कॉर्पोरेट क्षेत्र व अध्यात्म म्हणजे दोन ध्रुव अशी एक सर्वसाधारण समजूत आहे. कॉर्पोरेट क्षेत्र म्हणजे भौतिक सुख, चंगळवाद, गळेकापू स्पर्धा, तर अध्यात्म म्हणजे मानसिक समाधान, परोपकार असे काहीसे ढोबळ विश्लेषण सामान्य माणूस करतो. त्यामुळेच मी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये अध्यात्माचे फंडे वापरतो हे कळल्यावर माझे अनेक मित्र संशयाने माझ्याकडे बघू लागतात. राम, कृष्ण, ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे हे सर्व जण कॉर्पोरेट सक्सेस स्टोरीचे भाग बनू शकतात, या गोष्टीवर विश्वास बसावा म्हणून आजचा हा लेखमालेतील शेवटचा लेख लिहिताना मला वाचकांना खूप काही सांगावयाचे आहे.

कॉर्पोरेट जगात यशस्वी व्हायचे असेल तर अहंकार बाजूला ठेवणे फार गरजेचे असते. निवृत्तीनाथ हे चार भावंडांमध्ये सर्वात मोठे होते. ‘मी’पणाची निवृत्ती झाली की मग मनुष्याला खऱ्या अर्थाने ज्ञानाचा साक्षात्कार होतो; म्हणून दुसऱ्याचे नाव ज्ञानेश्वर. ‘मी’च्या जागी जेव्हा ‘आम्ही’, ‘आपण’ हा शब्द वापरला जातो तेव्हा कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांना टीम वर्कची महती कळते. आम्ही सर्वानी मिळून केले, असे म्हटल्याने आपसूकच तुम्ही लाडके लीडर बनू शकता. लोकांसोबत कसे मिसळून काम करायचे याचे ज्ञान प्राप्त झाल्याने तुम्ही यशाचा सोपान सहज चढू लागता. तिसरे भावंड म्हणूनच ‘सोपानदेव’. कॉर्पोरेट लॅडर (शिडी) च्या प्रत्येक पायरीवर यश प्राप्त होऊ  लागले की, माणसाचा आत्मा सुखावतो. मग एक क्षण असादेखील येतो जेव्हा सर्व प्रकारचे यश उपभोगल्यावर स्वजाणिवेच्या (२ी’ऋ-ूं३४ं’्र९ं३्रल्ल) अवस्थेला माणूस पोहोचतो. यश हे दुसऱ्यासमोर काही तरी सिद्ध करण्यासाठी प्राप्त केले जात नाही, तर आत्मसंतुष्टीसाठी प्राप्त केले जाते. हळूहळू काहीच अप्राप्य न राहिल्याने मनुष्याचा आत्मा सर्व इच्छांपासून मुक्त होतो. धाकटे भावंड म्हणूनच ‘मुक्ता’. ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे म्हणूनच कॉर्पोरेट यशाचे पाठ नकळत शिकवून जातात.

राम व रावण, रामायणातील दोन प्रतीके; एक आयुष्यभर पुरुषोत्तम म्हणूनच पूजनीय राहिला, तर दुसरा पुरुषोत्तम असूनदेखील वाईट मार्गावर भरकटला गेल्याने निंदानालस्तीस प्राप्त ठरलेला. अध्यात्मात एक कथा नेहमी सांगितली जाते. एका माणसाला रस्त्यातून जात असताना रामाची व रावणाची अशा दोन दगडी मूर्ती  दिसतात. माणूस साहजिकच रामाची मूर्ती उचलून घरी घेऊन जातो व त्याची देव्हाऱ्यात पूजा बांधतो; पण त्याच माणसाला रस्त्यामध्ये रामाची दगडी मूर्ती व रावणाची सोन्याची मूर्ती दिसली, तर मात्र त्याला सोन्याची मूर्ती उचलण्याचा मोह होऊ  शकतो. कॉर्पोरेट क्षेत्रामध्येदेखील असे अनेक मोहाचे प्रसंग येऊ  शकतात जेव्हा आपण आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करून चुकीच्या पर्यायाची मुद्दामहून निवड करतो; क्षणिक फायद्यासाठी आपण कुसंगाशी संग करून आपल्या करिअरवर/ चारित्र्यावर डाग पडून घेतो. त्यामुळे हे वर्तन कटाक्षाने टाळले गेलेच पाहिजे.

