शैलजा तिवले

मार्चपासून जवळपास आठ महिने थैमान घातलेल्या करोना संसर्गाच्या तीव्रतेला ऑक्टोबरपासून जी उतरती कळा लागली ती नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत होती. परंतु आता पुन्हा रुग्णसंख्येत काही प्रमाणात होणारी वाढ, शिथिल झालेली टाळेबंदी, दिवाळीत गर्दीने ओसंडलेल्या बाजारपेठा, घटलेले चाचण्यांचे प्रमाण आणि वाढू लागलेली थंडी यामुळे अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन इत्यादी देशांप्रमाणे संसर्गाची दुसरी लाट आपल्याही उंबरठय़ावर येईल का असे भीतीचे सावट सर्वत्र निर्माण झाले आहे. परंतु ही भीती सर्वसामान्यांच्या आचरणात मात्र दिसत नाही. तेव्हा लाट येवो किंवा न येवो, सावधानता मात्र गरजेची आहे.

राज्यात ऑगस्टमध्ये दर आठवडय़ाला आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या जवळपास ७० ते ८० हजार होती. गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढून सप्टेंबरमध्ये एका आठवडय़ात सरासरी एक लाखाहून अधिक करोनाबाधितांची नव्याने भर पडत होती. या काळात दर दिवशी जवळपास २४ हजार रुग्णांचे नव्याने निदान होत होते. सप्टेंबरचा हा कालावधी करोना लाटेचा उच्चांक ठरला होता. त्यानंतर मात्र हा आलेख झपाटय़ाने घसरत गेला तो ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात थेट पाच ते सहा हजारांवर स्थिरावला. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात तो चार हजारांखालीदेखील उतरला. देशभरातही साधारणपणे हीच स्थिती होती. सप्टेंबरमध्ये दर दिवशी आढळणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास ८० ते ९० हजारांच्या घरात होती. उत्तरोत्तर यात घट होत नोव्हेंबरमध्ये रुग्णवाढ ४० ते ५० हजारांपर्यंत स्थिरावली आहे.

चाचण्यांमध्येही घट

ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ापासून राज्यातील चाचण्यांच्या संख्येत घट झाल्याचे नोंदवले गेले. सप्टेंबरमध्ये जवळपास दर दिवशी ८० ते ९० हजारांवर गेलेले चाचण्यांचे प्रमाण नोव्हेंबरमध्ये तर ६० हजारांपर्यंत घसरले. दिवाळीच्या आठवडय़ात तर यात आणखीनच घट झाली. दिवाळीच्या दिवसांमध्ये हे प्रमाण २० ते २५ हजारांपर्यंत खाली आले होते. परिणामी रुग्णनिदानाचे प्रमाण या दिवसांत जवळपास निम्म्याने कमी झाले होते.

नोव्हेंबरमध्ये घटलेल्या रुग्णसंख्येच्या आलेखावरून ‘करोना संपुष्टात आला’ अशा भ्रामक समजुतीमध्ये सर्वत्र खुला वावर सुरू झाला. त्यातच आलेल्या दिवाळीच्या खरेदीसाठी सर्वच ठिकाणी बाजारपेठा गर्दीने खचाखच भरल्या. एसटी, बससारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू झाल्याने शहरात, गावांत राज्यातील तसेच इतर राज्यांतील नागरिकांची ये-जा वाढली. प्रार्थनास्थळे खुली केली गेली. यात प्रामुख्याने मुखपट्टी वापरासह सर्वच सुरक्षा नियम धाब्यावर बसवले गेले. त्यामुळे काही अंशी का होईना नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात राज्यातील रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा उंचावला आहे.

रुग्णसंख्येत काही अंशी वाढ?

