पक्ष्यांचा राजा गरुडाचे आयुष्य ७० वर्षांचे असते, पण ४० वर्षे जगल्यानंतर त्याच्या आयुष्यातदेखील बॅड पॅच येतो. ज्या पंखांच्या ताकदीवर तो आकाशावर राज्य करत असतो, ज्या अणकुचीदार चोचीने व नख्यांनी तो भक्ष्य टिपत असतो, तेच अवयव त्याची साथ सोडू लागतात. त्याची चोच वाकडी होऊ लागते, पंख जड होऊ लागतात व नख्या बोथट होऊ लागतात. ज्या गरुडभरारीसाठी तो प्रसिद्ध असतो ती केविलवाणी होऊ लागते. भक्ष्याला त्याच्या चोच व नख्या यांची दहशत वाटेनाशी होते उपासमारीची वेळ त्या पक्षी राजावर येते, पण हार मानेल तो राजा कसा असेल? तो आपली बोथट झालेली चोच कातळावर परत परत घासून अणकुचीदार करतो; वाकडय़ा झालेल्या चोचीचा नकोसा भाग काढून टाकतो. ती अणकुचीदार करतो. त्या चोचीने तो बोथट झालेल्या नख्या उचकटून टाकतो. त्याला या वेळी प्रचंड वेदना होतात, पण त्यामुळेच नवीन धारदार नख्या उगवण्याचा मार्ग प्रशस्त होतो. नवीन चोचीच्याच मदतीने जुनी, जड पिसे खेचून काढतो. त्या जागी नवीन हलकी पिसे उगवू लागतात व गरुडभरारीचा तोच आब परत दिसू लागतो. हा जीवनसंघर्ष तब्बल १५० दिवस चालतो. हा संघर्ष उरलेली ३० वर्षे त्याचे राजेपद टिकवून ठेवण्यास पुरेसा असतो. गरुडासारखे वेळोवेळी स्वत:च्या कामगिरीचे मूल्यमापन करून त्यात सुधारणा केली तर करिअरमधील आपली गरुडभरारी अनंत काळासाठी ऐट मिरवू शकते. आपल्या कारभाराचे असेच काहीसे मूल्यमापन, भारतीय व परकीय (पाश्चात्त्य देशांतील) उद्योग क्षेत्रातील उद्योगपतींनी केले व आपल्या कोसळणाऱ्या आर्थिक साम्राज्याला वेळीच सावरले. गरुड जशी त्याची प्रमाणाबाहेर जड झालेली पिसे उचकटवून टाकतो त्याचप्रमाणे अनेक उद्योगपतींनी, नकोसे झालेले, तोटय़ात भर टाकणारे त्यांचे उद्योग विकून टाकून स्वत:चे आर्थिक साम्राज्य सुदृढ केले. जैन इरिगेशन उद्योग समूहाचे जैन यांनीदेखील इरिगेशन क्षेत्राशी संबंधित नसलेले आपले इतर उद्योगधंदे वेळीच विकून पुढील अनर्थ टाळला. स्टीव्ह जॉब्स अॅपलचे सीईओ झाले तेव्हा कंपनीची परिस्थिती एकदम खस्ताहाल होती. त्यावर उपाय काढण्यासाठी स्टीव्हने कंपनीच्या चालू प्रोजेक्ट्सची समीक्षा केली व त्यांची संख्या ३५० वरून ५० वर व नंतर १० वर आणली. नको असलेले प्रोजेक्ट्स बासनात गुंडाळून त्यांनी कंपनीच्या शेअर प्राइसला वर नेले. केम्बेल सुपचे सीईओ कोनांट यांनी जेव्हा कंपनीची सूत्रे हाती घेतली तेव्हा कंपनीने स्वत:चे बाजारमूल्य ५० टक्क्य़ांनी गमावले होते. याला कारण होते आधीच्या व्यवस्थापनाने उत्पादनांच्या वाढविलेल्या किमती. कोनांट यांनी जुन्या ३५० डेड वूड्सपैकी ३०० मॅनेजर्सना दूर हटवून नवीन विचारांच्या माणसांची भरती केली; ज्यांनी केवळ उत्पादनाच्या किमती वाढवून महसूल वाढविण्याच्या कालबाह्य़ ठरलेल्या रणनीतीवर विसंबून न राहता इतर रणनीती अमलात आणल्या व दहा वर्षांमध्ये केम्बेलला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. डाबर कंपनीनेदेखील नफ्यावर विपरीत परिणाम करणारा आयटी बिझनेस विकून टाकला. (आऊटसोर्स केला.) नको असलेले उद्योग, माणसे, डोईजड