डॉ. उज्ज्वला दळवी – response.lokprabha@expressindia.com

करोनाच्या साम्राज्यात गेले बरेच आठवडे आपण घरकोंबडे झालो आहोत. कधी तरी सारं खुलं होऊन आपल्याला गरुडभरारी घेता येईल का? होताच कशासाठी तो लॉकडाऊन?

कोविड-१९ हा अनपेक्षित, अभूतपूर्व सांसíगक वणवा आहे. तो आला तेव्हा सारं जग भांबावून गेलं. भारताकडे तर पुरेशा वैद्यकीय सुविधा, विलगीकरणाची, रुग्णालयांची सोयही नव्हती. अद्यापही ना त्याच्यासाठी लस आहे, ना नेमकं औषध! त्याने अत्यवस्थ होणाऱ्या रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छ्वास देणाऱ्या महागडय़ा यंत्राची गरज असते. अत्यवस्थ रुग्णांची संख्या वेगाने भरमसाट वाढली तर १९१८च्या फ्लूसारखा हाहाकार माजेल. साथीचा झपाटा आटोक्यात ठेवणं निकडीचं आहे. त्यासाठीच समाजाने करोनाव्रत अंगीकारलं. लॉकडाऊनचे नियम स्वीकारले. त्याने संसर्ग कमी केला. साथीचा वेग मंदावला. तेवढय़ात सरकारला बऱ्याच सोयीसुविधा नीट सुरू करायला उसंत मिळाली. आता बरीच तयारी झाली आहे. योग्य औषधाची आणि लशीचीही चाहूल लागते आहे. म्हणून लॉकडाऊन शिथिल होतो आहे.

पण करोनाचं साम्राज्य एवढय़ात लयाला जाणार नाही. तो अनाहूत पाहुणा अजून वर्ष-दोन र्वष तरी भूतलावर वस्तीला राहणार आहे आणि लॉकडाऊन संपल्यानंतरही त्याचा मान राखायचा आहे. करोनाव्रत चालूच राहणार आहे. नाकातोंडावर तिपदरी, कापडी, सहज धुण्याजोगा मास्क लावणं, हात वरचेवर साबणाने किंवा सॅनिटायझरने स्वच्छ करणं आणि शेजारच्या व्यक्तीपासून किमान सहा फूट अंतर राखणं ही त्या व्रताची तीन मुख्य अंगं! लॉकडाऊन संपल्याच्या आनंदात उतू नये, मातू नये, जगप्रवासाला निघू नये, मॉलच्या गर्दीत नाटक-सिनेमाला जाऊ नये, लग्नामुंजीची गावजेवणं घालू नयेत; नाक, तोंड, डोळ्यांना हात लावू नये.

लॉकडाऊनमध्ये घरातल्या घरात सारं पावनच होतं. पण आता बाहेरून विषाणू येण्याची शक्यता वाढेल. सावध राहायला हवं. शक्यतो गर्दीवाल्या लिफ्टऐवजी जिन्याने वर-खाली जावं. त्यात चुकून िभतीला, कठडय़ाला हात लागलाच तर सॅनिटायझर वापरावा. घरातली बटणं, दारं, कडय़ाकोयंडे, टेबलं-कपाटं, लॅपटॉप सगळं कामाला लागण्यापूर्वी सॅनिटायझरने पुसून घ्यावं. दुसऱ्याचं उष्टं भांडं वापरू नये.

गरजेच्या वस्तू आणायला बाजारात जावंच लागतं. जाताना साबणाने धुऊन उन्हात वाळवलेला मास्क लावून, बरोबर सॅनिटायझर आणि बाजारासाठी आपली, पुरेशी मोठी पिशवी घेऊन जावं. दुकानात गर्दी असली तर बाहेर, रस्त्यावर योग्य अंतराचं सोवळं पाळत रांग लावावी. वयस्क माणसांना आधी पुढे जाऊ द्यावं. दुकानातल्या ज्या वस्तू घ्यायच्या असतील त्यांनाच हात लावावा.

केस कापायला जाताना अपॉइंटमेंट घेऊन, गर्दी टाळूनच जावं. नाक-तोंड मास्कने झाकून, डोळे मिटून डोकं कलाकाराच्या स्वाधीन करावं. दाढी मात्र घरच्या घरीच करावी.

बँकांची जमतील तेवढी कामं आंतरजालावरून करावी. कागदी फॉर्मचा, रोख पशांचा आणि कार्डाचा वापर शक्यतो टाळावा. पेटीएम किंवा नेट-बँकिंगला शरण जावं.

