30 May 2020

News Flash

कोविडकथा : गुप्त दान, हुंडीतले!

रवी, कुठल्या तरी वेगळ्याच आजाराने पीडित वृद्ध लोक दोन दिवसांपासून हॉस्पिटलच्या ओपीडीला येतायत. ...

ओपीडी सेक्शन बघून मी हबकलोच. रविवार असूनसुद्धा ओपीडी खोकणाऱ्या आणि तापाने फणफणणाऱ्या स्त्री-पुरुषांनी भरलेली.

डॉ. केदार आठवले – response.lokprabha@expressindia.com

‘‘सुरेखा, ए सुरेखा, खूप दिवसांत रिक्लायनर सीटवर रेलून सिनेमा नाही चेपलाय. जाऊ या का या रविवारी संध्याकाळच्या शोला? बुक करतो तिकीट्स. तू फ्री आहेस ना?’’

‘‘हो रे कर, जाऊ या! मीनल नाही येणार पण, तिचे वेगळे प्लान्स असतात. उगीच तिचे तिकीट काढू नकोस. एक तर तिला बळेबळे न्यायचे महागडे तिकीट काढून आणि चेहऱ्यावर एरंडेल प्यायल्याचे भाव सोसायचे आपणच.’’ सुरेखातला मुनीम बोलला!

रवीने मागच्या सहाएक महिन्यांत एकसुद्धा सुटी घेतलेली नव्हती. मागचे चार-सहा रविवारही तो इमर्जन्सी डय़ुटीवर होता. त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मुलांच्या परीक्षा होत्या म्हणून डय़ुटीज याच्या गळ्यात पडलेल्या. तसाही रवी दुसऱ्याच्या सुखात स्वत:चे सुख बघणारा. ‘‘प्लीज रवी, कर ना रे अ‍ॅड्जस्ट’’ म्हणायचा अवकाश, की रवी हळवा होई आणि डय़ुटी त्याच्या गळ्यात येई.

रवी शहरातल्या उत्कृष्ट सेवा देणाऱ्या इस्पितळात सीनियर भूलतज्ज्ञ म्हणून कामाला होता. कामाची वेळ १० ते ६, पण एकदा का चेंबरमध्ये स्वारी पोचली, की पीटर हेन्लेईन घडय़ाळाचा शोध करायचे विसरले की काय असा तो कामात गुंतून जाई. रवीला पेशंट्सशी अवांतर गप्पा मारायला जाम आवडे. खरं तर त्याचे काम शस्त्रक्रियागृहात भूल देण्याचे, पण हा अधिक वेळ आदल्या दिवशी त्यांच्याशी गप्पा मारण्यात घालवी. पेशंट रिलॅक्स झाला, की त्याला कमी औषधात बेहतर भूल देता येते अशी त्याची पक्की खात्री. काहीशा अशाच विषयावर त्याचा एक शोधप्रबंध एका उच्च दर्जाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेला आणि नावाजलेलासुद्धा. ‘काँग्रॅच्युलेशन्स रवी! यू कंपलीटेड टेन किमी इन फिफ्टी एट मिनिट्स. धिस इज युअर न्यू बेस्ट!’ रवीच्या आयफोनवर मॅसेज पॉप अप झाला. त्याच्या घामेजलेल्या चेहऱ्यावर लहानसे स्मित आले. रविवारची छान सुरुवात झालेली!

रवीने घराची बेल वाजवली आणि त्याला हवा तसा ब्लॅक कॉफीचा मग घेऊन सुरेखाने दार उघडले. घराच्या गॅलरीत रवी पाय लांब करून बसला. पक्ष्यांचा किलबिलाट, हलक्या आवाजात भीमसेन बुवांचा भरव राग, गार वाऱ्यावर वाळत चाललेला घाम, दीडशेवरून साठीत येणारी हृदयाची गती आणि जिभेवर कॉफीची चव! ही रवीची स्वर्गाची व्याख्या!

