scorecardresearch

…आणि मार्ग सापडेल!

संधी आहेत शोधायला शिका.

…आणि मार्ग सापडेल!

विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

साहिल आणि दीपिका दोघेही हैराण होते. लॉकडाऊनच्या काळात दोघांच्याही नोकऱ्या गेलेल्या. स्थिरस्थावर झाले म्हणून टू बेड हॉल-किचनचा भला मोठ्ठा फ्लॅटही घेतला. कर्जाच्या हप्त्याचा आकडा तसा मोठा होता, पण घर चालवणारे डबल इंजिन होते.. म्हणजे नोकरी दोघांनाही! त्यामुळे एकाचा पगार हप्त्यामध्ये गेला तरी दुसरा पगारही खाऊन-पिऊन उरण्याएवढा मोठा होता.. सगळं कसं सुरळीत सुरू होतं आणि तेव्हाच हा करोना आला! आणि होत्याचं नव्हतं झालं. दोघांच्याही नोकऱ्यांवर गंडांतर आलं.. मध्यंतरीच्या काळात खर्च वाढलेले. आता तर घरावरही जप्ती येते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली.

आई-बाबा खूप मागे लागले म्हणून कुटुंबाला अडीअडचणींच्या काळात मार्गदर्शन करणाऱ्या ज्योतिषी नामजोशींना पाचारण केले. ते म्हणाले, शनीची पनवती सुरू आहे त्यामुळे सर्वानाच हे भोग भोगावे लागत आहेत. पनवती म्हणजे लहान साडेसाती म्हणा ना.. ती अडीच वर्षांची असेल, नामजोशी म्हणाले. अजून दोन वर्षे.. आणि मग कुटुंबाचीच पाचावर धारण बसली! साहिल- दीपिकाला तर नैराश्यच आले. मानसोपचारतज्ज्ञाची भेटही घेतली. औषधे सुरूच होती, पण दुसरीकडे तणावही सारखा वाढतच होता. लॉकडाऊन सुटणार असे वाटत असताना करोनाचा नवा अवतार आता..

त्याच वेळेस दोघांनाही धीर देणारे मॅनेजमेंट शिकवणारे मुडिशगीकर सर आठवले आणि त्यांचे घर गाठले. एवढा काळ मनात ठेवलेल्या तणावाला आणि अश्रूंनाही दोघांनी वाट मोकळी करून दिली..

सर त्यांना घेऊन घराबाहेर पडले. चालता चालता म्हणाले, अरे वादासाठी गृहीत धरू की, शनीची पनवती आहे. परिणाम सर्वावर झालाय.. नोकऱ्या अनेकांच्या गेल्या. नाक्यावर ही पाच तरुण मंडळी दिसताहेत त्यांनाही गेल्या वर्षी जानेवारीत कल्पना नव्हती आपल्या समोर काय वाढून ठेवले आहे याची. नोकरी गेल्याचा धक्का बसला, पण महिन्याभरात उभे राहिले, पाचही जण एकत्र आले आणि उत्तर प्रदेशी फेरीवाले गावी गेल्यानंतर निर्माण झालेल्या पोकळीत त्यांनी संधी पाहिली आणि भाजीचा व्यवसाय सुरू केला. रस्त्यावर उभे राहावे लागते इतकेच. पण आता सहा महिन्यांत व्यवसायाचं सगळं गणित शिकले. नोकरीत नव्हता तेवढा पैसा मिळतोय आता. त्यातही निवडलेल्या भाजीचं इनोव्हेशन करून एक पाऊल पुढेही टाकलं..

चालत चालत एका चाळीत शिरले. एका घरासमोर उभे राहिले. ते म्हणाले, पाच जणांचं कुटुंब इथे एकत्र आलंय आणि आत बिर्याणी शिजतेय पाच प्रकारची. त्याच पाच तरुणांच्या घरची मंडळी आहेत शिवाय काही आणखी मंडळी कामावर ठेवण्याइतकी कमाई होतेय त्यांची आता. करोनाकाळ खूप काही शिकवून गेला. कधी नव्हे ते हात राखून खर्च करताना काहींना लक्षात आलं की, कमी पैशांतही भागतंय. पण दुसरीकडे ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी जिभेचे चोचले कमी केलेले नाहीत. वर्तमानपत्रातली तीच बातमी वाचून या तरुणांना ही कल्पना सुचली. जोडधंदा म्हणून सुरू केलेला हा व्यवसाय आता मूळ धरतोय. दीपिका तू तर उत्तम जेवण करतेस. आता घरच्या घरी डबे करून ‘अ‍ॅग्रीगेटर अ‍ॅप’मार्फत लोकांपर्यंत पोहोचविण्याची सोय आहे की! डिलिव्हरीही तेच करतात. तुम्हाला फक्त जेवण करायचंय घरच्या घरी.. संधी आहेत शोधायला शिका. शनी तर यांच्याही मागे असेल ना.. पण त्यांनी शनीकडे नाही, संधीकडे पाहिलं. तसं पाहा मार्ग सापडेल!

मराठीतील सर्व मथितार्थ ( Matitarth ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
भडकंप

संबंधित बातम्या