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात दर दिवशीची रुग्णसंख्या जवळपास चार ते पाच हजार नोंदली जात होती. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात चाचण्यांमध्ये घट झाल्याने रुग्णसंख्येचे प्रमाणही कमी नोंदले गेले. दिवाळीच्या आठवडय़ात ते आणखीनच कमी झाले. चाचण्या वाढविण्याचा धोशा केंद्र सरकार आणि करोना कृती दलाने लावल्याने नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ापासून पुन्हा दर दिवशी चाचण्यांची संख्या ९० हजारांपर्यंत पोहोचली आहे. त्या तुलनेत आढळणाऱ्या रुग्णांची संख्याही पुन्हा सहा हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे चाचण्या वाढविल्याने रुग्णसंख्या वाढली की संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला हे अजून तरी अस्पष्ट आहे.

बाधितांचे प्रमाण सहा टक्क्यांवर

दर दिवशी केल्या जाणाऱ्या चाचण्या आणि आढळलेले बाधित रुग्ण हे प्रमाण सप्टेंबरमध्ये २० टक्क्यांवर होते. ऑक्टोबर १८ टक्क्यांवर आले. नोव्हेंबरमध्ये यात मोठी घट झाली असून ते केवळ सहा-सात टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. हे प्रमाण पाच टक्क्यांहूनही खाली यायला हवे, असे राज्य कृती दलाने सूचित केले आहे.

पुढील १५ दिवसांत रुग्णवाढीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता

गणेशोत्सवानंतर १५ दिवसांत रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढली हे आपण अनुभवले. तुलनेत मुंबईची रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढली नसली तरी इतर जिल्ह्य़ांत मात्र नक्कीच वाढत आहे. तसेच मृत्युदरही मुंबईपेक्षा इतर जिल्ह्य़ांमध्ये वाढत आहे. त्यामुळे संसर्गाची तीव्रता कितपत वाढेल हे पुढील १५ दिवसांत समजू शकेल, असे मृत्यू लेखा परीक्षण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले. राज्यात ही स्थिती असताना केरळ, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, गुजरात येथील रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाटय़ाने वाढत आहे. देशभरात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राची दर दिवशीची रुग्णसंख्या आणि केरळ, दिल्लीची रुग्णसंख्या जवळपास समान नोंदली जात आहे.

करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मुक्तपणे सुरू झालेला वावर आणि वाढलेली थंडी यामुळे अमेरिकेसह, युरोपात (इटली, जर्मनी) दुसरी लाट सुरू झाली आहे. आधीच्या लाटेपेक्षा तीव्र असलेल्या या लाटेमध्ये अमेरिकेत दर दिवशी आढळणाऱ्या रुग्णांची संख्या दीड लाखांहून अधिक आणि मृतांची संख्या दोन हजारांवर पोहोचली आहे. या पाश्र्वभूमीवर राज्यातील रुग्णसंख्या ओसरत आली तरी ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यातही दुसरी लाट येण्याच्या धोक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. हिवाळ्यात या विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता अधिक आहे. अमेरिका, फ्रान्स, नेदरलॅण्ड्स या देशांमध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेत थंडी हादेखील महत्त्वाचा घटक आहे. आपल्या देशातील थंडीत त्या तुलनेत फरक असला तरी तीव्र हिवाळ्याच्या प्रदेशांत विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यासह तापमानात घट होणाऱ्या भागांत संसर्गाचा धोका हिवाळ्यात वाढणार असल्याचे करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

उन्हाळ्यात उष्ण हवा हलकी असल्याने प्रदूषित घटक हवेसोबत उंचावर जातात आणि प्रदूषणाचे प्रमाण कमी राहते. हिवाळ्यात याविरुद्ध प्रक्रिया होते. हवेतील आद्र्रता कमी होऊन कोरडी होते. रात्री आणि पहाटे धूर आणि धूलिकण जमिनीलगतच हवेत राहतात. यामुळे प्रदूषणात वाढ होते. परिणामी श्वसनाचे विकार थंडीत अधिक बळावण्याची शक्यता असते. साधारणत: दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात १० अंश सेल्सियसपेक्षा अधिक फरक असेल तर माणसाला जास्त थकवा जाणवतो. त्याची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे अशा परिस्थितीत विषाणूमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढते. दिल्लीमध्ये रुग्ण वाढण्याची हीच करणे आहेत.

