विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com

महामारी येते तेव्हा अनेकांचे जीव जातात; पण जे मागे उरतात, त्यांच्या आयुष्यावर दीर्घकाळ न मिटणारा ठसा उमटतो. संसर्गाचं, मृत्यूचं भय अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज स्वीकारायला भाग पाडते. अनेक सवयी दैनंदिन जीवनाचा भाग होऊन जातात. मास्क, सॅनिटायझर्स, हॅण्डवॉश हे आता रोजचंच झालं आहे. पण त्याव्यतिरिक्तही अनेक गोष्टी रोजच्याच होणार आहेत.

साथींमुळे सवयी कशा बदलतात हे पाहू. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या सवयीमुळे भारतीय नेहमीच टीकेचं लक्ष्य ठरतात. अमेरिकेतही पूर्वी सार्वजनिक ठिकाणी थुंकणं निषिद्ध मानलं जात नव्हतं. ठिकठिकाणी पिंकदाण्या ठेवलेल्या असत आणि नागरिक त्यांचा वापर करत. १९१८ मध्ये एन्फ्लूएन्झाची साथ पसरेपर्यंत हे चित्र कायम होतं. पण या साथीनंतर सार्वजनिक आरोग्याविषयीची सतर्कता वाढली. रस्त्यांवर थुंकणं बंद झालं आणि हळूहळू पिंकदाण्याही रस्त्यांवरून नाहीशा झाल्या.. हे झालं एक उदाहरण. अशा मोठय़ा साथींनी अनेक मानवी वर्तन, व्यवहारांत आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर इतिहासात येऊन गेलेल्या साथींचा प्रभाव आजही दिसतो. कच्चं दूध पिऊ नये, कच्चं किंवा अर्धकच्चं अंडं खाऊ नये, गर्भवतींनी अमुक एका प्राण्याचं मांस खाऊ नये, एकमेकांचे उष्टे पदार्थ खाऊ नयेत, मांसाहारी पदार्थाची भांडी स्वतंत्र असावीत असे अनेक नियम आजही अनेक घरांत काटेकोरपणे पाळले जातात. एरवी केवळ भ्रामक कल्पना किंवा अनाठायी भीती म्हणून हिणवल्या जाणाऱ्या रितींचं मूळ, त्यामागचं तर्क अशा साथींत असतं. एखादी व्यक्ती शिंकली ‘की गॉड ब्लेस यू’ म्हणण्याची पद्धतही अशाच साथींतून आली असावी. एन्फ्लूएन्झाच्या साथी दर काही वर्षांनी नवनवी रूपं घेऊन जगासमोर उभ्या ठाकल्या. ताप, सर्दी, खोकला ही त्यातली मुख्य लक्षणं होती. एखाद्याला आलेली शिंक ही गंभीर, जीवघेण्या आजाराची द्योतक ठरू नये, अशी देवाकडे प्रार्थना करण्याची पद्धत कधी तरी सुरू झाली असावी आणि नंतर कायमचीच रुळली असावी.

करोनाच्या महामारीमुळेही अशा अनेक नव्या सवयी आपल्या आयुष्यात शिरकाव करतील. त्यामुळे या स्थित्यंतराची दखल घेणं आवश्यक आहे. या काळात सर्वात मोठा परिणाम होईल, तो खाण्या-पिण्याच्या सवयींवर. हॉटेल-कॅन्टीनमध्ये खाणं, वडे-भजी-भेळपुरी-पाणीपुरीवर ताव मारणं, वीकेंडला फॅमिली डिनर, पब, पिकनिकला जाण्याचे बेत आखणं आधीच बंद झालं आहे. टाळेबंदी संपल्यानंतरही एकंदर तयार खाद्यपदार्थाविषयीचा संशय बराच काळ कायम राहील. हॉटेलमध्ये जायचं असेल तरी कमी गर्दीच्या ठिकाणी जाण्यास प्राधान्य दिलं जाईल. जिथे पदार्थ स्वत:च वाढून घ्यायचे असतात, तिथे भांडय़ांना अनेकांचे हात लागलेले असतात; त्यामुळे अशा ठिकाणी जाणं बराच काळ बंद राहील. भर उन्हाळ्यात शीतपेयं आणि आइस्क्रीमच्या खरेदीत झालेली घट पाहता पुढे बराच काळ अशा तयार थंड पदार्थाचा खप कमीच राहील, असं दिसतं.

