News Flash

गुंतवणूक विशेष : साथकाळातील गुंतवणूक

आपल्याला नेमके काय समजते आणि काय समजायला हवे यातील तफावत इंटरनेटमुळे कधी कधी खूपच वाढते.

पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही गुंतवणूक पर्यायांमध्ये भारतीय गुंतवणूकदार गुंतवणूक करताना दिसतात.

कौस्तुभ जोशी – response.lokprabha@expressindia.com

भारतीय अर्थव्यवस्थेच्या गेल्या १० वर्षांतील वाटचालीची विभागणी तीन प्रमुख टप्प्यांत करता येईल. पहिला टप्पा म्हणजे २०१४ साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेने अनुभवलेली संख्यात्मक वाढ, त्यात झालेले धोरणात्मक बदल आणि भविष्याच्या दृष्टीने सकारात्मक वाटेल अशी घोडदौड. साधारण नोटबंदीच्या काळापासून सुरू झालेला दुसरा टप्पा आíथक अनिश्चितता ठळकपणे दर्शवतो. ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा एका रात्रीत चलनातून हद्दपार करण्याच्या सरकारपातळीवरील निर्णयामुळे रोख स्वरूपातील चलनाचा वापर करणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेत त्सुनामी आली. हातावर पोट असलेले मजूर, शेतकरी, लघुउद्योजक आणि मोठे उद्योगधंदे अशा सर्वावरच नोटबंदीची कुऱ्हाड कोसळली. नोटबंदीचे यशापयश हा प्रस्तुत लेखाचा उद्देश नाही. नोटबंदीनंतर डिजिटल चलन अधिक वापरले जाऊ लागले, हे खरे असले तरीही त्यासाठी नोटबंदी हा काही सुज्ञ उपाय नाही.

नोटबंदीतून अर्थव्यवस्था सावरण्यासाठी अध्र्या वर्षांचा कालावधी जावा लागला आणि सर्व काही सुरळीत होत आहे, असे वाटत असतानाच सरकारने आणखी एक धक्का दिला. ‘एक देश एक कर’ अशी घोषणा देत ‘वस्तू आणि सेवा कायदा’ भारतात लागू करण्यात आला. प्रत्यक्ष तो एक देश एक कर कधीच नव्हता. जगभरात ज्या पद्धतीने हा कायदा राबवला जातो त्या पद्धतीला पूर्ण छेद देत भारतात तो कायदा राबवला गेला. त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सोयीसुविधा, मनुष्यबळ विकास, तांत्रिक उपलब्धता विचारात न घेता किंवा त्याची तरतूद न करता या कायद्याची अंमलबजावणी झाली. जीएसटीचे फायदे-तोटे सर्व राज्यांना सोसावे लागले. आधीच उत्पन्नाचे अल्प स्रोत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर यामुळे अधिकच बंधने आली. जीएसटीमुळे बेकायदा किंवा लबाडी करून व्यवसाय करणाऱ्यांना पायबंद घातला गेला हे निश्चित, मात्र त्याचबरोबर सूक्ष्म आणि लघुउद्योगांतील सुलभता लोप पावली. या क्षेत्रांना त्याचा फटका बसला. २०१७ ते २०२० या काळातील आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव लक्षात घेतल्यास हे स्पष्ट होईल की सरकारला कमी भावात उपलब्ध झालेल्या तेलामुळे घसघशीत फायदा झाला. वेळोवेळी इंधनावरील कर वाढवून सरकारने उत्पन्नाचा घसरता आलेख सुधारला.

भारतीय अर्थव्यवस्थेची तिसरी अवस्था म्हणजे करोनापश्चातची अर्थव्यवस्था. करोनाकाळात पहिल्या वर्षी देशपातळीवरील टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे अपरिमित नुकसान झाले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच उद्योगधंदे ठप्प असल्याने चलनाचा पुरवठा आटला. मालाला उठाव नसल्यामुळे वस्तूंचे उत्पादन घटले आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर तळाशी पोहोचला. अर्थव्यवस्थेत प्रचंड मोठय़ा संख्येने कार्यरत असलेल्या असंघटित क्षेत्रात याचा फटका सर्वाधिक जाणवला. या तीन अवस्थांचा जाणीवपूर्वक उल्लेख करण्याचे कारण म्हणजे कोविडमुळे अर्थव्यवस्था मंदावली आहे, असे म्हणून केवळ करोना विषाणूवरच याचे खापर फोडायचे झाल्यास ते अर्धसत्य ठरेल. भारतीय अर्थव्यवस्थेची गेल्या दहा वर्षांतील कामगिरी पाहता आपली महासत्ता होण्याकडे वाटचाल वगरे कधीच सुरू नव्हती. चीनच्या आíथक वृद्धीचा दर आपण अद्याप एकदाही गाठू शकलेलो नाही. त्यामुळे एक लक्षात घ्यायला हवे की केवळ करोनामुळे आपल्या अर्थव्यवस्थेची ही स्थिती झालेली नाही.