दुसऱ्या लाटेसाठी आरोग्य विभाग सज्ज

दुसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी म्हणून आरोग्य विभागाने नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच पूर्वतयारी सुरू केली आहे. चाचण्यांवर अधिक भर देणे हा यातील महत्त्वाचा भाग. यामुळेच आता दर दिवशीचे चाचण्यांचे प्रमाण ९० हजारांपर्यंत पोहोचले आहे. किराणा दुकानदार, दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, छोटे-मोठे व्यावसायिक, सार्वजनिक वाहतूक कर्मचारी इत्यादी ज्यांचा लोकांशी वारंवार संपर्क येतो, अशा वर्गातील लोकांच्या चाचण्या प्राधान्याने केल्या जात आहेत.

किमान ५० टक्के औषधसाठा उपलब्ध

करोनाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या काळात आवश्यक असलेल्या औषध आणि इतर सामुग्रीच्या किमान ५० टक्के औषधे नेहमी उपलब्ध राहतील, याची दक्षता रुग्णालय आणि जिल्हा किंवा महानगरपालिका स्तरावर घ्यावी. तसेच पुढील १५ दिवसांचा साठाही करून ठेवावा, असे आदेशही आरोग्य विभागाने दिले आहेत.

अतिजोखमीच्या व्यक्तींची तपासणी

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’अंतर्गत नोंद झालेल्या अतिजोखमीच्या व्यक्तींची यादी उपकेंद्र आणि वॉर्ड स्तरावरील आरोग्य कर्मचाऱ्यांना देऊन त्यांची दर आठवडय़ाला तपासणी करण्याच्या सूचना केल्या आहेत.

संसर्ग नियंत्रणासाठी क्षेत्रीय पातळीवर पथके

मोठय़ा संख्येने रुग्ण घरगुती विलगीकरणातील असून त्यांची देखरेख करण्यासाठी जिल्हा आणि पालिका पातळीवर सूक्ष्मनियोजन करावे. रुग्णसंख्या कमी झाली तरी निकट सहवासितांचा सखोल शोध आणि तपासण्या कराव्यात. वृद्धाश्रम, स्थलांतरित मजूर वस्ती, औद्योगिक वसाहती इत्यादी प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी विशेष लक्ष द्यावे. यासाठी उपकेंद्र आणि वॉर्डस्तरावर पथके कार्यरत करावीत, असे सूचित केले आहे.

उपचारांच्यादृष्टीने पुन:प्रशिक्षण

करोना साथीच्या सुरुवातीच्या टप्प्यात उपचारांच्या दृष्टीने प्रशिक्षण घेतले असले, तरी दरम्यानच्या काळात नव्याने समोर आलेल्या बाबी, वैद्यकीय उपचार नियमावलीतील बदल या अनुषंगाने पुन:प्रशिक्षण घेण्याचे आदेशही विभागाने दिले आहेत.

दिल्ली, राजस्थान, गोवा, गुजरात या राज्यांतील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन येथून रेल्वे, रस्ते, हवाई मार्गाने शहरात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. परंतु यात नियोजनाचा अभाव असल्याने पहिल्या दिवसापासून प्रवाशांच्या रांगा लागल्या आहेत. दिल्लीचे प्रवासी बेंगळूरुमधून प्रवेश करू शकतात इत्यादी पळवाटांचाही यात विचार केलेला नाही. र्निबध आणले तरी संसर्ग प्रसार रोखला जाईल का, याबाबत शंका उपस्थित होत आहेत.

सर्वाधिक सक्रिय रुग्ण

राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण सध्या पुण्यात (१८,४०२) असून त्या खालोखाल ठाणे (१५,३४४), मुंबई (१३,७३४) आणि अहमदनगर (४,०१७) येथे आहेत.

