response.lokprabha@expressindia.com

कोविड-१९ने ने माणसांना घरात डांबलं आणि मोकळ्या झालेल्या रस्त्यांवर वन्यजीव मुक्तसंचार करू लागले. पण म्हणून, माणसाला धडा शिकवण्यासाठी निसर्गाने हे सारं घडवून आणलंय, असं मानणं हे निसर्गाला कमी लेखण्यासारखं आहे. निसर्गाच्या लेखी पृथ्वीवरच्या अनेक घटकांपैकी आपण- मानवसुद्धा एक सामान्य घटक आहोत. इथल्या विविध घटकांचा परस्परांशी संघर्ष होत राहिला आहे. करोनाचं संकट हा अशाच संघर्षांचा भाग! या संघर्षांत स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी माणसाने घराबाहेर पडणं बंद केलं आणि त्यामुळे रित्या झालेल्या जागेवर वन्य प्राण्यांनी पूर्वहक्क सांगायला सुरुवात केली. ही स्थिती किती काळ कायम राहील हे आज कोणालाही खात्रीने सांगता येणार नाही. अर्थात त्यामुळे भविष्यात मानव आणि वन्यजीव या दोन्ही घटकांपुढे काही प्रश्न, आव्हानं उभी राहू शकतात. विज्ञान, पर्यावरण आणि वन्यजीव अशा विविध क्षेत्रांतल्या व्यक्तींशी संवाद साधला असता, याबाबत सावधतेचा इशारा ऐकू येतो.

याविषयी प्रसिद्ध विज्ञान अभ्यासक-लेखक डॉ. उज्ज्वला दळवी सांगतात, ‘निसर्ग माणसाला धडा शिकवण्यासाठी सारं काही करतो आहे, असं आपल्याला वाटतं. पण प्रत्यक्षात तसं होत नसतं. जसं लहान मुलाने खेळणं कुठे तरी टाकलं तर आई थोडय़ा वेळाने ते उचलून पुन्हा जागेवर ठेवून देते. निसर्गाचंही तसंच आहे. मानवाने त्याच्या कामात लुडबुड केली, तरी तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि तरीही त्याचं अस्तित्व कायम अबाधित राहातं. माणसाने शेती करायला सुरुवात केली तेव्हाच निसर्गाच्या चक्रात त्याचा हस्तक्षेप सुरू झाला. तोपर्यंत तो अन्य सर्व घटकांप्रमाणेच निसर्गाचा एक घटक होता. माणूस म्हणजे होमेसेपियन्स जेव्हा आफ्रिकेतून जगाच्या अन्य भागांत गेले, युरोपात गेले तेव्हा निअँडरथलचं तिथे आधीपासूनच वास्तव्य होतं. होमोसेपियन्सबरोबर आफ्रिकेतल्या प्राण्यांतून आलेले अनेक संसर्गही युरोपात गेले. या संसर्गाना तोंड देण्याची क्षमता निअँडरथलमध्ये नव्हती. निअँडरथल नष्ट होण्यात हे संसर्ग सर्वात महत्त्वाचं कारण ठरलं. शेतीमुळे प्राण्यांतून येणारे प्लेगसारखे विविध आजार माणसांमध्ये आढळू लागले. हे त्या आजारांनी मानवावर केलेलं आक्रमण होतं. हळूहळू या आजारांविरोधातली प्रतिकारशक्ती माणसात विकसित झाली आणि त्याने त्या आजारांवर नियंत्रण मिळवलं. पण त्यानंतर युरोपातले प्रवासी, दर्यावर्दी जेव्हा पुन्हा आफ्रिकेत गेले किंवा दक्षिण अमेरिकेत गेले, तेव्हा हे शेतीतून उद्भवलेले रोग तिथे घेऊन गेले. अशा संसर्गाने संस्कृतीच्या संस्कृती नष्ट झाल्याचाही इतिहास आहे. एन्फ्लूएन्झाही असाच पक्ष्यांतून उद्भवलेला संसर्ग. पाणपक्ष्यांत त्याचं अस्तित्व होतं. सुरुवातीला माणूस प्राणी-पक्ष्यांकडे एकतर शत्रू म्हणून पाहायचा किंवा भक्ष्य म्हणून पाहायचा. पण पुढे तो प्राणी-पक्षी पाळू लागला. त्यांच्याशी असलेली त्याची जवळीक वाढली. साहजिकच त्यातून उद्भवणारे आजार त्याला होऊ लागले.

