News Flash

हॉटेल व्यवसाय क्षेत्र आढावा : हॉटेल उद्योगाला हवे व्हिटॅमिन एम

करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सगळ्यात जास्त फटका बसलेली जी क्षेत्रं आहेत त्यातलं एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे हॉटेल व्यवसाय.

टाळेबंदीच्या शिथिलीकरणाच्या प्रक्रियेत हॉटेल्समधून ‘टेकअवे’ला म्हणजे ‘होम डिलिव्हरी’ला सरकारने परवानगी दिलेली असली तरी त्यातून जेमतेम १० टक्के व्यवसाय होत आहे.

वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com

करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सगळ्यात जास्त फटका बसलेली जी क्षेत्रं आहेत त्यातलं एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे हॉटेल व्यवसाय. गेले चार महिने टाळेबंदीमुळे जनजीवन ठप्प होतं. लोकांचं फिरणं बंद झालं होतं. लोक घरी बसून होते. काही अपवाद वगळता कार्यालयं बंद होती. जी काही हालचाल दिसत होती ती फक्त रुग्णालयांच्या परिसरात. एरवी भूक लागल्यावर ‘चला, पटकन काहीतरी खाऊन घेऊ’ असं कुणाही माणसाला वाटतं तेव्हा तो एखाद्या टपरीपासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंत त्याच्या ऐपतीप्रमाणे पर्याय निवडतो. पण आज ते शक्य नाही कारण हॉटेल व्यवसाय ठप्प आहे. टाळेबंदीच्या शिथिलीकरणाच्या प्रक्रियेत हॉटेल्समधून ‘टेकअवे’ला म्हणजे ‘होम डिलिव्हरी’ला सरकारने परवानगी दिलेली असली तरी त्यातून जेमतेम १० टक्के व्यवसाय होत आहे. कुणाची अन्नाची मूलभूत गरज पुरवणारा तर कुणाचे जिभेचे चोचले पुरवणारा एवढी व्याप्ती असलेला हा व्यवसाय आहे. घरी अन्न तयार करून गरजूंना डबे पुरवणारी कुटंबं, खानावळ चालवणारे, रस्त्यावर विशिष्ट वेळी गाडय़ा लावणारे, कोपऱ्यावर टपरी उभी करून खाद्यपदार्थ  विकणारे, घरून तयार करून आणून विशिष्ट वेळेत रस्त्यावर उभं राहून विकणारे हे या क्षेत्रातले असंघटित लोक. नीट हॉटेल उभं करून ते चालवणारे, आपल्या नावाचा ब्रॅण्ड तयार करणारे, एखाद्या ब्रॅण्डच्या साखळीचा भाग म्हणून उभं असलेलं हॉटेल, निवासाची सोय असलेले हॉटेल, तीन तारांकित, पंचतारांकित हॉटेल्स असे हॉटेलिंगमधले प्रकार व्यवसायाच्या पातळीवर अधिक भक्कम आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोठा हातभार लावत असतात. या सगळ्यांनाच आज करोनाने ग्रासले आहे.

गेली काही वर्षे या उद्योगाला चांगली बरकत होती. हातात पैसा येतो तेव्हा लोकांना खाण्यापिण्यात वैविध्य हवं असतं. त्यामुळे वेगवेगळे आनंद साजरे करण्यासाठी, कधी घरी स्वयंपाक करणं शक्य नाही म्हणून, कधी घरातल्या स्वयंपाकाची जबाबदारी पेलणाऱ्या स्त्रीला आराम द्यायचा म्हणून, तर कधी चवीत बदल हवा म्हणून अशा वेगवेगळ्या कारणांमुळे हॉटेलमध्ये जाऊन खाणं हे गेल्या काही वर्षांत वाढलं होतं. त्यामुळे लोकांना बदल हवा म्हणून वेगवेगळ्या प्रकारची थीम हॉटेल्स दिसायला लागली होती. सगळ्याच थरांमधल्या लोकांचं त्यांच्या त्यांच्या शहरात, इतर राज्यांमध्ये, इतर देशांमध्ये कामासाठी फिरणं वाढलेलं होतं. त्याशिवाय १९९१ च्या खासगीकरणानंतर झालेल्या बदलांमधून लोकांच्या हातात जो पैसा येत गेला त्यामुळे देशभर आणि देशाबाहेरही पर्यटनाचं प्रमाण वाढलेलं होतं. त्याचा फायदा सगळीकडच्याच हॉटेल उद्योगाला होत होता.

