17-lp-prashantएकदा पाच बोटांमध्ये भांडण सुरू झाले. विषय श्रेष्ठ होता कोण. अंगठा म्हणाला, ‘मी नसेन तर सगळेच अडेल. तुम्हाला बाण सोडता येणार नाही, लिहिता येणार नाही की अन्नाचा घास घेता येणार नाही.’ त्यावर दुसरे बोट (तर्जनी) म्हणाले , ‘मी नसेन तर तुम्हाला दिशा निर्देशनच करता येणार नाही. तुम्हाला लोकांना आदेश देता येणार नाही.’ त्यावर मध्यमा म्हणाली, ‘खरे तर मीच श्रेष्ठ. कारण विधात्याने म्हणूनच मला सर्वामध्ये उंच बनविले आहे.’ त्यावर अनामिका म्हणाली, ‘मलाच सर्व शुभ मानतात कारण साखरपुडय़ाची अंगठी माझ्यामध्येच शोभून दिसते, त्यामुळे मी सर्वश्रेष्ठ आहे यात वादच नाही.’ बिचाऱ्या करंगळीकडे सांगण्यासारखे काहीच नव्हते. तेव्हा एक संत म्हणाले, ‘अगं उदास होऊ  नकोस. जेव्हा देवापुढे नमस्काराला माणूस हात जोडतो तेव्हा अग्रभागी कोण असते? वेडे, तूच तर असतेस.’

आपल्या वैयक्तिक आयुष्यात किंवा कॉर्पोरेट विश्वातदेखील असाच एखादा कोणी तरी आत्मविश्वास गमावलेला माणूस हमखास आढळतो. तेव्हा त्याला धीर देऊन त्याला त्याची उजळ बाजू दाखवून देण्यात कौशल्य पणाला लागते.

बोइंग कंपनीमध्ये मेंटॉरशिप कार्यक्रमामध्ये याच पाच बोटांची कहाणी वापरली जाते. ‘विविध संकृतींमध्ये मिसळून जाऊन काम करणे म्हणजेच विविध लोकांना एकत्र घेऊन एकदिलाने काम करणे,’ या उक्तीवर बोइंग व्यवस्थापनाचा विश्वास आहे. अमेरिकन गोरे पुरुष म्हणजे श्रेष्ठ, असा एक पारंपरिक समज आहे, पण तो समज खोडून टाकण्यासाठी बोइंगने कंबर कसली आहे. त्यांना माहित आहे की भविष्यात पारंपरिक अर्थाने अल्पसंख्याक किंवा बुद्धिमत्तेमध्ये हीन समजल्या जाणाऱ्या वांशिक गटांमधील लोकांचे योगदान कंपनीमध्ये वाढत जाणार आहे. अशा वेळी त्यांचा आत्मविश्वास वाढविणारे किंवा त्यांना सक्षम बनविणारे प्रशिक्षण देणे जसे गरजेचे आहे तसेच त्यांच्यासोबत केला जाणारा भेदभाव नष्ट करणेही आवश्यक आहे. असे केल्याने बोइंगचाच फायदा होणार आहे, कारण महागडय़ा, गोऱ्या अमेरिकन मनुष्यबळाऐवजी स्वस्त आफ्रिकन, एशियन मनुष्यबळ प्राप्त झाल्याने स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहण्यास मदत होणार आहे. करंगळीला, ‘अगं, तूच तर आव्हानांचा गोवर्धन खऱ्या अर्थाने उचलू शकतेस’ हा आत्मविश्वास देण्याचा बोइंगचा प्रयत्न आहे; नाही का!

मेन्टॉिरग करताना कमी आत्मविश्वास असणाऱ्यांचा जसा विचार केला गेला पाहिजे त्याचप्रमाणे हुशार कर्मचाऱ्यांमधील दोष, त्यांचा आत्मसन्मान न दुखविता कशा प्रकारे दाखविण्यात येईल याचादेखील विचार केला गेला पाहिजे.

प्रसिद्ध डॉक्टर व माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख यांनी एका समारंभामध्ये त्यांच्या बालपणीची एक मजेशीर आठवण सांगितली होती. लहानपणी त्यांचे अक्षर खूपच खराब होते. शिक्षकांना प्रयत्नपूर्वक ते वाचावे लागत असे. पण त्यांचे शिक्षक त्यांना याबाबत कधीही ओरडले नाहीत; पण एके दिवशी त्यांनी लहानग्या स्नेहलताचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘तुझा फ्रॉक किती मस्त आहे, त्यावरची नक्षी किती सुंदर आहे, त्यामुळे तू आज खूप लोभस दिसत आहेस.’’ त्यावर स्नेहलता यांचे उत्तर होते, ‘‘ही नक्षी माझ्या आईने काढली आहे.’’ त्यावर शिक्षक म्हणाले, ‘‘तुझ्या वहीलापण आपण सुंदर दिसावे असे वाटत नसेल का? तिलादेखील तिचे कौतुक झालेले आवडणार नाही का?’’ लहानग्या स्नेहलताला इशारा कशाकडे हे कळायला वेळ लागला नाही. मग त्यांनी घरी रोज धूळपाटी गिरवून अक्षर सुधारले.

