News Flash

दुसरी लाट?

फेब्रुवारीचा पहिला आठवडा काहीसा निवांत गेला, पण त्यानंतर ६-७ फेब्रुवारीपासून राज्यात विदर्भ, पुणे, मुंबईचे उतरणीला लागलेले दैनंदिन रुग्णांचे आकडे पुन्हा वाढू लागले

रोज होणाऱ्या करोना चाचण्या आणि त्यात आढळणारे रुग्ण वाढू लागले. ही वाढ सहा-सात टक्के एवढी होती तोपर्यंत ठीक, मात्र जशी ती दहा टक्केआणि त्यापुढे जाऊ लागली, तशा सर्व यंत्रणा पुन्हा हायअ‍ॅलर्टवर आल्या.

भक्ती बिसुरे – response.lokprabha@expressindia.com

भारतात ३० जानेवारी २०२० या दिवशी करोनाचा पहिला रुग्ण सापडला. ‘करोनाचा रुग्ण देशात असेल तरी महाराष्ट्रात नाही,’ म्हणून राज्यातील नागरिकांना असलेला दिलासा ९ मार्च २०२० या दिवशी संपला. कारण दुबईला पर्यटनासाठी जाऊन आलेल्या दाम्पत्याला आणि त्यांना मुंबईहून पुण्याला सोडणाऱ्या टॅक्सी चालकाला झालेला संसर्ग हा करोना विषाणू अर्थात सार्स कोव्ही टूचा संसर्ग असल्याचे निष्पन्न झाले. त्याबरोबर काळजी, भीती, चिंता अशा सर्व भावनांनी राज्यातील नागरिकांना घेरले. सरकार, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांना पुढे वाढून ठेवलेल्या आव्हानाची कल्पना आली. सरकार आणि प्रशासनाने समोर उभ्या संकटाशी दोन हात करण्यासाठी कंबर कसली आणि २३ मार्चपासून टाळेबंदी नावाच्या एका ‘न भूतो’ प्रकाराचा अनुभव संपूर्ण देशाने घेतला. त्यानंतर चढत्या क्रमाने वाढलेले करोनाचे रुग्ण, लांबत चाललेली टाळेबंदी, आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा तुटवडा, गमावलेले प्रियजन, भितीच्या सावटाखाली घराच्या दिशेने चालत सुटलेले असंख्य मजूर हे अनुभव घेतलेल्या प्रत्येक संवेदनशील माणसाने २०२० हे वर्ष लवकर संपावे अशी प्रार्थना केली. नोव्हेंबर-डिसेंबरच्या सुमारास करोना काहीसा आटोक्यात आला आणि अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला. संकट टळले म्हणून आपण निर्धास्त झालो आणि त्यामुळेच काहीसे निष्काळजीही झालो. ‘सुटलो,’ या विचाराने आपण सगळेच करोनापूर्वीचे आयुष्य जगू लागलो. देशात लसीकरण सुरू झाले तसे आपण मास्क, सॅनिटायजर, अंतरभान विसरलो. सहलींना गेलो. सोहळे साजरे करत गर्दी केली. याचीच वाट पाहात असल्याप्रमाणे निद्रिस्त करोनाने पुन्हा मान वर काढली. आता २०२१च्या दुसऱ्याच महिन्यात राज्यात पुन्हा करोनाचे सावट गडद होऊ लागले आहे.

फेब्रुवारीचा पहिला आठवडा काहीसा निवांत गेला, पण त्यानंतर ६-७ फेब्रुवारीपासून राज्यात विदर्भ, पुणे, मुंबईचे उतरणीला लागलेले दैनंदिन रुग्णांचे आकडे पुन्हा वाढू लागले. रोज होणाऱ्या करोना चाचण्या आणि त्यात आढळणारे रुग्ण वाढू लागले. ही वाढ सहा-सात टक्के एवढी होती तोपर्यंत ठीक, मात्र जशी ती दहा टक्केआणि त्यापुढे जाऊ लागली, तशा सर्व यंत्रणा पुन्हा हायअ‍ॅलर्टवर आल्या. आता खासगी रुग्णालयांमध्ये करोनाव्यतिरिक्त रुग्णांनी व्यापलेल्या खाटा पुन्हा करोना रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यास सुरुवात झाली आहे. करोना चाचण्या, रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा पाठपुरावा (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग), गृह विलगीकरणाच्या अंमलबजावणीवर लक्ष आणि संस्थात्मक विलगीकरणाच्या क्षमता वाढवणे अशी तयारी पुन्हा सुरू झाली आहे. याला अधिकृतपणे दुसरी लाट म्हणायचे का, अशी चर्चा जोर धरत आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली अशा सर्व ठिकाणी करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ापासूनच मुंबईत ही वाढ दिसू लागली. त्याच दरम्यान मुंबईची लाइफलाइन असेलली लोकल ट्रेन सुरू झाल्यामुळे साहजिकच रुग्णवाढीनंतर सर्वात आधी बोट दाखवले गेले ते लोकलकडे! उपनगरांमधून नोकरी-व्यवसायानिमित्त रोज शहरात येणाऱ्यांचे लोंढे पाहता उपनगरांमध्ये वाढणारी रुग्णसंख्या अनपेक्षितही नाही.

