शैलजा तिवले – response.lokprabha@expressindia.com
ओमायक्रॉनमुळे राज्यातील करोनाबाधितांचा आलेख वेगाने वर जात आहे. त्यामुळे चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते ही तिसरी लाट विषाणूजन्य तापाच्या साथीप्रमाणे सौम्य आहे. ज्या वेगाने ही लाट वर जात आहे त्याच वेगाने ती फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत खाली येईल, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण ४ डिसेंबरला डोंबिवलीत आढळला. करोनाच्या या नव्या उत्परिवर्तनाबाबत विविध प्रकारची माहिती विविध देशांमधून येत होती. एकूणच हा विषाणूचा प्रकार नवा असल्यामुळे सारेच संभ्रमात होते. दक्षिण आफ्रिकेत हा विषाणू आढळल्यामुळे तिथून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासण्या सुरुवातीला सुरू करण्यात आल्या. हळूहळू जगभरात याचा प्रसार होऊ लागल्यानंतर जोखमीच्या देशांची यादी वाढत ४४ वर गेली. इतर देशांमधून येणारे प्रवासीही बाधित असल्याचे हळूहळू आढळू लागले. यातील काही नोव्हेंबरमध्येच मुंबईत उतरले होते. त्यामुळे ओमाक्रॉनचा समूहप्रसार डिसेंबरमध्येच सुरू झाला होता. परंतु २१ डिसेंबरपासून मुंबईतील आणि राज्यातील रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्यावर शंका निर्माण झाली. मुंबई पालिकेने यासाठी २१ ते २३ डिसेंबर दरम्यान बाधित झालेल्यांच्या जनुकीय चाचण्या केल्या आणि यात ५५ टक्के ओमायक्रॉनबाधित असल्याचे आढळले. इथूनच ओमायक्रॉनच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली. असे मानले जाते.

ओमायक्रॉनचा प्रसार सुरुवातीपासूनच मुंबई आणि पुण्यात वेगाने सुरू झाला. सुरुवातीला राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येत मुंबईतील रुग्णांचे प्रमाण ६० टक्के होते. परंतु आता ही लाट हळूहळू राज्यातील इतर भागांमध्ये पसरत आहे.

मुंबईत लाट उच्चांकाच्या दिशेने

मुंबईत २१ डिसेंबरपासून तिसरी लाट सुरू झाली. परंतु १५ दिवसांतच मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्येने १५ हजारांचा आकडा पार केला आहे. रुग्णसंख्या वाढीच्या वेगाने तर आजवरच्या दैनंदिन करोना रुग्णसंख्येचा विक्रमही मोडीत काढला आहे. मुंबईत दुसऱ्या लाटेमध्ये म्हणजेच एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात ११ हजार १०० रुग्ण एका दिवसात  आढळले होते. करोनाच्या दोन्ही साथींमधील ही सर्वाधिक रुग्णसंख्या होती. परंतु तिसऱ्या लाटेमध्ये संसर्ग प्रसाराचा वेग याच्या कित्येक पटीने अधिक आहे. ५ जानेवारीला मुंबईत १५ हजार १६६ नवे रुग्ण आढळले. करोनाच्या साथीतील ही सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली. ‘याच वेगाने मुंबईत रुग्णप्रसार होत राहिल्यास तिसरी लाट पुढील दोन आठवडय़ांत उच्चांक गाठेल आणि दैनंदिन रुग्णसंख्या सुमारे २५ हजारांवर जाईल,’ अशी शक्यता मृत्यू विश्लेषण समितीचे डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केली आहे.

पुढील दोन आठवडे आव्हानात्मक

राज्याच्या कृती दलाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुंबईत ८० टक्के रुग्ण हे ओमायक्रॉनबाधित आहेत. ओमायक्रॉन हा वेगाने डेल्टाला आटोक्यात आणू शकेल असा कयास आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत मुंबईत हे प्रमाण १०० टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. जगभरात ज्या देशांमध्ये ओमायक्रॉनमुळे लाट आली आहे, तिथे ती साधारण चार ते पाच आठवडे कायम राहिली आहे. मुंबईत आता दोन आठवडे उलटून गेले आहेत. त्यानुसार पुढील तीन-चार आठवडय़ांत लाट ओसरण्यास सुरुवात होईल. परंतु पुढील दोन आठवडे अधिक आव्हानात्मक असणार आहेत. या काळात लाटेचा उच्चांक वाढण्याची शक्यता आहे, असे मत मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी व्यक्त केले. 

