अनुराधा मस्करेन्हस – response.lokprabha@expressindia.com

कोविड १९ च्या महासाथीचा प्रादुर्भाव संपवण्यासाठी सगळ्या जगाच्या आशा ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संभाव्य लसीवर आणि या लसीची चाचणी स्वत:वर करू देणाऱ्यांवर केंद्रित झाल्या आहेत. भारतात या कोविशिल्ड लसीच्या मानवी चाचण्यांचे स्वयंसेवक होण्यासाठी पुढे आलेल्या सहा जणांशी ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ने केलेली बातचीत –

तो दिवस होता २७ ऑगस्ट २०२०. तब्बल पाच महिने आणि चार दिवसांनंतर पुण्यातल्या एका फार्मास्युटिकल कंपनीचे ते ६४ वर्षीय वरिष्ठ अधिकारी त्यांच्या बंगल्याबाहेर पाऊल टाकत होते. इतक्या महिन्यांनंतर बाहेर जाताना घालतात ते कपडे त्यांनी घातले. हात स्वच्छ धुऊन मग हातमोजे घातले. एन ९५ मुखपट्टी चढवली. गॉगल घातला. त्यांची ५९ वर्षांची पत्नी, ४० वर्षांची मुलगी या दोघी आवरून तयार झाल्या. ते तिघेही जण त्यांच्या मोटारगाडीतून बंगल्याच्या गेटबाहेर पडले आणि पुण्यामधल्या भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटलच्या दिशेने निघाले. त्यांचा हा सगळा खटाटोप होता तो करोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी संशोधन सुरू असलेल्या लसीच्या मानवी चाचणीत सहभागी होण्यासाठी.

‘अरे देवा, काय सांगू तुम्हाला? गेले कित्येक दिवस मी वाईट बातम्याच ऐकतो आहे.’ ते वरिष्ठ अधिकारी सांगतात, ‘माझ्या माहितीतले दोन आरोग्य कर्मचारी कोविडचा संसर्ग होऊन गेले. आत्ता इथे येताना आम्ही आमच्या गाडीमधला एसी बंद केला. सीट सॅनिटाइज केल्या. स्टीअिरग व्हील र्निजतुक केलं आणि एकमेकांचा स्पर्श होणार नाही असे लांब लांब बसलो.’

करोनाच्या महासाथीमुळे ते गेले काही महिने घरातच बसून असले तरी ऑक्सफर्ड- अ‍ॅस्ट्राझेनेका – कोविशिल्ड लसीच्या (कोविशिल्ड हे या लसीचे भारतातील नाव) दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी स्वयंसेवक हवे आहेत हे कळल्यावर त्यांना एक क्षणही घरी बसवलं नाही. आपण स्वयंसेवक व्हायचं याबाबत त्यांच्या मनात तिळमात्र संदेह नव्हता.

औषधनिर्मिती क्षेत्रातच काम करत असल्यामुळे त्यांनी अशा चाचण्या जवळून बघितल्या होत्या. त्यांच्या टीमने अशा अनेक संशोधन प्रकल्पांसाठी काम केलेलं होतं.

‘मी ऑक्सफर्डच्या लसीसंदर्भात लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेलं संशोधन वाचलं आहे आणि त्यासंदर्भात धोरणकर्ते तसंच डॉक्टरांशी बोललो आहे. हे सगळेचजण ऑक्सफर्डच्या लसीसंदर्भात आशावादी आहेत. त्याशिवाय परदेशात घेतल्या जाणाऱ्या अशा चाचण्या, त्यासंदर्भात पाळली जाणारी सुरक्षितता याबद्दल मी भरपूर वाचलेलं असल्यामुळे या लसीचा करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपयोग होईल असं मला वाटतं. त्यामुळे मी असा विचार केला की आपण ती टोचून का घेऊ नये?’ ते सांगतात.

