भक्ती बिसुरे – response.lokprabha@expressindia.com

२०२० हे वर्ष सुरू झालं आणि चीनमधल्या करोना विषाणू संसर्गाच्या म्हणजेच कोविडच्या बातम्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांत डोकावू लागल्या. हा चीनमध्ये सापडलेला, डोळ्यांना न दिसणारा, पण वेगानं पसरणारा करोना विषाणू लवकरच भारतात दाखल होईल आणि आपलं जगणं ३६० अंशात बदलून जाईल, असं तेव्हा कोणी सांगितलं असतं तर आपण चक्क दुर्लक्ष केलं असतं; पण आधी केरळ, राजस्थान, पंजाब, दिल्ली, तेलंगणात आणि नंतर ९ मार्चला महाराष्ट्रात करोना विषाणू संसर्गाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली. पाठोपाठ देशात आधी जनता कर्फ्यू आणि नंतर टाळेबंदीची घोषणा करण्यात आली. लोकांनी घरीच राहावं, घरातूनच काम करावं, असं आवाहन करण्यात येऊ लागलं. त्यामुळे घरी राहिल्याने प्रसार थांबवणारा हा कुठला विचित्र आजार, असा प्रश्नच सामान्यांना पडला. प्लेगच्या साथीच्या आठवणी केवळ गोष्टीरूपात ऐकलेल्या आजच्या पिढय़ांना- कोविडचा रुग्ण सापडला की त्याचं संपूर्ण विलगीकरण करायचं, त्याची शुश्रूषा करायला अगदी जवळचे नातेवाईकही त्याच्याबरोबर रुग्णालयात जाऊ शकत नाहीत ही कल्पना असह्य़ आणि अतार्किक वाटायला लागली. कोणतीही लक्षणं दिसत नसतील तरी त्या व्यक्तीची करोना चाचणी केली असता त्यात संसर्ग आढळू शकतो, म्हणजे लक्षणे नसलेली व्यक्ती करोनाची वाहक- असिम्प्टमॅटिक कॅरिअर असू शकते- तिच्याकडून तिच्या संपर्कात येणाऱ्या इतरांना हा संसर्ग ती तिच्याही नकळत देऊ शकते- हेही या साथीत बहुधा पहिल्यांदाच बघायला मिळालं. थोडक्यात काय, तर एक एक करत कोविडनं आपल्या तऱ्हेवाईकपणाची विचित्र कोडीच सामान्य नागरिकांसह अगदी निष्णात डॉक्टरांनाही घालायला सुरुवात केली. आज महाराष्ट्रातल्या करोना संसर्गाला सहा महिने लोटले तरी ही कोडी कमी होण्याचं नाव घेत नाहीत, हे विशेष! करोनाला प्रतिबंध म्हणून टाळेबंदी, मुखपट्टीचा आग्रह, गर्दी न करण्याची, सतत अंतर राखून वावरण्याची अट यांना वैतागून अनेक लोक अगदी सहज – ‘एकदाचा करोना होऊन गेला तर बरा!’ असे म्हणत आहेत. करोना बरा होतो हे खरेच, पण त्यानंतर काही रुग्णांमध्ये निर्माण होणारी इतर आजारांची गुंतागुंत थेट जिवावर बेतणारीच ठरू शकते, हे लक्षात ठेवणंही आवश्यक आहे.