गेल्या काही वर्षांत खाद्यपदार्थ ऑनलाइन ऑर्डर करण्याची सवय आपल्या चांगलीच अंगवळणी पडली आहे. सध्या हॉटेल इत्यादी आस्थापना बंद असल्या तरी होम डिलिव्हरी सुरू आहे; पण खानावळ चालवणारी महिला, पिझ्झा डिलिव्हरी करणारा मुलगा यांना करोना झाल्यामुळे त्यांचे ग्राहकही बाधित झाल्याच्या बातम्यांच्या पाश्र्वभूमीवर अनेकांनी ही सवय तात्पुरती बाजूलाच ठेवली आहे. घरी येऊन स्वयंपाक करणाऱ्यांच्या किंवा डबा पोहोचविणाऱ्यांच्या सेवा कधीच बंद झाल्या आहेत. त्यामुळे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी स्वत:लाच कष्ट घ्यावे लागणार हे वास्तव अनेकांनी स्वीकारलं आहे. समाजमाध्यमांवर आलेला पदार्थाच्या छायाचित्रांचा पूर पाहता हे सिद्धच होत आहे. पण हा ट्रेण्ड नव्याचे नऊ दिवस ठरण्याचीच भीती अधिक आहे. घरकामाची माणसं रजेवर गेली आहेत. ज्या घरांत स्वयंपाक, साफसफाई, नियमपालन करत खरेदी अशा अनेक जबाबदाऱ्या फक्त गृहिणीलाच पार पाडाव्या लागतात, अशा ठिकाणी मात्र महिलांचा तणाव आताच शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे जबाबदाऱ्या वाटून घेणं बहुतेक कुटुंबांत अंगवळणी पडू शकेल.

खरेदीविषयीच्या आपल्या सवयींत आमूलाग्र बदल झाला आहे आणि होत राहणार आहे. गल्लीतल्या किराणाच्या दुकानात पार आतपर्यंत घुसून, दुकानदाराकडून गावभरच्या खबरा काढत ‘भैय्या, ये दो- वो दो’ म्हणत, एक-एक वस्तू मागत तब्येतीत खरेदी करण्याची चैन आता आणि पुढचा बराच काळ कोणालाही परवडणारही नाही. मनात आलं की, ऑफिसहून येता-जाता खरेदी करणं बंद झालं आहे. त्यामुळे महिन्याच्या सामानाची यादी करून एकदाच सर्व काही आणून ठेवणं, आठवडाभर पुरेल एवढी भाजी-फळं एकदाच आणून फ्रिजमध्ये भरून ठेवणं या सवयी सर्वाच्याच अंगवळणी पडल्या आहेत. आणलेल्या सर्व पदार्थाचं र्निजतुकीकरण करणं, भाज्या-फळं स्वच्छ धुऊन साठवण्याच्या सवयी आपण स्वीकारल्या आहेत. आज मिळालेला पदार्थ उद्या उपलब्ध असेलच असं नाही, हे माहीत असल्यामुळे कोणतीही गोष्ट वाया न घालवता वापरण्याची काळजी प्रत्येक जण घेऊ लागला आहे. आता तर अनेक ठिकाणी दुकानं बंद करून केवळ होम डिलिव्हरी सुरू ठेवली आहे. पण सकाळी यादी पाठवली की दुपारी सामान हजर, असं वाटत असेल, तर चुकताय तुम्ही. कारण अनेक दुकानदारांकडे होम डिलिव्हरीसाठी पुरेसं मनुष्यबळ नाही. त्यामुळे ग्राहकाने यादी पाठवावी आणि काही तासांनंतर स्वत:च येऊन सामानाच्या पिशव्या घेऊन जाव्यात, अशी नवी सोय होण्याची शक्यता अधिक आहे. आपण जशी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊनच दवाखान्यात जातो, तसंच गर्दी आणि रांगा टाळण्यासाठी खरेदीसाठी ठरावीक वेळ घेऊन दुकानात जाण्याची सोय केली जाऊ शकते. जिथे ग्राहक स्वत: शेल्फपाशी जाऊन वस्तू खरेदी करतो, अशा मॉल किंवा अन्य मोठय़ा दुकानांचा संपूर्ण आराखडाच बदलावा लागण्याची शक्यता आहे. दोन शेल्फमधलं अंतर वाढवण्याची सक्ती केली जाऊ शकते. भारतीय ग्राहक विविध गॅजेट्स, कपडे, पादत्राणं, पुस्तकं ऑनलाइन खरेदी करण्यास सरावले आहेत, पण धान्य, भाज्या, फळं मात्र ते आजही स्वत: बाजारात जाऊन तपासूनच खरेदी करतात. ही मानसिकता आता बदलू लागेल. बाजारात जाऊन आजाराचा धोका आणि पोलिसांचा दंडुका झेलण्यापेक्षा ऑनलाइन खरेदीचा पर्याय अनेक जण स्वीकारतील.