राज्यातील ८० टक्के रुग्ण मुंबई महानगर प्रदेशात

तिसरी लाट मुंबई महानगर प्रदेशात धुमाकूळ घालत आहे. राज्यात नव्याने आढळणाऱ्या रुग्णांपैकी सुमारे ८० टक्के रुग्ण मुंबई महानगर प्रदेशातील नऊ नगरपालिकांमध्ये आढळत आहेत. यातील सर्वाधिक म्हणजेच सुमारे ५७ टक्के रुग्ण हे मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आढळत आहेत. त्या खालोखाल नवी मुंबई, ठाणे महानगरपालिकेमध्येही वेगाने प्रसार होत असून रुग्णसंख्या वाढत आहे. पनवेल, मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवली येथेही प्रसार वाढत असून दैनंदिन रुग्णसंख्या ५०० वर गेली आहे.

ओमायक्रॉनचे स्वरूप सौम्यच

ओमायक्रॉनमुळे रुग्णवाढीचे आकडे वेगाने बदलत आहेत. त्यामुळे भीती वाटणे साहजिक आहे. परंतु रुग्णसंख्या वाढत असली तरी बहुतांश रुग्ण लक्षणविरहित आहेत. १० टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल व्हावे लागत आहे. त्यातही घशाच्या संसर्गाचे प्रमाण अधिक असून हा विषाणू फुप्फुसावर फारसा आघात करत नाही. त्यामुळे प्राणवायूची गरजही तुलनेने फार कमी आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

बाधितांमधील ९५ टक्के रुग्णांच्या फुप्फुसांवर कोणताही परिणाम झालेला नाही. दुसऱ्या लाटेत या उलट स्थिती होती. जवळपास ९५ टक्के रुग्णांच्या सीटी अहवालामध्ये फुफ्फुसांवर लगेचच परिणाम झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे तिसऱ्या लाटेचे स्वरूप सौम्य असून ही लाट विषाणूजन्य तापाच्या साथीप्रमाणे आहे, असे मत कृती दलाचे सदस्य डॉ. वसंत नागवेकर यांनी सांगितले.

रुग्णालयात दाखल होणारे १५ टक्के

मुंबईत रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत काही प्रमाणात वाढले असले तरी एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे १५ टक्के आहे. त्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्या १५ हजारांवर गेली तरी रुग्णालयातील सुमारे ८५ टक्के खाटा रिक्त आहेत. तसेच आता पालिकेने खाटांची क्षमताही वाढवून ३५ हजारांवर नेली आहे. १४४ खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वेगाने वाढत असली तरी खाटांची कमतरता भासू नये, असा पालिकेचा प्रयत्न आहे. मुंबईत तरी सध्या स्थिती नियंत्रणात आहे, असे मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

ओमायक्रॉनमुळे बाधित होणारे बहुतेक जण लक्षणेविरहित असल्यामुळे किंवा त्यांची लक्षणे सौम्य असल्यामुळे विलगीकरणाचा कालावधी सात दिवसांपर्यंत कमी करण्यात आला आहे. रुग्णालयात दाखल झालेले रुग्णही सात दिवसांच्या आत बरे होऊन घरी परतत आहेत. मुंबईत दोन आठवडय़ांनी रुग्णसंख्येने उच्चांक गाठला तरी उपलब्ध खाटांची कमतरता भासण्याची शक्यता कमी आहे. तसेच अतिदक्षता विभागात दाखल होणाऱ्यांचे प्रमाणही नगण्य आहे. प्राणवायू किंवा अतिदक्षता विभागाची आवश्यकताही तुलनेने कमी असल्यामुळे यांची देखील कमतरता फारशी भासणार नाही, असे डॉ. सुपे यांनी सांगितले.

आरोग्य यंत्रणा बाधित

ओमायक्रॉन वेगाने पसरत असल्यामुळे रुग्णालये, आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणी कायर्म्रत आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत असून यंत्रणा काही काळ कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात सुमारे अडीचशे निवासी डॉक्टरांसह अनेक आरोग्य कर्मचारी बाधित झाले आहेत. एकीकडे बाधित आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असली तरी करोना व्यतिरिक्त उपचारही सुरू आहेत. त्यामुळे करोनाचे रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी असले तरी राज्यभरात लाट तीव्रतने पसरल्यास तुटपुंज्या मनुष्यबळामध्ये आरोग्य व्यवस्था कशी चालवावी, याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर निश्चितच निर्माण होणार आहे.