करोनाच्या साथीने आजूबाजूला हातपाय पसरायला सुरुवात केली त्या वेळी रुग्णांवर उपचार कसे करायचे, कोणत्या औषधांचा वापर केला तर उपयोग होईल अशी एक ना अनेक आव्हानं यंत्रणांसमोर होती. संसर्गाचा संभाव्य फैलाव गृहीत धरून तेवढय़ा प्रमाणात आरोग्य यंत्रणा उभ्या करण्याची जबाबदारीही होती. करोना विषाणू संसर्गावर उपयोगी पडणारं कुठलंही औषध उपलब्ध नसल्यामुळे दिसतील त्या लक्षणांवर उपचार करत करत रुग्णांना बरे करायचे होते. करोनाव्यतिरिक्त आजाराच्या रुग्णांना लागणारी अत्यावश्यक वैद्यकीय सेवा बंद करणे शक्य नव्हते, त्यामुळे त्याची व्यवस्था ठेवणेही महत्त्वाचे होते. हे सगळे करत करत पुढे जाणे ही तारेवरची कसरत होती. आज, राज्यातले लाखो रुग्ण करोनातून ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत, म्हटले तर ही किती आनंदाची आणि समाधानाची गोष्ट; पण कोविड आपला विळखा असा सहज सैल करताना दिसत नाही. करोनातून बरे झालेले रुग्ण जरा कुठे मोकळा श्वास घेतात म्हणेपर्यंत या रुग्णांमध्ये एखादी वेगळीच गुंतागुंत उभी ठाकते. आरोग्य यंत्रणा, डॉक्टर आणि प्रशासनापुढे कोविडने घातलेली आतापर्यंतची कोडी कमी म्हणून की काय, ‘पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन’ हे एक नवं कोडं आता उभं राहिलेलं दिसत आहे. करोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये गंभीर स्वरूपाचे मेंदू, फुप्फुस, हृदयाचे आजार आढळण्यास सुरुवात झाली आहे. दृष्टी कमी होत जाण्याची उदाहरणेही आहेत. त्यामुळे करोनातून बरे होऊन घरी गेल्यावरही काही काळ अत्यंत खबरदारी घेण्याची गरज असल्याचे सगळ्याच शाखांतील तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.

करोनाचा संसर्ग एकदा होऊन गेला, की नागरिक काहीसे बेफिकीर होतात, मास्क वापरणे बंद करतात, हे अगदी प्राथमिक निरीक्षण. मात्र, करोनातून बरे झालेल्या रुग्णांसाठी केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नुकत्याच काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या. त्यात, मुखपट्टीचा वापर, अंतर राखणे, हातांची स्वच्छता या गोष्टी बरे झाल्यानंतरही पाळल्या जाणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. बरे होऊन घरी गेल्यानंतर लगेच आपला दिनक्रम पूर्ववत करू नये. काही काळ कुटुंबीयांपासून वेगळे राहाणे, त्यानंतर हळूहळू कुटुंबाबरोबर राहायला सुरुवात करणे, मात्र संपूर्ण विश्रांती, ताजे, पौष्टिक जेवण, योगासने, प्राणायाम आणि श्वासनाचे व्यायाम करणे याबाबतचा आग्रह धरण्यात आला आहे. करोनातून बरे झाल्यावर उद्भवणारी संभाव्य गुंतागुंत विचारात घेऊन, प्रकृतीत काहीही चढउतार जाणवले असता प्राधान्याने डॉक्टरांचा सल्ला घ्या, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे सांगतात, करोनातून बरे झालेल्या काही रुग्णांमध्ये अगदी पुढचा महिनाभर देखील कमी न होणारा थकवा हे चिंतेचे कारण आहे. अनेक विषाणूजन्य आजारांमध्ये रुग्ण बरे झाल्यावर असा थकवा दीर्घकाळ टिकतो, असे दिसते. कोविडसुद्धा त्याला अपवाद नाही. करोनाकाळात होणाऱ्या रक्ताच्या गुठळ्या काही रुग्णांमध्ये मेंदू किंवा हृदयाशी संबंधित जटिल आजारांना निमंत्रण देताना दिसतात, त्यामुळे खबरदारी आवश्यक आहेच. अर्थात असे करोनापश्चात लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आज फार मोठे दिसत नसले तरी याचा सविस्तर अभ्यास होणे आवश्यक आहे. करोना विषाणू संसर्ग बरा झाला की त्याच रुग्णाला तो पुन्हा होतो किंवा नाही, झालाच तर तो किती दिवसांनी होऊ शकतो याबाबत निश्चित माहिती हाती लागत आहे. हाँगकाँग आणि अमेरिकेत प्रत्येकी एका रुग्णाला दुसऱ्यांदा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या संसर्गातील विषाणूच्या जिनोमची तुलना करून हा दुसऱ्यांदा झालेला संसर्ग होता, हे सिद्ध करण्यात आले आहे. मात्र, आपल्याकडे ज्या रुग्णांना असा संसर्ग झाल्याचे बोलले जात आहे, त्यांच्यामध्ये अशी शास्त्रशुद्ध जिनोम तुलना झालेली नाही. त्यामुळे हा दुसऱ्यांदा झालेला संसर्ग आहे की नाही, हे ठरवण्याची घाई करता येणार नाही. सध्या तरी जगभरात पुर्नससर्गाचे फार ठळक आणि निश्चित स्वरूपाचे पुरावे पुढे येताना दिसत नाहीत. करोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये गुंतागुंतीचे आजार दिसतात हे खरे, मात्र त्यांची तीव्रता किंवा प्रमाण निश्चित करण्यासाठी आणखी काही काळ जाण्याची गरज आहे, असेही डॉ. आवटे यांनी सांगितले.