कधी कधी मेंटॉर तुम्हाला जगावेगळा विचार करायलादेखील भाग पाडतो. एकदा कंपनीमधील सर्व हुशार कर्मचाऱ्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. ‘गाडीमध्ये असलेल्या ब्रेकचा उपयोग कशासाठी करतात?’ या प्रश्नाची सर्वानी ‘अपघात होऊ  नये म्हणून वेळीच गाडी थांबविण्यासाठी’, ‘वेग कमी करण्यासाठी’, वगैरे वगैरे रुटीन उत्तरे दिली. एक अनुभवी मेंटॉर तिथे आले व ते म्हणाले, ‘‘तुम्ही सगळे असे नकारात्मक विचार का करता? ब्रेक असतात ते वेगाने आपले उद्दिष्ट (गंतव्य स्थान) सुरक्षितपणे गाठण्यासाठी.’’ यावर सर्व कर्मचारी गोंधळले. त्यांचा गोंधळ पाहून मेंटॉर हसले व म्हणाले, ‘‘आणीबाणीच्या वेळी आपल्या मदतीला ब्रेक आहेत हे माहीत असते, म्हणूनच आपण एक्सलरेटर दाबतो ना! म्हणजे ब्रेक हे आपल्या जोखीम घेण्यास मदत करतात.’’ मेंटॉर नेमके हेच करतात. आपल्या चेल्यांना ते जाणूनबुजून जोखीम घेण्यास प्रवृत्त करतात. ‘तुम्ही काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न करा; काही चुकले तर आम्ही तुम्हाला सावरायला आहोत’ असा आश्वासक संदेश ते आपल्या चेल्यांना देतात.

जोंबे (JOMBAY) चे मोहित गुंडेचा म्हणतात, ‘‘आमच्याकडे येणाऱ्या जोखीमभऱ्या नवीन कल्पना  मंजूर केल्या जातात. एखादी जोखीमभरी कल्पना नाकारायची असेल तर त्यासाठी किमान दोन पानांचे स्पष्टीकरण देणे बंधनकारक असते.’’ थोडक्यात काय तर मोहित हे ब्रेकचा वापर टाळण्यावर भर देणारे व्यक्तिमत्त्व आहे. मानसशास्त्राचा अभ्यास असणाऱ्या, हुशार मेंटॉर्सना माहीत असते की मानवी मेंदू हा नेहमी जोखमींना ओव्हर एस्टिमेट करतो तर संधींना अंडर एस्टिमेट. या सर्वाना हेदेखील माहीत असते की, कर्मचाऱ्यांनी चुका केल्याशिवाय नवीन संशोधन शक्य नसते. त्यामुळे ‘टॉलरन्स तो मिस्टेक’ हा आता कळीचा मुद्दा झाला आहे. ‘द इन्स्टिटय़ूशनल येस’ नावाच्या पॉलिसीअंतर्गत अमेझॉन कंपनीमध्येदेखील मेंटॉर्सच कशाला सर्व लीडर्सच कर्मचाऱ्यांना जोखीमभऱ्या कल्पना मांडण्यास पूर्ण स्वातंत्र्य देतात. यापुढे एक पाऊल टाकले आहे ते प्रॉक्टर एन्ड गॅम्बल कंपनीने. ‘हेरॉईक फेल्युअर’ नावाचे एक अवॉर्डच त्यांनी घोषित केले आहे. ज्या चुकीमधून एक वेगळाच सकारात्मक दृष्टिकोन पुढे आला अशा फसलेल्या योजनेला हे अवॉर्ड दिले जाते.

थोडक्यात काय तर मेंटॉर आत्मविश्वास नसलेल्या स्टाफला विश्वासाचे कवच देतात, स्टाफच्या आत्मसन्मानाला ठेच न पोहोचविता त्यांचे कान उपटतात व त्यासोबत चुका करण्यास प्रवृत्त करून त्यांना नवीन मार्ग शोधण्यास उद्युक्त करतात.
प्रशांत दांडेकर – response.lokprabha@expressindia.com