सुदीप व अंकिता बापट – response.lokprabha@expressindia.com

#करोनाशीदोनहात

Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

गेली दोन वर्षे मी व माझी पत्नी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील सॅन्टा बार्बरा येथे वास्तव्यास होतो. मी कामानिमित्त तिथल्या युनिव्हर्सिटीत व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून रुजू झालो होतो. जून अखेपर्यंत भारतात परतणार होतो. पश्चिम अमेरिकेतील युनिव्हर्सिटीज या साधारणपणे ‘क्वार्टर सिस्टम’ चे अनुसरण करतात. यात मार्चअखेर पर्यंत ‘विंटर क्वार्टर’ व एप्रिल ते जून हे ‘स्प्रिंग क्वार्टर’ म्हणून ओळखले जातात. अगदी फेब्रुवारीपासूनच रोजच्या बातम्यांमधून करोनासंबंधीची माहिती आमच्या कानावर पडत होती. तरीही मार्चच्या सुरुवातीपर्यंत मी नित्यनेमाने माझे वर्ग घेत असे. पुढे काय वाढून ठेवलं आहे, याची पुसटशी कल्पना आम्हाला नव्हती. साधारण १० मार्चला प्रथमच त्याची प्रचीती आली.

युनिव्हर्सिटीकडून नोटीस पाठवण्यात आली की विंटर क्वार्टरच्या सर्व परीक्षा तसेच ३० एप्रिलपर्यंतचे वर्ग ऑनलाइन घेण्यात येणार असून प्राध्यापकांनी त्यानुसार बदल करावेत. साहजिकच मी देखील त्यानुसार माझे वर्ग बदलण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेत आरोग्य विशेष प्राधान्य दिले जाते. त्यामुळे करोनाचा फैलाव बघता ही अनिश्चितता एप्रिलनंतरही कायम राहील अशी कल्पना आम्हा दोघांना तेव्हाच आली आणि तसेच घडले. मार्चपासूनच तिकडचे रहिवासी ‘सोशल डिस्टन्सिंग’ या रामबाण उपायाकडे विशेष लक्ष देऊ लागले. तरीही भारतासारखी कडेकोट टाळेबंदी तिथे कधीच करण्यात आली नाही आणि त्यामुळेच करोनाबाधितांची संख्या तिथे कशी झपाटय़ाने वाढली आणि अजूनही वाढत आहे हे सर्वश्रुत आहे.

अन्य देशांप्रमाणेच तेथील सर्व सामाजिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. त्यातही कहर म्हणजे लोकांच्या मनातली भीती. सर्व किराणामालाची दुकाने माणसांनी ओसंडून वाहू लागली. लोक हाताला लागेल ते सामान मोठय़ा प्रमाणात विकत घेत होते आणि त्यामुळे काही दिवसांतच जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला. काही दिवस उलटले असतील आणि त्यात युनिव्हर्सिटीकडून पुन्हा घोषणा करण्यात आली की स्प्रिंग क्वार्टरचे सर्व वर्ग जूनपर्यंत ऑनलाइन घेण्यात येणार आहेत. हे ऐकून लगेचच आम्हा दोघांची विचारचक्रे जोरात फिरू लागली. एकंदर परिस्थिती पाहता जूनऐवजी तेव्हाच तिथून काढता पाय घेणे योग्य वाटू लागले. मी लगेच माझ्या डिपार्टमेंटकडून हिरवा कंदील घेऊन मोकळाही झालो. आम्ही त्याप्रमाणे मनाची तयारी करू लागलो, पण आपल्या माननीय पंतप्रधानांनी वेगळा विचार आधीपासूनच करून ठेवला होता. २२ मार्च रोजीचा जनता कर्फ्यू व लगेचच २४ मार्चपासून २१ दिवसांची संपूर्ण टाळेबंदी भारतभर लागू करण्यात आली. त्यामुळेच आमच्यासाठीदेखील ‘जैसे थे’ परिस्थिती उद्भवली. सर्व आंतरराष्ट्रीय विमाने रद्द करण्यात आली होती. साहजिकच ही परिस्थिती किती काळ टिकेल याविषयीची अनिश्चितता आमच्या मनात घर करून होती.