पत्नीला आणि मुलीलाही यासाठी तयार करणं त्यांना फारसं अवघड गेलं नाही. ‘आता असं आहे की या सगळ्या प्रक्रियेत कुणीतरी पुढाकार घेणं, स्वत:हून लस टोचून घेणं गरजेचं आहे. आणि यामुळे मला घराबाहेर पडायला मिळणार असेल तर चला, टोचून घेऊ लस असा मी विचार केला.’ टाळेबंदीमुळे त्यांच्याकडेच राहणारी त्यांची चाळिशीची मुलगी सांगते.

त्यांच्या आरटी- पीसीआर आणि रक्तचाचण्यांचे अहवाल एक दिवस आधीच आले. त्या तिघांच्याही शरीरात करोनाची प्रतिपिंडं तयार झालेली नाहीत, म्हणजे त्यांना आधीच करोनाचा संसर्ग होऊन गेलेला नाही आणि त्यामुळे ते लसीसाठी स्वयंसेवक म्हणून योग्य आहेत हे निश्चित झालं. त्यांच्याकडे काम करणाऱ्या त्यांच्या गाडीच्या चालकाचीही करोना लसीच्या मानवी चाचणीत स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्याची इच्छा होती. पण त्याच्या शरीरात करोनाची प्रतिपिंडं आढळल्यामुळे त्याला सहभागी होता आलं नाही. २७ ऑगस्ट रोजी या कुटुंबाने सकाळी साडेदहा वाजता घर सोडलं. लस टोचल्यानंतर त्यांना अर्धा तास निरीक्षणात ठेवण्यात आलं आणि अध्र्या तासानंतरही सगळं नॉर्मल आहे हे पाहिल्यावर त्यांना तिघांनाही घरी जाण्यास सांगण्यात आलं. एक वाजेपर्यंत ते घरी परतलेही. ‘लस टोचणारे लोक एकदम कुशल व्यावसायिक होते. त्यामुळे हे लसीकरण एकदम आरामात झालं,’ असं ते सांगतात.

पुण्याहून २० किलोमीटरवर असलेल्या वडू येथील संशोधन संस्थेत आणि केईएम रुग्णालयातही ऑक्सफर्डच्या या करोना प्रतिबंधक लसीच्या क्लिनिकल ट्रायल्स घेतल्या जात आहेत. येथील प्रमुख डॉ. आशीष बावडेकर सांगतात की केईएममध्ये सुरुवातीला ३० स्वयंसेवकांना लस टोचली जाणार आहे.

कोविड १९ ची महासाथ आटोक्यात आणण्यासाठी सगळं जग ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीच्या मानवी चाचणीकडे डोळे लावून बसलं आहे. या चाचणीत सहभागी होण्याची काहीजणांनी तयारी दर्शवली आहे.  दि इंडियन एक्स्प्रेसने त्यांच्यापैकी सहा जणांची भेट घेतली. भारतातल्या कोविशील्डचं भवितव्य ज्यांच्यावर अवलंबून आहे अशांपैकी हे सहाजण.. त्यांना या प्रकल्पात सहभागी व्हावं असं का वाटलं?

सुरुवातीला ज्यांचा उल्लेख केला आहे ते औषधनिर्मिती क्षेत्राचे प्रतिनिधी, त्यांचा निर्णय अर्थातच जाणीवपूर्वक, नीट विचार करून घेतलेला होता. त्यांनी भारती विद्यापीठाशी ईमेलवरून संपर्क साधून आपली या चाचणीत सहभागी होण्याची तयारी असल्याचं त्यांना कळवलं होतं. त्यांनी जवळपास आठ पानांचा मोठा फॉर्म भरून दिला. त्यात कोविड १९, लस, तिच्या साइड इफेक्ट्सची शक्यता, रक्ताच्या आवश्यक नमुना चाचण्या आणि इतर आवश्यक तपशील होते. रक्ताच्या नेमक्या कोणत्या चाचण्या करायच्या, त्यासाठी त्यांनी आधी पैसे खर्च करायचे आणि त्यांना ते नंतर मिळतील इत्यादी तपशील त्या फॉर्ममध्ये होते. त्यांना हेही कळवलं गेलं की त्यांना पहिला डोस दिल्यानंतर २९ व्या दिवशी दुसरा डोस दिला जाईल. असे दोन डोस देऊन पुढचे सहा महिने त्यांना निरीक्षणाखाली ठेवलं जाईल.

