बऱ्याचदा तुमचा, जीवनाकडे बघण्याचा अ‍ॅटिटय़ूड तुमच्या करिअरची अल्टिटय़ूड (altitude -उंची) ठरवितो.

मनुष्याचे करिअर असो की एखाद्या उद्योग समूहाचे! त्या करिअरला झळाळी प्राप्त करून देण्यासाठी काही विशिष्ट खुबींची नितांत गरज असते. शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद व आत्मविश्वास असला की रेडीमेड यश नको वाटते, कोणाची मेहेरबानी घेण्यापेक्षा स्वत: काही भव्यदिव्य करून दाखवावे ही ऊर्मी अंगी असते; कोणीही डिवचल्यास त्याला आव्हान समजून निधडय़ा छातीने सामोरे जाण्याची जिद्द असते. मला काय म्हणायचे आहे ते पुढील दोन कथांवरून तुमच्या लक्षात येईल.

रस्त्यावर चणे विकणाऱ्या मुलाच्या शेजारी, एकदा एक आलिशान गाडी येऊन उभी राहिली. बालसुलभ स्वभावानुसार तो लहान मुलगा, सिग्नलपाशी उभ्या असलेल्या त्या गाडीला हात लावून त्या आलिशान गाडीचा फील घेऊ लागला. हे दृश्य पाहून त्या गाडीतील श्रीमंत माणसाने मुलाकडे तुच्छतेने कटाक्ष टाकत त्याला हाड्तुड करून पिटाळून लावले. पण मग काही वेळाने त्या माणसाला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला. त्याने सिग्नलपासून गाडी दूर नेऊन रस्त्याच्या कडेला उभी केली व त्या मुलाला जवळ बोलावून म्हणाला, ‘‘अरे, तुझ्या मळकट हाताने माझी गाडी मळली असती ना! ही गाडी माझ्या मोठय़ा भावाने वाढदिवसाची भेट म्हणून मला दिली आहे. मला माहीत आहे हे कळल्यावर तुझ्या मनात असेच विचार आले असतील ना, की मला पण असाच एखादा दिलदार मोठा भाऊ असावा.’’ त्यावर तो चुणचुणीत मुलगा म्हणाला, ‘‘साहेब नाही, मला तुमच्यासारखे नशीब नको, तर तुमच्या भावाचे नशीब हवे आहे, मला इतरांकडून फुकट घेण्यापेक्षा, लोकांना काही तरी अनोखे द्यायला जास्त आवडेल.’’

त्या श्रीमंत माणसाचे तोंड बघण्यासारखे झाले व तो पार ओशाळला. पण त्या मुलाच्या विचारसरणीला त्याने मनापासून दाद दिली व त्याच्या हातावर दहा रुपयांची नोट टेकविली; सोबतच ती भीक वाटू नये म्हणून त्या मुलाकडून चण्याची पुडीदेखील घेतली.

अगदी असेच काहीसे जमशेटजी टाटांच्या बाबतीत झाले होते. एकदा परदेशात असताना ते एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. पण हे हॉटेल फक्त गोऱ्या लोकांसाठीच आहे, काळ्या लोकांसाठी व कुत्र्यांसाठी नाही असा अपमान करून त्यांना हुसकावून लावण्यात आले. तेव्हाच टाटा यांनी पण केला की मी भारतामध्ये जाऊन असे आलिशान हॉटेल बनवेन की ज्यात काळ्या लोकांनादेखील तितकाच मान असेल, त्यांनादेखील तितकेच आदरातिथ्य मिळेल, ज्यात राहण्यासाठी तमाम भारतीयांना अभिमान वाटेल व सोबत गोरे लोकदेखील पाहुणचार झोडण्यासाठी खासकरून दूर-दूरवरून येतील. ताजमहाल हॉटेलची जन्मकथा ही अशी आहे.

करिअर करताना स्वत:च्या हितांसोबत, आपल्यासाठी राबणाऱ्या लोकांचे हित जपणेदेखील महत्त्वाचे असते. प्रसंगी आपले हित बाजूला सारून अशा लोकांचे हित जोपासणे, यात खऱ्या अर्थाने लीडरची परीक्षा असते.

आता त्या चणेवाल्या मुलाची पुढची कथा ऐकू या. त्या दहा रुपयांतून आज एक आइसक्रीम खावे असा विचार करून तो एका आइसक्रीम पार्लरमध्ये गेला. तिथे त्याने सर्वात मोठय़ा आइसक्रीम कपची किंमत विचारली. १५ रुपये किंमत ऐकल्याने त्याने मग मध्यम कपची किंमत विचारली, त्याची किंमत होती दहा रुपये. मुलाने मग छोटय़ा कपची किंमत विचारताच काउंटर कम सव्‍‌र्हिस बॉयने जरा घुश्शातच उत्तर दिले, ‘आठ रुपये. पण तू उगाचच टाइमपास करू नको. तुझ्याकडे पाच रुपये तरी आहेत का? नाहीतर चालता हो इथून.’’ मुलाने आठ रुपयांचा छोटा आइसक्रीम कप घेतला व पार्लरमधील एका टेबलावर बसून मोठय़ा आनंदाने त्याचा स्वाद घेतला. सव्‍‌र्हिस बॉयने बिल टेबलवर ठेवताच त्या मुलाने दहाची नोट टेबलवर ठेवली व पार्लर सोडले. चणेवाल्या मुलाचे ते कृत्य पाहून त्या सव्‍‌र्हिस बॉयला भरून आले. केवळ आपल्याला दोन रुपये टीप देता यावी म्हणून त्या मुलाने आइसक्रीमचा मध्यम कप न घेता छोटा कप घेतला हे पाहून त्याला स्वत:च्या वागण्यावर चीड आली तर त्या मुलाबद्दल आदर दाटून आला.

