06 July 2020

News Flash

विज्ञान : विषाणू.. नवीन यजमानाच्या शोधात

सध्या जगभर धुमाकूळ घालत असलेल्या करोना विषाणूची साथ थोडीशी कमी होतेय आणि सर्वाचे लक्ष रुग्णांना बरे करण्याकडे आहे.

राल्फ बेरिक या विषाणुतज्ज्ञाच्या मते हा विषाणू जगभर पसरत आहे आणि दाट शक्यता आहे की, चीनच्या बाहेर तो वेगळा असा नवीन यजमान शोधेल.

डॉ. किशोर कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com

सध्या जगभर धुमाकूळ घालत असलेल्या करोना विषाणूची साथ थोडीशी कमी होतेय आणि सर्वाचे लक्ष रुग्णांना बरे करण्याकडे आहे. तसेच साथ आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात जगभरचे लोक गुंतलेले आहेत. मात्र काही तज्ज्ञांच्या मते करोना विषाणू तुमची दिशाभूल करतोय आणि तो शोधात आहे एका नव्या प्राण्याच्या ज्याद्वारे तो माणसात पुन्हा प्रवेश करू शकेल आणि अनेकांना पुन्हा संसर्ग करेल. राल्फ बेरिक या विषाणुतज्ज्ञाच्या मते हा विषाणू जगभर पसरत आहे आणि दाट शक्यता आहे की, चीनच्या बाहेर तो वेगळा असा नवीन यजमान शोधेल. बेरिक हे नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात वैज्ञानिक आहेत. ते पुढे म्हणतात की, करोना विषाणू तसा स्वैराचारीच. कोणा एका विशिष्ट व्यक्ती वा प्राण्यात टिकून राहणारा नाही. वटवाघळे अनेक विषाणू बाळगून आहेत; परंतु तरीही ते विषाणूपासून होणाऱ्या रोगापासून मुक्त आहेत. विषाणूंची ख्याती आहे की, ते एका यजमानापासून दुसऱ्या यजमानात सहज प्रवेश करू शकतात. असं करताना ते कधी उत्परिवर्तित होतात, तर कधी आहे त्याच स्थितीत नवीन यजमानात प्रवेश करतात. करोना विषाणू सस्तन वर्गातील प्राणी आणि पक्षी यांना संसर्गित करू शकतात. त्यात कुत्रे, कोंबडय़ा, पाळीव प्राणी, डुकरे, मांजरे, मुंगीखाऊ आणि वटवाघळे इत्यादी प्राण्यांचा समावेश आहे. चीनमध्ये सुरू झालेली करोना विषाणूची सध्याची साथ बहुतेक हॉर्सशू प्रकारातील वटवाघळाला झालेल्या संसर्गातून सुरू झाली. त्या सांसíगक वटवाघळातून विषाणूने नंतर माणसात प्रवेश केला. म्हणजे या ठिकाणी माध्यम आहे वटवाघूळ.

वैज्ञानिकांच्या मते सध्याच्या आपल्या अनुभवावरून तसेच ज्ञात माहितीच्या आधारे आपण सांगू शकतो की, नॉव्हेल करोना विषाणूमुळे काही पाळीव प्राण्यांनाही संसर्ग होऊ  शकतो; परंतु काही तज्ज्ञांच्या मते, पाळीव प्राणी व िपजऱ्यातील वन्यप्राण्यांद्वारे या विषाणूचा संसर्ग माणसात पसरत नाही. तरीही असे घडते का, हे काळजीपूर्वक पाहायला हवे. वैज्ञानिकांनी हे शोधून काढण्यासाठी त्रिमित संगणकीय प्रारूपाच्या साहाय्याने असे अनुमान काढले की, विषाणूंच्या विशिष्ट जाती मुंगीखाऊ, मांजरे, म्हैस, बकरी, मेंढी, कबुतर, उदमांजर आणि डुकराद्वारे माणसात संसर्ग फैलावतात. या प्रयोगात उंदीरदेखील वापरले होते; परंतु उंदीर संसर्ग फैलावत नाहीत असे आढळून आले. एसीई २ प्रथिन असलेले प्राणी सांसíगक होताना आढळले. एसीई २ प्रथिन हे अ‍ॅन्जिओ टेनसिन कंव्हìटग एंझाईम-२ चे लघुरूप आहे. एसीई २ प्रथिन हे पेशीच्या बाह्य़ भागाला म्हणजे पेशी पटलाला जोडलेले असते. फुप्फुस, हृदय, वृक्क किंवा मूत्रिपड आणि शुद्ध रक्त वाहून नेणारी रक्तवाहिनी म्हणजे रोहिणी यांच्या पेशीबाहेर एसीई २ प्रथिन असते आणि ते रक्तदाब कमी करण्यास मदत करते.