डॉ. अविनाश सुपे सांगतात, करोनातून बरा झालेला रुग्ण घरी गेल्यानंतर काही दिवसांनी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. रुग्णालयातून घरी गेलेल्या रुग्णांमध्ये अशी अनेक लक्षणे आढळतात; पण करोनाबद्दलच्या भीती आणि गैरसमजामुळे रुग्ण पुन्हा तपासणीसाठी येत नाहीत. साहजिकच त्या त्रासाची तीव्रता वाढत जाते. त्यामुळे करोनातून बरे झालेल्या रुग्णांनी त्यांच्या प्रकृतीतील प्रत्येक बारीकसारीक चढउतारांची कल्पनाही डॉक्टरांना द्यायलाच हवी. त्याकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये, हे रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय या सगळ्यांनी लक्षात ठेवायचे आहे. ६० वर्षांवरील वयोगटातले रुग्ण पूर्ण बरे झाल्याशिवाय किंवा १४ दिवसांपर्यंत त्यांना घरी पाठवू नये. घरी पाठवताना फुप्फुस विकार आणि इतर संभाव्य आजारांच्या चाचण्या करून, रुग्णाची प्रकृती पूर्ण स्थिर आहे याची खात्री करून घेणं महत्त्वाचं आहे. संसर्गानंतर २५ ते ३० दिवसांनी सहा टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे होणारे आजार, स्टिरॉईडच्या अतिवापरामुळे झालेले किंवा जिवाणूजन्य आजार ही कारणं असल्याचं निरीक्षण डॉ. सुपे नोंदवतात. त्यामुळे करोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये कुठलाही त्रास किंवा लक्षणं नसतील तरीही शक्यतो १४ आणि २८ दिवसांनी त्यांची तपासणी होण्याची गरजही ते अधोरेखित करतात.

प्रख्यात मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. राजस देशपांडे सांगतात, कोणत्याही विषाणूजन्य आजाराच्या संसर्गादरम्यान होणारे शरीराचे नुकसान आणि आजार बरा झाल्यावर कालांतराने त्या व्यक्तीच्या प्रकृतीला असलेला धोका असे दोन प्रकार पाहायला मिळतात. करोनामध्ये मेंदूला सूज येते. त्यातून अपस्माराचे झटके (फीट) येणे, रुग्ण कोमात जाणे असे धोके असतात. रक्ताच्या गुठळ्या झाल्या असता पक्षाघाताचा धोका असतो. रुग्णाच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी झपाटय़ाने कमी झाली असता त्या वेळी रुग्णाचा रक्तदाब स्थिर ठेवणे महत्त्वाचे आहे, अन्यथा अनेक अवयव एकाच वेळी निकामी होण्याचा धोका असतो. करोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये ‘गिया बारे सिंड्रोम’ हा हात, पाय, श्वसनयंत्रणा निकामी करणारा भयंकर आजार दिसून येतो. त्यामुळे करोना बरा झाला तरी काळजी घेणे, सावध राहाणे अत्यंत गरजेचे आहे, हे डॉ. देशपांडे नमूद करतात.

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. ऋतुपर्ण शिंदे सांगतात, हृदयरोगाची पाश्र्वभूमी असली किंवा नसली तरी करोनातून बरे झालेल्या रुग्णांनी किमान महिनाभर सर्व प्रकारची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. करोनामध्ये रक्त गोठलेले असते, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील काही महिने रक्त पातळ राहाण्याची औषधे घेणे आवश्यक आहे. चक्कर येणे, धाप लागणे, छातीत दुखणे असे त्रास झाल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवावे. संसर्गजन्य आजारांच्या साथीच्या काळात हृदय बंद पडून रुग्ण दगावणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे (अऱ्हिदमिया), लंग फायब्रॉसिस या आजाराने फुप्फुसे निकामी होणे असे धोके संभवतात. करोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्येही आता या समस्या दिसण्यास सुरुवात झाल्याचे डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले.