आजवर निसर्गात अनेकदा उलथापालथ झाली. त्यात अनेक प्रजाती नष्ट झाल्या. आज आपण प्रदूषणाची, तापमानवाढीची चर्चा करतो, पण प्रदूषण किंवा तापमानवाढीची ही पहिलीच वेळ नाही. अणुयुद्ध झालं तर मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होण्याची ही सहावी वेळ ठरेल. सायबेरियन ट्रॅपमध्ये मोठा भूकंप झाला तेव्हा सायबेरियाचं वाळवंट निर्माण झालं. त्या वेळी प्रचंड प्रमाणात तापमानवाढ झाली होती. टोबाचा ज्वालामुखी उफाळला, तेव्हा पश्चिम किनारा वगळता संपूर्ण भारतवर्षांत राखेचा सुमारे दोन मीटर उंचीचा थर पसरला होता. एवढे सगळे आघात पचवून मानवजात तगून राहिली. पण आपण हेदेखील लक्षात ठेवलं पाहिजे की, अनेक प्राणी, पक्षी, जलचर, कीटकांच्या प्रजाती नष्टही झाल्या आहेत. माणूस जर निसर्गाच्या कारभारात फार ढवळाढवळ करू लागला, तर निसर्गासाठी आपण काही खास प्रजात नाही.’

याविषयी वन्यजीव अभ्यासक आणि महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचे पूर्व संचालक डॉ. अविनाश कुबल सांगतात, ‘आपण नेहमी मानवी संवेदनांचा विचार करतो. माणसाला जाणवणारं प्रदूषण, आवाज याचा विचार केला जातो, पण प्राण्यांच्या संवेदना वेगळ्या आहेत. औद्योगिकीकरण सुरू झालं तेव्हापासून वायुप्रदूषण तर सुरू झालंच, पण ध्वनिप्रदूषण वाढलं. प्राणी, पक्षी, कीटक यांची श्रवणक्षमता माणसापेक्षा किती तरी अधिक आहे. काही खूप सूक्ष्म आवाजात संवाद साधतात, तर काही कीटक खूप कर्कश ध्वनी निर्माण करतात. ते आपल्याला ऐकू येत नाहीत. औद्योगिकीकरणामुळे यंत्राचे ध्वनी-प्रतिध्वनी निर्माण झाले. त्यातून उद्भवलेल्या गोंगाटामुळे या विविध जीवांच्या संवादात अडथळे आले. आता टाळेबंदीमुळे हे ध्वनी कमी झाले आहेत. त्याची जाणीव या जीवांना होऊ लागली आणि त्यांच्यातला संवाद सोपा झाला. केवळ जंगलांत ऐकू येणारा दिवसकिडय़ांचा आवाज शहरातही ऐकू येणं हे त्याचंच द्योतक आहे. जलचरांचंही असंच आहे. पाण्यात ध्वनीच्या वहनाचं विज्ञान वेगळं असतं. तिथे ध्वनी अधिक स्पष्ट ऐकू येतात. समुद्रात जहाजांची सतत सुरू असलेली घरघर सध्या थांबली आहे. त्यामुळे जलचरांना सुरक्षित वाटू लागलं आहे. त्यांच्यातला संवाद सोपा झाला आहे. म्हणूनच एरवी शहरांजवळच्या किनारपट्टय़ांवर न आढळणारे मासे आता आढळू लागले आहेत. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर या वर्षी तब्बल १० लाख कासवांनी अंडी घातली, यावरून आपण या परिणामांचा अंदाज बांधू शकतो.

आपण जेव्हा वाहनांसाठी किंवा औद्योगिक कारणांसाठी ऊर्जा वापरतो तेव्हा कृत्रिम उष्मा निर्माण होते. आपण जन्मापासूनच या उष्म्याचा सामना करत आलो आहोत. त्यामुळे आपल्याला त्याची जाणीव होत नाही. पण निसर्गातल्या अन्य घटकांचं तसं नसतं. ते या उष्म्याशी अनुकूल  साधू शकत नाहीत. त्यापासून दूर जाणं एवढाच पर्याय त्यांच्यापुढे असतो. ज्यांना जंगलांतच सुरक्षित वाटतं, असे प्राणीदेखील सध्या हा कृत्रिम उष्मा कमी झाल्यामुळे शहरात येऊ लागले आहेत. ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, जलप्रदूषणावर कोविडकाळात नियंत्रण आलं आहे. पण प्रकाशाच्या प्रदूषणाबाबत मात्र आपण अद्याप काहीही केलेलं नाही. त्यावर नियंत्रण आणलं तर त्याचे आणखी वेगळे परिणाम दिसू शकतील.’