मृत्युदर कमी करण्याचे आव्हान

रुग्णसंख्येत सप्टेंबरपासून घट होत असली तरी आठवडय़ाचा मृत्युदर दोन ते अडीच टक्क्यांदरम्यान स्थिरच आहे, तर एकूण मृत्युदर २.६ टक्के आहे. मृत्युदर एक टक्क्याखाली आणणे हे आरोग्य विभागासाठी आव्हानात्मक ठरले आहे. मोठय़ा रुग्णालयांमध्ये नियमावलीनुसार उपचार दिले जात असले तरी अद्यापही द्वितीय आणि तृतीय स्तरांवरील रुग्णालयांत मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीची गरज आहे. मृत्युदर कमी करण्यासाठी म्हणून आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. करोना कृती दल आणि मृत्यू लेखापरीक्षण समितीने सूचित केल्याप्रमाणे ज्या रुग्णालयांमध्ये मृत्युदर अधिक आहे त्या ठिकाणी रुग्णालय स्तरावरच मृत्यू लेखापरीक्षण समिती नेमण्याचे आदेश विभागाने दिले आहेत. या रुग्णालयांना कृती दलाकडून मार्गदर्शनही केले जाणार आहे.

आजही शहराची काही प्रमुख ठिकाणे सोडली तर राज्यभरात कोठेही मुखपट्टीचा वापर केला जात नाही. लग्नसमारंभांपासून सर्वच कार्यक्रमांतील उपस्थितांच्या संख्येवर कोणतीही बंधने राहिलेली नाहीत. बंधने असलीच तरी ती नावापुरती आहेत. मुखपट्टी वापरली तरी ती बहुतांश वेळा नाकाच्या खालीच असते. संसर्गप्रसार रोखण्यासाठी साम, दाम, दंडाचा राज्य सरकार वापर करत आहे. नियमांचे पालन न झाल्यास पुन्हा टाळेबंदीचा विचार करण्याचा इशारा मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु भीतीपेक्षा जनतेला याचे गांभीर्य समजणे आणि त्यानुसार वर्ततान बदल होणे गरजेचे आहे.

रुग्णालयांचे व्यवस्थापन

दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने रुग्णालयांचे व्यवस्थापन करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्य़ांना दिल्या आहेत.

  • बाधित सात टक्क्यांपेक्षा कमी : जिल्हा आणि पालिका स्तरावर किमान पाच ते सात करोना रुग्णालये
  • बाधित सात ते दहा टक्के : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि प्रत्येक शहरी आणि तालुका विभागातील एक रुग्णालय करोना रुग्णालय
  • बाधित ११ ते १५ टक्के : आवश्यकतेनुसार आणखी २० टक्के करोना रुग्णालये कार्यान्वित करावीत.
  • बाधित १६ ते २० टक्के : विविध आजारांचे उपचार देणारी मल्टिस्पेशालिटी रुग्णालये करोनासाठी कार्यान्वित करावीत.
  • बाधित २० टक्क्यांहून अधिक : करोनासाठी या आधी निवडलेली सर्व प्रकारची रुग्णालये करोना उपचारांसाठी खुली करावीत. खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याच्या मुदतीलाही वाढ द्यावी.

एवढे लक्षात ठेवा

  • गर्दीच्या ठिकाणी किंवा समूहात असताना मुखपट्टीचा योग्य वापर करा.
  • हातांची व नेहमी स्पर्श होणाऱ्या पृष्ठभागांची नियमित स्वच्छता ठेवा.
  • सुरक्षित शारीरिक अंतराचे पालन करा.
  • सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान व थुंकणे टाळा.
  • अनावश्यक प्रवास टाळा.
  • वारंवार हात स्वच्छ करा.
  • समाजमाध्यमाचा गैरवापर म्हणजेच चुकीचे संदेश/ अफवा पसरवणे टाळा.
  • मानसिक ताण तणाव असल्यास नातेवाईक-मित्रांशी संवाद साधा आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.