बाहेरून घरी गेल्यावर जुने संस्कार स्मरून बूट-चपला, पिशवी दाराशीच ठेवावी. मास्क आणि हात ताबडतोब साबणाने धुवावे. गाडीची किल्ली, फोन सॅनिटाइझ करावे. बाहेर असताना कुठे बसावं लागलं, कुणाचा धक्का लागला तर घरी आल्याआल्या किमान कपडे बदलावे.

घरी किराणामालाची, कपडय़ा-भांडय़ांची डिलिव्हरी घेतली तरी पसे पेटीएमने किंवा नेटबँकिंगने द्यावे. दाराबाहेर मोठी पिशवी किंवा स्टूल ठेवून डिलिव्हरी तिथे ठेवायला सांगावी.

बाहेरून आलेल्या वस्तू सॅनिटायझरने पुसून किंवा साबणाने धुवून घ्याव्या. भाज्या-फळांतून करोना पसरत नाही; पण जर कुणी आजारी माणूस त्यांच्या पृष्ठभागावर िशकला/खोकला असेल तर ते विषाणू त्याच्यावर चिकटून राहतात. म्हणून भाज्या आणि फळं आधी साबणपाण्यात किंवा पोटॅशियम परमँग्नेटमध्ये आणि मग कोमट पाण्यात स्वच्छ खळबळून घ्यावी आणि मग धुतलेल्या टॉवेलावर पसरून उन्हात वाळवून मगच फ्रिजमध्ये, आधीच्या उरलेल्या जेवणापासून दूर ठेवावी. ज्या भाज्या ताबडतोब शिजवल्या जातात त्या फक्त साध्या पाण्यात धुतल्या तरी पुरे. ब्लीच किंवा अ‍ॅसिडने खाण्याच्या वस्तू धुऊ नयेत. ती रसायनं पोटात गेल्याने विषबाधा होऊ शकते.

लॉकडाऊन उघडला की कामवाल्या मावशा परत येतील. त्यांच्यासाठी हातपाय धुण्याची सोय, सॅनिटायझर आणि मास्क आपणच पुरवावा. पाहुणेही यायला लागतील. त्यांचा अपमान होऊ न देता आपण ‘मास्कनेम’ पाळावा आणि त्यांनाही आपल्यापासून सहा फूट अंतरावर राहायची विनंती करावी. बठकीची, स्वयंपाकघराची व्यवस्था त्यानुसार बदलावी. घरात हवा खेळती ठेवावी म्हणजे बाहेरून आलेले विषाणू वाऱ्याबरोबर निघून जातील. कामवाल्या मावशांना स्वच्छता समजावून सांगावी. त्यांना किंवा त्यांच्या घरच्यांना सर्दी, ताप, खोकला झाला किंवा आपल्याही घरात कुणी आजारी झालं तर मावशांना तेवढय़ापुरती रजा द्यावी.

लॉकडाऊन संपला की बऱ्याच लोकांची ऑफिसं सुरू होतील. तिथेही घरच्यासारखेच स्वच्छतेचे, विलगीकरणाचे नियम पाळावे. जाता-येता मास्क, सॅनिटायझर वापरावे. कमी प्रवासी घेणाऱ्या लोकलगाडय़ा आणि बसेस सुरू करायचा सरकारचा मनसुबा आहे. तोवर शक्यतो कंपनीच्या खास बसने किंवा आपल्याच वाहनावरून ये-जा करावी. ऑफिसात पोहोचल्याबरोबर हात साबणाने धुवावे. ऑफिसातलं कॉफीचं यंत्र, फोन, िपट्रर वगरे सॅनिटायझरने पुसून मगच वापरावे. पेन आपलंच वापरावं. पर-लेखणीला स्पर्शही करू नये. आपलं जेवण घरून न्यावं. ते मित्रांमध्ये वाटून खाऊ नये. आपल्या जागी बसून एकटय़ाने जेवावं. दुसऱ्यांच्या केबिनमध्येही कारणाशिवाय जाऊ नये. शौचालयात विषाणूंची देवाणघेवाण होऊ शकते. म्हणून तिथला वापर केल्यावर हात धुवावे आणि त्यानंतर कामाला लागण्यापूर्वी ते पुन्हा एकदा सॅनिटायझरने स्वच्छ करावे.

शाळा-कॉलेजं इतक्यात सुरू होणार नाहीत. घरूनच, आंतरजालावरून शिक्षण चालू राहील. मुलं एकत्र जमलीच तरी पकडापकडी, खोखोसारखे जवळिकीचे खेळ बंद असतील. सायकल चालवणं, एअरोबिक्स, कवायत वगरे विलगतेत करता येणारे व्यायामच होतील. त्याची मुलांना आतापासूनच कल्पना द्यावी.