मार्च शेवटाकडे येऊन ठेपला होता आणि करोनाचे संकट संपुष्टात येईल असे दिसत नव्हते. गाणी ऐकणे, वाचन, व्यायाम करणे, नेटफ्लिक्स व यूटय़ूब पालथे घालणे, नवनवीन पदार्थ करून पाहाणे यात हळूहळू मन रमवू लागलो. दर गुरुवारी व दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी होणारे आमच्या भजनी मंडळाचे कार्यक्रमही आता ‘व्हच्र्युअल’ झाले होते. आता तुम्ही म्हणाल की आजच्या जमान्यातली ही मुले भजनासारख्या गोष्टीत कशी काय रमू लागली? पण खरे सांगायचे तर ही भजने आम्हा भारतीयांना व त्यातही सर्व पंथांना एकत्र आणणारी संधी होती. तसेच आम्हा दोघांनाही गाण्याची आवड असल्यामुळे या कार्यक्रमांमधे आमचे एखाददुसरे गाणे हे ठरलेले असे. हे सर्व सुरू असतानाच एकीकडे भारतात करोनाग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढू लागली व खबरदारी म्हणून भारत सरकारकडून २१ दिवसांची टाळेबंदी आणखी काही दिवस वाढवण्यात आली.

मी एक व्हिजिटिंग प्रोफेसर असल्याने आमच्या दोघांचे व्हिसा जून अखेपर्यंतच वैध होते व त्यामुळे आता भारतात कसे व केव्हा जायला मिळणार हा एक मोठ्ठा प्रश्न होता. टाळेबंदी सुरू असली तरी विमानसेवा लवकरात लवकर सुरू होईल अशी आशा होती. त्या सुमारास भारताकडून चीन, इटली, इराण अशा कोरोनाबाधित देशांमधे अडकलेल्या भारतीयांसाठी एअर इंडियाच्या मदतीने विमानसेवा सुरू करण्यात आली. अमेरिकेतही अशी काही विमाने लवकरच पाठवली जातील, अशी अपेक्षा तेथील भारतीयांना होती. पण बराच काळ तसे काही घडत नसल्याने तेथील भारतीयांनी एकत्र येऊन भारत सरकारकडे विनंती अर्ज पाठवायला सुरुवात केली. तशाच प्रकारचे विनंती अर्ज इतर देशांतील भारतीयांकडूनही करण्यात आले. अखेर त्याचा परिणाम म्हणून साधारण मे महिन्याच्या सुरुवातीला भारत सरकारने ‘वंदे भारत’ मोहिमेअंतर्गत अमेरिकेत काही विमाने सोडायचा निर्णय घेतला. नियमित व्यावसायिक आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू व्हायला आणखी बराच काळ जाईल, याचा अंदाज आम्हाला आला. त्यामुळे या संधीचा फायदा घेणे आम्हाला योग्य वाटू लागले.

लागलीच आम्ही आमची नावे वॉशिंग्टन येथील भारतीय दूतावासाच्या संकेतस्थळावर नोंदवली. एकीकडे सामानाची बांधाबांध करण्याचा निर्णय घेतला. आमचे सामान अधिक असल्याने त्यातले बरेचसे एखाद दोन खोक्यांत भरून समुद्रमार्गे आधीच रवाना करून घेतले. आता या ‘वंदे भारत’च्या काही बाबी म्हणजे भारत सरकारने काही निकषांच्या आधारे मोजक्याच विशिष्ट वर्गाना यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. यात लवकरच व्हिसा संपणारे लोक, विद्यार्थी, वृद्ध, गर्भवती, आरोग्याची आणीबाणी असणारे अशांचा समावेश होता. आम्ही पहिल्या वर्गात मोडत असल्याने आशा वाटू लागली होती.