एखाद्या उद्योगाला फायदा होतो तेव्हा त्याचा परिणाम इतर उद्योगांवरही होत असतात. हॉटेल व्यवसायाशी तर इतर अनेक व्यवसाय संबंधित आहेत. करोना महासाथीमुळे हॉटेल उद्योग बंद झाल्याचा फटका फक्त हॉटेल व्यावसायिकांनाच बसत नाही तर तो इतर अनेकांना बसतो, कारण या व्यवसायावर आधारलेली इतर अनेक व्यवसायांची साखळी असते. हॉटेलला चिकन, मासे पुरवणारे व्यावसायिक असतात. हॉटेल व्यवसायाला रोज नियमित धान्यांची गरज असते. मीठ, तेल, साखर असे अन्नघटक लागतात. हॉटेलला भाज्यांचा नियमित पुरवठा केला जातो. त्याशिवाय हॉटेलला नेहमीच्या भाज्यांशिवाय मश्रूम, ब्रोकोलीसारख्या एक्झॉटिक भाज्या लागतात. हे सगळे घटक ठोक स्वरूपात घेतले जातात. त्याशिवाय हॉटेलला इंटिरियर डिझायनर, टेलर, सुतार, रंगारी, गवंडीकाम करणारे, वेटर, शेफ, कूक, ऑर्डर घेणारी मुलं, काऊंटरवर बसणारे, हेल्पर, भाज्या कापणारे, भांडी घासणारे, साफसफाई करणारे, वेटरचे कपडे, नॅपकीन नियमित धुऊन, इस्त्री करून देणाऱ्या लॉण्ड्री, विविध प्रकारचे हेल्पर, पॅकिंग करणारे, डिलिव्हरी बॉईज, क्रोकरीचा पुरवठा करणारे असे वेगवेगळ्या प्रकारचे कर्मचारी, सहकारी लागतात. त्यातल्या प्रत्येकावर त्याचं त्याचं चारपाच जणांचं कुटुंब अवलंबून असतं.

हॉटेल उद्योगात काम करणारे बहुतांश कामगार हे नेपाळ, दार्जिलिंग, ओरिसा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब अशा वेगवेगळ्या राज्यांमधून येतात. टाळेबंदी जाहीर होतानाच ही मुलं आपापल्या राज्यांमध्ये निघून गेली. मुंबईमधले एक हॉटेल व्यावसायिक राजन चेऊलकर त्यासंदर्भात सांगतात की करोना झाल्यावर माणूस मरतोच असा सुरूवातीच्या काळातला समज होता. अशा वेळी कुणीही सामान्य माणूस असाच विचार करेल की मरायचं असेल तर मी माझ्या घरी, माझ्या माणसांमध्ये जाऊन मरेन. त्यामुळे ही मुलं आपापल्या घरी, गावी निघून गेली. त्यांना आमच्यासारख्या अनेकांनी सांगायचा प्रयत्न केला की थोडं थांबा, वाट बघा, पण कुणीही ते ऐकलं नाही. जिथे एरवी प्रवासाला दोन हजार रुपये लागले असते तिथे आठ हजार रुपये गाडीभाडं देऊन ही माणसं आपापल्या घरी परतली. त्यानंतर माझ्याकडे दोन माणसं उरली. त्यांना घेऊन आता मी काम करतो आहे. एरवी जो व्यवसाय नीट चालतो तो १० टक्क्यांवर आला आहे.

खरं तर टाळेबंदीच्या आधीच हॉटेल उद्योगावर परिणाम व्हायला सुरुवात झाली होती. कारण टाळेबंदीच्या आधीच चीनमध्ये मांसाहार केल्यामुळे करोनासदृश आजार आलेला असून तो होऊ नये यासाठी मांसाहार करून नका असा प्रसार दीडदोन महिने आधीपासूनच सुरू झाला होता. त्याबरोबरच लोकांनी चीनमुळे हे सगळं होतंय असा विचार करत चायनीज फूडवर राग काढायला सुरुवात केली होती. चेऊलकर सांगतात की खरं तर चिकन, तांदूळ, तेल, भाज्या हे सगळे घटक इथलेच वापरून चायनीज फूड तयार केलं जातं. त्याच चीनचं काय असतं?  पण लोकांनी चायनीज खायचं नाही असं ठरवून टाकलं होतं. खरं सांगायचं तर खरोखरचे चायनीज पदार्थ आपल्याला खाववणार नाहीत असे असतात. पण व्हॉट्सअ‍ॅपमधून खोटय़ा बातम्या पसरत होत्या आणि लोक त्यावर विश्वास ठेवत होते. त्यामुळे टाळेबंदीच्या आधीच्या काळातच आमचा व्यवसाय ३० टक्क्य़ांवर आला होता.

