सुनीता कुलकर्णी

करोना संसर्गाचा धोका बाजूला ठेवून आपल्याकडे लोकांनी दिवाळी साजरी केली आणि आता त्याचे परिणाम करोना संसर्गाच्या वाढत्या आकड्यांमधून दिसायला लागले आहेत. पण सगळेचजण आपल्यासारखे वागत नाहीत.
अमेरिकेत थँक्सगिव्हिंगचा सणही एरवी जोरदार साजरा केला जातो. पण यावेळी या सणाला एकमेकांना विशेषत नातवंडांना भेटता येणार नाही हे समजल्यावर टेक्सासमधल्या एका आजीआजोबांनी एक वेगळीच शक्कल लढवली. त्यांनी आपल्या आकाराचा कट आऊटच आपल्या नातवंडांना पाठवून दिला.

मिस्सी आणि बॅरी बुचानन यांची मुलगी कॅलिफोर्नियात राहते तर मुलगा टेक्सासमध्येच राहतो. दरवर्षी सगळं कुटुंब मुला-नातवंडांसह थँक्सगिव्हिंगच्या सणाला भेटतं आणि मौजमजा करतं. पण यंदाच्या थँक्सगिव्हिंगला करोनाच्या महासाथीमध्ये सुरक्षित राहण्याचा भाग म्हणून त्यांनी एकमेकांकडे जायचं नाही असं निर्णय घेतला होता. नातवंडांना भेटता येणार नसलं तरी त्यांच्यासाठी काहीतरी गमतीशीर आणि त्यांना अनपेक्षित, आनंदाचा धक्का देणारं काहीतरी करावं असं त्या दोघांनाही वाटत होतं.

मग त्यांनी आपल्या प्रत्यक्षातल्या आकाराएवढा आपला कट आऊट करवून घेतला आणि दोन्ही ठिकाणच्या नातवंडांकडे पाठवून दिला. कट आऊटच्या रुपातले आजीआजोबा बघून त्यांची नातवंडं जाम खूष झाली. इतर अनेकांनादेखील ही कल्पना आवडली.

त्याबद्दल समाजमाध्यमांवर लिहिलेल्या पोस्टमध्ये मेस्सी आणि बेरी म्हणतात, आमच्या कार्डबोर्ड कुटुंबात तुमचं स्वागत. थँक्सगिव्हिंगला एकत्र जमणं असुरक्षित वाटत असल्यामुळे आम्ही दोघांनी आमचा कट आऊट करून घेऊन टेक्सास आणि कॅलिफोर्नियामधल्या आमच्या नातवंडाना पाठवून दिला. आमच्या अनेक मित्र मंडळींना कोविडचा फटका बसला आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं आहे की आपण एकमेकांना प्रत्यक्ष न भेटताही आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे. अशा पद्धतीने आमचा कट आऊट पाठवून आम्ही आमचं नातवंडांवरचं प्रेम व्यक्त केलं आहे. आता या कट आऊटमुळ ती जणू काही आमच्या सहवासातच थँक्सगिव्हिंगचा आनंद साजरा करत आहेत असं आम्हाला वाटतं आहे.
मेस्सी आणि बेरीची ही कल्पना अनेकांना आवडली आहे आणि तिचं कौतुक केलं जात आहे.