अखेर एअर इंडियाने फेज १ अंतर्गत सॅन फ्रॅन्सिस्को ते मुंबई व नवी दिल्ली अशी दोन विमाने ९ आणि १३ मे रोजी पाठवण्याचा निर्णय घेतला. आम्ही एकीकडे टक लावून सर्व घडामोडी पाहात होतो, पण फेज १ अंतर्गत आमची नावे न आल्याने आमचा पुरता हिरमोड झाला. आता फेज २ ची घोषणा कधी होते याकडे आमचे लक्ष केंद्रित झाले होते. त्याच दरम्यान अमेरिकेत अडकलेल्या आमच्या सारख्या सर्व भारतीयांनी समाजमाध्यमांवर ‘एस ओ एस ग्लोबल इंडियन्स’ या नावाचा एक ग्रुप तयार केला होता. यातील ९ आणि १३ तारखेच्या विमानाने प्रवास करणाऱ्या मंडळींनी त्यांना आलेले अनुभव इतरांसमोर मांडले होते. त्यातूनच बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला व आम्हाला चांगले मार्गदर्शन मिळत गेले. अखेर १६ मे रोजी सायंकाळी सुमारे साडेपाच वाजता भारतीय दूतावासाच्या कार्यालयातून आम्हाला कॉल आला. १९ तारखेच्या सॅन फ्रॅन्सिस्को ते नवी दिल्ली विमानासाठी आमच्या नावांची निवड करण्यात आली होती. तुमची जायची तयारी आहे ना? अशी खात्री करून घेतल्यावर त्यांच्याकडून आम्हाला ई-मेल पाठवण्यात आला. त्याच दिवशी ७ वाजेपर्यंत उत्तर देणे बंधनकारक होते. जर तसे केले नाही तर आमच्या जागी इतरांना पाठवण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्याच ई-मेल मधे २ प्रकारचे फॉर्म जोडण्यात आले होते. एकात आमची सविस्तर माहिती, पासपोर्ट क्रमांक, अमेरिकेतील व भारतातील पत्ते इत्यादी गोष्टी विचारण्यात आल्या होत्या. दुसरा फॉर्म हा एअर इंडियाकडून तिकीट विक्री संबंधी माहितीसाठी पाठवण्यात आला. यातून क्रेडिट कार्डचे सर्व तपशील छायाचित्रासह मागण्यात आले होते. आता तुम्ही म्हणाल की क्रेडिट कार्डची इत्थंभूत  माहिती कोणालाही देणे धोक्याचे असू शकते पण त्याक्षणी ते करणे गरजेचे होते.

साधारण १७ तारखेच्या दुपारी ३ वाजता आमची तिकिटे एअर इंडियाकडून पाठवण्यात आली. आमचे विमान १९ तारखेला रात्री ११ वाजता सॅन फ्रॅन्सिस्को विमानतळावरून प्रस्थान करणार होते. त्यासाठी आम्हाला त्याच दिवशी सकाळी ११ वाजता सॅन्टा बार्बरा येथून निघणे भाग होते. हातात फक्त दोनच दिवस असल्याने सर्व सामानाची बांधाबांध, घरातले फर्निचर व इत्यादी सामान विकणे, गाडी विकणे, अपार्टमेंटची चावी व्यवस्थापनाकडे सुपूर्द करणे, अशी आव्हाने आमच्यासमोर होती. पुरेसा वेळ न मिळाल्याने शेवटी सोफा, मॅट्रेस अशा बोजड गोष्टी विनामूल्य देऊन टाकल्या. भारतात जाऊन आम्हाला १४ दिवस एका हॉटेलमधे विलगीकरणात राहावे लागणार होते. त्यासाठीची संपूर्ण तयारी व वेगळी बॅग आम्ही तेव्हाच भरून ठेवली होती. तसेच त्या हॉटेल्सची यादी आम्ही आधी नमूद केलेल्या समाजमाध्यमांच्या ग्रुपवर पाहिली होती. आयत्या वेळी गोंधळ नको म्हणून त्यासंबंधी थोडेफार संशोधन करून ठेवले होते. प्रत्येक हॉटेलमध्ये दिवसाला तीन वेळेच्या जेवणाची सोय होती पण तरी मधल्या वेळेस तोंडात टाकायला म्हणून काहीतरी घरातून घेऊन जावे, असे सगळ्यांनी सुचविले. त्याप्रमाणे चिवडा व बनाना ब्रेड आम्ही घरी बनवून सामानात गुंडाळला.

