कौनेन शेरीफ – response.lokprabha@expressindia.com

गेल्या आठवडय़ात जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या उपचारांमध्ये कोर्टिकोस्टेरॉइड्सच्या वापराबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. आठ वेगवेगळ्या क्लिनिकल चाचण्यांच्या अहवालाचं विश्लेषण करून जागतिक आरोग्य संघटनेने दोन शिफारसी केल्या आहेत. कोविड-१९ च्या संसर्गामुळे गंभीर तसंच तीव्र आजारी असलेल्या रुग्णावर सात ते दहा दिवस कोर्टिकोस्टेरॉइड उपचार पद्धतीचा वापर करावा. कोविड-१९ च्या संसर्गाचा फार आणि गंभीर परिणाम झालेला नाही अशा रुग्णावर कोर्टिकोस्टेरॉइड थेरपीचा वापर करू नये.

कोर्टिकोस्टेरॉइड्स म्हणजे काय?

कोर्टिकोस्टेराइड्स हे कमी किमतीचे सूज उतरवणारे किंवा जळजळ कमी करणारे औषध आहे. ते काहीसे कोर्टिसोल या माणसाच्या शरीरातील अ‍ॅड्रेनल ग्रंथींनी तयार केलेल्या संप्रेरकासारखेच असते. कोर्टिकोस्टेरॉइड्स सहसा संधिवात, स्नायूंना सूज येणं, रक्तवाहिन्यांचे आजार, त्वचाक्षय, फुप्फुस, किडनी यांचे आजार, डोळ्यांची जळजळ, पाठीचा कणा अथवा मेंदू या अवयवांच्या आसपास गाठ तयार झाल्यामुळे सूज येणं यांच्यावरील उपचारात या औषधाचा वापर होतो. डेक्सामेथासोन, हायड्रोकोर्टिसोन आणि मेथ्यल्प्रेडनीसोलोन ही तीन प्रकारची कोर्टिकोस्टेरॉइड्स सहसा वापरली जातात.

सुरुवातीच्या काळात इंग्लंडमधील क्लिनिकल चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्या ऑक्सफर्डच्या संशोधकांनी जाहीर केले होते की डेक्सामेथासोन या कोर्टिकोस्टेराइडमुळे कोविड-१९ चा संसर्ग होऊन रुग्णालयात दाखल झालेल्या, श्वसनसंस्थेतील गंभीर संसर्गामुळे गुंतागुंत झालेल्या एक तृतीयांश रुग्णांचा जीव वाचला होता. तेव्हापासून डेक्सामेथॅसोन अनेक देशांनी डेक्सामेथसोनचा कोविड-१९ वरील उपचारात वापर सुरू केला होता.

नवीन विश्लेषण काय सांगते?

रॅपिड एव्हिडन्स अप्राजयल फॉर कोविड-१९ थेरपीज (REACT) वर्किंग ग्रुप या जागतिक आरोग्य संघटनेच्या आस्थापनेने गेल्या आठवडय़ात जामा म्हणजेच जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन या नियतकालिकात त्यांचे एक विश्लेषण प्रसिद्ध केले आहे. कोविड-१९ चा संसर्ग होऊन गंभीर आजारी असलेल्या रुग्णांमधील मृत्युदर आणि इंजेक्टेबल किंवा सलाईनच्या माध्यमातून दिलेले कोर्टिकोस्टेरॉइड्स यांचा एकमेकांशी असलेला संबंध या अभ्यासांवर हे विश्लेषण आधारित आहे. ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, डेन्मार्क, फ्रान्स, आर्यलड, नेदरलॅण्ड, न्यूझीलंड, स्पेन, इंग्लंड आणि अमेरिका या देशांमधील रुग्णांच्या सात चाचण्यांचा तुलनात्मक अभ्यास करून हे विश्लेषण करण्यात आले आहे. यात एकूण १७०३ रुग्णांचा अभ्यास केला गेला. त्यात ६७८ रुग्णांच्या उपचारांमध्ये कोर्टिकोस्टेरॉइड वापरण्यात आले तर १०२५ रुग्णांसाठी नेहमीचे औषध किंवा प्लेसबो (औषधाचा आभास निर्माण करून एखाद्या साध्याच घटकाचा वापर करून मानसिक परिणाम पाहिला जातो.) वापरले गेले.

संशोधकांनी औषधाची कमी मात्रा दिलेले रुग्ण आणि जास्त मात्रा दिलेले रुग्ण यांचा वेगवेगळा अभ्यास केला. डेक्सामेथॅसोनची कमी मात्रा आणि जास्त मात्रा दिलेले रुग्ण, हायड्रोकोर्टिसोनची कमी मात्रा दिलेले रुग्ण आणि मेथ्यल्प्रेडनीसोलोनची जास्त मात्रा दिलेले रुग्ण असं वर्गीकरण करण्यात आलं. या विश्लेषणामुळे पुढील महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर शोधले गेले. तो म्हणजे कोविड-१९ च्या संसर्गामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांमधील मृत्यूचं प्रमाण २८ दिवसांत कमी होण्यामागे कोर्टिकोस्टेरॉइडच्या वापराचा काही संबंध आहे का?

