Untitled-57

आयुष्यात किंवा करिअरमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर मोजूनमापून जोखीम घ्यायला शिकलेच पाहिजे. जितकी जास्त जोखीम तेवढा जास्त व लवकर उत्कर्ष हा व्यवस्थापनशास्त्रातील महत्त्वाचा नियम आहे. भविष्यातील नेतृत्त्व घडविण्यासाठी असेसमेंट सेंटर नावाचा एक प्रोग्राम असतो. त्यात इनडोअर व आउटडोअर गेम्स असतात. त्यातील एक आउटडोअर गेम तुमची रिस्क घेण्याची किंवा नवीन वाटा चोखाळण्याची क्षमता जोखतो. या खेळामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या रिबिन्स वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या असतात; त्यांच्यासाठी गुणदेखील असतात. उदा. निळ्या रिबिन्सला १० गुण, पिवळ्याला २०, लालला १००, हिरव्याला ५० वगैरे. सर्वात कमी गुण असलेल्या रिबिन्स सहज पोहोचता येतील अशा ठिकाणी असतात तर सर्वात जास्त गुण असलेल्या रिबिन्स अत्यंत अवघड ठिकाणी असतात. रात्रीच्या गडद अंधारात सर्वाना डोंगर कडय़ापाशी असलेल्या पठारावर नेण्यात येते. कमी गुणांच्या रिबिन्स जमिनीवर गवतामध्ये असतात, तर जास्त गुणाच्या रिबिन्स झाडाच्या उंच फांद्यांवर लटकवलेल्या असतात. काही कमी गुणांच्या रिबिन्स डांबरी रस्त्यांवर ठेवलेल्या असतात तर काही जास्त गुणाच्या डोंगराच्या माथ्यावर/ दरीमध्ये उगवलेल्या निवडुंगावर अडकवलेल्या असतात.
या खेळामध्ये चान्स, चॉईस आणि चेंज या त्रिसूत्रीवर म्हणजे थ्री- सी वर भर दिला जातो. आयुष्यात काहीतरी हटके करून दाखविण्यासाठी एखादी संधी घ्यावी लागते. एखादी संधी सोपी असते तर एखादी अशक्य वाटेल अशी. कोणती संधी निवडायची हे आपल्यावर असते. संधी जितकी कठीण तितके मिळणार रिवॉर्डस् आकर्षक! कोणत्या संधीची निवड करायची व आपल्या जीवनात किती वेगाने बदल आणायचा हे त्रराशिक जुळले की यश मिळालेच समजा.
कधी कधी चाकोरीबा जीवनातून बाहेर पडले तरच नवीन पायवाटांची ओळख होते. त्यांच्यावरून जाताना मग नवीन सृष्टीची जाणीव होते. कधी कधी या पायवाटा शॉर्टकटचेदेखील काम करतात; ज्यायोगे हमरस्त्यावरून यशाकडे पोहोचायला जितका वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळात तिथे पोहोचणे शक्य होते. पण या वाटांवर काटे व दगड असतात. आव्हाने असतात. या पायवाटा उद्या इतरांसाठी हमरस्ता होण्याचे श्रेय आपल्याला मिळाले तर आपला नावलौकिक होऊ शकतो.
आज आपण अशाच काही यशोगाथा बघणार आहोत ज्या या पायवाटांच्या साक्षीदार आहेत.
बहादूर अली, मध्यप्रदेशमधील राजनंदगाव येथील एक तरुण; कुटुंबाचा पारंपरिक धंदा असलेल्या कुक्कुटपालन व्यवसायात आला. या धंद्यात फारसे काही हाती लागत नव्हते, पण नवनवीन क्षेत्रांशी मात्र ओळख वाढत होती. पोल्ट्री फीडमध्ये सोयाबिन एक प्रमुख घटक म्हणून लागते. बहादूर सोयाबिनयुक्त पोल्ट्री फीड आपल्या पक्ष्यांसाठी नियमितपणे खरेदी करत असे. त्याला जाणवले की पोल्ट्रीपेक्षा या सोयाबिन प्रोसेसिंगमध्ये जास्त नफा आहे. त्याने त्या दिशेने आपली वाटचाल सुरू केली व आज बहादूर, २२०० कोटींची उलाढाल असलेल्या इंडिया ब्रॉयलर ग्रुपचे मालक आहेत.