राम व कृष्ण म्हणजे सर्वस्वी दोन भिन्न व्यक्तिमत्त्वे. राम नेहमी इतरांचा विचार करत राहिले. प्रत्येकाला खूश ठेवण्यासाठी त्यांनी स्वत:ला आत्मक्लेश करून घेतले. पित्याचे वचन खाली पडू नये म्हणून वनवास स्वीकारला, प्रजेच्या मताचा आदर करण्यासाठी पत्नीला दूर लोटले; पण कृष्णाने मात्र जे योग्य वाटेल तेच केले; त्यासाठी प्रसंगी नातेसंबंध पणाला लावले. आपल्या मोठय़ा भावाने म्हणजे बलरामाने, सुभद्रेचा (आपल्या बहिणीचा) हात दुर्योधनास देऊ  नये म्हणून अर्जुनालाच सुभद्राहरण करण्याचे सुचविले. कॉर्पोरेट क्षेत्रामध्येदेखील तुम्हाला ठरवावे लागते की, तुम्ही पीपल ओरिएंटेड आहेत की टास्क ओरिएंटेड. काही मॅनेजर सर्वाना खूश ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये स्वत:चे जिणे मुश्कील करून घेतात, तर काही जण वैयक्तिक संबंध बिघडले तरी बेहत्तर, पण आपणास पाहिजे तसेच काम करून घेतात.

कुरुक्षेत्रावर कृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. संजयच्या माध्यमातून ती धृतराष्ट्रापर्यंत पोहोचली; पण त्या उपदेशातून बोध घेतला तो फक्त अर्जुनाने; धृतराष्ट्राने नाही. कॉर्पोरेट क्षेत्रामध्येदेखील असेच काहीसे होते. अनायासे महत्त्वाचे मार्गदर्शन/सल्ला मिळत असतानादेखील काही जण त्याचे महत्त्वच ओळखू शकत नाही.

कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग हे फक्त गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये नाही, तर ते कॉर्पोरेट लाइफमध्येपण असतात. ऑफिसमध्ये एखादे नवीन काम आपल्या अंगावर टाकले गेले तर ते अंगावर झुरळ पडल्यागत झटकू नका. कर्मयोग म्हणून ते सकारात्मक वृत्तीने स्वीकारा. ते करताना आवश्यक ते कौशल्य, ज्ञान आत्मसात करा किंवा आपले जुने कौशल्य व ज्ञान यांचा उपयोग करा. ज्ञानयोगामुळे आपले काम सर्वोत्तम होते व त्या कामावर तुमची खास छाप पडते. ते काम वरिष्ठांकडे किंवा सहकाऱ्यांकडे सोपविताना पूर्ण भक्तिभावाने सोपविले, तर भक्तियोग साकार होतो. पूर्ण भक्तियोगाने काम सुपूर्द करणे म्हणजे काय, तर ते सोपविताना स्वत:ने प्राप्त केलेले ज्ञान दुसऱ्यांना हस्तांतरित करणे. त्या कामाच्या पश्चातदेखील लोकांना त्याबाबत काही शंका-कुशंका असल्यास त्यांचे निराकरण करणे, आपण केलेले काम समोरच्या व्यक्तीस आवडले आहे की नाही याची पूर्ण खात्री करून घेणे. आपण देवाला भक्तिपूर्वक नैवेद्य दाखवितो तेव्हा याहून दुसरे काय करतो? त्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये म्हणून आपण सर्वोत्तम जिन्नस निवडतो, चित्त व शरीराने पूर्णपणे पावन होऊन तो बनवितो व सरतेशेवटी तो मान्य करून घ्यावा, असे देवाला विनवितो. आपण केलेले काम हे वरिष्ठांसाठी एक प्रकारचा प्रसाद. तो चढवल्यावर वरिष्ठ संतुष्ट झाले तरच आपल्याला त्यांची कृपा प्राप्त होते. नाही का!

कॉर्पोरेट स्टोरीजच्या या शेवटच्या भागामध्ये अध्यात्म हा विषय निवडण्यामागचे कारण म्हणजे आपल्या महत्त्वाकांक्षेला अध्यात्माची जोड मिळाली तरच मिळणारे यश हे निर्भेळ असू शकते.        (समाप्त)

प्रशांत दांडेकर response.lokprabha@expressindia.com