राज्यात अन्य जिल्ह्यांमध्येही शिरकाव

मुंबईपाठोपाठ पुण्यामध्येही ओमायक्रॉनच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली असून तिथे आता दैनंदिन रुग्णसंख्या जवळपास दोन हजारांपर्यंत गेली आहे. पुणे मनपा क्षेत्रामध्ये संसर्गप्रसार वेगाने होत असून त्यासोबतच िपपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणमध्येही रुग्णसंख्या वाढत आहे. नाशिक आणि नागपूर मनपा क्षेत्रांमध्येही संसर्गाचा वेग वाढत  आहे.

दैनंदिन रुग्णसंख्या २६ हजारांच्या घरात

मुंबईसह मुंबई महानगरप्रदेशात ओमायक्रॉनची तिसरी लाट वेगाने पसरत असल्यामुळे राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेखही उंचावून २६ हजारांच्या वर गेला आहे. करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या प्रचंड होती. त्यामुळे अद्याप दुसऱ्या लाटेइतकी रुग्णसंख्या वाढलेली नाही. परंतु राज्यात ओमायक्रॉनचा प्रसार वाढेल आणि जानेवारीच्या तिसऱ्या आठवडय़ात सुमारे दोन लाख उपचाराधीन रुग्ण असतील, असा अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने तयारी करण्याच्या सूचनाही जिल्ह्यांना देण्यात आल्या आहेत.

ही प्रमुख लक्षणे

ओमायक्रॉनबाधितांना ताप एक ते दीड दिवस येतो. डोकेदुखी, घसा खवखवणे ही प्रमुख लक्षणे आहेत. काही जणांना खोकला, सर्दी तर काही जणांना पोटदुखी होत असल्याचे आढळले आहे. हा त्रास साधारण चार ते पाच दिवस राहतो आणि त्यानंतर रुग्ण पूर्णपणे बरा होतो. यासाठी कोणतेही अन्य औषध देण्याची सध्या तरी गरज भासत नाही. ताप, सर्दी, खोकल्याची औषधे रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत. विषाणूची तीव्रता कमी करण्यासाठी दिली जाणारी अ‍ॅन्टी व्हायरल औषधेही बहुतेक रुग्णांना देण्याची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. करोना प्रतिबंधात्मक उपयांचे काटेकोरपणे पालन करावे, असा सल्ला डॉ. जोशी यांनी दिला आहे.

यांनी खबरदारी घ्यावी

मधुमेह, उच्च रक्तदाब असे दीर्घकालीन आजार असलेल्या आणि ६० वर्षांवरील व्यक्तींनी थोडी खबरदारी घ्यावी. तीन दिवसांपेक्षा अधिक काळ १०० फॅ. पेक्षा अधिक ताप असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बहुतांश रुग्णांमध्ये घशावर याचा परिणाम होत असला तरी अगदी मोजक्या रुग्णांमध्ये फुप्फुसांवर परिणाम झाल्याचेही आढळले आहे. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला हे तीव्र प्रमाणात असल्यास रुग्णांनी दुखणे अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांकडे तपासणीसाठी जावे, असे कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी स्पष्ट केले आहे.

पहिल्या लाटेमध्ये करोना मुळात नवीन होता. केवळ स्पर्शाने पसरणाऱ्या या साथीच्या आजाराबाबत भीती निर्माण झाली होती. दुसऱ्या लाटेमध्ये डेल्टाने उडविलेल्या हाहाकारातून सगळेच तावून सुलाखून बाहेर पडले. या दोन वर्षांत अनेकांनी जवळच्या व्यक्ती गमावल्या, अर्थचक्र थांबल्यामुळे उपासमारी सहन केली, पै अन् पै गोळा करून ठेवलेली शिदोरी या काळात रिकामी झाली. त्यामुळे आता तिसऱ्या लाटेत काय पाहावे लागणार याविषयीची धाकधूक सर्वाच्या मनात होती. परंतु ओमायक्रॉनच्या रूपाने आलेला हा करोना सर्वाच्या शरीरात शिरकाव करत असला तरी लशीसारखे काम करत असल्याचे दिसते. त्यामुळे एका दमात सर्वाना करोनाविरोधात लढण्याची प्रतिकारशक्ती देत असलेल्या या तिसऱ्या लाटेनंतर का होईना या साथीचा अंत होवो, अशीच प्रत्येकाची इच्छा आहे.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus third wave is mild dont get scared covid 19 omicron coverstory dd
First published on: 07-01-2022 at 17:02 IST