विज्ञान अभ्यासक-लेखक डॉ. हेली दळवी सांगतात, विविध प्राण्यांमधला संघर्ष पूर्वीपासून चालत आला आहे, तो कायम सुरूच राहणार आहे. ‘आपण म्हणतो की माणसाने अमुक गोष्टींवर मात केली, पण काहीही पूर्णपणे नष्ट होणार नाही. कारण परिसंस्थेत त्या घटकांना विशिष्ट स्थान आहे. डास-ढेकूण निर्माण करण्यामागेही निसर्गाचं काहीतरी गणित आहे. त्यांचा आणि माणसांचा संघर्ष होत गेला. जेव्हा त्या प्राण्यांनी माणसावर मात केली तेव्हा मलेरिया वगैरे प्रकारचे ताप निर्माण झाले आणि कीटकनाशक निर्माण करून माणसाने कीटकांवर मात केली. असा संघर्ष निसर्गात सदैव सुरू असतो. करोना हासुद्धा एक असाच संघर्ष मानायला हवा. करोना काही जिवंत प्राणी नाही. तो आपल्यावर आक्रमण करतोय, असं आपल्याला वाटतं, पण त्यामागे त्याचं किंवा निसर्गाचं काही उद्दिष्ट आहे, असं म्हणता येणार नाही.

निसर्ग हा भल्याबुऱ्याच्या पलीकडे आहे. प्लेग, टायफॉइड, देवी हे जंतू आता जवळपास नष्ट झाले आहेत, असं म्हणायला हरकत नाही. आपल्या दृष्टीने ही फार चांगली गोष्ट झाली आहे. पण निसर्गाच्या दृष्टीने हीदेखील त्याचीच पिल्लं होती. त्यांना आपण मारून टाकलं. हे चांगलं की वाईट कसं ठरवणार? चीनमध्ये माओच्या काळात सगळे साप मारण्यात आले. त्यामुळे उंदरांचा सुळसुळाट झाला. असं काही वेळा होतं. आपण चांगल्यासाठी केलेलं असतं, पण उलटा परिणाम होतो. याचा निसर्ग आपल्याला धडा शिकवतो असं नाही. जो सक्षम असतो तोच टिकतो, असा नियमही यात नाही. हा निसर्गचक्राचा एक सामान्य भाग आहे.

औद्योगिकीकरणानंतर माणसाने परिसंस्थेवर मात करायला सुरुवात केली. धरणं, खाणकाम, उद्योग यामुळे माणसाचा वावर (पान २९ वर) वाढला. आता दोन महिन्यांमध्ये निसर्ग पुन्हा माणसावर वरचढ होऊ लागला. माणसं घरात असल्यामुळे निसर्गाला वाट मिळाली आहे.’

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम सुनील लिमये यांच्या मते आता माणसं घरांत बंद झाल्यामुळे निसर्ग स्वतचं स्थान पुनस्र्थापित करू लागला आहे. जे प्राणी एरवी फक्त जंगलांत दिसायचे ते आता शहरांत फिरू लागले आहेत. मुंबईतल्या रस्त्यांवर मोर दिसत आहेत. केवळ घनदाट अरण्यात दिसणारं सांबर आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या भागात दिसू लागलं आहे. सांबर पिलांना दूध पाजत असल्याची छायाचित्रं लोकांनी टिपली आहेत. मेळघाटात शिकारी कुत्रे दिसू लागले आहेत. काही वर्षांपूर्वी तस्करीमुळे चर्चेत आलेलं खवले मांजरही आढळू लागलं आहे. मानवाप्रमाणेच हीदेखील निसर्गाचीच मुलं आहेत. ती सगळीच आता मुक्तपणे बागडताना दिसत आहेत.

याविषयी विज्ञान अभ्यासक- लेखक चारुता गोखले सांगतात, ‘पर्यावरणातले सर्व घटक परस्परावलंबी आहेत. ते स्वतंत्रपणे काम करत नाहीत, त्यामुळे टाळेबंदीचा त्यांच्यावर होणारा परिणाम अभ्यासताना स्वतंत्रपणे एकेका घटकाचा अभ्यास न करता, संपूर्ण परिसंस्थेचा एकत्रित अभ्यास करायला हवा. ही स्थिती किती काळ टिकेल, इतिहासात यापूर्वी असं घडलं आहे, का, याचा शोध घ्यायला हवा. आपल्यासाठी ही अभूतपूर्व घटना आहे. पण याचे काय परिणाम होतील, याचे अंदाज आपण हाती असलेल्या पुराव्यांच्या आधारे बांधू शकतो. मानवी हस्तक्षेपाच्या अनुपस्थितीत फुलं, कीटक, प्राणी, पक्षी यांचं एक गुंतागुंतीचं जाळं पाहण्याची संधी यानिमित्ताने आपल्याला मिळू शकेल. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत काहीही ठरवून घडवलेलं नसतं. करोनाचं संकट ही अशीच आपोआप घडलेली घटना आहे. कोणत्या तरी प्राण्यात या विषाणूने शिरकाव केला. त्यात परिवर्तन होत तो माणसांत आला. पण याचा अर्थ निसर्गाने माणसाला धडा शिकवायचं ठरवलंय, असा नाही.’

