रुट कॉज अ‍ॅनॅलिसिस

तो व्हॅनिला आइस्क्रीम घेण्यास जायचा तेव्हा खरेदी करून परतताना त्याची कार हमखास बंद पडायची

39-lp-prashant-dandekarकरिअरमध्ये एखादी विचित्र समस्या आली की आपण त्यावर उपाय शोधू लागतो. पण करिअरमध्येही तोच यशस्वी होऊ शकतो ज्याला मूळ समस्या कोणती व समस्येची लक्षणे कोणती यातील फरक लवकर कळतो.

एकदा एक ग्राहक, जनरल मोटर्स कंपनीमध्ये एक अनोखी तक्रार घेऊन आला. तो व्हॅनिला आइस्क्रीम घेण्यास जायचा तेव्हा खरेदी करून परतताना त्याची कार हमखास बंद पडायची, पण मँगो, बटरस्कॉच, स्ट्रॉबेरी हे फ्लेवर घेताना नीट सुरू व्हायची. ग्राहक तक्रार कक्षाने ही तक्रार खरे तर हसण्यावारी नेली, पण ग्राहकाचे मन राखण्यासाठी त्यांनी एका टेक्निशिअनला सोबत पाठविले. ती कंपनी शोरूम एका हिल स्टेशनच्या पायथ्याशी होती व त्या शोरूमपासून एक कि.मी.च्या अंतरावरच आइस्क्रीम पार्लर होते. संबंधित टेक्निशिअनने तिथून व्हॅनिला आइस्क्रीम घेतले व गाडी परत शोरूमकडे आणण्यास सुरू केली, ती नेहमीप्रमाणे चालू झाली. ग्राहक अचंबित झाला. टेक्निशिअनने मात्र ‘हे येडं कुठून आलं आपलं डोकं खायला’ असा कटाक्ष टाकला. ग्राहक त्याची गाडी घेऊन हिल स्टेशनच्या माथ्यावर आपल्या घरी परतला. त्यालादेखील नवल वाटले की आपण या पार्लरमध्ये आइस्क्रीम घ्यायला येतो तेव्हा आपली गाडी मात्र हमखास बंद पडते.

ग्राहकाने या घटनेनंतर परत एकदा रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर व्हॅनिला आइस्क्रीम आणण्याचे ठरविले. तो दहा वाजता गाडी घेऊन माथ्यावरून पायथ्याशी आला. त्याने त्याच पार्लरमधून व्हॅनिला आइस्क्रीम घेतले. पण परतत असताना परत त्याची गाडी नेहमीप्रमाणे बंद पडली. तो परत तक्रार घेऊन शोरूममध्ये गेला. आधीच्या टेक्निशिअनला या ग्राहकाला अटेंड करण्यात बिलकुल स्वारस्य नव्हते. पण श्रेयस ही तक्रार सोडवायला स्वत:हून तयार झाला.

श्रेयस त्या रात्री शोरूममधील काम संपल्यावर ग्राहकाच्या घरी गेला. तो तिथे दोन रात्री राहणार होता. पहिल्या रात्री त्याने ग्राहकासोबत बटरस्कॉच फ्लेवर आणला. त्यावेळी ग्राहकाची गाडी व्यवस्थित स्टार्ट झाली. दुसऱ्या दिवशी त्याने व्हॅनिला फ्लेवर आणला तेव्हा मात्र गाडी बंद पडली. श्रेयसच्या लक्षात आले की   खूप खप असलेला व्हॅनिला फ्लेवर पार्लरच्या दर्शनी भागात असल्याने तो घेऊन, पैसे चुकते करून श्रेयसला परत गाडीपर्यंत यायला दहा मिनिटे लागली तर बटरस्कॉच किंवा अन्य फ्लेवर अंतर्भागात असल्याने ते घेऊन यायला त्याला १८ मिनिटे वेळ लागला होता. श्रेयसने हे पण वाचले होते की उंचीवर इंधनाचा बॉयलिंग पॉइंट कमी होत असल्याने ते लवकर द्रवरूपातून वायुरूपात रूपांतरित होते. आता श्रेयसला हळूहळू मिसिंग लिंक मिळत होती. माथ्यावरून पायथ्याशी जाईपर्यंत ग्राहकाच्या गाडीचे इंजिन याच कारणामुळे लवकर तापत होते. त्यामुळेच व्हेपर लॉकची समस्या येऊन गाडीच्या फ्युएल पंपमध्ये समस्या येत होती. इतर फ्लेवर घेऊन परत येईपर्यंत वेळ लागत असल्याने तापलेले इंजिन थंड व्हायला पुरेसा वेळ मिळत होता, पण व्हॅनिला फ्लेवर घेताना इंजिन थंड होण्यास पुरेसा वेळ नव्हता व गाडी बंद पडत होती. श्रेयसने असे ‘रूट कॉज अ‍ॅनालिसिस’ करून ग्राहकाची वाहवा मिळविली.