या विश्लेषणाचे निष्कर्ष ?

या अभ्यासानुसार कोर्टिकोस्टेरॉइडचा वापर केलेल्या ६७८ रुग्णांपैकी २२२ रुग्णांचा मृत्यू झाला. तर साधे औषध किंवा प्लेसबो पद्धती वापरलेल्या १,०२५ रुग्णांपैकी ४२५ रुग्णांचा मृत्यू झाला. हा अभ्यास सांगतो की साधे औषध किंवा प्लेसबोचा वापर केलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचं प्रमाण ४० टक्के होते तर कोर्टिकोस्टेरॉइडचा वापर केलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचं प्रमाण ३२ टक्के होतं.

या विश्लेषणानुसार कोविड-१९ च्या संसर्गामुळे गंभीर आजारी असलेल्या, ज्यांना व्हेंटिलेटरसारख्या उपकरणाची मदत उपलब्ध नव्हती अशा  रुग्णांमध्ये कोर्टिकोस्टेरॉइड्सच्या वापरामुळे मृत्यूचं प्रमाण कमी झालं. वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणांच्या वेगवेगळ्या क्लिनिकल चाचण्यांमधून पुढे आलेल्या परिणामांमधून असं दिसतं की खूप गुंतागुंत नसेल तर कोविड-१९ च्या संसर्गामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवरील उपचारांमध्ये कोर्टिकोस्टेरॉइडचा वापर सयुक्तिक ठरू शकतो.

कोविड-१९ च्या संसर्गामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांच्या क्लिनिकल चाचण्यांचे विश्लेषण सांगते की साधे उपचार अथवा प्लेसबोच्या तुलनेत इंजेक्शन अथवा सलाइनच्या माध्यमातून दिलेल्या कोर्टिकोस्टेरॉइड्सचा आणि २८ दिवसांत मृत्युदर कमी होण्याचा एकमेकांशी संबंध आहे.

जागतिक आरोग्य संघटनेची मार्गदर्शक तत्त्वे

जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-१९ च्या संसर्गामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांच्या उपचारामध्ये तोंडावाटे किंवा वाफेतून कोर्टिकोस्टेरॉइड देण्यापेक्षाही इंजेक्शन अथवा सलाइनच्या माध्यमातून कोर्टिकोस्टेरॉइड देण्याची शिफारस केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने इतर खर्चीक, अवघड तसंच अद्ययावत वैद्यकीय सुविधांची गरज असलेल्या उपचारांच्या प्रयोगाच्या तुलनेत कोर्टिकोस्टेरॉइड्स कमी किमतीचे, वापर आणि निरीक्षण करायला सोपे, जागतिक पातळीवर सगळीकडेच सहज उपलब्ध असल्याचे नमूद केले आहे. कोविड-१९ च्या उपचारामध्ये इंजेक्शन अथवा सलाइनवाटे दिलेल्या कोर्टिकोस्टेरॉइड्समुळे शरीरात निर्माण झालेली कमतरता भरून निघते आणि आरोग्य सुधारते. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने त्याची शिफारस केली आहे.

इंजेक्शन अथवा सलाइनच्या माध्यमातून कोर्टिकोस्टेरॉइड देणं हा उपचार त्याचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने कमी वेळ घेणारा आहे. या पद्धतीने कोर्टिकोस्टेरॉइड देणं सुरक्षित आहे. सात ते आठ दिवस संबंधित रुग्णाचं निरीक्षण केल्यानंतर संबंधित पॅनल या निष्कर्षांपर्यंत आलं की या उपचाराचा रुग्णांच्या शरीराने स्वीकार करून त्याला प्रतिसाद देण्याचं प्रमाण जास्त आहे.

दुसरी शिफारस सांगते, कोविड १९ च्या संसर्गाचा गंभीर परिणाम झालेला नाही अशा रुग्णांवरील उपचारामध्ये कोर्टिकोस्टेरॉइडचा वापर करू नये.