मीनल तेवढय़ात येऊन त्याला बिलगली. ‘‘बाबी, लंचला मॅक-डीला जायचे का?’’ मॅक-डी आणि रवीचे हाडाचे वैर! तो नाही म्हणणार हे तिला नक्की माहीत असे. मग तिचा पुढचा डायलॉग – ‘‘बघ ह.. मी यायला तयार आहे तुझ्याबरोबर, तूच नाही म्हणतोयस. मी जाते आता माझ्या फ्रेंड्स गँगबरोबर.’’ तो चिडचिड करण्याचा आव आणत असे; पण आतून त्याला हे सगळे आवडे.

‘‘सुरेखा, आज मस्त अंडाकरीचा बेत करू या. मी करतो सगळे. तू आज जरा तुझ्या ‘मी-टाइम’चा आनंद घे.’’

चव कमीअधिक असली तरी ती बोटं चोखून करीचा आनंद घेत असे. अंडय़ाचा बलक आवडत नसला तरी मिटक्या मारून खाई.

‘‘रवी, तुझ्या हाताला अशी काही चव आहे ना, की मला ते कमी मीठ, अंडय़ाचा बलक जाणवतच नाही रे.’’ तिची ही एक ओळ त्याचा सगळा थकवा घालवायला पुरेशी असे.

स्वत: बनवलेला विडा चघळत त्याने एक झोप काढली. चारचा अलार्म लावला, सिनेमाला जायचे होते ना! पण डोळा लागतो ना लागतो तोच फोन खणाणला. डॉ. सरपोतदार कॉिलग.. हॉस्पिटल सुपरिंटेंडंट. ‘रविवार दुपारी का कडमडतोय हा’ म्हणत त्याने फोन कट केला.

परत फोनची कटकट सुरूच. शेवटी कंटाळून त्याने फोन रिसीव्ह केला. ‘‘रवी, लगेच हॉस्पिटलला ये’’ इतकेच बोलून सरांनी फोन कट केला. इतके तुटक सर कधीच बोलत नाहीत. नक्की काही तरी गंभीर असेल – रवीला उमगले. तो तडक हॉस्पिटलला पोचला.

सर घाईघाईत बोलत होते- ‘‘रवी, कुठल्या तरी वेगळ्याच आजाराने पीडित वृद्ध लोक दोन दिवसांपासून हॉस्पिटलच्या ओपीडीला येतायत. सगळ्या फिजिशियनना लागण झाल्याची शक्यता आहे. त्यांना आयसोलेशनमध्ये शिफ्ट केलंय. आपल्या दोघांनाच आता गड लढवायचा आहे. फास्ट सेलिना सिस्टर – डॉ. रवींना ‘पीपीई’ द्या आणि त्यांची रूम दाखवा.’’

ओपीडी सेक्शन बघून मी हबकलोच. रविवार असूनसुद्धा ओपीडी खोकणाऱ्या आणि तापाने फणफणणाऱ्या स्त्री-पुरुषांनी भरलेली. सिस्टर सेलिना मला चेंजिंग रूममध्ये घेऊन गेली. ‘पीपीई’चा याआधी मी कधीच वापर केला नव्हता. दरवाजामागे लावलेल्या तक्त्यानुसार मी चेंज करायला घेतले. घातलेले कपडे आधी काढून ठेवले. सर्जकिल गाऊन चढवला. रेड टेपचे भारीतले शूज काढून साधे कॅनव्हास पुश-इन घातले. त्यावर एक विशिष्ट प्रकारच्या प्लास्टिकचे पिशवीसम कव्हर चढवले. अंगावर त्याचाच अंगरखा घातला. हातात डबल ग्लोव्हस, डोक्यावर कापडी आणि त्यावर प्लास्टिकची टोपी. तोंडावर कापडी मास्क आणि त्यावर ट्रिपल लेअरचा विशिष्ट मास्क. डोळ्याला चष्मा आणि त्यावर एक पारदर्शक बंद गॉगल. या सगळ्यावर हेल्मेटला पुढे काच असते तसे कव्हर. बेसिनच्या वर लावलेल्या आरशात बघितले आणि पटकन हसू आले स्वत:चे ध्यान बघून. खोलीत िभतीवर टांगलेल्या फोटोतला नील आर्मस्ट्राँग वाटत होतो फुल्टूख. समोरच्याला माझ्या डोळ्यांशिवाय काही दिसत नसणार.