आज सर्व जण घरात बंद आहेत. सर्व व्यवहार ठप्प आहेत. कधी ना कधी हे चित्र बदलेल. सर्वानाच आपले व्यवहार हळूहळू पूर्वपदावर आणावे लागतील. पण तोपर्यंत आपल्या दैनंदिन जीवनात खूप बदल झालेला असेल. टाळेबंदीच्या काळात अनेकांना कार्यालयीन काम घरून करावं लागत आहे. टाळेबंदी उठल्यानंतरही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था लगेच पूर्ण क्षमतेने सुरू केली जाणार नाही. शिवाय त्यात गर्दी करूनही चालणार नाही. त्यामुळे अनेकांना पुढे बराच काळ घरूनच काम करावं लागणार आहे. घरून काम करण्याचे दुष्परिणाम जेमतेम महिनाभरातच अनेकांना जाणवू लागले आहेत. ऑफिसातील हजेरी हा तिथल्या कामगिरीपेक्षाही महत्त्वाचा भाग मानणाऱ्या भारतीयांसाठी हा नवा प्रकार आहे. लहान घरांत अनेक व्यक्ती राहात असल्यामुळे कामासाठी योग्य आणि शांत जागा मिळणं अनेकांसाठी मोठं आव्हान ठरत आहे. कामासाठी स्वतंत्र खुर्ची-टेबल, संगणक, इंटरनेट इत्यादी सुविधा अनेकांच्या घरात नसतात. मग घराचा एखादा कोपरा पकडून, लॅपटॉप मांडीवर घेऊन अवघडलेल्या स्थितीत खूप काळ काम केल्यामुळे अनेकांना पाठदुखी, डोकेदुखी, डोळे चुरचुरणे अशा समस्या भेडसावू लागल्या आहेत आणि त्या बराच काळ कायम राहणार आहेत.

ऑफिसचा वेळ आणि घरचा वेळ आजवर स्वतंत्र होता, मात्र आता या दोहोंची सरमिसळ झाली आहे. त्यामुळे अनेकांना सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही कामाचे कॉल येत राहतात. ऑफिसचं काम सुरू असताना मध्येच घरची कामं करावी लागल्यामुळे कुठेच लक्ष केंद्रित करता येत नाही, अशी अनेकांची अवस्था आहे. शिवाय इंटरनेटचा अपेक्षित वेग न मिळणं, अन्य तांत्रिक समस्या उद्भवल्यास वेळीच मदत न मिळणं, त्यातून निर्माण होणारे गैरसमज आणि वाढणारा ताण अनेकांना सहन करावा लागत आहे. हा शारीरिक, मानसिक ताण पुढचा बराच काळ अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग राहणार आहे.