सेन्सेक्स : निफ्टी आणि अर्थव्यवस्थेची घोडदौड

आपल्याला नेमके काय समजते आणि काय समजायला हवे यातील तफावत इंटरनेटमुळे कधी कधी खूपच वाढते. भारताच्या भांडवली बाजारांचा निर्देशांक दिवसेंदिवस वरच्या दिशेने आगेकूच करतो आहे म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचेसुद्धा एकूण भले सुरू आहे, असे वाटणाऱ्यांची संख्या कमी नाही. मुळात निफ्टी आणि सेन्सेक्स म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. निफ्टी हा राष्ट्रीय शेअर बाजाराचा म्हणजेच एनएसईचा निर्देशांक आहे तर सेन्सेक्स हा बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा म्हणजेच बीएसईचा निर्देशांक आहे. निफ्टीमध्ये आघाडीच्या ५० आणि सेन्सेक्समध्ये आघाडीच्या ३० कंपन्यांचा समावेश असतो. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये भरघोस वाढ होत राहिली याचा अर्थ या आघाडीच्या कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्य वाढत आहे. पण म्हणजेच सगळ्या कंपन्यांना सुगीचे दिवस आले आहेत असा अर्थ काढणे चुकीचे ठरेल. भांडवली बाजारामध्ये सूचिबद्ध नसलेल्या आणि आकाराने सूक्ष्म मध्यम उद्योगधंद्यांच्या, नफ्या तोटय़ाचा कोणताही प्रभाव सेन्सेक्स आणि निफ्टी दाखवत नाहीत, किंबहुना सेन्सेक्समधील सगळ्या ३० कंपन्यांचे शेअर्स दामदुपटीने वाढले आहेत असेही घडत नाही. अर्थव्यवस्थेचे चंदेरी चित्र रंगवण्यासाठी काही जणांना हे पुरेसे वाटते! विशेष म्हणजे गेल्या चार पाच वर्षांचा विचार करता परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारात पसे गुंतवण्याकडे कल वाढत राहिला. त्यातल्या त्यात मागच्या वर्षीच्या मार्चनंतर हे प्रमाण झपाटय़ाने वाढलेले दिसले. याला अनेक घटक कारणीभूत आहेत, करोनापश्चात जवळजवळ सर्वच केंद्रीय बँकांनी त्यांचे व्याजदर कमी केले आणि रोकड तुटवडा भासू नये म्हणून अशा मौद्रिक उपाययोजना केल्या की ज्यामध्ये अर्थव्यवस्थेत मोठय़ा प्रमाणावर पसे सोडले गेले. विकसित देशांतील बाजारपेठांपेक्षा विकसनशील देशांमध्ये गुंतवणुकीवर नेहमीच चांगला परतावा मिळतो त्यामुळे जगभरातून पसा भारतात येऊ लागला. कधी कधी परदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावून नफेखोरीसुद्धा केली पण पुन्हा गुंतवणुकीसाठी भारतीय बाजारपेठ निवडली. परिणामी भांडवली बाजारांमध्ये अच्छे दिन दिसू लागले. मात्र मॅक्रो चित्र गुटगुटीत वाटत असले तरी अर्थव्यवस्था घोडदौड करते आहे असे चित्र रंगवणे चुकीचे ठरेल. जागतिक स्तरावर आलेल्या मंदीचा वा टंचाईचा फायदा घेऊन गेल्या वर्षभरात आपण दमदार आयात-निर्यात कामगिरी नोंदवली आहे. मागच्या वर्षी टाळेबंदीमुळे कच्च्या तेलाची आयात  मंदावली, त्यामुळे अल्पकाळासाठी चालू खात्यावरील तूट नाहीशी झाल्यासारखी वाटली मात्र हळूहळू तीसुद्धा जाणवायला लागली आहे.