मी ओपीडी वन गाठली. १५ बाय १५ फुटांची खोली. मधोमध एक लाकडी टेबल. त्यावर ठेवलेला एक पांढऱ्या रंगाचा स्टील ट्रे. त्यात एक टॉर्च, टंग-डिप्रेसर, स्पिरिट, सॅनिटायजर, पीसीआर किट – इतकेच सामान. टेबलाच्या दोन्ही बाजूंना हात नसलेली एक-एक खुर्ची. कोपऱ्यात कॉम्प्रेसर चालू आहे याची सतत जाणीव करून देणारा एक आवाज करणारा जुना फ्रिज. िभतीवर राष्ट्रपुरुषांच्या तसबिरी आणि त्याला घातलेले प्लास्टिकच्या फुलांचे हार. उजव्या िभतीला एक छोटीशी खिडकी ज्याची काचेची कवाडे घट्ट बंद. छतावरचा पंखा एका विशिष्ट लयीत फिरत होता, फ्रिजच्या आवाजाला साथ देत होता जणू. खोलीचा दरवाजा िस्प्रगची बिजागरे असलेला, दोन्हीकडूंन धक्का दिला की उघडणारा.

मी खुर्चीत विसावतो ना विसावतो तोच सिस्टर सेलिना म्हणाल्या – सर, पाठवू का पेशंट? मी होकारार्थी मान डोलवली. पहिला रुग्ण – वय – ६१, कोरडा खोकला, ताप १०१, पल्स – ११०, रेस्पिरेटरी रेट – ४०, रक्तदाब, मधुमेह – आहे. घशातून स्वाब घेऊन सॅम्पल पाठवले. दुसरा रुग्ण – ताप, खोकला, पल्स, सॅम्पल. तिसरा, मग चवथा.. दहावा.. विसावा..

बाहेरच्या रुग्णांचा खोकल्याचा आवाज, सिस्टर सेलिनाचा आवाज- चला, नेक्स्ट पेशंट आणि माझ्या फोनची िरग – काहीच थांबेना. सुरेखा जाम वैतागली असणार. मला फोन घेता किंवा करता येत नव्हता. मला तरी कोठे माहीत होते असे काही तरी पुढे वाढून ठेवलंय ते. असो. रात्रीचे नऊ कधी वाजले कळलेच नाही. मास्कचे इलॅस्टिक कानामागे काचायला लागलेले. उजव्या पोटरीला आणि पाठीला खाज येत होती; पण काही इलाज नव्हता. ब्लॅडर इतके भरले होते की ते फुटेल की काय अशी सारखी भीती वाटत होती. मानेभोवती घामाने पोवळ उठल्यासारखे जाणवत होते. हे सगळे विचार मेंदू करत होता. रुग्ण मात्र मी स्पायनल लेव्हलवर बघत होतो. ताप, खोकला, टेस्ट हेच काय ते करायचे होते. सिस्टर सेलिनाला शेवटी माझी दया का कीव काही तरी आली. ‘‘सर, एक ब्रेक घेऊ या.’’ ती उद्गारली. मी लगेच उठलो. किती बरं वाटलं पाय सरळ करून! मी तडक चेंजिंग रूममध्ये गेलो. चिलखत बाजूला ठेवले आणि गोडमिट्ट चहा घशाखाली केला. चहाने मला इतका आनंद याआधी कधीच दिला नव्हता. चहा संपवून सुरेखा आणि मीनलला परिस्थितीची कल्पना दिली. मला काही दिवस इथेच राहावे लागणार होते, नव्या डॉक्टरांची फळी येईस्तोवर तरी. पलंगावर आडवा झालो ते सकाळी सहालाच जाग आली. सिस्टर सेलिनाने दोनदा दार ठोठावल्याचे ती म्हणाली, पण नंतर तिने नाद सोडला. चहा-बिस्किटे खाल्ली, पीपीई चढवला आणि परत १, २, ३, ताप, खोकला, टेस्ट .. चालू.