सर्व सहकाऱ्यांनी सहमतीने ठरावीक वेळ निश्चित करून काम त्याच वेळेपुरतं मर्यादित ठेवणं सर्वाच्याच सोयीचं आणि हिताचं ठरणार आहे. तसं झाल्यास प्रत्येकालाच स्वत:चा कौटुंबिक, वैयक्तिक वेळ शिल्लक ठेवता येईल. कार्यालयात जाण्या-येण्यासाठी ज्यांना दिवसाचे तीन-चार तास खर्ची घालावे लागत होते; त्यांना आता हा वेळ छंद जोपासणं, घरच्या घरी व्यायाम इत्यादींसाठी सत्कारणी लावता येईल. तसं झाल्यास हा निराशाजनक काळही सुसह्य़ होऊ शकेल.

शाळांच्या बाबतीत तर समस्या फारच मोठी आहे. बहुतेक शाळांत एका बाकावर किमान दोन विद्यार्थी बसतात. अगदी लहान वयातल्या मुलांना तर शारीरिक अंतर, वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयींचं महत्त्व समजावून सांगणं, त्याचे नियम पाळायला लावणं केवळ अशक्यच असतं. त्यामुळे शाळा सुरू करणं हे सर्वात मोठं आव्हान असेल. अभ्यासक्रम ऑनलाइन शिकवण्याचा पर्याय अनेक शाळांनी स्वीकारला आहे. पण त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा अनेकांकडे नाहीत. खेडेगावातल्या गरीब शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ऑनलाइन हा पर्याय ठरूच शकत नाही. अनेकांकडे स्मार्टफोन नाहीत, इंटरनेट नाही, एकाच कुटुंबात शाळेत जाणारी अनेक मुलं आहेत, काहींच्या पालकांना शिक्षणाचं महत्त्व उमगलेलं नाही, अनेकांना अभ्यासासाठी फोन, आयपॅड, संगणक, इंटरनेट आवश्यक असू शकतं, याचीही जाण नाही. त्यामुळे अशा मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मात्र बिकट होत जाणार आहे.

वर्षांचे बाराही महिने गर्दीने भरलेले डॉक्टरांचे दवाखाने सध्या ओसाड पडले आहेत. करोनाबाधित डॉक्टर किंवा परिचारिकांच्या संपर्कात आल्यामुळे रुग्णांना संसर्ग झाल्याच्या बातम्यांमुळे अनेक जण डॉक्टरकडे जाणं टाळत आहेत. आजारी पडूच नये म्हणून काळजी घेणं आणि पडलो तरी घरगुती उपचार करणं असे पर्याय स्वीकारले जात आहेत. कॉल करून डॉक्टरांचा सल्ला घेणं, फोटो किंवा व्हिडीओ कॉल करून जखम, सूज दाखवणं याचं प्रमाण वाढलं आहे.

टीव्ही, इंटरनेट, समाजमाध्यम या बाहेरच्या जगात डोकावण्याच्या खिडक्या. पण सध्या यातली कोणतीही खिडकी उघडली तरी करोना एके करोनाच नजरेस पडत आहे. महामारीविषयीची ताजी माहिती मिळवण्याचं व्यसन आता अनेकांना लागलं आहे. सतत नकारात्मक बातम्या ऐकून येणारं नैराश्य हा या व्यसनाचा दुष्परिणाम आहे. त्यामुळे बातम्या ऐकण्याची किंवा समाजमाध्यमांचा वापर करण्याची वेळ ठरवून घेणं आणि ती काटेकोरपणे पाळणं अत्यावश्यक आहे. खिडकी, बाल्कनी, गच्ची, इमारतीच्या आवारात घालवला जाणारा वेळ वाढला आहे आणि पुढचे काही महिने वाढलेलाच राहील. रुग्णवाहिका, पोलिसांच्या गाडय़ा, अग्निशमन दलाची गाडी एवढंच नाही, तर साध्या बस किंवा रिक्षांचे आवाजही अनेकांना खिडकीकडे जाण्यास भाग पाडतील.