पुणे शहरात संसर्गाचा दर १३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत हा दर पाच टक्क्यांपर्यंत मर्यादित होता, म्हणजे आटोक्यात होता असे म्हणता येईल. ६ आणि ७ फेब्रुवारीपासून त्यात वाढ सुरू झाली. महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातल्या सगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये जनरल वॉर्डचे ५० टक्के आणि अतिदक्षता विभागातले ५० टक्के बेड करोनाग्रस्तांसाठी राखून ठेवायच्या सूचना दिल्या आहेत. पुणे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे म्हणाले, ‘रुग्णसंख्या वाढत आहे. संसर्गाचा दर वाढत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ानंतर हा दर वाढायला सुरुवात झाली तरी तो १० टक्क्यांपर्यंत मर्यादित राहील अशी अपेक्षा होती. आता दररोज तो दर १० टक्क्य़ांचा टप्पा ओलांडत आहे. त्यामुळे चित्र गंभीर आहे. नागरिकांनी नियम पाळून आम्हाला सहकार्य करावे. मास्क वापराबाबत अजूनही गाफीलपणा आहे. तो योग्य नाही. यंदाची रुग्णवाढ मागील वर्षीपेक्षा अधिक आहे. याचे भान ठेवून नागरिकांनी जबाबदारीने वागावे. गर्दी करणे, गरज नसताना घराबाहेर पडणे टाळावे. हवामानातील सततच्या चढउतारांमुळे श्वसनाचे विकार बळावले आहेत. त्यावर वेळीच उपचार घेणे, डॉक्टरांनी चाचणी करायला सांगितली तर ती करणे आवश्यक आहे. संसर्गाची लक्षणे दिसताच निदान होईपर्यंत शक्यतो स्वत:चे विलगीकरण करावे, म्हणजे आपल्यापासून इतरांना संसर्गाचा धोका कमी होईल.’

राज्याचे निवृत्त आरोग्य महासंचालक सुभाष साळुंखे करोना साथरोगासंदर्भात राज्याचे सल्लागारही आहेत. डॉ. साळुंखे सांगतात, याला दुसरी लाट म्हणायचे की आणखी काही, याबाबतचे निष्कर्ष एवढय़ा लवकर काढता येणार नाहीत. मात्र, गतवर्षीच्या साथीच्या तुलनेत रुग्णवाढीचा वेग चिंता वाढवणारा आहे. त्याच वेळी नागरिकांचे नियम धाब्यावर बसवण्याचे वर्तन काळजीत टाकणारे आहे. कोणताही विषाणू हा ठरावीक कालावधीनंतर आपले स्वरूप बदलत राहतो. सध्या संसर्ग करणारा विषाणू हा ब्रिटन, दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझिलमधील विषाणूचा स्ट्रेन नसेलही, मात्र, हा विषाणू मागील वर्षी होता तसाही राहिलेला नाही. भारतातील विषाणूचे हे बदललेले, म्युटेशन झालेले स्वरूप आहे, असे म्हणायला वाव आहे. त्याचबरोबर परदेशातील स्ट्रेन आहे की नाही, हे पडताळून पहाण्यासाठी मोठय़ा संख्येने चाचण्या करत राहणे आवश्यक आहे, कारण साथीतील चढ-उतारांची दिशा ओळखण्यासाठी ते महत्त्वाचे ठरेल. तूर्तास नागरिकांनी मास्क, सॅनिटायजर, अंतर राखण्याचे नियम काटेकोरपणे पाळावेत. आजाराची लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने करोना चाचणी करावी. लक्षणे दिसताच निदान होईपर्यंत आपल्यापासून इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी विलगीकरणात राहावे. नागरिकांचे सहकार्य सगळ्यात महत्त्वाचे असून ते न मिळाल्यास सरकार आणि प्रशासनाला कडक र्निबध लागू करण्याशिवाय, कदाचित पुन्हा टाळेबंदी करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

विदर्भात वेगाने प्रसार

अमरावती आणि नागपूरसह संपूर्ण विदर्भात फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. अमरावतीत जानेवारी महिन्यात रोज सरासरी ८०-९० रुग्णांची नोंद होत होती. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात हे प्रमाण वाढून प्रतिदिन ३००-४०० रुग्णांपर्यंत पोहोचले आणि सध्या रोज ८०० च्या आसपास रुग्ण आढळत आहेत. करोनाचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी अमरावती, अचलपूर आणि लगतच्या नऊ गावांमध्ये कडक टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली ठेवण्यास परवानगी आहे.

