शैलजा तिवले – response.lokprabha@expressindia.com

चाचण्यांचे प्रमाण कमी होते, त्या दिवशी नव्याने आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत साहजिकच घट होते. या गणिती सूत्राचा चलाखीने वापर करत करोना रुग्णसंख्येत घट दाखवत संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे चित्र राज्य सरकारने निर्माण केले आहे.

कोविड-१९ने मार्चमध्ये महाराष्ट्रात प्रवेश केला आणि तेव्हापासून सप्टेंबरअखेपर्यंत रुग्णसंख्येचा आलेख सातत्याने चढाच राहिला. पण गेल्या एक-दोन आठवडय़ांत अचानक चित्र पालटल्याचे दिसू लागले आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात राज्यात रोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सरासरी १८ हजार ६८४ एवढे होते. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात यात घसरण होत ते १७ हजार २३५ वर आले. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात घट कायम राहत रोजच्या रुग्णसंख्येची सरासरी १३ हजार ८८५ पर्यंत खाली आली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ाच्या तुलनेत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात रुग्णसंख्यावाढीत सुमारे २७ टक्के घट झाल्याची नोंद आहे. रोजच्या रुग्णसंख्येत ऑक्टोबरमध्ये झपाटय़ाने घसरण झाल्याचे यावरून स्पष्ट होते.

रुग्णसंख्यावाढीत घट झाली हे सत्य असले तरी ते अंतिम सत्य नाही. करोनाबाधितांची रोजची रुग्णसंख्या ही त्या दिवशी झालेल्या चाचण्यांच्या संख्येवर अवलंबून असते. ज्या दिवशी चाचण्यांचे प्रमाण कमी होते, त्या दिवशी नव्याने आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत साहजिकच घट होते. या गणिती सूत्राचा चलाखीने वापर करत करोना रुग्णसंख्येत घट दाखवत संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे चित्र राज्य सरकारने निर्माण केले आहे.

करोना चाचण्या आणि रुग्णसंख्या यांचा परस्परसंबंध स्पष्ट करताना करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी सांगतात, ‘१५ सप्टेंबरपासून रुग्णसंख्यावाढीच्या आलेखात घसरण होत असल्याचे दिसते. यामागील प्रमुख कारण म्हणजे चाचण्यांच्या प्रमाणात घट. सप्टेंबरमध्ये रोज जवळपास ९० हजार चाचण्या केल्या जात होत्या. हे प्रमाण ऑक्टोबरमध्ये ७०-८० हजारांपर्यंत कमी झाले. परिणामी नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत ऑक्टोबरमध्ये घट झाल्याचे दिसून येते.’

चाचण्यांच्या संख्येत २० टक्के घट

सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात राज्यात सरासरी ८२ हजार ८८६ चाचण्या केल्या गेल्या. याच महिन्यात शेवटच्या आठवडय़ातील दैनंदिन चाचण्यांची सरासरी ९६ हजार ९१७ एवढी होती. यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात मोठी घट झाली असून सरासरी ७६,९९८ एवढी कमी झाली. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ाच्या तुलनेत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात चाचण्या जवळपास २० टक्क्यांनी घटल्याचे यावरून स्पष्ट होते.