जागतिक आरोग्य संघटना सांगते की दुसरी शिफारस ज्या रुग्णांना विलगीकरणाच्या हेतूने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, पण ते कोविड १९ च्या संसर्गामुळे गंभीररीत्या आजारी नाहीत, त्यांच्यासाठी आहे. त्यांच्यावर इंजेक्शन अथवा सलाइनवाटे म्हणजे सिस्टेमिक पद्धतीने कोर्टिकोस्टेराइडचा उपचार केला जाऊ नये. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोविड १९ च्या संसर्गाने आजारी असलेल्या रुग्णाची प्रकृती अधिक बिघडली (म्हणजे त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, रक्तामधले प्राणवायूचे प्रमाण कमी झाले) तरच त्याला इंजेक्शन अथवा सलाइनवाटे कोर्टिकोस्टेरॉइड द्यावे असे जागतिक आरोग्य संघटना सांगते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीनुसार असं असलं तरीही कोविड १९ चा संसर्ग झालेला आहे, पण फारसे गंभीर आजारी नाहीत अशा रुग्णांना प्रतिकारशक्ती कमी करणारे तसंच फुप्फुसांशी संबंधित तीव्र आजार झाले असल्यामुळे आधीपासूनच इंजेक्शन अथवा सलाइनवाटे कोर्टिकोस्टेरॉइड दिलं जात असेल तर त्यांचा तो कोर्स थांबवण्याची गरज नाही.

या अभ्यासाच्या मर्यादा आणि शिफारसी

या अभ्यासातून पुढे आलेले निष्कर्ष महत्त्वाचे आहेत, कारण कोविड १९ च्या संसर्गामुळे गंभीररीत्या आजारी असलेल्या जगभरातल्या वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीत जगणाऱ्या तुलनेत मोठय़ा गटाचे तुलनात्मक विश्लेषण करून ते काढण्यात आले आहेत. असं असलं तरी हा अभ्यास सांगतो की रुग्णाला दिलेल्या कोर्टिकोस्टेरॉइडच्या डोसचे प्रमाण आणि उपचारांचा कालावधी यांचे या विश्लेषणात मूल्यमापन केले जाऊ शकत नाही.

जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केले आहे की कोविड १९ च्या संसर्गाने गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवरील उपचारात कोर्टिकस्टेरॉइडचा वापर केल्यानंतर ते वाचले असले तरीही त्यांच्यावर कोर्टिकोस्टेरॉइडचे कोणते दूरगामी परिणाम झाले असतील ते आत्ताच सांगता येणार नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेचा दुसरा मुद्दा म्हणजे कोविड १९ च्या संसर्गामुळे गंभीर आजारी नसलेल्या पण न्युमोनिया किंवा रक्तातील प्राणवायूचे प्रमाण कमी असणे अशा आजारांमुळे ज्यांना कोर्टिकोस्टेरॉइड द्यावे लागले आहे त्यांच्यावर या उपचाराचा काय परिणाम झाला आहे ते अजून स्पष्ट झालेले नाही. तिसरा मुद्दा असा की कोर्टिकोस्टेरॉडचा प्रतिकारशक्तीवर झालेला परिणाम आणि त्यामुळे इतर कोणताही संसर्ग होण्याची शक्यता याचा परिणाम होऊन २८ दिवसांनंतर रुग्णाचा मृत्यू होण्याचा धोका याबाबत निश्चित माहिती सांगता येत नाही.

कोर्टिकोस्टेरॉइडच्या वापराचे भारतातील नियम

जून महिन्यात भारत सरकारने कोविड १९ च्या रुग्णांच्या उपचारांच्या व्यवस्थापनाविषयीची सुधारित मार्गदर्शक तत्त्वं प्रसिद्ध केली. त्यात कोविडने मध्यम आजारी ते गंभीर आजारी रुग्णांसाठी डेक्सामेथासोन हे स्टेरॉइड मेथीलप्रेडिनिसोलोन या स्टेरॉइडला पर्यायी म्हणून वापरावे अशी शिफारस करण्यात आली आहे. ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सच्या (एम्स) इन्टेन्सिव्ह केअर युनिटच्या वतीने कोविड १९ संदर्भात सातत्याने विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यानुसार एक प्रश्न असा आहे की मेथीलप्रेडिनिसोलोन हे स्टेरॉइड डेक्सामेथासोन या स्टेरॉइडपेक्षा अधिक चांगले आहे का? या प्रश्नाचे एम्सने उत्तर दिले आहे की कोविडच्या संसर्गाने मध्यम ते गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवरील उपचारांमध्ये कोर्टिकोस्टेरॉइड्सचा वापर करावा असे सध्या सुचवण्यात आले आहे. याआधीच्या चाचण्यांमध्ये डेक्सामेथासोनचा वापर करण्यात आला आहे. असं असलं तरी डेक्सामेथासोन अथवा मेथीलप्रेडिनिसोलोन या दोन्हीपैकी उपलब्धतेनुसार कोणतेही वापरायला हरकत नाही.

‘दि इंडियन एक्सप्रेस’मधून

अनुवाद- वैशाली चिटणीस