विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

कोविडकहराच्या आता दुसऱ्या लाटेमध्ये घटना वेगात घडण्यास सुरुवात झाली आहे. या लाटेला सुरुवात झाली, त्याही वेळेस फारसे कुणी गांभीर्याने तिच्याकडे पाहिले नाही. मृत्युदर अगदीच कमी आहे, असे म्हणून जवळपास हेटाळणीच केली. आता मात्र मृत्युदराचे आकडे चढेच आहेत. संसर्ग वेगात वाढणाऱ्या राज्यांच्या संख्येमध्ये आणि राज्यांतील रुग्णसंख्येबरोबरच मृत्युदरामध्येही मोठी वाढ होत आहे. सर्वत्रच आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचे चित्र दिसते आहे. गुरुवारी तर गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमधील अवस्था पाहून महाराष्ट्रातील अवस्था परवडली असे म्हणायचीच वेळ आली. यातील गुजरात आणि मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता आहे तर छत्तीसगढमध्ये काँग्रेसची. करोना हाताळणीसंदर्भात महाराष्ट्र सरकारवर टीका करणारा भाजपा गुजरात आणि मध्य प्रदेशातील हाताळणीबाबत मात्र मूग गिळून गप्प आहे. महत्त्वाचे म्हणजे देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री दोघेही गुजरातचे. दोन्हीकडे सत्ता भाजपाचीच. असे असतानाही गुजरातमध्ये हाताळणी चुकते आहे, हे खडसावून सांगण्याची वेळ तेथील उच्च न्यायालयावर आली, हे विशेष!

देशभरात सगळीकडेच करोनाची दुसरी लाट आलेली असली तरी काही ठिकाणी मात्र कुणालाच त्याचे सोयरसुतक नाही असे चित्र आहे. महाकुंभ सुरू आहे, तिथे करोनाकाळातच आरोग्यदायी सवयींना थेट गंगेतच तिलाजंली देण्यात आली आहे. लाखोंच्या संख्येने भाविक, साधू यांनी गर्दी केली आहे. कुर्नूलमध्ये तर स्थानिक प्रथा-परंपरेच्या नावाखाली हजारोंनी गर्दी करून एकमेकांवर शेणगोळे फेकण्यात धन्यता मानली. करोना जाती, धर्म यांचे भेद मानत नाही. आरोग्यदायी सवयी न पाळणाऱ्या सर्वच जाती-धर्माच्या लोकांना तो धडा शिकवतो. त्यामुळे इथे धर्मभावना बाजूला ठेवून विज्ञानाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अशा प्रकारे प्रथा-परंपरांच्या नावाखाली मग त्या कोणत्याही जाती-धर्माच्या का असेनात, हजारो किंवा लाखोंच्या संख्येने का असेना, एकत्र येणे म्हणजे वावरण्याच्या दृष्टीने अतिशय त्रासदायक असलेला पीपीई किट परिधान करून करोनाविरुद्धच्या लढाईत आपल्या जिवानिशी उतरलेल्या करोनायोद्धांचा ढळढळीत अपमानच आहे! खरे तर धार्मिक नेत्यांनी या काळात पुढे येऊन धर्मभावनांना आवर घालण्याचे पुण्यकर्म करणे गरजेचे आहे. या पुण्यकर्माने त्यांना मृत्युपश्चात स्वर्ग मिळेल की नाही माहीत नाही; पण पृथ्वीवर नरक होणे टाळल्याचे श्रेय तरी नक्कीच मिळेल!

सध्या पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये व्यग्र असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी त्यातल्या त्यात वेळ काढून देशभरात लसमहोत्सव जाहीर केला खरा, पण सध्या लशीपासून ते ऑक्सिजनपर्यंत आणि औषधांपासून ते रुग्णखाटांपर्यंत सर्वत्र तुटवडय़ाचीच साथ आल्याचे चित्र देशभरात आहे. त्यातील दिलासादायक भाग म्हणजे केंद्र सरकारने बुधवारी लशींच्या संदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेत विदेशी लशींनाही वापरासाठी मंजुरी दिली. त्यामुळे लशींच्या संदर्भातील प्रश्न थोडा सुटण्यास सुरुवात होईल. मात्र सद्य:परिस्थितीकडे नीट पाहिले तर असे लक्षात येते की, कदाचित पहिल्या लाटेतून आपण फारसे काहीच शिकलो नाही. कारण आपण आज पुन्हा त्याच तुटवडारेषेवर उभे आहोत, ज्या रेषेवर गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात आपला देश झुंजत होता. त्यामुळे सारे धार्मिक उत्सव पूर्णपणे बंद करून संपूर्ण देशाने विज्ञानाची कास धरत आता केवळ एकाच उत्सवात सहभागी व्हायला हवे आणि तो म्हणजे लसमहोत्सव. अन्यथा आपण सगळेच मृत्यूच्या उत्सवाच्या दारात जाऊन केव्हा उभे राहू कळणारही नाही! वेळीच सावध व्हा, अद्यापही वेळ गेलेली नाही!