तंत्रज्ञ बाधित झाल्याने चाचण्यांमध्ये घट

खासगी प्रयोगशाळांमधील तंत्रज्ञ, नमुने घेणारे शासकीय कर्मचारी मोठय़ा प्रमाणात बाधित झाल्याने पुणे, िपपरी-चिंचवडसह जिल्ह्य़ातील चाचण्यांचे प्रमाण घटले आहे. या भागात दररोज सुमारे १२-१५ हजार चाचण्या केल्या जात होत्या. परंतु कर्मचाऱ्यांना बाधा झाल्याने चाचण्यांची संख्या १० हजारांहून अधिक खाली घसरली आहे. रुग्णसंख्येत घट होण्यामागील आणखी एक कारण म्हणजे या आजाराविषयी समाजात असलेली भीती. करोनाची आरटीपीसीआर किंवा प्रतिजन (अ‍ॅण्टीजेन) यातील कोणतीही चाचणी सरकारी किंवा खासगी प्रयोगशाळेत केल्यास बाधित रुग्णाची माहिती संबंधित सरकारी यंत्रणेला कळविणे प्रयोगशाळांना बंधनकारक आहे. त्यामुळे बाधित रुग्णांची माहिती प्राप्त झाल्यावर संबंधित सरकारी यंत्रणा त्यांच्या घरी पोहोचतात. घरी विलगीकरणाची सोय नसल्यास त्यांना जवळील करोना केंद्रामध्ये दाखल केले जाते. घरातील इतरांच्या चाचण्या केल्या जातात. रुग्णाच्या इमारतीबाहेर रुग्ण आढळल्याची पाटी लावली जाते. त्यामुळे केवळ इमारतीतच नव्हे तर आजूबाजूच्या सर्व परिसराला येथे रुग्ण आढळल्याचे कळते. संसर्ग नियंत्रणाच्या दृष्टीने या बाबी आवश्यक आहेतच; परंतु करोनाचा संसर्ग झपाटय़ाने पसरत असल्याने समाजात या आजाराविषयी गैरसमज आणि भीतीचे वातावरण आहे. बाधित रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना वाळीत टाकणे, अन्यायकारक वागणूक देणे असे प्रकारही अनेक ठिकाणी घडले आहेत. तेव्हा करोनाची बाधा झाल्याचे कोणालाही कळू नये, सरकारी यंत्रणा दाराशी येऊ नयेत म्हणून निदानासाठी आरटीपीसीआर किंवा प्रतिजन चाचण्यांऐवजी क्ष-किरण, सीटी स्कॅन या छुप्या मार्गाचा अलीकडे मोठय़ा प्रमाणात वापर केला जात आहे. त्या रूग्णांची नोंद सरकार दरबारी होत नाही.

चाचण्यांमधून पळवाटा

क्ष-किरण किंवा सीटी स्कॅन चाचणीत फुप्फुसांवर काही परिणाम झाला आहे का, हे स्पष्ट दिसते. लक्षणे दिसल्यानंतर चार ते पाच दिवसांत ही चाचणी डॉक्टरांच्या सल्ल्याने केली जाते. आरटीपीसीआर किंवा प्रतिजन चाचणीपेक्षा यामध्ये संसर्गाचे निदान योग्य केले जात असल्याने फॅमिली डॉक्टरही मग या चाचण्या करण्याचा सल्ला देतात. यात बाधित आढळलेले रुग्ण संबंधित डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचारही घरच्या घरी सुरू करतात. आरटीपीसीआर किंवा प्रतिजन चाचणी न केल्याने अशा बाधित रुग्णांची नोंद सरकारी आकडेवारीत होत नाही. अशा रुग्णांची संख्याही नोंद घेण्याइतपत आहे. यामुळेदेखील रुग्णसंख्येत घट दिसत असल्याचे मत डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले.

रोज केलेल्या करोना चाचण्यांपकी नव्याने आढळलेल्या रुग्णांच्या संख्येवरून संसर्गाचे प्रमाण ठरविले जाते. यालाच बाधितांचे प्रमाण दर किंवा पॉझिटिव्हिटी रेट असेही म्हटले जाते. ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणात घट दिसत असली तरी बाधितांचे प्रमाण मात्र १८-२० टक्क्यांदरम्यानच आहे. सप्टेंबरमध्ये हे प्रमाण जवळपास २२ टक्के होते.

बाधितांच्या प्रमाणात घट होणे गरजेचे

रुग्णसंख्येत घट नोंदली याचा अर्थ संसर्ग आटोक्यात आला असा होत नाही. बाधितांच्या प्रमाणावरून संसर्गाच्या प्रादुर्भावाची व्याप्ती मोजली जाते. रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी झाले असला तरी रोजच्या बाधितांचे प्रमाण अद्याप १८-२० टक्क्यांदरम्यान आहे. हे प्रमाण पाच टक्क्यांपर्यंत खाली येईल, त्या वेळी संसर्ग आटोक्यात आला असे म्हणता येईल. त्यामुळे चाचण्या कमी झाल्याने होणारी रुग्णसंख्येतील घट ही आभासी असल्याचे डॉ. जोशी यांनी अधोरेखित केले.