त्यांनी या काळात कशाकशावर लक्ष ठेवायचं आहे याची मार्गदर्शक तत्त्वं तपशीलवार देण्यात आली आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाचा आहे तो ताप. तो आला तर आणि त्याशिवाय इतरही काहीही समस्या असतील तर त्यांना देण्यात आलेल्या इमर्जन्सी नंबरवर ताबडतोब लस चाचणी चमूमधल्या डॉक्टरांशी संपर्क साधायचा आहे. या स्वयंसेवकांच्या दृष्टीने त्यांना सांगण्यात आलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते त्यांचं दैनंदिन रुटीन सुरू ठेवू शकतात.

‘आम्ही तेच केलं आहे’, या औषधनिर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या गृहस्थांची मुलगी सांगते. ‘लस टोचली तेव्हा मला जेमतेम सुई टोचल्याइतपतच जाणवलं. त्यानंतर मी घरी आले आणि नेहमीचं जेवण केलं.’

‘मला बाहेर जाणं आणि लोकांना भेटणं गरजेचं आहे. खूप दिवस झाले, घरी बसलो आहे.’ तिचे वडील सांगतात.

या स्वयंसेवकांमधली दुसरी ३२ वर्षीय व्यक्ती जैवसांख्यिकीतज्ज्ञ या नात्याने औषधनिर्मिती क्षेत्राशी संबंधित आहे. भारतातील कोविशील्ड लसीच्या मानवी चाचणीत सहभागी होणाऱ्या काही मोजक्या लोकांपैकी एक अशीही तिची ओळख यापुढच्या काळात असणार आहे. ही व्यक्ती विद्यार्थी असून पुण्यात एका खासगी संस्थेत संशोधन करते. तिने या लसनिर्मितीच्या प्रक्रियेबद्दल सातत्याने वाचन केले होते आणि तिची चाचणी पुण्यातच होणार आहे हे कळल्यावर त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. ‘करोनाचे हे दुस्वप्न संपवण्यासाठी या लसीच्या माध्यमातून लवकरच मार्ग निघेल अशी सगळ्यांनाच आशा आहे. त्यामुळे मी या मानवी चाचण्यांमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्याचा निर्णय घेतला.’ हा विद्यार्थी सांगतो. ‘या महासाथीने आपल्या जगण्यावर फार मोठा परिणाम केला आहे. अनेक लोकांचा रोजगार गेला आहे. मी तरुण आहे. त्यामुळे अशा चाचणीत सहभागी होणं हेच माझं समाजासाठी योगदान आहे.’

तो आधीपासूनच या सगळ्याबद्दल वाचत असल्यामुळे, सगळ्या घडामोडी, आकडेवारी, सुरू असलेलं संशोधन या सगळ्याशी संबंधित असल्यामुळे त्याला हा निर्णय घेणं अधिक सोपं गेलं. तो सांगतो, ‘मी इंग्लंडमधल्या दुसऱ्या टप्प्यामधल्या चाचणीचे अहवाल वाचले होते. संख्यातज्ज्ञ म्हणून काम करत असल्यामुळे मला त्याचा अर्थ नीट समजून घेता आला आणि या लसीचे साइड इफेक्ट्स खूप कमी आहेत हेही समजलं.’

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी स्पष्ट केलं आहे की या लसीच्या मानवी चाचणीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात त्या व्यक्तींवरचा परिणाम पाहता लस सुरक्षित असल्याचं निदर्शनाला येत आहे.