गुंतवणूकदारांचे प्रकार

मागच्या एक वर्षांत गुंतवणूक करणाऱ्यांचे त्यांच्या स्थितीनुसार प्रमुख तीन प्रकारांत वर्गीकरण करावे लागेल.

 • पहिला प्रकार : टाळेबंदीमुळे ज्यांच्या उत्पन्नावर कोणत्याच स्वरूपाचा परिणाम दिसून आला नाही असा वर्ग. यात सरकारी कर्मचारी, खाजगी क्षेत्रातील वित्त संस्था, माहिती तंत्रज्ञान कंपन्या यामध्ये काम करणारा मोठा वर्ग आणि ज्यांचे व्यवसाय टाळेबंदीतही सुरूच राहिले असे व्यावसायिक यांचा समावेश होतो.
 • दुसरा प्रकार : ज्यांना आपल्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले नाही, त्यांच्या रोजगारावर गदा आली नाही, पण त्यांना वेतन कपातीचा सामना करावा लागला. काही खासगी कंपन्यांमध्ये कर्मचारी पद आणि वेतनाच्या ज्या क्रमवारीत काम करत आहे त्यानुसार वेतनात कपात करण्यात आली. काहींना वेतनाव्यतिरिक्तचे भत्ते आणि विशेष सुखसुविधांवर पाणी सोडावे लागले.
 • तिसरा प्रकार : अशा गुंतवणूकदारांचा की ज्यांच्या खर्चात आकस्मिक वाढ झाली. मात्र उत्पन्नात तेवढय़ा प्रमाणात वाढ झाली नाही. खर्चात वाढ होण्याचे प्रमुख कारण वैद्यकीय होते.
 • चौथा प्रकार : ज्यांच्या उत्पन्नाची शाश्वती संपली. मुळात रोजगार मिळेल की नाही हेच ठाऊक नाही तिथे गुंतवणूक काय करणार असा प्रश्न यांना पडला.

गुंतवणुकीसाठीचे पर्याय कोणते?

पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही गुंतवणूक पर्यायांमध्ये भारतीय गुंतवणूकदार गुंतवणूक करताना दिसतात. पोस्टाच्या योजना, बँकांमधील मुदत ठेवी, सोने-नाणे हे गुंतवणुकीचे पारंपरिक पर्याय तर शेअर बाजारातील प्रत्यक्ष गुंतवणूक, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हे आधुनिक पर्यायसुद्धा गुंतवणूकदार वापरताना दिसतात. गेल्या वर्षभरात आíथक अस्थिरतेमुळे आणि जागतिक बाजारातील घडामोडींमुळे सोन्याचा दर घसघशीत वाढला. त्यानंतर पुन्हा त्यात घसरण होऊन तो स्थिरावला. पण त्यामुळे अजूनही सोन्यात गुंतवणूक करणे फायदेशीर आहे ही विश्वासार्हता कायम आहे. शेअर बाजार आणि मध्यमवर्गीय मराठी माणूस याचे नाते घनिष्ठ नाही. अर्थनिरक्षरतेमुळे आणि अपुऱ्या भांडवलामुळे तरुण मंडळी शेअर बाजाराकडे क्वचितच वळताना दिसतात. ज्यांच्या घरात एखाद-दोन पिढय़ांपासून शेअर बाजारातील गुंतवणुकीचा इतिहास आहे त्यांच्यामध्ये म्युच्युअल फंड आणि इक्विटी शेअर्स गुंतवणूक या बाबतीत आस्था जाणवते. अन्यथा शेअर बाजार हा आपल्यासाठी नाहीच, अशी समजूत अनेकांनी करून घेतलेली दिसते.

गेल्या वर्षभरात एकूणच घटलेले उत्पन्न विचारात घेता शेअर बाजारात गुंतवणूक कमीच व्हायला हवी होती, मात्र तसे झालेले नाही. याउलट ज्यांचा भांडवली बाजाराशी कधीही संबंध आला नाही अशा मंडळींनीसुद्धा अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा दोन्ही हेतूंनी शेअर बाजाराकडे मोर्चा वळवला. सी.डी.एस.एल. आणि एन.एस.डी.एल. यांच्याकडे मागच्या एक वर्षांत नव्याने नोंदणी केलेल्या डिमॅट खात्यांची वाढलेली संख्या याचीच साक्ष देते. याच दरम्यान शेअर ट्रेिडग आणि गुंतवणूकविषयक कार्यशाळा यांचे पेवच फुटले. फ्युचर ऑप्शन्स अशा कार्यशाळांमधून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास अल्पावधीतच पशाचे घबाड हाती लागते असा समज निर्माण केला गेला. याच ‘वरलिया रंगा’ला भुलून लोकांनी शेअर बाजारात दमदार एंट्री घेतली.