दुसऱ्या एका प्रयोगात वैज्ञानिक वेगवेगळ्या प्राण्यांच्या पेशी विषाणूंच्या संपर्कात ठेवत आहेत आणि निरीक्षण करत आहेत, की नेमकी कोणती पेशी सांसíगक होतेय. राल्फ बेरिक यांची प्रयोगशाळा अशा प्रकारचे प्रयोग करते आहे. कोणती पेशी लवकर बाधित होतेय हे एकदा कळले; की त्यावरून प्रत्यक्ष प्राण्यावर असे प्रयोग प्रयोगशाळेत नियंत्रित स्थितीत करण्याची योजना आहे. जर्मनीमधील शासकीय प्रयोगशाळा डुकरे, कोंबडीची लहान पिले, फर्ेेट, फ्रुटबॅट वटवाघूळ यांच्यावर विषाणूचा मारा करत आहेत. या प्रयोगातून त्यांना हे शोधून काढायचंय, की जर अशा प्रकारे त्यांना संसर्ग झाला तर त्यांच्या शरीरातील इतर पेशींत हा संसर्ग पसरतो का? आणि खरोखरच इतर पेशींत संसर्ग पसरला तर हे प्राणी रोगकारक विषाणूंची साठवण करू शकतात हे सिद्ध होईल. प्राथमिक अभ्यासावरून हे स्पष्ट झाले आहे की, फ्रुटबॅट हे वटवाघूळ आणि फर्ेेट हे प्राणी रोगकारक विषाणूंची साठवण करतात. डुक्कर आणि कोंबडीच्या पिलांबाबत मात्र तसे होत नाही. आणखी एका संशोधनात असे आढळले की, कुत्रे, डुक्कर, कोंबडीची पिले आणि बदकात विषाणूची वाढ खूपच धिम्या गतीने होते. मात्र फर्ेेट आणि मांजरात त्याची वाढ झपाटय़ाने होते. शिवाय मांजर, त्यांच्या नाकावाटे बाहेर पडणाऱ्या लहान व सूक्ष्म थेंबातून, हे विषाणू बाहेर टाकत असल्याचे आढळले. अर्थात ही प्रयोगशाळेतील चाचणी असून प्रत्यक्षात असे घडेलच असे निश्चित सांगता येणार नाही, असेही वैज्ञानिक सांगतात.

जे प्राणी विषाणूच्या संसर्गाला सहज बळी पडतात म्हणजेच ज्यांना सहज संसर्ग होतो अशा प्राण्यांबरोबर जर माणूस आपला बराच वेळ घालवत असेल तर माणसातील विषाणू त्या प्राण्यांच्या  शरीरात सहज प्रवेश करू शकतात. बराच काळ प्राणी आणि माणूस एकमेकांच्या सान्निध्यात राहिल्यास  विषाणू पसरण्याला जादा वाव आणि माणसातून प्राण्यात जायला एक योग्य संधी. वैज्ञानिकांच्या मते समजा, माणसापासून एखाद्या प्राण्याच्या शरीरात विषाणूने प्रवेश केला तरी तो तिथे जगेलच आणि आपली प्रजा विस्तारेल याची खात्री देता येणार नाही, कारण अनेक गोष्टींवर त्या विषाणूचे जगणे आणि त्याचा विस्तार अवलंबून आहे. एवढेच नाही तर विषाणूने त्या प्राण्यात शिरकाव करून पेशीत प्रवेश केला असला तरी तो विषाणू पुन्हा माणसात फेरप्रवेश करेलच याची खात्री देता येत नाही, असे पीटर दझाक या वैज्ञानिकाचे मत आहे. डॉ. दझाक हे २०१७ मध्ये सार्ससारख्या विषाणूच्या उद्रेकानंतर समीक्षण आणि निरीक्षण करण्यासाठी नेमलेल्या समितीचे सदस्य होते. प्राण्यापासून माणसात फेरप्रवेशाविषयी बोलताना त्यांनी काही उदाहरणं दिली. ते म्हणतात, समजा, एका विशिष्ट विषाणूने शेतातील एखादा प्राणी संसíगत झाला तर त्या प्राण्यात गंभीर आजार होईल आणि त्यामुळे अनेक मृत्यूही घडून येतील. एकाच प्रकारच्या प्राणिजातीला संसर्ग होऊन मृत्यू घडून आल्याने रोगाचे निदान होईल आणि तिथेच रोगाचा आणि पर्यायाने विषाणूचा बंदोबस्त होईल. दुसरे एक उदाहरण दझाक देतात. विषाणू प्राण्यांना संसर्ग करेल, त्यामुळे त्या प्राण्यात  काही अनिश्चित लक्षणे निर्माण होतील. उदा. त्या प्राण्याला हगवण लागेल, हगवण लागणे हे अनेक सर्वसाधारण रोगांचे लक्षण आहे, त्यामुळे तो विषाणू त्यासारख्या प्राण्यातच फिरत राहील. माणसात परत येणार नाही. तिसरे  उदाहरण देताना डॉ. दझाक म्हणतात, ‘एखाद्या प्राण्यात एखादा विषाणू शिरकाव करेल, परंतु कोणतीच लक्षणं प्रकट करणार नाही. निदान न होताच तो प्राण्यामध्येच फिरत राहील आणि त्यामुळेच माणसात परत फिरणार नाही. अर्थात विषाणू योग्य संधीची वाट पाहातच असतात. योग्य संधी मिळाली की काही महिन्यांनंतर म्हणा किंवा वर्षांनंतर तो येनकेनप्रकारेण माणसात प्रवेश करेल आणि नव्याने साथ पसरवेल, असंही डॉ. दझाक म्हणतात.

मित्रहो, करोना विषाणू साथ गेली तरी करोना कुटुंबातील इतर सदस्य कधीही, केव्हाही आणि कुठेही हल्ला करायला संधी शोधताहेत हे विसरून चालणार नाही, म्हणून आता ज्या स्वच्छतेच्या सवयी तुम्ही आत्मसात केलेल्या आहेत त्या कायमस्वरूपी सांभाळून ठेवल्यात आणि रस्त्यावर गुटखा, तंबाखू खाऊन किंवा विनाकारण थुंकण्याची सवय बंद केली तर निश्चितच करोनासारख्या विषाणूला दूर ठेवण्यात आपण यशस्वी होऊ यात तिळमात्र शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2020 12:37 am

Web Title: coronavirus pandemic virus in search of new species to grow vidynana dd70
टॅग Coronavirus
Next Stories
1 राशिभविष्य : दि. ८ ते १४ मे २०२०
2 तेव्हाचे साथरोग विधेयक
3 निर्जंतुकीकरणासाठी आयआयटीचं नवं उपकरण!
Just Now!
X