चेऊलकर सांगतात की आता काही प्रमाणात टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर लोकांचा दृष्टिकोनही बदलला आहे. एक तर महिन्यातले निम्मे दिवस बाहेरचं खायची सवय असलेले मुंबईकर तीन साडेतीन महिने आपणच केलेलं घरचं अन्न खाऊन कंटाळले आहेत. करोनाविरोधात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रथिनांचा आहारात समावेश करणं आवश्यक आहे हे कळल्यामुळे आता त्यांचे मांसाहाराबद्दलचे गैरसमजही दूर झाले आहेत. त्यांनी मांसाहार करायला सुरुवात केली आहे. हॉटेलमधून होम डिलिव्हरीला मान्यता दिल्यामुळे त्यांनी हॉटेलमधून जेवण मागवायला सुरुवात केली आहे. हॉटेलमधून जेवण मागवल्यावर ते मायक्रोवेव्ह ओव्हनमधून गरम करून खायचं म्हणजे संसर्गाची भीती रहात नाही हे त्यांना समजलं आहे.

पण सध्या हॉटेल व्यावसायिकांसमोर अनेक अडचणी आहेत. एक तर त्यांच्याकडे पुरेसे कर्मचारी नाहीत. ठरावीक वेळेनंतर चला आता हॉटेल बंद करा असं सांगायला पोलीस येतात. पूर्वी हॉटेलचा खरा व्यवसाय रात्री आठनंतर सुरू व्हायचा. आता तो आठला बंद करावा लागतो. मुळात लोकच संध्याकाळनंतर घराबाहेर पडत नाहीत. त्यांना घरपोच पार्सल पोहोचवायला डिलिव्हरी बॉईज मिळत नाहीत. चेऊलकर सांगतात की हा व्यवसाय पुन्हा उभा करायचा असेल तर काही गोष्टी करणं आवश्यक आहे. एक तर सरकारने हॉटेल व्यवसायावरचा कर या वर्षी कमी करावा. सोशल डिस्टंन्सिंग पाळून व्यवसाय करण्यासाठी हॉटेलच्या समोर असलेली जागा वापरायला परवानगी दिली पाहिजे. परदेशात हॉटेल लहान असतं पण त्याच्यासमोरच्या जागेत टेबलखुच्र्या टाकलेल्या असतात. एरवी लोकांना हॉटेलमध्ये गेल्यावर एसी हवा असतो. पण आता सध्या एसी नको अशीच सगळ्यांची भावना आहे. त्यामुळे परिसराचा वापर करण्याची परवानगी द्यायला हवी.

चेऊलकर सांगतात, हॉटेलमध्ये काम करणारी बरीच मुलं या राज्यांमधल्या आपापल्या घरी गेली आहेत. त्यांच्या गावांमध्ये त्यांना रोजगार मिळेलच असं नाही आणि मुंबई पैसा देते हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे जवळचे पैसे संपले की ही माणसं परत येतील. मुंबईची देवी असलेल्या मुंबादेवीकडे पैशाचा घडा आहे, ती तो ओतत असते आणि तो कधीच संपत नाही असं मानलं जातं. आणि पोटापाण्यासाठी इथे येणारे परप्रांतीय तो पैसा अक्षरश वेचतात. मी पहाटे चार वाजता मासे घ्यायला ससून डॉकला जायचो तेव्हा बघायचो की तिथला भैय्या पहाटे तीनलाच कामाला लागलेला असतो. मुंबई कशी पहाटे चारलाच जागी होऊन कामाला लागते हे मी आयुष्यभर बघत आलो आहे. इथे मी कायमच गजबज बघितलेली आहे. काम करून दमल्याचा आणि दमून झोप येत असल्याचा आनंद मी त्यांच्या चेहऱ्यावर बघितला आहे. त्यामुळे गेले काही महिने ठप्प झालेली मुंबई बघवत नाही.

आता लोकांना घरचं खाऊन कंटाळा आला आहे. मांसाहाराची भीती गेली आहे. चमचमीत खावंसं वाटतं आहे. होम डिलिव्हरीच्या ऑर्डर यायला लागल्या आहेत. प्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज सध्या कधी नव्हे इतकी लोकांना जाणवते आहे. त्यांना आरोग्यदायी आणि चमचमीत असं दोन्ही एकत्र कसं मिळेल यावर हॉटेल व्यावसायिक विचार करत आहेत. त्याची सुरुवात करण्यासाठी राजन चेऊलकर यांनी टोमॅटो, पालक, झुकिनी, ब्रोकोली यांचा वापर करत आरोग्यदायी सूप तयार करून ते पोलीस, फायर ब्रिगेडचे कर्मचारी, कोविद रुग्ण यांना विनामूल्य वाटलं. आता आपल्या हॉटेलमध्ये चव आणि आरोग्य यांची सांगड घालणाऱ्या पदार्थावर भर द्यायचा त्यांचा विचार आहे.

