26 February 2021

News Flash

प्रासंगिक : समूह प्रतिकारशक्ती सध्या अशक्यच!

सामूहिक प्रतिकारशक्तीने (हर्ड इम्युनिटीने) करोना बरा होण्याची शक्यता फारच कमी आहे, असं हे संशोधन सांगतं.

लसीकरणाच्या संदर्भात सामूहिक प्रतिकारशक्ती या संकल्पनेचा प्रामुख्याने वापर होतो.

कौनेन शरीफ – response.lokprabha@expressindia.com

स्पेनमधील मोठय़ा लोकसंख्येचा अभ्यास करून प्रतिपिंडांबद्दलचे एक संशोधन ‘लॅन्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. सामूहिक प्रतिकारशक्तीने (हर्ड इम्युनिटीने) करोना बरा होण्याची शक्यता फारच कमी आहे, असं हे संशोधन सांगतं.

सामूहिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) म्हणजे काय?

– एखाद्या विषाणूमुळे होऊ शकणाऱ्या आजाराविरोधातली प्रतिकारशक्ती लोकसंख्येमध्ये विशिष्ट प्रमाणात निर्माण झाल्यास त्या आजाराचा संसर्ग उर्वरित लोकसंख्येमध्ये पसरत नाही, या परिस्थितीला सामूहिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) असं म्हटलं जातं. लसीकरणाच्या संदर्भात सामूहिक प्रतिकारशक्ती या संकल्पनेचा प्रामुख्याने वापर होतो. खूप लोक एखाद्या रोगाचा संसर्ग होऊन बरे होतात तेव्हाही त्यांच्यामध्ये त्या रोगाविरोधात सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होते. पण खूप लोक असं म्हणताना तिथे लोकसंख्येच्या संदर्भात विशिष्ट आकडेवारी अपेक्षित असते.

त्याचं गणित असं असतं की अमुक लोकसंख्येच्या अमुक इतकेटक्के लोकांमध्ये त्या विशिष्ट रोगाविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण झाली की ते लोक बाकीच्या लोकांमध्ये तो आजार संक्रमित करू शकत नाहीत. त्यामुळे त्या संसर्गाची साखळी तुटते आणि संभाव्य रोग्यांचा त्यापासून बचाव होतो.

 

नवा अभ्यास काय सांगतो?

स्पेनमध्ये रक्ताचे नमुने घेऊन कोविड १९ च्या महासाथीच्या रुग्णांचा अभ्यास (सेरोएपिडेमीओलॉजिकल स्टडी) केला गेला. त्यातून निघालेला निष्कर्ष असा की अभ्यास केलेल्या एकूण स्पॅनिश लोकांपैकी फक्त पाच टक्के स्पॅनिश लोकांमध्ये कोविड १९ ला कारणीभूत ठरणाऱ्या रअफर-उश्-2 या विषाणूची प्रतिपिंडं विकसित झाली होती. म्हणजे उर्वरित ९५ टक्के लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. (इथून पुढे लेखात विवेचनाच्या सोयीसाठी रअफर-उश्-2 न म्हणता कोविड १९ विषाणू असा उल्लेख केला आहे.)

स्पेनमध्ये २७ एप्रिल २०२० ते ११ मे २०२० दरम्यान झालेल्या या अभ्यासात एकूण ६६ हजार ८०५ लोक सहभागी झाले होते. माद्रिदसह स्पेनच्या सात प्रांतांमध्ये हा अभ्यास करण्यात आला. या प्रांतामध्ये या विषाणूचा संसर्ग होण्याचं प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त होतं, तर किनारी प्रदेश आणि बार्सिलोनामध्ये ते पाच टक्क्यांपेक्षा जास्त होतं. वयाच्या दृष्टीने विश्षेषण पाहिलं तर एक ते तीन वर्षांच्या मुलांमध्ये ते प्रमाण १.१ होतं तर पाच ते नऊ वयोगटाच्या मुलांमध्ये ते प्रमाण ३.१ होतं. ४५ र्वष आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये त्याचं प्रमाण सहा टक्क्यांच्या आसपास होतं.

या अभ्यासाला किती महत्त्व द्यायला हवं?