दोन वर्षांचा संसार दोन दिवसांत गुंडाळणे जरा जिकिरीचेच काम होते. टाळेबंदीमुळे आमच्या सॅन्टा बार्बरा येथील मित्र मंडळ, भजनी मंडळ इत्यादींचा मनाजोगा निरोपही घेता आला नाही. पण तरीही काही जणांनी आवर्जून धावत्या का होईना, भेटी दिल्या. प्रवासासाठी काही हवे नको विचारले. अखेर १९ मे चा दिवस उजाडला. आमची गाडी आदल्या दिवशीच विकली गेल्याने आम्हाला गाडी भाडय़ाने घ्यावी लागली. सर्व सामान डिक्कीत भरून, अख्खं अपार्टमेंट एकदा नजरेखालून घालून सुमारे साडेअकरा वाजता आम्ही सॅन फ्रॅन्सिस्को विमानतळाकडे प्रस्थान केले. त्याक्षणी सॅन्टा बार्बरा येथे गेल्या २-३ वर्षांत आलेले अनुभव, भेटीगाठी इत्यादी डोळ्यांसमोरून सर्रकन गेले. शेवटी पाच तासांच्या थकवणाऱ्या प्रवासानंतर संध्याकाळी सुमारे साडेसहा वाजता आम्ही विमानतळावर जाऊन पोहोचलो.

कित्येक लोकांनी ६ वाजल्यापासूनच रांगा लावायला सुरुवात केली होती. इतर उड्डाणे रद्द असल्याने सर्व काऊंटर्सवर एअर इंडियाचे कर्मचारी आपापली कामे चोख बजावत होते. सुरुवातीलाच प्रत्येकाला २ फॉर्म देण्यात आले. त्यातील एकावर आमची जुजबी माहिती व दुसऱ्यावर भारतात गेल्यावर १४ दिवस विलगीकरणात रहाण्याबाबतची आमची संमती घेण्यात आली. पहिल्या रांगेत सर्व प्रवाशांचे तापमान तपासण्यात आले.  साधारणपणे ३७.५ अंश सेल्शियसच्या खालील सर्व लोकांना पुढे जाण्यास अनुमती होती. आमच्या देखत कोणालाही त्यांनी या कारणावरून अडवून धरलेले आम्ही पाहिले नाही. त्यानंतरचा टप्पा म्हणजे आधी भरलेले फॉर्म व चेक-इनच्या सर्व बॅगा एअर इंडियाकडे सुपूर्द करणे. सर्व कर्मचाऱ्यांचा संयम निश्चितच वाखाणण्याजोगा होता. लगेचच आम्हाला आमचे बोर्डिग पास व निर्धारित सीट देण्यात आल्या. या असामान्य प्रसंगी देखील माणशी २३ किलोच्या दोन बॅगा व सोबत एक कॅरी-ऑन व छोटीशी पर्स असे सामान नेण्यास अनुमती होती. यापुढील टप्पे नेहमीसारखेच म्हणजेच सिक्यूरिटी, बोर्डिग हे होय. प्रत्येक टप्प्यावर अंतर राखण्याला प्राधान्य देण्यात येत होते हे बघून हायसे वाटले. बोर्डिगच्या आधी पुन्हा एकदा तापमान घेण्यात आले. त्याक्षणी कोणाचे तापमान जास्त आले तर त्यांचे पुढे काय? असा प्रश्न आमच्या मनात डोकावून गेला. पण सुदैवाने तसले काही घडले नाही. या अशा अद्वितीय कसोटीनंतर आम्ही साधारण रात्री साडेदहा वाजता विमानात आमच्या जागी जाऊन स्थिरावलो.

प्रत्येकाच्या सीटवर बांधून ठेवलेले खाण्याचे जिन्नस, मास्क, फेस शील्ड व सॅनिटायझरच्या पुडय़ा पद्धतशीरपणे आधीच ठेवण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर आतील सर्व कर्मचारी डोक्यापासून पायापर्यंत सुरक्षा पोशाखात होते. आम्हालाही मास्क व फेस शील्ड संपूर्ण प्रवासात घालून ठेवण्याचा सल्ला दिला गेला, पण अल्पावधीतच तसे करणे आम्हाला अस्वस्थतेचे वाटायला लागले. १५ तास तसे घालून बसणे तर सोडाच! समस्त डॉक्टर, परिचारिका व आरोग्य सेवेतील इतर कर्मचारी हे कशा प्रकारे सहन करत असतील, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. काहीशी नाराजीची बाब म्हणजे समोरचे स्क्रीन बंद ठेवण्यात आले होते व १५ तास कसे काढायचे हे एक आव्हानच होते. पण असो, ही काही करमणुकीची वेळ नाही हे आम्ही चांगलेच जाणून होतो.