तो सांगतो की त्याने स्वत:हून भारती विद्यापीठाशी संपर्क साधला आणि आपण लसीच्या मानवी चाचणीत स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं. त्यांनी त्याला या अभ्यास प्रकल्पाची सगळी माहिती दिली आणि संमतीच्या फॉर्मवर सही करायला सांगितलं. त्याचा रक्तदाब आणि इतर आवश्यक गोष्टी तपासल्या गेल्या. त्याच्या शरीरात करोनाची प्रतिपिंडं नाहीत हे तपासलं गेलं आणि मग त्याला पहिला डोस दिला गेला.

२६ ऑगस्ट रोजी त्याचा दिवस नेहमीसारखा सुरू झाला. नाश्ता करून तो भारती हॉस्पिटलला गेला. लस टोचण्याची सगळी प्रक्रिया आटोपून परत आला तेव्हा त्याचे पालक त्याची उत्सुकतेने वाट बघत होते. आपला मुलगा भारतातल्या कोविशील्डच्या मानवी चाचणीत सहभागी झाला आहे याचा त्यांना वाटत असलेला अभिमान त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहात होता. दुसऱ्या दिवशी त्याने रोजच्यासारखी त्याच्या कामाला सुरुवात केली.

करोना लसीच्या या मानवी चाचणीत भारतातून जे स्वयंसेवक सहभागी झाले आहेत, त्यात ४८ वर्षांचे हे स्त्रीरोगतज्ज्ञ वेगळे ठरतात. कारण त्यांच्या आयुष्यात ते दुसऱ्यांदा अशा प्रकारच्या मानवी चाचणीत सहभागी झाले आहेत. याआधी २००९ मध्ये ते आणि त्यांची तेव्हा ११ वर्षांची असलेली मुलगी भारती हॉस्पिटलच्या एचवनएनवनसाठीच्या लसीच्या चाचणीत सहभागी झाले होते.

नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या आकडेवारीनुसार तेव्हा म्हणजे २००९ मध्ये एचवनएनवनमुळे भारतात ९८१ मृत्यू झाले होते. त्यानंतरच्या दहा वर्षांमध्ये देशात १.५८ लाख लोकांना स्वाईन फ्ल्यू झाला आणि त्यातल्या दहा हजार लोकांचा मृत्यू झाला.

त्यानंतर पाच वर्षांनी त्यांची मुलगी पुन्हा भारती हॉस्पिटलच्याच सव्‍‌र्हिकल कॅन्सरवरील लसीसाठीच्या मानवी चाचण्यांमध्ये सहभागी झाली. दोन्ही वेळचा आपला अनुभव अतिशय चांगला, आश्वासक होता. हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी त्या दोघांचाही सातत्याने फॉलोअप घेतला असं हे स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात.

या वेळी त्यांनी आणि त्यांच्या मुलीने दोघांनीही कोविशील्डच्या मानवी चाचण्यांमध्ये सहभागी व्हायचं ठरवलं. त्यांची पत्नीदेखील स्त्रीरोगतज्ज्ञ आहे. पण तिच्या शरीरात कोविडची प्रतिपिंडं आढळल्यामुळे तिला या चाचण्यांमध्ये सहभागी होता आलं नाही. डॉक्टरांनी २६ ऑगस्ट रोजी ते काम करत असलेल्या खासगी हॉस्पिटलमधलं त्यांचं काम संपवलं आणि जाऊन लस टोचून घेतली, तर त्यांच्या मुलीला दुसरा दिवस म्हणजे २७ ऑगस्ट हा दिवस दिलेला होता. तिने तिचे इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या दिवसाचे ऑनलाइन क्लासेस संपवले आणि मग जाऊन लस टोचून घेतली.

आता २१ वर्षांची असलेली त्यांची मुलगी सांगते, मी चौथी-पाचवीत होते तेव्हा माझ्या आईवडिलांनी एचवनएनवनच्या लसीच्या मानवी चाचणीत मी सहभागी व्हावं असं मला सुचवलं होतं. दुसऱ्या वेळी मी सव्‍‌र्हिकल कॅन्सरवरील उपचारांसाठीच्या लसीच्या मानवी चाचणीत सहभागी झाले होते. मला माझ्यावर कोणतेही लक्षणीय साइड इफेक्ट्स आढळले नाहीत. या मानवी चाचणीमध्येदेखील सहभागी व्हायचं हे आम्ही एकमताने ठरवलं होतं.