२६ नोव्हेंबर २००८ च्या हल्ल्यानंतर रतन टाटा यांचे असेच काहीसे वर्तन होते. दहशतवादी हल्ल्यामुळे ताज हॉटेलचे अतोनात नुकसान झाले होते. हॉटेल पुनर्बाधणीसाठी खूप निधी लागणार होता. हॉटेल ऑपरेशन बंद झाल्याने महसूल पण बंद होणार होता, ताजच्या कर्मचाऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी लागणार होती. अशा वेळी मिळणारा प्रत्येक रुपया आवश्यक होता तरी रतन टाटा यांनी त्यांचादेखील विचार केला; ज्यांची जबाबदारी रूढार्थाने त्यांच्या समूहावर नव्हती. दुसऱ्या स्रोताकडून येणाऱ्या महसुलाचा शंभर टक्के हिस्सा आपल्या गरजेसाठी न घेता, रतन टाटा यांनी त्यातला काही हिस्सा इतरांच्या आयुष्याच्या पुनर्बाधणीसाठी खर्च केला.

सी.एस.टी. स्टेशनवर मृत्युमुखी पडलेले लोक, पोलीस कर्मचारी, फुटपाथवरील पावभाजीवाला अशा सगळ्यांना रतनजी यांनी सहा महिन्यांसाठी दरमहा दहा हजार रुपये अशी घसघशीत मदत केली. म्हणूनच टाटा समूहामध्ये करिअर करायला लोक उत्सुक असतात. तसेच टाटा समूहाला समाजात आदराचे स्थान आहे.

आता त्या चणेवाल्या मुलाची कथा अजून जरा पुढे नेऊ या. याच मुलाने मग आपल्या बचतीच्या व हिमतीच्या जोरावर भविष्यात स्वत:चे कॉफी व आइसक्रीम पार्लर काढले. त्याच्या दुकानात एक अनोखे मेनू कार्ड होते. त्यात ‘कॉफी ऑन वॉल’ व ‘आइसक्रीम ऑन वॉल’ असे दोन पदार्थ होते. ग्राहक जेव्हा या मुलाच्या दुकानात यायचे तेव्हा त्यातील काही जण उत्सुकतेने या पदार्थाबद्दल विचारायचे. त्या आयटमबद्दल सविस्तर कळल्यानंतर, काही जण दोन कॉफी व एक कॉफी ऑन वॉल असे काहीसे ऑर्डर करायचे. ते ग्राहक मग दोन कॉफींचा आस्वाद घ्यायचे, पण तीन कॉफींचे पैसे देऊन निघून जायचे. मग मुलगा एक कॉफीचा स्टीकर पार्लरच्या एका भिंतीवर चिकटवायचा. एखादा निर्धन गरजू माणूस जेव्हा असा स्टीकर पार्लरच्या दर्शनी भागावर पाहायचा तेव्हा तो पार्लरमध्ये शिरून तो स्टीकर मुलाला द्यायचा व एक कप कॉफीचा आस्वाद पैसे न देता घ्यायचा.

समाजातील वंचित लोकांना, मानाने त्यांचा हक्क देण्याचा अनोखा प्रयोग या मुलाने केला होता. दानशूराला गुप्त दानाचा अनुभव व आनंद देणारा व याचकाला लाचारीपासून मुक्तता देणारा हा समाजसेवेचा प्रयोग, मुलाच्या पार्लरला सर्वदूर मशहूर करून गेला. यामुळे त्या मुलाचा बिझनेस व त्याच्या प्रति समाजात असलेला आदर, दोन्ही शतपटीने वाढला.

कॅपजेमिनी कंपनीमध्ये ‘कॉफी ऑन वॉल’चा फंडा वेगळ्या स्वरूपामध्ये अवलंबिला गेला आहे.. बेनेवोलन्स फंडच्या स्वरूपामध्ये. सर्व कर्मचाऱ्यांनी या फंडामध्ये स्वेच्छेने योगदान करायचे व जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याला मेडिकल इमर्जन्सी असेल तेव्हा त्याला या फंडातून अतिरिक्त निधी देऊन ऑफिसतर्फे यथोचित मदत करायची असे सरळ-साधे मानवतावादी सूत्र या योजनेमागे आहे. कठीण आर्थिक व भावनिक परिस्थितीमध्ये सापडलेल्या आपल्या सहकाऱ्याला अगतिक, लाचार होऊन मदतीसाठी दारोदार हात पसरत फिरावे लागू नये यासाठी केलेला हा उपक्रम कंपनीच्या इमेजला उजळवून टाकायला कारणीभूत तर झालाच आहे, सोबत कर्मचाऱ्यांना देखील कंपनीसाठी तन-मन-धन अर्पून काम करण्यास प्रवृत्त करायला कारणीभूत ठरला आहे.

थोडक्यात काय, तर तुमच्या डीएनएमध्ये स्वत:च्या कर्तृत्वावर साम्राज्ये उभी करण्याची ऊर्मी असू द्या, लोकांच्या हिताला आपल्या स्वत:च्या हितापेक्षा जास्त प्राधान्य देण्याचा दिलदारपणा असू द्या व सर्वात मुख्य म्हणजे समाजातील वंचितांसाठी गुप्त दान करण्याची मनीषा असू द्या; तुमचे करिअर मग खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी व येणाऱ्या पिढय़ांसाठी स्फूर्तिदायक, प्रेरणादायी ठरेल.
प्रशांत दांडेकर
response.lokprabha@expressindia.com