कोनैन शरीफ – response.lokprabha@expressindia.com

आता कोविड १९ च्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी घरीदेखील मुखपट्टी वापरणं आवश्यक आहे, अशी शिफारस देशाच्या कोविड-१९ टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी केली आहे. देशात सोमवारी (२६ एप्रिल) करोनाचे तीन लाख ५२ हजार ९९१ नवे रुग्ण नोंदवले गेले. २४ तासांत दोन हजार ८१२ करोना मृत्यू झाले आणि देशातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन कोटी ८ लाख १३ हजार ६५८ इतकी आहे. या पाश्र्वभूमीवर डॉ. पॉल यांच्या शिफारसी आल्या आहेत.

त्यांनी अशी शिफारस करण्यामागे काय कारण असू शकते?

माणसाच्या शिंकेवाटे जे द्रव्यकण बाहेर पडतात, त्यांच्यामार्फत एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे कोविड- १९ च्या विषाणूचा प्रसार होतो. व्यक्ती खोकते, शिंकते, खाकरते, बोलते, ओरडते किंवा गाते तेव्हा त्यातून बाहेर पडणाऱ्या जलकणांच्या माध्यमातून हवेमार्फत हे विषाणू प्रवास करतात. या प्रवासादरम्यानच्या काळात ते त्या परिसरातील माणसांच्या नाकावाटे किंवा तोंडावाटे त्यांच्या शरीरात शिरतात. श्वसनप्रक्रियेच्या माध्यमातूनही ते मानवी शरीरात प्रवेश करत असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बऱ्याच मोठय़ा लोकसंख्येमध्ये या संसर्गाची लक्षणं दिसत नाहीत. ते असिम्प्टमेटिक असतात. लक्षण दिसत नसलेले हे लोक वेगाने त्यांच्या घरामध्ये हा संसर्ग पसरवू शकतात. कोविड १९ च्या संसर्गाची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत असे हे लोक बोलण्यासाठी तोंड उघडतात तेव्हादेखील त्यांच्यामार्फत दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो.

त्यामुळेच या लाटेदरम्यान कुटुंबातले बहुतेक जण घरीच थांबलेले असतानाही कुटुंबंच्या कुटुंबं बाधित होताना दिसत आहेत.

पण मग हे दुसऱ्या लाटेदरम्यानच का?

भारतात बऱ्यापैकी मोठय़ा लोकसंख्येला श्वास घ्यायला त्रास होणं यासारखी तीव्र लक्षणं दिसत आहेत. अनेकांना रुग्णालयात भरती व्हावं लागलं आहे. ऑक्सिजन बेडची मागणी इतक्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे की आरोग्य यंत्रणेच्या नाकातोंडात पाणी गेले आहे.

मुखपट्टीचा वापर हा तिच्या वापरकर्त्यांपेक्षा मुख्यत: इतरांचा कोविड १९ पासून बचाव करण्यासाठी आहे. त्यामुळे घरीदेखील मुखपट्टी वापरा ही शिफारस फक्त संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नाही तर अतिधोकादायक गटात असणाऱ्यांचं संरक्षण करण्यासाठीदेखील आहे.

त्यामागे दोन निश्चित उद्दिष्टं आहेत. एक म्हणजे संबंधित घरामधल्या एखाद्या सदस्यामध्ये संसर्गाची कोणतीही लक्षणं दिसत नसतील आणि तो बाधित असेल तरी घरातच मुखपट्टी वापरल्यामुळे त्या घरामधल्या वयस्कर तसंच इतर आजार असलेल्या लोकांचं कोविड १९ च्या संसर्गापासून संरक्षण होऊ शकेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरातही मुखपट्टी वापरल्यामुळे दुसऱ्या लाटेच्या प्रामुख्याने स्थानिक पातळीवर झालेल्या उद्रेकावर नियंत्रण मिळवता येईल.

अशी विधानं करताना सरकारकडे काही पुरावे आहेत का?

होय, ‘नॉर्थ कॅरोलिना डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अ‍ॅण्ड ह्य़ूमन सव्‍‌र्हिस’ने असे उद्धृत केले आहे की दोन माणसांमध्ये सहा फुटांचे अंतर असते आणि त्या दोघांनीही मुखपट्टी घातलेली असते तेव्हा त्यांच्यामध्ये कोविड १९ च्या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता जवळपास नसते.