तिच्या वडिलांच्या मते अशा प्रकारच्या सहभागाचा निर्णय घेणं त्यांच्यासाठी फारसं अवघड नव्हतं. त्यांना शास्त्रीय पद्धतीने विचार करण्याची सवय आहे. त्यामुळे करोनाशी मुकाबला करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे काढे, वैद्यकीयदृष्टय़ा सिद्ध न झालेले वेगवेगळे उपाय याविषयी समाजात सुरू असलेल्या चर्चेचा त्यांना वैताग आला होता. ते सांगतात, ‘डॉक्टरांसह आरोग्य कर्मचारीदेखील करोनाबाधित झाले आहेत. या संसर्गामुळे झालेले मृत्यू मी पाहिले आहेत. त्यावर लस हाच उपाय आहे.’

मानवी चाचणीसाठी रांगा

पुण्यामध्ये भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या तळमजल्यावर, नॉन कोविड विभागात, कान-नाक-घसा विभागात तसंच बालरोगतज्ज्ञांच्या ओपीडीजवळ कोविडच्या मानवी चाचण्यांचं केंद्र आहे. त्याच्या दारावर इंग्रजी तसंच मराठी भाषेत लावलेली नोटीस एवढंच सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या चाचण्यांचं हे केंद्र ओळखण्याची खूण आहे.

८३२ बेडची क्षमता असलेल्या भारती हॉस्पिटलमध्ये (त्यापैकी ३५० बेड्स कोविड रुग्णांसाठी राखून ठेवले आहेत.) आजवर ५० पेक्षा जास्त लसींच्या मानवी चाचण्या झाल्या आहेत. त्यांच्या या चाचण्या घेणाऱ्यांच्या १५ जणांच्या चमूमध्ये डॉक्टर्स, नर्सेस आणि वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. हे १५ जण या चाचण्या करणं, फोन घेणं, मेल पाठवणं, स्वयंसेवकांचं समुपदेशन अशी सगळीच कामं करताना दिसतात.

अशा पद्धतीच्या मानवी चाचण्या घेणं आणि त्यासाठी भारती हॉस्पिटलकडे लक्ष वेधलं जाणं हे या संस्थेसाठी नवीन नसलं तरी या वेळी लोकांच्या अपेक्षा सगळ्यांनाच चक्रावून टाकणाऱ्या आहेत. हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय लालवानी सांगतात की समाजाच्या वेगवेगळ्या थरांतले, वेगवेगळ्या क्षेत्रांतले लोक मेल पाठवून आपल्याला या मानवी चाचणीत स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हायचं आहे असं कळवत आहेत. हॉस्पिटलचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते समीर पाटील सांगतात की सकाळी साडेनऊ वाजल्यापासून लस टोचून घेण्यासाठी लोक हॉस्पिटलबाहेर येऊन थांबले आहेत. त्यांच्यामध्ये एक ७५ वर्षांचे वृद्ध गृहस्थदेखील आहेत. हॉस्पिटलच्या बालरुग्ण विभागात दाखल झालेल्या रुग्णांच्या पालकांकडूनही चौकशी होते आहे.

२००९ मध्ये एचवनएनवनच्या लसीसाठी हॉस्पिटलमध्ये मानवी चाचण्या घेतल्या गेल्या होत्या तेव्हा मुख्यत: डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वयंसेवकांची तयारी करून घेतली होती, तसं आता नाही.