काल घशाला कोरड पडून वैताग आलेला. त्यावर मी आज एक युक्ती शोधली. मॅरेथॉनला वापरलेल्या सिप्पीन्ग बॅगेत मी पाणी, मीठ, साखर आणि िलबू असे मिश्रण भरून घेतले. ती बॅग पीपीईच्या आतून पाठीवर घेतली. त्याचे सिप्पीन्ग एन्ड तोंडात ठेवले. ते पाणी पिताना मी केलेल्या त्या बॅगच्या उपयोगाने स्वत:चा अभिमान वाटायचा आणि मीच माझी पाठ थोपटून घ्यायचो. कानामागे काचणाऱ्या इलॅस्टिकच्या पट्टीला गॉजचा एक थर दिला, त्याने खूप सुखावह झाले. इलॅस्टिकच्या खेचण्यामुळे माझे कान जरा बाहेर आल्यागत वाटत होते. थोडा का होईना गांधीजींसारखा दिसतोय म्हणून कॉलर ताठ झाली! मानेवर, पाठीवर आणि पायावर टाल्कम पावडर लावल्याने घामामुळे सारखी येणारी खाज बरीच कमी झाली होती.

बाहेर लॉकडाऊन झाल्याचे कळाले. काल केलेल्या टेस्ट्सपकी ९०% पॉझिटिव्ह आल्या होत्या. प्रत्येक दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत होती. आता तर कमी वयाचे रुग्णही यायला लागलेले. कोविड-१९ किती बळावलाय याची कल्पना मला येत होती. कबूलच करायचे तर मी जाम घाबरलो होतो. घशात जरा जरी टोचल्यासारखे झाले किंवा डोळ्यांची थोडी का आग झाली तरी मला धस्स व्हायचे. मी लगेच इन्फ्रारेड थर्मोचेक स्वत:च्या कपाळासमोर धरी. ३७ चा आकडा बघून जीव भांडय़ात पडे. शाळेत भूगोल माझा जानी दुश्मन. तेव्हासुद्धा प्रगती पुस्तकावर भूगोलाच्या रकान्यात ३७ चा आकडा बघून अगदी इतकाच आनंद होत असे.

दिवसाचे दहा तास काम करून रात्री कधी झोप लागायची कळायचेच नाही.

आज तिसरा दिवस. पहिलाच रुग्ण रशीद. त्याला बघून धक्काच बसला. रशीद पन्नाशीतला एक उत्साही बंदा. कुठल्याशा आयटी कंपनीत मदतनीस म्हणून कामाला होता. रोज सकाळी फ्रेश ज्यूस घेऊन रस्त्याच्या कडेला एक टेबल घेऊन उभा असे. ‘सर, आज गाजर डे, आज कारले जूस, आज बीटरूट, कधी मिक्स’ असे माझ्यासाठीचे दिवस त्यानेच ठरवलेले. मीही धावल्यानंतर निमूटपणे तो देईल ते ज्यूस पीत असे. सगळ्यांना तंदुरुस्त राहायला मदत करणारा रशीद आज खोकल्याने बेजार आणि तापाने थरथरत होता. त्याचे वय झाल्यासारखे स्पष्ट वाटत होते. आता माझ्या ओळखीचे लोकही इथे दिसू लागले, या विचारानेच मी घाबरलो, हादरलो. काहीही झाले तरी रुग्णाला हात लावायचा नाही, अशी सक्त ताकीद असूनसुद्धा माझा हात आपसूक रशीदच्या खांद्यावर विसावला आणि ‘घाबरू नकोस, बरा होशील लवकर’ असे शब्द तोंडी आले. नुसत्या या कृतीनेसुद्धा त्याला धीर आल्यासारखे स्पष्ट दिसत होते. माझ्या झाकलेल्या चेहऱ्यामुळे त्याने मला ओळखले नव्हते. एका अर्थी ते बरेच झाले.