या अभ्यासानुसार या दोन्ही माणसांनी मुखपट्टी घातलेली असते तेव्हा त्यांच्यामध्ये संसर्ग होण्याचा धोका १.५ टक्के (कमी) असतो. बाधित नसलेल्या व्यक्तीने मुखपट्टीचा वापर केला असेल आणि त्याच्यासोबतच्या बाधित व्यक्तीने मुखपट्टीचा वापर केला नसेल तर संसर्ग होण्याचा धोका पाच टक्के (मध्यम) असतो. तर बाधित असलेल्या आणि बाधित नसलेल्या अशा दोन्ही व्यक्तींनी मुखपट्टी वापरलेली नसते तेव्हा संसर्ग होण्याचा धोका ९० टक्के (उच्च) असतो.

आणखी कोणत्या देशाने अशी शिफारस केली आहे का?

‘सीडीसी’ म्हणजे ‘सेंटर्स फॉर डिसिजेस कंट्रोल अ‍ॅण्ड प्रोटेक्शन’ या अमेरिकेच्या संस्थेने जवळपास अशीच शिफारस केली आहे. ‘सीडीसी’ म्हणते की दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचं अंतर असलं तरी त्यांनी मुखपट्टी वापरणं आवश्यक आहे. विशेषत: तुम्ही एखाद्या बंदिस्त ठिकाणी असता आणि आसपासच्या व्यक्ती तुमच्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्ती नसतात तेव्हा मुखपट्टी वापरणं आवश्यक आहे.

वृद्ध व्यक्तींनी त्यांच्या आसपास वावरणारे लोक त्याच घरात राहणारे नसतात, येऊन जाऊन करणारे असतात तेव्हा विशेषत: मुखपट्टीचा वापर केला पाहिजे यावर ‘सीडीसी’ने भर दिला आहे. याचा ठळक अर्थ असा की घरात कोणतीही नवीन व्यक्ती येते तेव्हा संसर्गाचा धोका टाळण्यासाठी आरोग्यदृष्टय़ा असुरक्षित व्यक्तीने मुखपट्टीचा वापर करण्याची गरज आहे.

सरकारच्या या माहितीव्यतिरिक्त असा कोणता अभ्यास, संशोधन आहे का ज्यात घरी किंवा बंदिस्त जागेतही मुखपट्टी वापरण्याचे फायदे नमूद केले आहेत?

होय, यासंदर्भात बीजिंगमध्ये राहणाऱ्या चिनी कुटुंबांचा अभ्यास करण्यात आला. ब्रिटिश मेडिकल जर्नल तो प्रसिद्ध करत आहे. या अभ्यासादरम्यान असं आढळून आलं की कोविड १९ च्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी घरात किंवा बंदिस्त जागेत मुखपट्टीचा वापर केला तर तो उपाय ७९ टक्के प्रभावी ठरतो. अर्थात हा वापर संसर्गाची लक्षणं दिसण्याआधी करणं अपेक्षित आहे.

या दरम्यान १२४ कुटुंबांमधल्या ३३५ व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला. त्यातून असं आढळलं की घरातच राहणाऱ्या व्यक्तीला घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तीच्या सततच्या, रोजच्या शारीरिक जवळिकीमुळे घरातूनच संसर्ग होण्याचं प्रमाण १८ पट जास्त होतं. घरातच राहणाऱ्या व्यक्तीला लक्षणं दिसण्याआधी संबंधित व्यक्तीने आणि घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तीने मुखपट्टीचा वापर करणं संसर्ग टाळण्यासाठी ७९ टक्के प्रभावी ठरलं आहे. घरातच राहणाऱ्या व्यक्तीने संसर्ग झाल्यानंतर मुखपट्टीचा वापर करणं फारसं संरक्षक ठरलं नाही.

फक्त सार्वजनिक ठिकाणीच नाही तर ज्यांना संसर्ग होण्याचा धोका आहे अशा व्यक्तींबरोबर घरामध्ये वावरतानादेखील मुखपट्टीचा वापर करण्याचीं आणि सहा फुटांचं अंतर राखण्याची सगळ्या जगाला गरज आहे हेच या निष्कर्षांमधून व्यक्त झालं आहे. त्याचबरोबर अलगीकरणात असलेल्या व्यक्तीचं कुटुंबं, आरोग्यसेवक हे सतत संसर्गाच्या धोक्याला तोंड देत असतात. त्यांच्या धोक्याचं प्रमाण कसं कमी करता येईल याचं मार्गदर्शनही या शिफारशींमध्ये आहे.

‘दी इंडियन एक्स्प्रेस’मधून