पुण्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी येथील माजी विषाणूतज्ज्ञ डॉ. मनदीप चढ्ढा यांनी भारतातील करोना विषाणूविरोधी लढय़ात पहिल्यापासून पुढाकार घेतला आहे. ते सांगतात की कोविड १९ च्या विषाणूची संसर्ग पसरवण्याची क्षमता आणि इतर विषाणूंपेक्षा असलेलं त्याचं वेगळेपण या दोन गोष्टींमुळे त्याच्यावरची लस शोधण्यासाठी अधिक आणि वेगवान प्रयत्न करावे लागत आहेत. २००९ मध्ये आलेल्या एचवनएनवन विषाणूच्या महासाथीमुळे पुरेशी भीती निर्माण झाली होती. पण तेव्हा टॅमीफ्ल्यू हे त्याच्यावरचं औषध बऱ्यापैकी वेळेत उपलब्ध झालं.

गेल्याच महिन्यात लॅन्सेटने म्हटले आहे की ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या करोनाविरोधी लसीचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. ही लस म्हणजे अ‍ॅडिनोव्हायरस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नेहमीच्या तापाच्या विषाणूचे कमकुवत रूप आहे. शास्त्रज्ञांनी कोविड १९ च्या पृष्ठभागावर दिसणारी या विषाणू संसर्गाला कारणीभूत ठरणारी प्रथिनांची टोकं काढून घेतली आणि ती चिंपांझींमधून घेतलेल्या अ‍ॅडिनोव्हायरसमध्ये रुजवली आणि माणसाच्या शरीरात वाढू न शकणारा एक नवीन व्हायरस तयार केला.

२ ऑगस्ट २०२० रोजी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या पुणेस्थित जगातील सर्वात मोठय़ा लसनिर्मिती संस्थेला करोनाविरोधी लसीच्या दुसऱ्या तसंच तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या घेण्याची परवानगी दिली. या अभ्यासाला अधिकृतपणे ऑब्झव्‍‌र्हर, ब्लाइंड, रॅन्डोमाइझ्ड कंट्रोल्ड स्टडी टू डिटरमाइन द सेफ्टी अ‍ॅण्ड इम्युनोजेनिसिटी ऑफ कोविशील्ड इन हेल्दी इंडियन अ‍ॅडल्ट्स असं म्हटलं आहे.

या चाचण्या सुरू असतानाच सीरम इन्स्टिटय़ूटने अ‍ॅस्ट्राझेनेकाबरोबर भागीदारी केल्याचं जाहीर केलं असून ते दोघंही एकत्रितरीत्या गरीब देशांसाठी अब्जावधींच्या संख्येने डोसनिर्मिती करणार आहेत. हे लक्ष्य गाठण्यासाठी त्यांनी आपली उत्पादनक्षमता आणि सुविधा वाढवायला सुरुवात केली आहे.

भारतातल्या मानवी चाचण्या किंवा क्लिनिकल चाचण्यांच्या नोंदणीसाठी १७ ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत. त्यातली १४ किंवा त्याहूनही कमी ठिकाणी कोविशील्ड चाचण्या घेतल्या जातील. सगळ्यात पहिल्यांदा पुण्यातील केईएम हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर या दोन ठिकाणी १०० स्वयंसेवक नोंदवले गेले. १८ र्वष आणि त्यावरील वयाच्या १६०० लोकांना या अभ्यासात सहभागी करून घेतलं गेलं आहे.

१०० सहभागींना कोविशील्डचा डोस दिल्याच्या सात दिवसांनंतर वैद्यकीय तसंच संख्यातज्ज्ञांचा समावेश असलेल्या डाटा सेफ्टी मॉनिटरिंग बोर्डासमोर माहिती सादर केली जाईल. या सात दिवसांच्या कालावधीत काही काळजी करण्याजोगं आढळलं नाही तर चाचण्या पुढे जातील.

या चाचण्यांचे सगळे टप्पे पार पडले, त्यातून मिळालेल्या आकडेवारीची मांडणी करून झाली, निकाल हातात आले की ते ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियापुढे मंजुरीसाठी ठेवले जातील. या चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्यांना या निकालांची कल्पना दिली जाईल. ज्या सहभागींना प्लेसबो दिलेलं होतं त्यांना कंपनीकडून लस दिली जाईल. नियंत्रक यंत्रणेकडून लस, तिचं उत्पादन आणि इतर आवश्यक तपशिलांची पाहणी केली जाईल.