असेच काहीसे फेर्योसिओ लेम्बोर्गिनो या ग्राहकाबद्दल झाले होते. या गृहस्थाने ट्रॅक्टरनिर्मितीतून रग्गड पैसा कमावला होता. त्याने आलिशान फेरारी घेतली होती. पण ही फेरारी एका विशिष्ट वेगमर्यादेनंतर बंद पडायची. त्याने अनेकदा तक्रार नोंदवली होती, पण उपयोग होत नव्हता. स्वत: मेकॅनिक असल्याने एकदा त्याने फेरारी गाडी डिसेम्बल केली. त्याला आश्चर्य वाटले की त्याच्या ट्रॅक्टर व फेरारीमधील क्लचचे डिझाइन जवळजवळ सारखेच आहे. त्यामुळे अतिवेग घेतल्यावर फेरारीमधील क्लच जागेवरून निसटायचा. त्याने आपले निरीक्षण फेरारी कंपनीला कळविले. पण कंपनीने उत्तर दिले, ‘तुम्ही ट्रॅक्टर चालविण्याच्याच लायकीचे आहात, तुम्हाला फेरारी कशी हाताळतात हे कळतच नाही.’ लेम्बोर्गिनो याने मग शास्त्रीय विश्लेषण करत नवीन क्लच डिझाइन बनविले व फेरारीपेक्षा अतिवेगवान लेम्बोर्गिनो बनवून दाखविली, जी अत्युच्च वेग असतानाही टेक्निकली कधीच बिघडायची नाही.

म्हणून सांगतो करिअरमध्ये अशी अनेक माणसे आपल्याला भेटतील जी आपली समस्या झुरळासारखी झटकून देतील. अशा वेळी निराश न होता ती समस्या सुटेपर्यंत पाठपुरावा करत राहिले पाहिजे. कोणीही साथ देत नसेल तर हतबलता येऊ नये यासाठी आपल्याला स्वत: ‘रूट कॉज एनालिसिस’ करता आले पाहिजे.

कंपनीच्या उत्पादनांचा खप कमी होणे हे खरे तर लक्षण आहे, पण साध्या कुवतीचा मॅनेजर हीच समस्या समजून यावर उपाय करू लागतो. उदाहरणार्थ जाहिरातीचे बजेट वाढविणे, फ्री (एकावर एक) स्कीम्स आणणे वगैरे वगैरे. पण ज्याला ‘रूट कॉज अ‍ॅनालिसीस’ करता येते तो खप कमी का याचे विश्लेषण करेल. मग त्याला कळेल की ग्राहकांची पसंती बदलल्यामुळे उत्पादनाला उठाव नाही किंवा मालाची गुणवत्ता घसरल्यामुळे ग्राहक दुसऱ्या ब्रॅण्डकडे आकर्षित होत आहे किंवा सेल्स फोर्सला सेल्स कमिशन वेळेवर नीट मिळत नाहीय वगैरे वगैरे. यामागचं मुख्य कारण काय तर निधीची कमतरता. उत्पादनांमध्ये बदल करायचा किंवा नवीन उत्पादने आणायची तर ‘आर एंड डी’मध्ये पैसा गुंतवला पाहिजे, असेम्ब्ली लाइनमध्ये फेरफार केले पाहिजेत. उत्कृष्ट प्रतीचा कच्चा माल घेण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने, गुणवत्तेमध्ये तडजोड केली जाते; मग त्यामुळे फायनल प्रॉडक्टचे फिनिशिंग किंवा परफॉर्मन्स निकृष्ट होणारच, निधी नसल्याने सेल्स फोर्सचे हक्काचे कमिशन वेळेवर देता येत नाही हे सत्यदेखील सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ!

सुजाण मॅनेजर हा खरी समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय योजेल. खरी समस्या खेळत्या भांडवलाची आहे हे समजल्यावर तो जाहिरातीचे बजेट वाढविणे किंवा सेल्स स्कीमचे गाजर दाखविणे हे उपाय न करता एखादा तगडा भागीदार शोधेल ज्याच्याकडे राखीव निधी असेल, नवीन प्रॉडक्टची पेटंट असतील, ज्याचे सेल्स नेटवर्क तगडे असेल.

सारांश काय तर करिअरमधील असंख्य तुफानांमधून वाट काढत आपले गलबत, यशरूपी किनाऱ्याला सुखरूप पोहचवायचे असेल तर ‘रूट कॉज अ‍ॅनालिसिस’ला पर्याय नाही.
प्रशांत दांडेकर – response.lokprabha@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कॉर्पोरेट कथा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Root cause analysis

ताज्या बातम्या