19 January 2021

News Flash

माहितीची साथ

‘इन्फोडेमिक’ - अर्थात माहितीची साथ. करोनासारखे साथीचे विकार जेवढे भयावह तेवढीच ही माहितीची साथही भयावह

संग्रहित छायाचित्र

विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

खरे तर हे यापूर्वीही अनेकदा लक्षात आले आहे, मात्र आपण समाज म्हणून त्याकडे फारसे लक्ष कधीच दिलेले नाही. आता मात्र करोनाकहराच्या कालखंडात त्याकडे लक्ष देणे अपरिहार्य आहे, असे थेट जागतिक आरोग्य संघटनेच्याही लक्षात आले आणि त्याकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी एक शब्दप्रयोगच जन्माला घातला- ‘इन्फोडेमिक’ – अर्थात माहितीची साथ. करोनासारखे साथीचे विकार जेवढे भयावह तेवढीच ही माहितीची साथही भयावह, हे जागतिक आरोग्य संघटनेला जगाच्या लक्षात आणून द्यावे लागले!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर समाजमाध्यमांचा वापर करताना एक आगळीक घडली, तेव्हा प्रथम मोठय़ा प्रमाणावर या साऱ्याची चर्चा झाली. त्यानंतरही तसे प्रसंग येत गेले. प्रत्येक प्रसंगामध्ये समाजमाध्यमे अधिकाधिक ताकदवान होत गेली. जमाना त्यांचाच आहे. तंत्रज्ञान हे अनेकदा अनेक गोष्टी समान पातळीत आणण्याचे काम करते. समाजमाध्यम या तंत्रज्ञानानेही तेच केले. यातील एक महत्त्वाचा आणि सकारात्मक भाग असा की, पूर्वी लिहायचे आणि लिखाण प्रसिद्ध करायचे म्हणजेच समाजापर्यंत पोहोचायचे हे तसे सोपे नव्हते. त्यामुळे लिहिते हात फार कमी होते. शिक्षणाने समाजाच्या तळागाळातील लेखक लिहिते झाले तसेच समाजमाध्यमे अवतरल्यानंतर अनेकांना लिखाणाचे आणि मोठय़ा प्रमाणावर समाजात पोहोचण्याचे स्वातंत्र्य मिळाले. त्यातून अनेक चांगल्या गोष्टीही घडल्या, त्याचे आपण स्वागतच करायला हवे. मात्र या साऱ्या घटनाक्रमामध्ये जबाबदार लिखाण व्हायला हवे, याचे भान मात्र समाजात फार कमी असल्याचे लक्षात आले. तंत्रज्ञान हे कधीच कुणाच्या बाजूचे किंवा विरोधातील नसते. त्याचा वापरकर्ता ते कसे वापरतो, यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात. समाजमाध्यमे नावाच्या या ताकदीचा वापर अनेकांनी समाजविघातक कृत्यांसाठी करण्यास सुरुवात केली. फेकन्यूज अर्थात असत्य वार्ता हा त्याचाच एक भाग. करोनाकहराच्या काळात आता असत्य वार्तानीही कहरच केला आहे. म्हणून जागतिक आरोग्य संघटनेला सांगावे लागले की, या माहितीच्या साथीपासूनही सावध राहा!

समाजमाध्यमे आता मुद्रितमाध्यमांना संपवणार, अशी चर्चा गेल्या दशकभरात वाढतच गेली. पलीकडे मुद्रितमाध्यमांसमोरही समाजमाध्यमांनी आव्हान उभे केले. मात्र बहुसंख्य मुद्रितमाध्यमे आजही जबाबदारीने वागून प्रसिद्धीस जाण्यापूर्वी सर्व बाजूंची योग्य ती खातरजमा करण्याची काळजी घेतात. सध्या माहितीचीही साथ असलेल्या करोनाकहर काळात हेच त्यांचे सामथ्र्यही आहे. आपल्याकडे समाजात अद्याप माध्यमसाक्षरता रुजणे बरेचसे बाकी आहे. शिवाय माध्यमांचे अकादमिक शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांमध्येही ते रुजवावे लागेल आधी. कारण तिथे केवळ व्यावसायिक नीतिमत्तेचेच धडे दिले जातात. ते व्यक्ती अर्थात पत्रकार किंवा त्यांच्या संस्था यांच्याशी आणि व्यवसायाशी प्रामुख्याने संबंधित असतात. माध्यमसाक्षरता आता मोठय़ा संख्येने असलेल्या वाचकांशी थेट संबंधित विषय आहे.

समाजमाध्यमांवरील गोष्टी किंवा अगदी वाहिन्यांवरून प्रसिद्ध होणाऱ्या गोष्टीही नंतर तात्काळ काढून टाकल्या जातात, डीलीट केल्या जातात. मुद्रितमाध्यमांमध्ये ही सोय नसते. त्यांना शुद्धिपत्रक किंवा माफीनामा प्रसिद्ध करावा लागतो. यातून सुटका नाही! मुद्रितमाध्यमे म्हणूनच विश्वासार्हता राखून आहेत. वस्तुस्थिती, पुरावा यांची छाननी करून घेतलेला शोध हे मुद्रितमाध्यमांचे बलस्थान आहे. शिवाय समाजातील घटनाघटिते आणि त्याचे समाजमनातील प्रतिबिंब यांचीही कौशल्यपूर्ण उकल आजही मुद्रितमाध्यमेच अधिक जबाबदारीने करताना दिसतात. करोनाकाळात माहितीच्या साथीची महालाटच आलेली आपण पाहिली आणि या महालाटेने मुद्रितमाध्यमांची ताकदपूर्ण विश्वासार्हता पुन्हा एकदा अधोरेखित केली!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 3:14 am

Web Title: coronavirus pandemic information pandemic infomdemic mathitartha dd70
टॅग Coronavirus
Next Stories
1 कोविडकोंडी!
2 ‘निर्शहरीकरणा’च्या दिशेने..
3 राष्ट्रीय जोखीम व्यवस्थापन
Just Now!
X