शेअर बाजारात गुंतवणूक करणे, शेअर्समध्ये ट्रेिडग करणे यात काहीच गर नाही. पण यासाठी लागणारा अभ्यास करायची मानसिक तयारी किती गुंतवणूकदारांची आहे? ट्रेिडगमध्ये सातत्य ठेवण्यात किती गुंतवणूकदारांना रस आहे? करोनाकाळ संपला आणि नियमित उद्योग-व्यवसाय सुरू झाले की सुरू केलेले ट्रेिडग तसेच करत राहू याची खात्री किती गुंतवणूकदारांना आहे? हेच खरे प्रश्न आहेत. ट्रेिडग हा उत्पन्नाचा पहिला स्रोत की अन्य स्रोत यावर मतमतांतरे असू शकतील, पण गुंतवणुकीतील ‘ग म भ न’ गिरवल्याशिवाय थेट ट्रेिडगकडे वळणे किती सयुक्तिक आहे, याचा विचार गुंतवणूकदारांनी करायला हवा.

जेन नेक्स्ट गुंतवणुकीचे पर्याय

भारतात १९९१ नंतर नवीन आíथक धोरणाचे परिणाम झालेले दिसले, त्यातील महत्त्वाचा परिणाम अर्थ क्षेत्रात जाणवला. राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात ‘नॅशनल स्टॉक एक्स्चेंज’ सुरू झाल्यावर डिमॅट स्वरूपात विश्वासार्ह व्यवहार सुरू झाले. त्यामुळे कूर्मगतीने का होईना शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या भारतीयांची संख्या वाढू लागली. नव्याने उदयाला आलेल्या आणि भरभराट झालेल्या शहरांमध्ये पसा खर्च करायची इच्छा तसेच क्षमता असलेला वर्ग मोठय़ा प्रमाणावर वाढू लागला. खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, वस्त्रप्रावरणे, मनोरंजनाची साधने, गुंतवणुकीचे पर्याय, विमा या सर्वच गोष्टींमध्ये ग्राहक रस दाखवू लागले. त्यामुळे सर्वच वस्तूंच्या खरेदीचे गणित बदलू लागले. गेल्या २० वर्षांत भारतात उदयास आलेल्या ग्राहक वर्गाने वस्तू आणि सेवा विकत घेण्याची आपली एक शैली विकसित केली. त्यामुळे अशा वस्तू विकणाऱ्या आणि सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्या बाजारात आल्या. डिजिटल माध्यमांनी यात आणखीनच भर घातली. जेन नेक्स्ट कंपन्या म्हणजेच गेल्या २० वर्षांत बाजारात जे बदल झाले त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी आकर्षण ठरलेल्या कंपन्या. थोडक्यात बदलत्या भारताचा नवीन चेहरा म्हणून या कंपन्यांकडे आपल्याला पाहता येईल. भांडवली बाजारात अशा कंपन्यांनी प्रवेश केल्यामुळे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे पर्याय आता उपलब्ध आहेत.

गुंतवणूकदारांसाठी अष्टांग मार्ग!

भविष्यकाळ आíथक स्थर्याचा जायचा असेल तर सध्याच त्यासाठी सुनियोजित प्रयत्न करणे आवश्यक आहे. गुंतवणूकदार म्हणून जितके सजग असायला हवे तेवढे आपण आहोत का, हे जाणून घेण्यासाठी पुढील यादी तपासून पाहा.