झालेले प्रोजेक्ट्स विकून टाकणे म्हणजे गरुडाने जड व जुनाट झालेली पिसे उचकटवून टाकण्यासारखेच कृत्य आहे. रिचर्ड क्लार्क यांनी मर्क कंपनीची धुरा हाती घेतली तेव्हा फार मोठे आव्हान त्यांच्या समोर होते. संधिवातावर उपाय असणारे कंपनीचे 'VIoxx' हे औषध हृदयविकार व त्यामुळे उद्भवणाऱ्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट झाले होते. हे औषध कंपनीच्या इमेजला अत्यंत अपायकारक ठरत होते. त्यामुळे क्लार्क यांनी या औषधाचे उत्पादनच बंद करण्याचा निर्णय घेतला. सोबत त्यांनी आठ नवीन औषधांची परवानगी घेण्यावर सर्व लक्ष केंद्रित केले. नको असलेला वाकडा झालेला चोचीचा भाग फेकून देणे व नवीन नख्या येण्यासाठी प्रयत्न करणे असेच काहीसे क्लार्क करत होते नाही का! हर्ले डेविडसन ही अमेरिकी कंपनी मोटार बाइक्सच्या क्षेत्रात कार्यरत असताना, तिला १९८९ मध्ये होंडासारख्या जपानी कंपन्यांशी स्पर्धा करावी लागली. यामुळे हर्ले डेविडसन तोटय़ात जाऊ लागली अशा वेळी रिचर्डस तिर्लिक यांनी कंपनीचा फोकस परत एकदा गुणवत्तेवर व ग्राहक सेवेवर आणला; जो मध्यंतरीच्या काळात नव्हता. हे म्हणजे गरुडाने स्वत:च्या नख्या व चोच परजण्यासारखेच होते नाही का? कॉन्टिनेन्टल एअरलाइन्सच्या गोर्डन यांना जाणवले की, त्यांची कंपनी गाळात रुतत आहे मुख्यत्वे करून तीन कारणांनी; ग्राहकांच्या तक्रारी, उशिरा होणारी उड्डाणे व वरचेवर गहाळ होणारे यात्री सामान. कंपनीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी गोर्डन यांनी ग्राहक व कर्मचारी या दोघांना प्रेरित व खूश करण्याचे ठरविले. कर्मचाऱ्यांसाठी इन्सेन्टिव्ह देऊन व ग्राहकांना मनाजोगती सेवा देऊन त्यांनी सुवर्णमध्य काढला. त्याचबरोबर नुकसानीत चालणारे हवाई मार्ग बंद करून त्यांनी कर्मचाऱ्यांवरचा खर्च आटोक्यात आणला. ग्राहकाभिमुखी सेवेशी कर्मचाऱ्यांचा इन्सेन्टिव्ह जोडला गेल्याने हे सर्व शक्य झाले. इथेदेखील नुकसानीत जाणारे मार्ग म्हणजे जड झालेली पिसे व ग्राहक व कर्मचारी म्हणजे चोच व नखे असा संदर्भ जुळविल्यास कंपनीची रणनीती समजणे सोप्पे होऊन जाते. कारण ग्राहक व कर्मचारी याच आयुधांच्या मदतीने प्रतिस्पर्धी कंपनीचा मार्केट शेअर बळकावता येऊ शकतो. व्हर्लपूल कंपनीचा ढासळता आर्थिक डोलारा सावरताना अरविंद उप्पल यांनीही दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित केले; कर्मचाऱ्यांचे मनोबल व उत्पादनांचे संशोधन, त्यामधील नावीन्य. प्रतिस्पर्धी कंपनीचा आवाक्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या कर्मचाऱ्यांच्या ‘प्रॉडक्ट इनोवेशन’ क्षेत्रातील प्रभुत्वावर अधिक फोकस दिल्यामुळे कंपनी तोटय़ातून नफ्यामध्ये आली. फिनिक्स पक्ष्यासारखी भरारी घेताना आपल्यातील अवगुण, कमतरता यांना बाजूला सारा व त्याच वेळी आपल्या बलस्थानांवर लक्ष केंद्रित करून ती अजून बळकट करण्याचा प्रयत्न करा. संधींच्या अवकाशात आपले साम्राज्य, मग परत एकदा डौलाने प्रस्थापित होईल. प्रशांत दांडेकर - response.lokprabha@expressindia.com