जानेवारीपर्यंत नागपूरमध्ये प्रतिदिन सरासरी २००-३०० रुग्ण आढळत होते. ११ ते १८ फेब्रुवारीदरम्यान दिवसाला ५०० ते ६५० रुग्ण आढळू लागले होते. २४ फेब्रुवारीला गेल्या चार-सहा महिन्यांतील सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली- एकाच दिवसात एक हजार १८१ रुग्ण आढळले. गेल्या काही दिवसांत चाचण्या वाढल्या आहेत. पूर्वी दिवसाला सुमारे सहा हजार चाचण्या होत होत्या. साधारण २० फेब्रुवारीपासून ही संख्या साडेदहा हजारांपर्यंत पोहोचली आहे. नागपूरमध्ये आता शनिवार आणि रविवारी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता कडक बंद पाळण्यात येणार आहे.

अकोल्यात जानेवारीत प्रतिदिन ५० च्या आसपास रुग्ण आढळत होते. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवडय़ात १००च्या आसपास रुग्ण आढळू लागले. सध्या तिथे प्रतिदिन २५० ते ३०० रुग्ण आढळत असून सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्ण दोन हजार ६६३ आहेत. अमरावतीला लागूनच असलेल्या या जिल्ह्य़ात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. इथे लग्न सोहळ्यात नियम धाब्यावर बसवण्यात आले. सध्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पाश्र्वभूमीवर मूíतजापूर आणि अकोट भागात कडक र्निबध लागू करण्यात आले आहेत.

बुलडाणा जिल्ह्य़ात जानेवारीत दिवसाला सरासरी १०० रुग्णांची नोंद होत होती. फेब्रुवारीमध्ये ही संख्या २०० पर्यंत पोहोचली. सध्या प्रतिदिन ३००-४०० रुग्णांची नोंद होत आहे. वाशिममध्ये जानेवारीत १५-२० रुग्ण नोंदवले जात होते ही संख्या आता १००च्या घरात पोहोचली आहे. सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ८९० एवढी आहे.

वध्र्यात जानेवारीत प्रतिदिन सरासरी रुग्णसंख्या ५० च्या आसपास असे. गेल्या काही दिवसांत ती वाढून १०० च्या घरात पोहोचली आहे. सध्या तिथे ८३४ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यवतमाळमध्ये जानेवारीत सरासरी १० ते ५० रुग्ण आढळत होते. ते प्रमाण आता वाढले आहे. १४ फेब्रुवारीनंतर सरासरी रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. यवतमाळमध्ये बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत, मात्र निवासी भागांतील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
– महेश बोकडे

फेब्रुवारीत रुग्णवाढ

७ फेब्रुवारीला राज्यात ३५,९४८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण होते, म्हणजेच या रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू होते. मुंबईत ५,४८३, ठाण्यात ६,६११, पुण्यात ५,८७८, नागपूरमध्ये ३,५७०, नाशिकमध्ये १,३२३ आणि अहमदनगरमध्ये १,१४८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण होते. हे सहा जिल्हे वगळता इतर जिल्ह्य़ांत अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या तुलनेने कमी होती. २४ फेब्रुवारीला हे चित्र बदलले. या दिवशी राज्यात ५९,३५८ अ‍ॅक्टिव्ह  रुग्णांची नोंद झाली. मुंबईत ६,९००, ठाण्यात ६,५५२, पुण्यात १०,४२७, नाशिकमध्ये १,७६५, अहमदनगरमध्ये १,१३२, जळगावमध्ये १,७४९, औरंगाबादमध्ये १,५५९, अमरावतीत ६,१७८, अकोल्यात २,२९८, बुलडाण्यात १,६९९, यवतमाळमध्ये १,१०१ आणि नागपूरमध्ये ७,८५१ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण होते. इतर जिल्ह्य़ांतील रुग्णवाढ तुलनेने मर्यादित आहे.

(माहिती : एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2021 12:21 pm

Web Title: coronavirus second wave india coverstory dd 70
Next Stories
1 इंधन दराचा भडका सामान्यांची होरपळ
2 अल्पजीवी विकासाचे भकास वास्तव!
3 अंदाजपत्रकीय चलाखी
Just Now!
X