्यासाठी अनेक महिने खिंड लढवली, पण भक्कम पुराव्यांवर आधारित संशोधनामुळे शेवटी सिगारेटच्या पाकिटावर, ‘सिगारेटचे सेवन स्वास्थ्यास हानिकारक’ असल्याचा शिक्का परतवण्यास ते असमर्थ ठरले.

२० व्या शतकाच्या उत्तरार्धात जसजशी वैद्यक शाखेची प्रगती होऊ लागली, तसे रक्तातील अनेक मॉलेक्युलर मार्कर्स, इतर जैविक नमुने तसेच आपला पर्यावरणीय अधिवास अनेक आजारांचा मागोवा काढण्यात सफल होऊ लागला, याला मॉलेक्युलर एपिडेमिओलॉजी असे संबोधण्यात आले. सोबत जेनेटिक एपिडेमिओलॉजी होतीच. (डॉक्टरांकडे गेल्यावर, आपली तपासणी चालू असताना मध्येच आपल्या आई-वडील, आजोबा यांना मधुमेह, रक्तदाब वगरेची चौकशी होते. ही ख्यालीखुशाली काही प्रेमापोटी नसते.. आपले आजारांचे आनुवंशिकत्व/ खानदानत्व शोधणे असते) यात आता मॉलेक्युलर पॅथॉलॉजीची भर पडून नवीन नामकरण झाले आहे ‘मॉलेक्युलर पॅथॉलॉजिकल एपिडेमिओलॉजी’. यामध्ये अभ्यासकाला अनेक गोष्टींचे परस्परसंबंध तपासावे लागतात. उदाहरणार्थ, पहिल्या गटात

व्यक्तीचा अधिवास, खाण्या-पिण्याच्या सवयी, राहणीमान, आनुवंशिकत्व. दुसऱ्या गटामध्ये पेशीमध्ये किंवा पेशीबाहेर असलेल्या मॉलेक्युल्समध्ये होणारे बदल आणि तिसरे म्हणजे उत्क्रांतीचा टप्पा आणि रोगात होणारी वाढ या सर्वाचा एकत्रित अभ्यास त्या-त्या रोगाच्या बाबतीत माणसाला आत्तापर्यंत तरी शहाणे करून वाचवण्याची हमी देत होता.

हे सर्व करत असताना साथतज्ज्ञाला प्रश्न पडत राहणे फारच महत्त्वाचे, उदा. कोणता आजार? त्याची लागण कुणाकुणाला झाली? कोणत्या ठिकाणी त्याचे अस्तित्व दिसले? कुठे दिसले नाही? तो कसा किंवा कशामुळे झाला असावा? हा आजार कसा शोधायचा? काय केले तर तो टाळता येईल? थोडक्यात, अटकाव कसा करायचा? अशी सर्व ‘क’ची बाराखडी!

आज करोनाबाबतीतही आपण यापलीकडे वेगळे काय करतोय? साथविकारशास्त्रातील एका स्थित्यंतराचा २१ व्या शतकातला इतिहास घडतोय, आपण तो याचि देही याचि डोळा बघणारी/ अनुभवणारी पात्रे आहोत. करोनाच्या एपिडेमिओलॉजिकल सव्‍‌र्हेचे आपण सन्मान्य सभासद आहोत. तेव्हा दिवस असे हे शिकायचे.. आणि सध्या तरी करोनासहित जगायचे!