विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

प्रचंड वेगात उत्परिवर्तन करणाऱ्या ब्रिटनमधील करोनासंदर्भातील चिंता सतावत असतानाच आता दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिलमधून उत्परिवर्तित होऊन भारतात पोहोचलेल्या करोनाच्या नव्या अवताराने कपाळावरील चिंतेची आठी वाढविलेली आहे; पण केवळ तेवढेच नव्हे तर गेल्या ४८ तासांमध्ये अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे टाळेबंदीचे मोहोळ पुन्हा फिरू लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता पुन्हा टाळेबंदी शक्यतो करणार नाही, असे सांगितलेले असले तरी पुन्हा र्निबध कडक करावे लागतील, असेही त्याच वेळेस सूचित केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा रात्रीची संचारबंदी आदी तत्सम र्निबध पुन्हा लागू झालेले दिसतील.

करोनाच्या प्रसारास सुरुवात झाली त्या वेळेस जगभरात कुणालाच त्याचा काहीही अंदाज आलेला नव्हता. मात्र नंतर असे लक्षात आले की, मुखपट्टीचा वापर, नियमित हात धुणे (सॅनिटायझर वापरणे) आणि शारीरिक अंतर राखणे याने त्याच्या प्रसाराला आळा बसू शकतो. या तिन्ही बाबी त्यामुळे अनिवार्य करण्यात आल्या. आता करोना प्रसारास वर्षही होऊन गेले. त्यावर उपाय असलेल्या लशीची निर्मितीही झाली. लशीच्या प्रभावक्षमतेबाबतच्या चाचण्याही यशस्वी झाल्या. तरीही आजदेखील त्याला आळा बसण्याची खात्री कुणालाच नाही. इस्रायलमध्ये मोठय़ा प्रमाणावर लसीकरण पार पडले असून तिथे करोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसते आहे. मात्र असे असले तरी दुसरीकडे अनेक युरोपीय व इतर देशही परत एकदा टाळेबंदीमध्ये जातानाचे चित्र भयावहच आहे. हातावर पोट असलेल्यांची संख्या सर्वाधिक असणाऱ्या भारतासारख्या देशामध्ये तर पुन्हा टाळेबंदी ही कुणालाच परवडणारी नाही; नागरिकांना व सरकारलाही!

आता कुठे अर्थव्यवस्थेचे चक्र वेग घेते आहे. त्यामुळे पुन्हा टाळेबंदीमध्ये शिरायचे नसेल तर दोन पातळ्यांवर तातडीचे प्रयत्न व्हायला हवेत. सरकारी पातळीवर लसीकरणाने वेग घेणे आवश्यक आहे. भारताने लसीकरणाचा वापर चांगल्या पद्धतीने राजनयासाठी केला आहे. शेजारील देशांना त्याचप्रमाणे जगभरातील अनेक देशांना लशींचा पुरवठा करून त्यांच्याशी मैत्रीपूर्ण सौहार्दाचा हात पुढे केला आहे; पण त्याचबरोबर देशभरातील लसीकरणाला वेग देणे हेही अर्थचक्रासाठी आणि नागरिकांच्या निरोगी आयुष्यासाठी तेवढेच आवश्यक आहे. लसीकरण सुरू झाले त्याला आता एक महिना पूर्ण झाला. अद्याप आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरणच सुरू आहे. येत्या काही दिवसांत वयवर्षे ५० वरील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होईल. लसीकरण वाढविण्यासाठी खासगी रुग्णालयांनाही त्यात समाविष्ट करून त्याचा वेग वाढवावा लागेल. त्याचप्रमाणे लसनिर्मितीच्या प्रक्रियेचाही वेग सरकारला वाढवावा लागणार आहे. इतर देशांना केवळ उपलब्ध लशींवरच भागवावे लागेल, मात्र भारत हाच सर्वाधिक लसनिर्मिती करणारा देश असल्याने आपल्याकडील करोना  प्रसारास पायबंद घालण्यासाठी अधिक आक्रमक मोहीम राबविण्याची गरज आहे.

नागरिकांनीही त्यासाठी सारे नियम पाळून सरकारसोबत राहणे आवश्यक आहे. मात्र करोना प्रसाराच्या आकडेवारीसोबत मुखपट्टी न वापरणाऱ्यांकडून दररोज जमा होणाऱ्या रकमेची कोटींची आकडेवारीही तेवढीच भयावह आहे. यामध्येच करोना प्रसाराचे महत्त्वाचे कारणही दडलेले आहे. त्यामुळे लसीकरण आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतरही करोना प्रसारात लक्षणीय प्रतिबंध होईपर्यंत नियम पाळणे हे नागरिकांच्याच हातात आहे. महत्त्वाचे म्हणजे करोनाकाळाचा सर्वात महत्त्वाचा धडा हा आपल्या वैयक्तिक आरोग्याच्या सवयींशी थेट संबंधित आहे. लशींची १००% खात्री कुणालाच नाही. त्यामुळे सध्या तरी करोना प्रतिबंधात्मक तीन आरोग्यदायी सवयी हाच महत्त्वाचा उपचार ठरणार आहे, याचे भान प्रत्येकाने राखणे आवश्यक आहे!