 • दर महिन्याला खर्च होणाऱ्या प्रत्येक पशाचा हिशेब तुमच्याकडे आहे का? आपत्कालीन परिस्थितीत सहा महिने तुमच्याकडे उत्पन्नाचे मार्ग नसतील तर तुम्हाला आहे तीच जीवनशैली टिकवून ठेवण्यासाठी किती पसे खर्च करावे लागतील याचे नियोजन तुमच्याकडे आहे का? नसेल तर त्यासाठी आत्ताच प्रयत्न व्हायला हवेत.
 • तुम्ही खर्चाची गरज आणि आवश्यकता याचा गांभीर्याने विचार करता का? तुमची जीवनशैली तुमच्या उत्पन्नाला साजेशी आहे का? नसल्यास योग्य वेळीच आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी मानसिक तयारी करायला सुरुवात करा.
 • क्रेडिट कार्डचा भूलभुलया तुम्हाला समजतो का? तुमच्याकडे असलेल्या क्रेडिट कार्डावर तुम्ही किती रुपयांची खरेदी करू शकता? त्याचे बिल नेमके कसे तयार होते? मिनिमम अमाऊंट डय़ू भरून तुम्ही व्याजाच्या कचाटय़ात तर सापडत नाही ना? या प्रश्नांची उत्तरे माहीत नसल्यामुळे बऱ्याचदा अवाच्या सवा बिलाचे तगादे मागे लागतात. त्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर नेमका कसा करायचा हे समजून घ्यायला हवे. क्रेडिट कार्ड ही पसे खर्च करायची संधी नसून रोख खर्च करण्याऐवजी क्रेडिट कार्डने खरेदी करण्यासाठीची सोय आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
 • तुमच्या कुटुंबाची आíथक जबाबदारी तुमच्यावर असेल तर तुमचा पुरेसा जीवन विमा आहे का याची खातरजमा करून घ्या. जीवन विमा पॉलिसी घेताना फक्त आणि फक्त शुद्ध मुदतबंद विमा म्हणजेच टर्म पॉलिसी विकत घेणे हाच शहाणपणाचा उपाय आहे. अन्य कोणत्याही पॉलिसीमधून तुम्हाला पुरेसे विमा कवच उपलब्ध होत नाही, किंबहुना या सगळ्या पॉलिसी प्रचंड महाग असतात आणि परतावा सगळ्यात कमी असतो. त्यामुळे तुमच्या उत्पन्नाच्या पटींमध्ये टर्म इन्शुरन्स घ्या. कुटुंबातील न कमावणाऱ्या किंवा लहान मुलांचा विमा अजिबात उतरवू नका.
 • आरोग्य विमा पॉलिसी पुरेशी आहे का? संपूर्ण कुटुंबाला पुरेसे ठरेल एवढे कवच तुमची पॉलिसी देते का, याचा विचार करा. चाळिशी-पन्नाशीनंतर उद्भवणारे आजार, त्यानिमित्ताने रुग्णालयात दाखल झाल्यावर होणारा खर्च विचारात घेता आरोग्य विमा असणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा स्वस्तातील आरोग्य विमा घेतला जातो आणि प्रत्यक्ष क्लेम मिळताना तोटा सहन करावा लागतो. तुमच्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये कोणते आजार समाविष्ट आहेत, उपचारांचा कोणत्या प्रकारचा खर्च कंपनी परत देणार नाही, याची सविस्तर माहिती तुमच्या गुंतवणूक सल्लागारांकडून घ्या.
 • सध्याच्या काळात गृहकर्जावरील व्याज दर तुलनेने कमी आहे. अशा वेळी आपल्या बँकेशी वाटाघाटी करून तो दर मिळेल असे पाहा. बोनस किंवा अन्य मार्गानी उत्पन्न मिळाले आणि आवश्यक खर्च करायची गरज नसेल तर गृहकर्ज फेडणे हा सगळ्यात उत्तम मार्ग.
 • म्युच्युअल फंडातील एसआयपी सुरू ठेवा. तुमची जोखीम, वय लक्षात घेऊन इक्विटी किंवा हायब्रीड फंडाची निवड करा आणि एकदा सुरू केलेली गुंतवणूक आपत्कालीन परिस्थिती नसेल तर बंद करू नका. अशी गुंतवणूक दीर्घकाळ केल्यामुळे फायदा होतो हे लक्षात असू द्या.
 • सुलभ हप्त्यांवर वस्तू विकत घेताना सावधपणे विचार करा. आपल्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा अंदाज घ्या. केवळ कुटुंबीयांची हौस म्हणून अंगावर ईएमआयचे ओझे घेऊ नका.

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूक सल्लागार आणि एजंट वेगळे असतात हे कृपया समजून घ्या. आपल्या पशांचा गांभीर्याने विचार करा तुमच्याच सुखी आणि स्थिर भविष्यासाठी तुम्हाला एवढे करावेच लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2021 4:42 pm

Web Title: coronavirus pandemic investment in pandemic lokprabha investment special issue 2021 guntavnuk vishesh dd 70
Next Stories
1 गुंतवणूक विशेष : नवीन कररचनेचा विकल्प
2 तंत्रज्ञान : आयपॅड प्रो आणि बरंच काही
3 राशिभविष्य : ७ ते १३ मे २०२१
Just Now!
X