रक्ताचे नमुने तपासून प्रतिपिंडांचा शोध घेण्यासाठी (सिरॉलॉजिकल स्टडी) युरोपात केला गेलेला हा आजवरचा सर्वात मोठा अभ्यास आहे. त्यातून कोविड १९ च्या संसर्गाची खरी आकडेवारी समोर आली. अशी आकडेवारी प्रयोगशाळांत झालेल्या चाचण्यांतून पुढे आली नव्हती. त्यातून त्या संपूर्ण देशाबद्दलचा अंदाज बांधता आला. एकूण लोकसंख्येमध्ये असलेलं संसर्गाचं ३.७ टक्के ते ६.२ टक्के हे प्रमाण तसंच, कोणतीही लक्षणे दिसत नसलेल्या (एसिम्प्टमॅटिक) पण कोविड १९ बाधित रुग्णांची संख्या यावर हा अभ्यास आधारित होता. त्यातून या संशोधनाने स्पष्ट केलं की स्पेनमध्ये कोविड १९ ची कोणतीही लक्षणं थेट  दिसत नाहीत अशा (एसिम्प्टमॅटिक) तीन लाख ७६ हजार ते १० लाख ४३ हजार व्यक्तींच्या कोणत्याही वैद्यकीय यंत्रणेमार्फत चाचण्या झालेल्या नाहीत.

या अभ्यासाचे परिणाम काय सांगता येतात?

रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेऊन हा अभ्यास केला गेला. रुग्णाच्या रक्तात असलेल्या विषाणूंच्या प्रमाणावरून त्या विषाणूच्या प्रसाराची माहिती मिळते. या अभ्यासातून संशोधक या निष्कर्षांपर्यंत पोहोचले की कोविड १९ प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होणं शक्य नाही.

हा अभ्यास सांगतो की कोविड १९ मुळे होणारे मृत्यू, आरोग्यव्यवस्थेवर येणारा ताण या सगळ्यातून मोठं नुकसान होत आहे. पण सध्या तरी ते टाळून कोविड १९ ला अटकाव करणारी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होणं कठीण आहे. ‘लॅन्सेट’मध्येच या अभ्यासावर केलेल्या वेगळ्या टिप्पणीमध्ये जर्मन विषाणूतज्ज्ञ इसाबेला इकेरल आणि बेंजामिन मेयर लिहितात, की या अभ्यासाचे निष्कर्ष पाहता नैसर्गिक संसर्गाच्या माध्यमातूनच सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल असा विचार करणं अनैतिकच नाही तर अशक्यदेखील आहे. मोठय़ा लोकसंख्येला संसर्गापासून दूर ठेवताना र्निबध घातले आणि नंतर ते काढले तर विषाणूचा प्रसार पुन्हा होऊन दुसरी लाट उद्भवू शकते.

त्यामुळेच स्पेनव्यतिरिक्त इतर देशांनीही या अभ्यासातून काही धडे घेणं आवश्यक आहे. त्यातला महत्त्वाचा धडा हा की कोविड १९ चा प्रभाव, प्रसार ज्या देशांमध्ये मोठय़ा प्रमाणात आहे, तिथेही ही महासाथ लवकर आटोक्यात येण्यासारखी नाही. त्यामुळे या देशांनीही र्निबध हटवताना सतर्क राहणं आवश्यक आहे.

सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होणं अवघड का आहे?

या महासाथीच्या सुरुवातीला इंग्लंडने असं मत मांडलं होतं, की देशातल्या ६० टक्के लोकसंख्येला कोविड १९ विषाणूचा संसर्ग होऊ द्यावा. त्यातून सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल आणि हा आजार आपोआप बरा होऊ शकेल.

पण आता स्पेनमध्ये झालेल्या या अभ्यासातून पुढे आलेली माहिती सांगते की त्या देशात कोविड १९ चा सामूहिक संसर्ग झाला. पण तरीही फक्त पाच टक्के लोकांच्या शरीरामध्येच कोविड १९ ची प्रतिपिंडं विकसित झाली. त्यामुळे सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होणं अवघड आहे, असं सांगितलं जात आहे.

जर्मन विषाणूतज्ज्ञांनी आपल्या टिप्पणीमध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. एक म्हणजे कोविड १९ या विषाणूविरोधात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती आजच्या घडीला तरी अपुरी आणि तात्कालिक आहे. ती काही महिने किंवा काही र्वषच टिकू शकते. दुसरं म्हणजे बरे होणारे रुग्ण पेशींअंतर्गत असलेल्या इतर कोणत्या प्रतिकारशक्तीमुळे त्यांचं संरक्षण होऊन बरे होत आहेत का ते अद्याप आपल्याला समजलेले नाही.