कामवाल्या मावशा, बस ड्रायव्हर, सफाई कामगार, दुकानदार, नस्रेस, डॉक्टर हे सगळे जण स्वत:चा जीव धोक्यात घालून समाजासाठी काम करतात. त्यांच्याबद्दल मुलांच्या मनात आदराची भावना आवर्जून रुजवावी.

वयस्क माणसांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असते. त्यांना रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार वगरे आजार आधीपासून असतात. कोविड-१९ची लागण त्यांच्यात अधिक प्रमाणात होते. लॉकडाऊन संपल्यावरही साठीच्या वरच्या लोकांनी कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. चालायला किंवा किराणामाल आणायलाही न जाणं उत्तम. घरातल्या इतर माणसांनी त्यांची ती काळजी घ्यावी.

कोविड-१९चा अभिनव विषाणू माणूस आणि वटवाघळांसारखे वन्यजीव यांच्यातल्या अनावश्यक, अति जवळिकीमुळे निर्माण झाला. चीनमधल्या बाजारात वाघळं, खवल्या मांजरं आणि त्यांचे विक्रेते फार काळ एकमेकांच्या निकट राहिले. वाघळांच्या प्रजातीत शतकानुशतकं मुकाटय़ाने नांदणारी, त्यांच्याशी एकनिष्ठ राहणारी करोनाची प्रजाती तशा जवळिकीमुळे चुकून खवल्या मांजरात शिरली. खवल्या मांजरांत नांदणारी त्यांचीही वेगळी एकनिष्ठ करोना-प्रजाती होती. एकाच पेशीत दोन भिन्न प्रजातींचे विषाणू एकत्र आले. त्यामुळे भिन्न विषाणूंच्या जनुकांमध्ये संकर झाला आणि एक नवीच, आक्रमक प्रजाती निर्माण झाली. तिथून माणसांच्या पेशीत उडी मारताना कदाचित पुन्हा अधिक जालीम जनुकपरिवर्तन झालं आणि ती जीवघेणी साथ उगम पावली.

त्यातून धडा घ्यावा. माणूस आणि इतर प्राणी यांच्यात फार जवळीक टाळावी. त्यातही सध्याच्या कोविड-काळात आपल्याला सर्दी, खोकला, ताप असला तर घरच्या पाळीव प्राण्या-पक्ष्यांपासून जरा अंतर पाळणं योग्य. तसंच त्या मुक्या प्राण्यापक्ष्यांना बरं नसलं तरी त्यांच्या फार जवळ न जाणं उत्तम.

त्या कठोर करोनाव्रताचे इतके सारे र्निबध पाळले तरीसुद्धा करोना जेमतेम कह्य़ात राहतोय; पण निदान तो कमी वेगाने पसरतो आहे. त्यामुळे मृत्युदर आटोक्यात राहून यथावकाश सामाजिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) तयार होते आहे. उतूनमातून त्या नियमांचा वसा टाकणं हे मात्र वाघाच्या िपजऱ्यात घुसण्यासारखं वेडेपणाचं ठरेल. साथ भडकेल, पण म्हणून त्याला घाबरून गळाठूनही जाऊ नये. व्रत चालूच ठेवावं, करोनाला ‘वाघोबा’ न म्हणता ‘वाघ्या’ म्हणावं आणि शांतपणे जगावं. वर्षअखेपर्यंत व्रताचं फळ लाभेल. करोनाची लस येईल, कोविडवर लागू पडणारं औषध येईल, खवल्या मांजरातून आलेल्या त्या वाघोबाचं ताटाखालचं मांजर होईल, करोना विषाणू मवाळ होईल आणि आपल्याला अनेक चांगले धडे शिकवून कोविड-१९ची मरीआई शांत होईल. व्रताची सांगता होईल!

आवश्यक जीवनसत्त्व

क जीवनसत्त्व अनेक मार्गानी रोगप्रतिकारशक्ती वाढवतं. रोज २०० मिलिग्रॅम क जीवनसत्त्व पुरेसं होतं. कोविड-१९मुळे अत्यवस्थ झालेल्या रुग्णांच्या फुप्फुसांतलं ‘इन्फ्लमेशन’ (सूज, वेदना) कमी करण्यासाठीही क जीवनसत्त्व उपयोगी पडेल अशी आशा शास्त्रज्ञांना आहे. त्यासाठी लागणारा क जीवनसत्त्वाचा डोस मात्र बराच मोठा असेल. ड जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास करोनाविषाणूच्या पेशींतल्या प्रवेशाला आणि तिथल्या पुनरुत्पादनाला वेग येतो. त्यासाठी रोज हजार मिलिग्रॅम ड जीवनसत्त्व घेतलं तर पुरेसं होईल. फुप्फुसांतलं इन्फ्लमेशन कमी करायलाही ड जीवनसत्त्वाचा फायदा होतो.