चाचण्यांकडे मुंबईकरांची पाठ

करोना साथीच्या सुरुवातीच्या काळात मुंबईत संसर्गाचा उद्रेक झाला होता, त्या वेळी चाचण्या करण्यासाठी मुंबईकरांना सरकारी रुग्णालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या. वेळेत चाचण्या न झाल्याने अनेकांना जीवदेखील गमवावे लागले. आता चाचण्या वाढविण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे, तर मुंबईकरांनीच चाचण्यांकडे पाठ फिरवली आहे. प्रत्येक विभागाला रोज एक हजार चाचण्या करण्याचे लक्ष्य मुंबई पालिकेने दिले आहे. परंतु यातील २०० चाचण्या करतानाही पालिकेचे कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत. मात्र तरीही मुंबईतील रुग्णसंख्या वाढीचा आलेख चढाच आहे.

मुंबईतील या स्थितीबाबत विश्लेषण करताना खासगी रुग्णालयातील डॉक्टर म्हणाले, ‘मुंबईत सध्या उच्चभ्रू वस्तींमध्ये करोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक असून सीटी स्कॅन आणि क्ष-किरण चाचण्या करत उपचार घेण्याकडे या वर्गाचा कल आहे.’ करोनाचा उद्रेक सुरू झाल्यापासून करोना चाचण्यांचे संच, सामुग्री केंद्रीय आरोग्य विभागाकडून राज्याला पुरविली जात होती. मात्र सप्टेंबरपासून हा पुरवठा केंद्राने खंडित केला आहे. परिणामी राज्य सरकारच्या तिजोरीवर दरमहा जवळपास १५० कोटी रुपयांचा आर्थिक भार वाढला आहे. राज्यातील ग्रामीण भागांत मर्यादित आरटीपीसीआर चाचण्यांची सुविधा आणि आर्थिक बोजा यामुळे प्रतिजन चाचण्यांवर आरोग्य विभागाकडून अधिक भर दिला जात आहे. राज्यात आत्तापर्यंत २० लाखांहून अधिक प्रतिजन चाचण्यांची नोंद झाली असून एकूण चाचण्यांमध्ये प्रतिजन चाचण्यांचे प्रमाण सुमारे ३४ टक्के आहे. जुलपर्यंत हे प्रमाण केवळ ११ टक्के होते. प्रतिजन चाचण्या सरसकट सर्वासाठी खुल्या केल्या असल्या तरी त्यांच्या अचूकतेबाबत अद्याप साशंकता आहे. प्रतिजन चाचण्यांमध्ये बाधित न आढळलेल्यांपकी केवळ एक टक्का नागरिकांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या आहेत.

चाचण्या वाढविण्याबाबत राज्य करोना कृतिदल सुरुवातीपासून आग्रही असून यासाठी राज्य सरकारने  ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे अधोरेखित करताना करोना कृतिदलाचे प्रमुख डॉ. संजय ओक म्हणाले, ‘ठिकठिकाणी करोना चाचण्या उपलब्ध करणे आवश्यक आहे. जितक्या लवकर निदान होईल, रुग्णसंख्येचे प्रमाण वाढेल, तितक्या लवकर मृत्युदर एक टक्क्यापेक्षा खाली आणण्यात यश येईल.’

चाचण्यांमध्ये राज्य बाराव्या स्थानी

देशातील एकूण रुग्णसंख्येच्या २१ टक्के रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. करोनाबळींची सर्वाधिक संख्याही राज्यातच नोंदली आहे. मात्र तरीही देशात करोना चाचण्यांच्या संख्येत राज्य १२व्या स्थानी आहे. बिहार, आसाम या राज्यांनीही महाराष्ट्राला चाचण्यांमध्ये मागे टाकले आहे.

याबाबत अधिक विश्लेषण करताना मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे सांगतात, ‘रुग्णसंख्येत घट झाली म्हणून लगेचच संसर्ग आटोक्यात येत असल्याचा निष्कर्ष काढणे योग्य नाही.’ रुग्णसंख्या कमी झाली आणि पुन्हा झपाटय़ाने वाढली हे मुंबईने अनुभवले आहे. त्यामुळे संसर्ग नियंत्रणात आल्याच्या भ्रमात राहून मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, हात वारंवार स्वच्छ धुणे या नियमांकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे आहे. तेव्हा यांचे काटेकोरपणे पालन करत आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपण स्वीकारायला हवी, हेच खरे वास्तव आहे.