याआधीचे कोविड १९ संदर्भातले रक्ताचे नमुने घेऊन केलेले अभ्यास काय सांगतात?

‘लॅन्सेट’ने ११ जून २०२० रोजी जिनिव्हामधल्या दोन हजार ७६६ सहभागींच्या कोविड १९ विषाणूविरोधी प्रतिपिंडांचा अभ्यास प्रसिद्ध केला. त्यांनी पहिल्या आठवडय़ात सहभागींपैकी ४.८ टक्के लोकांच्या रक्ताच्या नमुन्यांची नोंद घेतली. दुसऱ्या आठवडय़ात ८.५ टक्के, तिसऱ्या आठवडय़ात १०.९ टक्के, चौथ्या आठवडय़ात ६.६ टक्के आणि पाचव्या आठवडय़ात १०.८ टक्के लोकांची नोंद घेतली. प्रत्येक करोनाबाधित व्यक्तीमुळे समाजातील ११.६ जणांना संसर्ग झाल्याचं निरीक्षण त्यांनी मांडलं आहे.

वुहान हे चीनमधलं करोनाचं केंद्र होतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. ‘नेचर’ने चीनमधील संशोधकांचा अभ्यास प्रसिद्ध केला आहे. या संशोधकांनी वुहानमधल्या १७ हजार ३६८ लोकांच्या रक्ताचे नमुने घेऊन इम्युनोग्लोबुलीन एम आणि जी या दोन विशिष्ट प्रतिपिंडांचा अभ्यास केला. त्यांना असं आढळलं की ३.२ ते ३.८ टक्के लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यांना असंही आढळलं की डायलिसिससाठी गेलेल्या रुग्णांना तसंच आरोग्यक्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना कोविड १९ चा संसर्ग होण्याचं प्रमाण जास्त म्हणजे ३.३ टक्के होतं. जसजसं वुहानपासून लांबच्या शहरांमध्ये जावं तसतसं रक्ताच्या नमुन्यांमध्ये विषाणूचा संसर्ग असण्याचं प्रमाण कमी होत गेलं होतं.

१८ मे २०२० रोजी ‘जर्नल ऑफ मेडिकल असोसिएशन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात म्हटलं होतं, की लॉस एंजेलिसमध्ये १० एप्रिल २०२० रोजी ८६५ लोकांच्या रक्ताचे नमुने घेऊन एक अभ्यास करण्यात आला. त्यापैकी ४.६५ टक्के लोकांमध्ये कोविड १९ च्या विषाणूची प्रतिपिंडंआढळून आली. त्यातून संशोधकांनी अंदाज बांधला की एलएसमध्ये साधारणपणे ३.६७ लाख लोकांमध्ये कोविड १९ च्या विषाणूची प्रतििपडं असू शकतात. याच दिवशी म्हणजे १० एप्रिल रोजी एलएसमध्ये आठ हजार ४३० करोनाबधित रुग्ण सापडले होते. संशोधकांच्या मते या रुग्णांच्या तुलनेत प्रतिपिंडं असण्याची शक्यता असणाऱ्यांची संख्या जास्त होती. याचाच अर्थ तेवढे लोक कोविड १९ चा संसर्ग होऊन बरे झाले असण्याची शक्यता होती. पण त्यांच्या चाचण्या झालेल्या नसल्यामुळे त्यांची कुठे नोंद झालेली नव्हती. त्यामुळे ज्यांच्या चाचण्या होऊन कोविड १९ चा संसर्ग झाल्याचं सिद्ध झालं आहे, त्यांच्या मृत्यूचं प्रमाण हे ज्यांना कोविड १९ चा संसर्ग झालेला आहे पण त्यांच्या चाचण्याच झालेल्या नाहीत अशा रुग्णांपेक्षा जास्त आहे, असं हा अभ्यास सांगतो.

(‘दि इंडियन एक्स्प्रेस’मधून)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 7:32 am

Web Title: coronavirus pandemic covid 19 herd immunity could be difficult dd70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 आदरांजली : कमलाक्षरे
2 समाजमाध्यमे : आभासी जगातलं वास्तव
3 विज्ञान : पर्यावरणीय कामगिरीत भारत नापास
Just Now!
X