बरोबर ११ वाजता विमानाने उड्डाण घेतले व दिवसभराच्या धकाधकीमुळे आपोआपच डोळ्यांवर झोप आरूढ होत गेली. सांगायची बाब म्हणजे विमानातदेखील शक्य तितके कमी वावरणे बंधनकारक होते व तेच सर्वाच्या हिताचे होते. अखेर बरोबर २१ तारखेच्या पहाटे साडेतीन वाजता आमचे विमान नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. तेच विमान पुढे बंगळुरू व हैदराबाद येथे जाणार होते. आम्ही आमचे सामान घेऊन विमानाबाहेर पाऊल टाकले. विमानाबाहेर पडताना मास्क व फेस शील्ड घालणे बंधनकारक होते. बाहेर पडताच एअर इंडियाचे कर्मचारी व सीआरपीएफचे जवान आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तैनात होते. सर्वप्रथम आमची पुन्हा एकदा थर्मल चाचणी घेण्यात आली. त्यानंतर आधी भरलेले फॉर्म तेथील एका कर्मचाऱ्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्यांनी ते सर्व पडताळून त्याच फॉर्मवर ‘विलगीकरण आवश्यक’ असे शिक्के मारले.

तेथील तैनात जवानांनी नुकत्याच प्रवाशांचे विविध गट केले व प्रत्येक गटासाठी एक मार्गदर्शक नेमण्यात आला. त्यानंतर आमचे इमिग्रेशन पार पडले व तिथे शिक्का मारलेला आमचा फॉर्म ताब्यात घेण्यात आला. तेथून पुढे सर्वांनी आपापल्या चेक-इन बॅग्स ताब्यात घेतल्या. हे सर्व करत असताना आपापल्या गटातच रहाणे आवश्यक होते. त्यानंतर थोडे पुढे गेल्यावर प्रत्येकाने ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप आपापल्या मोबाईल फोनमधे डाऊनलोड केले आहे अशी नोंद फॉर्म वर करून घेण्यात आली व त्याखाली स्वाक्षरी घेण्यात आली. तेथील कर्मचाऱ्याने आम्हाला ताप, घशात खवखव, सर्दी व खोकला यापैकी काही लक्षणे नाहीत ना याची खात्री करून घेतली. नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे ठिकठिकाणी खुच्र्या मांडून प्रत्येक गटासाठी बसायची वेगळी सोय केली होती व हे सर्व होत असताना मास्क व शील्ड घालणे अनिवार्य होते. पुढील टप्पा म्हणजेच हॉटेलची निवड. एका यादीत नवी दिल्ली व एनसीआर येथील बरीच हॉटेल्स तीन श्रेणींत विभागण्यात आली होती. यात अगदी कमी दर्जाच्या हॉटेल्सपासून पंचतारांकित हॉटेल्सपर्यंतचे पर्याय होते. आम्ही आमच्या सोयीनुसार नवी दिल्ली येथील ‘द सूर्या’ या पंचतारांकित हॉटेलची निवड केली. दिल्ली सरकारने सर्व हॉटेलचे दर आधीच निश्चित केले होते. आमच्या हॉटेलमध्ये एका सिंगल रूमसाठी दिवसाचे ३१०० रुपये आणि डबल रूमसाठी ४१०० रुपये अधिक कर असे दर निश्चित करण्यात आले होते. यात सकाळचा नाश्ता व दोन वेळचे जेवण समाविष्ट होते. त्यानुसार आमची जुजबी माहिती घेतल्यानंतर आमचे पासपोर्ट्स ताब्यात घेण्यात आले. आम्ही पळून जाऊ नये, म्हणून ही खबरदारी! प्रत्येक हॉटेलवर सोडण्यासाठी डीटीसीच्या बस विमानतळाबाहेर आधीच सज्ज होत्या. आमच्यासोबत दिल्ली सरकारचे दोन कर्मचारी व पोलीस पाठवण्यात आले. अशी सगळी दिव्यं पार करून आम्ही साधारण साडेसहा वाजता हॉटेलवर पोहोचलो.