कोविशिल्ड तपशील

ऑक्सफर्ड- अ‍ॅस्ट्राझेनेका लस म्हणजेच भारतातली कोविशिल्ड लसीच्या मानवी चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी १८ र्वष आणि त्यावरील वयाच्या १६०० जणांनी नावनोंदणी केली आहे.

त्यांची दोन गटांमध्ये विभागणी केली जाईल. एका गटाची प्रतिकारशक्ती आधीच तपासली जाणार नाही आणि त्याला लस दिली जाईल तर दुसऱ्या गटाची आधीच तपासणी करून त्याच्या शरीरात करोनाची प्रतिपिंडं आहेत का ते पाहिलं जाईल आणि ती नसतील तरच त्याला लस दिली जाईल.

१६०० सहभागींपैकी १२०० सहभागी ३:१ असे विभागले जातील. काहींना कोविशिल्ड दिलं जाईल तर काहींना प्लेसबो (रुग्णांना औषध म्हणून साधंच काहीतरी देणं) दिलं जाईल. काहीजणांना ठरावीक अंतराने दोन डोस दिले जातील, पण त्यांचे रक्तनमुने घेतले जाणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या शरीरात करोनाची प्रतिपिंडं आहेत का ते तपासलं जाणार नाही. त्यांचं सहा महिन्यांसाठी निरीक्षण केलं जाईल.

ज्यांच्या शरीरात प्रतिपिंडं आहेत का हे आधीच तपासलं गेलं आहे अशा उरलेल्या ४०० सहभागींना कोविशील्ड दिलं जाईल. तेदेखील ३:१ या प्रमाणात दिलं जाईल. (लस तीच पण आधी सीरम इन्स्टिटय़ूटने आणि नंतर अ‍ॅस्ट्राझेनेकाने निर्माण केलेली) दुसऱ्या डोसनंतर सहा महिने या सहभागींचे रक्तनमुने घेतले जातील आणि त्यांच्या शरीरात करोनाची प्रतिपिंडं निर्माण झाली आहेत का याचा अभ्यास केला जाईल.

काळाशी स्पर्धा

देशात करोनावर उपचारासाठी लसनिर्मितीचे तीन प्रयत्न सुरू असून त्यातले दोन भारतीय स्थानिक कंपन्यांचे आहेत.

आयसीएमआरच्या बरोबर भारत बायोटेकच्या कोव्ॉक्सिन या स्थानिक लसीच्या चाचणीचा पहिला टप्पा पार पडला आहे. झायडस कॅडिला लिमिटेडच्या ८उश्-ऊ  या स्थानिक लसीच्या चाचणीचाही पहिला टप्पा पार पडला आहे.

झायडसची दुसरी चाचणी सुरू झाली आहे. भारत बायोटेकची दुसरी चाचणी या महिन्यात सुरू होत आहे.

ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राझेनेका लसीचं काम या वरील लसींच्या तुलनेत अधिक प्रगत टप्प्यावर आहे. भारतात २५ ऑगस्टपासून त्यांच्या दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्यांतील चाचण्यांना सुरुवात झाली आहे.

लस सगळ्यांनाच वेळेत मिळावी यासाठी १७२ देश कोव्ॉक्स ही यंत्रणा उभी करण्यासाठी विचारविनिमय करत आहेत. मोडेर्ना या अमेरिकी कंपनीसह ९ आस्थापनांबाबत विचार सुरू आहे.

अनेक शंकाकुशंका व्यक्त केल्या जात असल्या तरी रशियाने स्पुटनिक व्ही ही आपली लस वापरासाठी सिद्ध असल्याचे जाहीर केले आहे. तर चीने तेथील सिनोव्हॅक बायोटेकने जुलैमध्ये तातडीच्या वापरासाठी करोना व्हॅक्सिन विकसित केल्याचं चीनने स्पष्ट केलं आहे.

– संडे एक्स्प्रेसमधून

अनुवाद- वैशाली चिटणीस