आता प्रश्न असा आहे, की टाळेबंदीचा कालावधी संपल्यानंतर मानवी व्यवहार पूर्वपदावर येतील, तेव्हा काय? शहरात आलेल्या वन्य प्राण्यांवर मानवी वावराचा आणि मानवावर या जवळ आलेल्या प्राण्यांचा काय परिणाम होईल? याविषयी तज्ज्ञांनी सावधतेचा इशारा दिला आहे. लिमये यांच्या मते, टाळेबंदीनंतर व्यवहार पूर्वपदावर आणताना, त्यांना इजा होणार नाही, याची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं ठरेल. अन्यथा निसर्ग मानवी जीवाशी खेळून आपलं वर्चस्व प्रस्थापित करेल. जे प्राणी जंगलातून बाहेर आले आहेत त्यापैकी काही प्राण्यांशी माणसाची पूर्वीपासून जवळीक आहे. हरिण, हत्ती यांच्या संपर्कात माणूस येत असतो, त्यातून दरवेळी रोग पसरतातच असं नाही. उज्ज्वला दळवींनी मानवासमोर उभी राहणारी आव्हानं अधोरेखित केली. त्यांच्या मते, टाळेबंदी संपेपर्यंत अनेक प्रकारचे वन्य प्राणी माणसाच्या जवळ आलेले असतील. माणूसही नैसर्गिक कुतूहलापोटी त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करेल. मधल्या काळात या विषाणूने अनेक प्राण्यांमध्ये शिरकाव केलेला असेल. तो सीमोल्लंघन करून इतर प्रजातींत उडय़ा मारण्याच्या तयारीतच असेल. त्याव्यतिरिक्त जंगलांच्या सीमांत राहणारे अन्यही कितीतरी आजार माणसांपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण होईल. एड्स, सार्स, मर्सने अशाच प्रकारे प्राण्यांतून माणसांत उडय़ा मारल्या होत्या, हे विसरून चालणार नाही. प्राणी आणि माणसं एकाच वेळी रस्त्यांवर असतील, तेव्हा त्याचे काय परिणाम होतील, याचा अभ्यास व्हायला हवा. आता कॅनडामध्ये रॅकून्ससारखे प्राणी शहरांत राहायला चटावले आहेत. ते घरांत घुसून राहतात. भारतात असं झालं, तर कोणते प्राणी शहरांत राहतील, त्याचे काय परिणाम होतील, याचा अंदाज घ्यायला हवा.  लोक हल्ली मगरी सुसरीसुद्धा पाळू लागले आहेत. पेट्सची फॅशन आली आहे. वन्यजीव अभ्यासक, पशुवैद्यक, छायाचित्रकार, वनवासी हेसुद्धा अशा वन्य प्राण्यांच्या सहवासात येत असतात, पण ते त्यांच्या जीवनपद्धतीचा मान राखून वावरतात. पण शहरी मंडळी तसं करत नाहीत. त्यामुळे प्राणीजन्य आजार पसरण्याची शक्यता बळावते. डॉ. अविनाश कुबल म्हणतात, ‘प्राण्यांना शहरांत सुरक्षित वाटत आहे, हे चांगलंच आहे, पण ते १०० टक्के सकारात्मक लक्षण आहे, असं म्हणणं धाडसाचं ठरेल. माणसाला धोकादायक ठरू शकतील, असे जीव या काळात वाढले, तर त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात.

टाळेबंदीचे सकारात्मक परिणाम समोर येऊ लागले आहेत. मुंबईसह देशभरात विविध ठिकाणी नद्या आणि समुद्राच्या पाण्याचे नमुने घेऊन त्याची चाचणी केली जाऊ लागली आहे. त्यातून समुद्रातलं प्रदूषण कमी झाल्याचे संकेत मिळू लागले आहेत. कायम प्रदूषणामुळे घुसमटणाऱ्या अनेक शहरांतल्या हवेची प्रत सुधारल्याचं निदर्शनास आलं आहे. वाहनं आणि उद्योग बंद झाल्यामुळे ध्वनिप्रदूषणही घटलं आहे. ज्याची आपण केवळ चर्चाच करत असतो, ते प्रदूषणावर मात करण्याचं उद्दिष्ट साध्य होताना दिसत आहे. मात्र, टाळेबंदी संपताच पहिले पाढे पंचावन्न अशी स्थिती उद्भवेल, याविषयी शंकाच नाही. शहरांतच राहणाऱ्या आणि जंगलांतून शहरांत आलेल्या निसर्गाच्या विविध घटकांच्या संघर्षांचा नवा आध्याय लिहिला जाऊ नये, यासाठी सावध भूमिका घ्यावी लागेल.

शब्दांकन : विजया जांगळे