आज नववा दिवस. आता मला रोजच्या दिनक्रमाची सवय झालेली. सकाळी ८ ला उठून ९ पर्यंत ओपीडी गाठायची. रात्री ९ ला आंघोळ करून गादीवर पाठ टेकवायची ती सकाळी ८ पर्यंत. माझ्या ओपीडीच्या खिडकीत एक मनीप्लांटची कुंडी ठेवलेली. त्यावर सकाळी कोवळ्या उन्हाची तिरीप पडे. त्याने ते रोप जणू आनंदी होई. त्याची पाने टवटवीत आणि डोलताना दिसत. जसजसे ऊन माथ्यावर येई तसे ते रोपटे अंग चोरल्यागत पाने खाली वाकवे. मग मी जाऊन कुंडी सावलीत घेत असे. थोडय़ा वेळात पाने परत टवटवीत दिसत. सकाळी आल्यावर तिरपीच्या कक्षेत कुंडी ठेवायची आणि नंतर सावलीत. हा आमच्या दोघांचा – मी आणि ते वेल रोजचा ठरलेला खेळ.

गेल्या दहा दिवसांत ना धावणे, ना ते पाय लांब करून बसून कॉफी पिणे, ना भीमसेन, ना तो पक्ष्यांचा किलबिलाट. सगळ्यात जास्त मिस करत होतो ते मुलीचे लाडिक बाबी म्हणत उगीच गळ्यात बिलगणे, छोटय़ा छोटय़ा गोष्टींसाठी हट्ट करणे, रात्री बळेबळेच मला कॉफी प्यायला लावणे, मॅक-डीचे नाव घेऊन मला उल्लू बनवत मित्रांबरोबर बाहेर जाणे – सगळे सगळे मिस करत होतो.

सरपोतदार सरांचा निरोप आला – ‘उद्या घरी जाऊ शकतोस. रुग्णसंख्या मंदावलीय आणि बाकीचे डॉक्टर्सही कामावर रुजू झालेत.’ माझा आनंद गगनात मावेना. मी लगेच घरी फोन करून सुरेखाला हुकूम सोडला. ‘उद्या घरी येतोय. मस्त फोडणीचे वरण आणि फडफडीत भात करून ठेव.’ हॉस्पिटलच्या डब्याचा वीट आला होता. सकाळी लवकर उठून सरपोतदार सरांचा आणि सिस्टर सेलिनाचा निरोप घेऊन बाहेर पडलो. सकाळच्या उन्हाची तिरीप माझ्या चेहऱ्यावर पडली आणि ते मनीप्लांट का डोलायचे आणि टवटवीत दिसायचे ते कळले. तसाच ५ मिनिटे उभा राहिलो आणि १४ दिवसांची कसर भरून काढली. याच उन्हापासून बचावासाठी मी डोळ्यांवर ग्लेअर्स आणि चेहऱ्यावर सनस्क्रीन लावून पळायला जायचो, तेच ऊन आज मला हवेहवेसे वाटत होते.

या दोन आठवडय़ांत मला माझ्या एकटय़ाबरोबर भरपूर निवांत वेळ मिळाला. शरीर पूर्ण वेळ काम करीत असे. मेंदू आणि मन मात्र खूप गप्पा मारत, अगदी कुठल्याही विषयावर. त्यांची चांगलीच गट्टी जमली होती. याचा एक मोठा फायदा झाला – मी स्वत:ला आणखीन नीट ओळखायला लागलो आणि स्वत:वर जास्त प्रेमही करायला लागलो.

मागच्या काही दिवसांत मी कमीत कमी हजारच्या वर रुग्ण तपासले असतील. त्यांच्यापकी कित्येक चेहरे माझ्या लक्षात आहेत. माझा चेहरा मात्र त्यांनी कोणीच पहिला नाही – म्हणजे दिसतच नव्हता पीपीईमुळे. तिरुपतीला मी पाहिल्यात हुंडय़ा ठेवलेल्या – गुप्त दान करायला. ज्याची सेवा केली त्याला पण कळायला नको की कोणी ती केलीय – तीच तर खरी सेवा – गुप्त दान, हुंडीतले!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2020 6:48 am

Web Title: coronavirus pandmic story of a doctor secret donation covidkatha dd70
टॅग Coronavirus
Next Stories
1 निमित्त : करोनानुभव
2 प्रासंगिक : करोना संकट पेलताना
3 राशिभविष्य : दि. १५ ते २१ मे २०२०
Just Now!
X