तिथे आमचे तापमान पुन्हा एकदा तपासून सर्व बॅगा सॅनिटाइज करण्यात आल्या. आमच्याकडून १४ दिवसांचे भाडे आधीच घेण्यात आले. सर्व औपचारिकता पार पाडून आम्ही आमच्या खोलीत शिरलो व सुटकेचा नि:श्वास टाकला. खोलीच्या बाहेरही न पडण्याची सक्त ताकीद दिली गेली. तीन वेळचे जेवण नियमितपणे हॉटेलचे कर्मचारी खोलीच्या बाहेरूनच आमच्या ताब्यात देत होते. त्याचबरोबर दिवसाला माणशी फक्त १.५ लि. पाणी मिळायचे व त्यापेक्षा जास्त हवे असल्यास प्रत्येक लिटरमागे १०० रुपये आकारले जात होते. या व्यतिरिक्त लॉन्ड्री, जेवणाव्यतिरिक्त दुसरे काही मागविणे यासाठी अव्वाच्या सव्वा पैसे हॉटेलकडून आकारण्यात येत होते. अर्थात हा एखाद्या पंचतारांकित हॉटेलचा सामान्य दर होता.

एक मजेशीर पण काहीशी चिंताजनक बाब म्हणजे एके दिवशी मला दिल्ली दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयातून फोन आला. त्यांचे म्हणणे असे होते की २२ मे रोजी माझ्या मोबाइल फोनचे लोकेशन हॉटेलव्यतिरिक्त दुसऱ्याच ठिकाणी दाखवत होते. त्यांना मलाच काहीशा सविस्तर पण गंभीर स्वरात सांगावे लागले की, ‘अहो आम्हाला आमच्या रूमच्याही बाहेर न पडण्याची सक्त ताकीद दिली गेली आहे. त्यात हॉटेल सोडून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’. हे शक्य नसून तुम्ही पुन्हा शहानिशा करून घ्या. या १४ दिवसांत आम्हाला चांगलाच मनस्ताप झाला आणि भरुदडही भरावा लागला. दिलासा म्हणजे २५ मे पासून राज्य सरकारकडून नवीन नियमावलीची घोषणा करण्यात आली. त्या अंतर्गत आम्हाला ७ दिवस हॉटेलमध्ये राहून त्यापुढील ७ दिवस स्वत:च्या घरी विलगीकरणात राहावे लागणार होते. पण आमच्याच सोसायटीमध्ये घडलेल्या घटनेमुळे आमच्या मनात जरा भीती होती. मार्चच्या सुमारास र्मचट नेव्हीतील एक गृहस्थ परदेशातून आमच्या सोसायटीमधील त्यांच्या घरी परतले. लगेचच दुसऱ्या दिवशी पोलिसांनी येऊन त्यांच्या दारावर ठळक अक्षरात ‘हाऊस इज अंडर क्वॉरंटाईन ! डू नॉट व्हिजिट’ असे लिहिले. त्यानंतर सोसायटीतील लोक त्यांच्या घराबाहेरही फिरकेनासे झाले. त्यांना काही हवे नको हे विचारणे तर दूरच, पण अक्षरश: त्यांना वाळीतच टाकल्यासारखे लोक करू लागले. हा त्रास आम्हाला आमच्या आई वडिलांना होऊ द्यायचा नव्हता. त्यामुळे हॉटेलमधून ७ दिवसांनंतर घरी जायचे की १४ दिवस इथेच थांबायचे असा विचार आम्ही करू लागलो. असो. तर या नवीन नियमावलीनुसार आमचे ७ दिवस २८ मे रोजी पूर्ण झाले आणि आम्ही हॉटेलमधून चेक आउट करण्याच्या तयारीला लागलो. सकाळी ११ वाजता हॉटेलमध्ये एक डॉक्टर व दिल्ली कॉर्पोरेशनचे काही कर्मचारी आले. त्यांनी तपासणी करून पुढील ७ दिवस घरी विलगीकरणात राहण्याची तंबी दिली. पासपोर्टही परत केले. दुपारी १ वाजता आम्ही आमच्या घरी पोहोचलो आणि खऱ्या अर्थाने सुटकेचा नि:श्वास सोडला.

मागे वळून बघताना काही जाणवलेल्या सामान्य बाबी म्हणजे अख्खं जग करोनाशी दोन हात करत असताना आम्ही केलेल्या या दिव्य प्रवासात अनेकदा जोखीम पत्करावी लागली. कितीतरी अडथळे पार करावे लागले. पण हे सर्व आपल्या मायदेशी परतण्यासाठीच! कित्येक लोक अजूनही विविध देशांमध्ये अडकून पडले असून अशाच काही वंदे भारत विमानांची वाट पाहात आहेत. त्या सर्वाचीच सुटका होवो व हे संकट लवकरात लवकर संपुष्टात येवो हीच सदिच्छा.