करोनातून बरे झालेल्या आठ रुग्णांमध्ये डोळ्याच्या पडद्यावरील रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या थ्रोम्बोसिस झाल्याचे आढळले. मुलुंडमधल्या एका ५२ वर्षांच्या करोना रुग्णाला सात दिवसांनी घरी सोडले. त्यानंतर अवघ्या चार दिवसांत या रुग्णाला धूसर दिसू लागले. त्यामुळे केलेल्या चाचणीत डोळ्यांच्या पडद्यावर असलेल्या एका रक्तवाहिनीला सूज आल्याचे दिसले; पण योग्य वेळी निदान आणि उपचार झाल्यामुळे या रुग्णाची दृष्टी वाचवणे शक्य झाले. धूसर दिसण्यास सुरुवात झाली असता तातडीने नेत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला घेतला गेला, तर वेळेत उपचार सुरू करून रुग्णाचे डोळे वाचवणे शक्य असल्याचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. विनोद गोयल सांगतात. त्यामुळे करोनातून बरे झाल्यावर केवळ हृदय, मेंदू आणि फुप्फुसांचीच नव्हे, तर अगदी डोळ्यांचीही काळजी घेणं गरजेचं असल्याचं या उदाहरणावरून स्पष्ट झालं आहे.

कोविड आणि ट्रॉमा

कोविडकाळात अनेक मानसिक प्रश्न समाजात दिसून आले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. पगारकपात झाली आहे. घरातच राहाण्याची सक्ती असल्यामुळे समाजातील वावर संपुष्टात आला आहे. मित्रमैत्रिणी, नातेवाईकांच्या भेटी घेता येत नाहीत. कोविड हा माणसामाणसांच्या नात्यात दरी निर्माण करणारा एक प्रमुख घटक ठरू पहातोय. ज्या घरांमध्ये करोनाचे रुग्ण आहेत, त्यांना बहिष्कृत केल्याच्या, त्यांच्याशी वाईट वागल्याच्या घटना सर्रास पाहायला मिळत आहेत. अर्थात, अपवादात्मक उदाहरणेही आहेत. मात्र, ज्यांच्या घरातील व्यक्तीचे करोनाने निधन झाले आहे, अशांना बसलेला मानसिक धक्का भयंकर आहे. करोनाने दगावलेल्या व्यक्तीचा मृतदेह पाहायला न मिळणे, त्याच्यावर धार्मिक रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कार करता न येणे याची वेदना अनेकांच्या बाबतीत ‘ट्रॉमा’मध्ये रूपांतरित झाली आहे. त्यामुळे येत्या काळात मानसिक आरोग्याचे प्रश्नही चिंतेचा विषय ठरले तर त्याचे आश्चर्य वाटायला नको, असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. त्यामुळे कोविडचे परिणाम जितके शारीरिक प्रकृतीवर आहेत, तितकेच ते मानसिक आरोग्यावरही असल्याचं दिसून येत आहे.

गिया बारे सिंड्रोम

करोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये जगभरात गिया बारे सिंड्रोम (यालाच जीबीएस म्हणूनही ओळखलं जातं) नावाचा एक गंभीर आजारही दिसून आला आहे. ही सहसा कोणत्याही विषाणू किंवा जिवाणूजन्य आजारानंतर उद्भवणारी गुंतागुंत आहे. यांमध्ये शरीराची प्रतिकारशक्ती नसांवर हल्ला करते. त्यामुळे त्यामुळे हात-पाय-श्वसनयंत्रणा निकामी होत जाते. त्यातून पक्षाघातासारखा गंभीर धोका संभवतो. भारतात हे प्रमाण अत्यल्प आहे, आजपर्यंत वर्षांला १०० किंवा त्यापेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहेत. कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये गिया बारे सिंड्रोम आढळल्याच्या नोंदी ‘द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये करण्यात आल्या आहेत. २८ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत इटलीमध्ये करोनावर उपचार घेणाऱ्या चार ते पाच रुग्णांमध्ये हा सिंड्रोम आढळल्याची नोंद या प्रख्यात वैद्यकीय नियतकालिकानं घेतली आहे. रक्तसंक्रमणासारखे उपचार या रुग्णांवर उपयुक्त ठरत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनावरून स्पष्ट झाले आहे.