नंदकुमार चौधरी, राजस्थानमधील चुरू गावाचा निवासी; त्याला जाणवले की हाताने विणलेल्या जाजमांना परदेशी खूप मागणी आहे. त्याने हेदेखील पाहिले की चर्मकार लोक या कामामध्ये निष्णात आहेत. पण त्यांना आजही लोक जवळ करायला तयार नाहीत. समाज आपल्यावर रुष्ट होईल का याचा काडीमात्र विचार न करता नंदकुमार यांनी या लोकांशी संधान जुळविले. आज चर्मकार लोकांच्या कौशल्यामुळेच ‘जयपूर रग्स’ हाताने विणलेल्या जाजमांच्या निर्यातीमध्ये अव्वल ठरले आहे. याच नंदकुमारने आदिवासी महिलांना सोबत घेऊन आपले उद्योग साम्राज्य वाढविले आहे.
सी. व्ही. जेकब एकदा जपान फिरायला गेले होते. त्यांनी तिथे पाहिले की ओलियोरेझिन्सला (मसाल्यांचे द्रवरूप अर्क) जपानमध्ये प्रचंड मागणी आहे. स्वदेशी परतल्यावर त्यांनी ओलियोरेझिन्सबद्दलची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी म्हैसूरमधील सेंट्रल फूड टेक्निकल रिसर्च इन्स्टिटय़ूटशी संपर्क साधला व त्यानंतर त्यांनी स्वत:ची सिंथाइट (२८ल्ल३ँ्र३ी) नावाची कंपनी काढली. आज जेकब यांची ही कंपनी ओलियोरेझिन्स क्षेत्रात, जगातील सर्वात जास्त उत्पादन करणारी कंपनी ठरली आहे.
पी. सी. मुस्तफा एक सर्वसामान्य मुलगा! आर्यलडमध्ये असताना भारतीय संस्कृतीची व जेवणाची राहून राहून आठवण काढणारा मुस्तफा भारतामध्ये परतला तेव्हा कोणता व्यवसाय चालू करावा या विचारात होता. मुस्तफाचा एक भाऊ (शमशुद्दीन) गावातील दुकानांमध्ये डोशाचे तयार पीठ विकायचा तर दुसरा भाऊ बंगलोरमध्ये किराणामालाचे दुकान चालवायचा. मुस्तफाने या दोघांना बरोबर घेऊन, लोकांना उत्तम प्रतीचे व आरोग्यदायी वातावरणात तयार व वितरित केलेले इडली व डोशाचे तयार पीठ विकण्याचा धंदा चालू केला. आयडीफ्रेश (कऊा१ी२ँ) (इडली डोसा फ्रेश) या त्यांच्या उद्योगाने १०० कोटींचा जादूई आकडा पार केला असून, त्यांचे पीठ पार दुबईपर्यंत विकले जाते.
मुरिगन्थम यांना आपल्या समाजातील वंचित, गरीब स्त्रियांसाठी काहीतरी भरीव काम करायचे होते. त्यांना आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी बनवितानाच सुदृढ आरोग्यदेखील प्रदान करायचे होते. ही दोन्ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांनी स्वस्त, पण घरगुती पद्धतीने आरोग्यदायी सॅनेटरी नॅपकिन्स बनविण्याचे यंत्र विकसित केले. आज त्यांच्या जयश्री इंडस्ट्रीचा पसारा एवढा वाढला आहे की गावातील प्रत्येक महिलेकडे असे सॅनेटरी नॅपकिन्स बनविण्याचे यंत्र आहे ज्यायोगे त्यांना बारमाही रोजगार व स्वत:साठी आरोग्यदायी जीवन प्राप्त झाले आहे.
यातून काय दिसते तर बहादूर यांनी पोल्ट्री बिझिनेस की पोल्ट्री फीड यामधील एक चॉइस ठरविला. नंदकुमार यांनी बहिष्कृत लोकांना जवळ करायचा धोकादायक चान्स घेतला. तर मुरिगन्थम यांनी लोकांचे आर्थिक व आरोग्य विश्व चेंज करण्याचा पर्याय निवडला.
थोडक्यात काय तर नवीन वाटा चोखाळा, आंधळे अनुयायी होण्यापेक्षा दूरदृष्टीवाले पथदर्शक बना.