ते सांगतात, आता हळूहळू परिस्थिती बदलायला लागली आहे. लोक घराबाहेर पडायला लागले आहेत. टाळेबंदी झाल्यानंतर बराच काळ प्लंबर, फिटर असे लोक मिळत नव्हते. आता ते मिळायला लागले आहेत. भाज्यांचा, अन्नधान्याचा पुरवठा वाढायला लागला आहे.  आता यापुढच्या काळात लोकांचं घराबाहेर पडण्याचं प्रमाण टप्प्याटप्प्याने वाढवायला हवं.

आहार फूड असोसिएशनचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी सांगतात की गेले चार महिने हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. आता गेले काही दिवस फक्त टेकअवे सुरू झालं आहे. पण त्याचं प्रमाण जेमतेम दहा टक्के आहे. त्यामुळे आमचा व्यवसाय जवळपास बंदच आहे. होम डिलिव्हरीमधून काम करणाऱ्या दोनतीन लोकांचा पगार निघतो एवढंच. त्यामुळे आता टाळेबंदी लौकर आणखी शिथिल करणं गरजेचं आहे. आमचा व्यवसाय इतर अनेक व्यवसायांना चालना देत असतो. त्यामुळे सरकारने हॉटेल व्यवसायाला मदतीचा हात देणं आवश्यक आहे. रिलीज पॅकेज, एक वर्षांसाठी परवाने फिया, कर माफ करणं, गावी गेलेल्या कामगारांना परत येण्यासाठी ट्रेन-बस या सुविधा देणं हे सगळं होणं आवश्यक आहे. बंगळुरू, राजस्थान, दिल्ली, गोवा या राज्यांमध्ये हॉटेल व्यवसाय सुरू करायला मुभा दिली आहे, तर मग महाराष्ट्रात ती द्यायला काय हरकत आहे? ती दिल्यावर पहिल्याच दिवशी काही होणार नाही. पण हळूहळू लोक यायला लागतील. सगळ्यांच्याच पातळीवरून काळजी घेतली जाईल. पण आता ती मुभा दिली नाही तर त्याचा या व्यवसायाला खूप मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण एरवीच्या काळी दरवर्षी २५ टक्के हॉटेल्स वेगवेगळ्या कारणांनी बंद होतात. नवी माणसं हॉटेलचा व्यवसाय करून बघायला पुढे येतात. आताही दरवर्षीप्रमाणेच २५ टक्के हॉटेल्स बंद होतीलच, शिवाय नवीन लोक येणार नाहीत. त्याशिवाय मॉल्समध्ये असतात ती फाईनडाईन प्रकारची हॉटेल्सही जागेचं भाडं वगैरे परवडत नाही म्हणून मोठय़ा प्रमाणावर बंद पडण्याची शक्यता आहे. त्याशिवाय या व्यवसायात मोठय़ा प्रमाणात लागणारे फ्रीज, एसी गेले चार महिने वापरले गेलेले नाहीत. ते मेंटेन झाले नसण्याची, त्यामुळे खराब झालेले असण्याची शक्यता मोठी आहे. तोही मोठा खर्च हॉटेल व्यावसायिकांसमोर आहे. या सगळ्यामुळे जवळपास ५० टक्के हॉटेलव्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे. कारण आता जे सुरू आहे त्यात दोन माणसांच्या कामावर निभावून नेणं कठीण आहे.

लोकांना जेवू खाऊ घालणारा हॉटेल व्यवसाय करोनाच्या कचाटय़ात मेटाकुटीला आला आहे. काम करणारी माणसं नाहीत, ग्राहक नाहीत, सगळं सुरळीत कधी सुरू होईल याची शाश्वती नाही. या सगळ्यामुळे  व्यावसायिकांसमोर भविष्याचं चित्र धूसर आहे. साहजिकच हॉटेल व्यवसायाशी संबंधित इतर कामांच्या साखळीमधल्या लोकांचीही तीच अवस्था आहे. या उद्योगाला चालना मिळण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा अशी त्यांना अपेक्षा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 3:00 am

Web Title: coronavirus pandemic hotel business need financial support dd70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 प्रासंगिक : राम मंदिर आणि सोमपुरा
2 मैत्रीदिन विशेष : हिरवे मित्र
3 राशिभविष्य : दि. ३१ जुलै ते ६ ऑगस्ट २०२०
Just Now!
X