ब्युटी पार्लर, स्पा, सलोनमध्ये जाणारे आता तिथल्या कर्मचाऱ्यांना घरीच बोलावू लागले आहेत. ही सेवा आधीपासूनच उपलब्ध होती; मात्र त्यासाठी मोजावे लागणारे अधिकचे पैसे, घरात पुरेशी जागा नसणं अशा अनेक कारणांमुळे या सेवेला म्हणावा तसा प्रतिसाद अद्याप मिळाला नव्हता. पण अशा सेवा देणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे, ग्राहकांच्याही ते अंगवळणी पडणार आहे.

या साऱ्यात सर्वाधिक त्रासदायक गोष्ट आहे, ती चार भिंतींत अडकून पडणं. कुटुंबीय प्रत्येकालाच प्रिय असतात, पण माणसातला समाजप्रेमी प्राणी त्याला घरात फार काळ शांत बसू देणार नाही. आजवर सतत घराबाहेर असणारी माणसं ‘घरच्यांसाठी वेळ काढता येत नाही,’ म्हणून तक्रार करत होती. टाळेबंदीचे सुरुवातीचे काही दिवस कुटुंबीयांच्या सहवासात घालवल्यानंतर आता त्यांना आपल्या घराबाहेरच्या मोठय़ा कुटुंबाची उणीव जाणवू लागली आहे. अधूनमधून भेटणारे नातेवाईक, मित्रमंडळी, घरकामांसाठी येणाऱ्या व्यक्ती, बस-ट्रेनमधले सहप्रवासी, कार्यालयीन सहकारी हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य नसले, तरी महत्त्वाचा भाग झालेले असतात. त्यांना बराच काळ न भेटणं, ठरलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त एकही चेहरा न दिसणं हे अनेकांसाठी त्रासदायक ठरू लागलं आहे. त्यावर उपाय म्हणून व्हिडीओ कॉलचा पर्याय वापरणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. कदाचित काही दिवसांनी हा संपर्कही विरळ होत जाईल.

एकमेकांना अभिवादन करण्याच्या पद्धतींतही बदल होतील. भारतीय संस्कृती तशी आधीपासूनच शारीरिक संपर्काविषयी साशंक! त्यामुळे दुरूनच नमस्कार करणं ही आपली पद्धत. पण गेल्या काही वर्षांत आलिंगन देणं, हात मिळवणं अशा पाश्चात्त्य सवयी आपणही स्वीकारल्या. आता आपणच नाही, तर एकूणच जग आपल्या अभिवादनाच्या सवयी बदलू लागलं आहे. नमस्कार करणं, कमरेत झुकणं, हात हलवून अभिवादन करणं, अशा सवयी जाणीवपूर्वक अंगीकारल्या जाण्याची शक्यता आहे. या संकटाची झळ प्रत्येकाच्याच खिशाला कमी-अधिक प्रमाणात बसणार आहे. त्यामुळे चैनीवर होणारा खर्च भविष्यात घटेल आणि केवळ अत्यावश्यक गरजांसाठीच खर्च केला जाईल. पर्यटन, चित्रपटगृहं, हॉटेल्स, कपडे-दागिने इत्यादींची दुकानं सध्या बंदच आहेत. भविष्यात ती सुरू झाली तरी तिथे जाण्याएवढे पैसे खिशात असतील की नाही, याची चिंता प्रत्येकालाच आहे. त्यामुळे पुढचा काही काळ तिथली वर्दळ माफकच राहण्याची शक्यता आहे.

कालपर्यंत आपण मोकळे फिरत होतो, सहज एकमेकांच्या घरी जात होतो, सहज हात मिळवत होतो, रस्त्यावर विकले जाणारे पदार्थ नि:शंकपणे खात होतो; पण एका विषाणूने आपलं सगळं जग आणि जगणं बदलून टाकलं. यातलं काय कायम राहील, किती काळ राहील याविषयी आताच कोणीही खात्रीलायक आडाखे बांधू शकत नाही. पण या बदलांचे आपण सारेच साक्षीदार होऊ, हे निश्चित!