scorecardresearch

वर्धापनदिन विशेष : हे जीवन सुंदर आहे!

एक वर्ष लोटलं टाळेबंदीला. दुसऱ्या कडक टाळेबंदीची टांगती तलवार डोक्यावर आहे. सारं कसं शांत होतं.. महिनोन्महिने! एका बाजूस रस्त्यावरही स्मशानशांतता अन् दुसरीकडे स्मशानाच्या दिशेने जाणाऱ्या रुग्णवाहिका..

वर्धापनदिन विशेष : हे जीवन सुंदर आहे!
गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षांचा पहिला दिवस. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि’ असं म्हणत नव्याने सुरुवात करण्याचा दिवस.

विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

एक वर्ष लोटलं टाळेबंदीला. दुसऱ्या कडक टाळेबंदीची टांगती तलवार डोक्यावर आहे. सारं कसं शांत होतं.. महिनोन्महिने! एका बाजूस रस्त्यावरही स्मशानशांतता अन् दुसरीकडे स्मशानाच्या दिशेने जाणाऱ्या रुग्णवाहिका.. रुग्णवाहिकेचा सायरन वाजला तरी अनेकांच्या छातीत धस्स होत असे! हाच तो साक्षात्काराचा क्षण होता.. अनेकांना जाणीव झाली, हे जीवन अनमोल आहे. ते प्रत्येक क्षण पूर्णाशाने जगायला हवं! हाच तो काळ ज्या वेळेस माणसं थांबली, उत्पादन प्रक्रिया थांबली, वाहनं थांबली आणि निसर्गाचं अनोखं दर्शन माणसांना जगभर झालं!

मृत्यूसमोर सारे धर्म, पंथ सारखेच असतात हेही कळलं. आप्तेष्टांचं अंत्यदर्शनही करोनामुळे अशक्य झालं.. सर्वच जण घरात बंदिस्त झाले आणि मग काहींना कंटाळा आला. बंदिस्त काळात अनेकांना सुरुवातीला मजा वाटली तर नंतर अनेकांना त्याही अवस्थेचा कंटाळा आला. ..काहींनी त्यातूनही मार्ग काढला आणि प्रवास सुरू झाला सृजनाच्या दिशेने! कोविडपोकळीतील या सृजनाचा, मानवतेच्या अनोख्या दर्शनाचा, तर काही कल्पक व्यक्तींनी त्यांच्या त्यांच्या व्यवसाय- पेशामध्ये वापरलेल्या नवोन्मेषाचा वेध आम्ही या वर्धापन दिन विशेषांकामध्ये घेतला आहे. उद्देश एकच की, माणसांमध्येही काही अशी सुपीक, प्रकाशाची बेटं असतात, त्यांच्याकडून सहजप्रेरणा मिळू शकते!

गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षांचा पहिला दिवस. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि’ असं म्हणत नव्याने सुरुवात करण्याचा दिवस. म्हणूनच या दिवशी काही प्रेरणादायी असावं यासाठीच ‘लोकप्रभा’च्या वर्धापन दिन विशेषांकाचा अट्टहास!

या क्षणी आवर्जून आठवण येते ती सुधीर मोघे यांच्या कवितेची. या कवितेमध्ये ते ‘आकाशाची नितळ निळाई, क्षितिजाची लाली, दवात भिजल्या किरणांची रांगोळी’ या साऱ्याचा उल्लेख करतात. नंतर कंसात म्हणतात, इमारतींच्या जंगलातील वनवासात, गर्दीत घुसमटले रस्त्यांचे श्वास. पण अवतीभोवती कोठेही जा.. निसर्ग एकच आहे. हे जीवन सुंदर आहे. नंतरच्या कडव्यांत ते पानांमधल्या पाऊसधारांच्या गमतीचं वर्णन करतात, पण रेनकोटचं ओझं वागवत, कपडय़ांचा सत्यानाश आणि सर्दीला आमंत्रण हेच डोक्यात असेल तर पावसाची गंमतधार कशी लक्षात येणार, असा प्रश्न न करताच त्याची जाणीवही करून देतात. सुधीर मोघेंच्या पुढील ओळी कदाचित आपली कोविडकाळातील पोकळी, कोविडकोंडीआधीचीही जगण्याची धावपळ आणि हातून निसटलेले क्षण नेमके व्यक्त करतात..

(याच अंकातील प्राची पाठक यांचा लेख अवश्य वाचा.)

पानांमधली सळसळ हिरवी अन् किलबिल पक्ष्यांची

झुळझुळ पाणी, वेळुमधुनी खुळी शीळ वाऱ्याची

(इथं गाणं लोकलचं आणि वारं डोक्यावर गरगरणाऱ्या पंख्याचं)

इथे तिथे संगीत अनामिक एकच घुमते आहे

हे जीवन सुंदर आहे!

..अशा या सुंदर जीवनाच्या साक्षात्कारासाठी कोविडकाळात

सर्वाना गुढीपाडव्याच्या आरोग्यदायी शुभेच्छा!

मराठीतील सर्व मथितार्थ ( Matitarth ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या