डॉ. राधिका टिपरे – response.lokprabha@expressindia.com
सुशांत सिह राजपूत या तरुण अभिनेत्याच्या मृत्यूनंतर समाजात एक वादळ उठलं होतं.. इंग्रजीमध्ये पँडोराची पेटी उघडल्यावर काय घडते याची एक गोष्ट लहानपणी शिकल्याचे अंधूक आठवतं आहे.. सुशांत सिंहचा मृत्यूसुद्धा या पँडोराच्या पेटीप्रमाणेच सिनेमा वर्तुळात वावटळ घेऊन आला.. या मृत्यूचे गूढ उकलण्याच्या प्रयत्नात अशा काही गोष्टी समोर आल्या, की त्यामुळे ‘बॉलीवूड बॉलीवूड’ म्हणवल्या जाणाऱ्या सिनेमा उद्योगाचे स्वरूप लोकांसमोर उघडे पडले. या उद्योगात काम करणाऱ्या तरुणाईचे एक वेगळेच वास्तव लोकांसमोर आले. यातील किती तरुणाई गांजा, चरस, हशीश, कोकेन आदी नशिल्या पदार्थाच्या आहारी गेली आहे त्याचा अंदाज करता येत नाहीय. परंतु तरुणाईला लागलेला हा चस्का समाजातील फक्त या उच्चभ्रू वर्गापुरती मर्यादित नाही.

या निमित्ताने काही सेलीब्रेटीजमध्ये प्रचंड वाद झाले..आरोप-प्रत्यारोप झाले.. या गदारोळात हिमाचल प्रदेशबाबत एक विधान करण्यात आले, ते शब्दश: खरे आहे, हे मात्र कुणाच्या लक्षातच आले नाही. पण वस्तुस्थिती हीच आहे, की जगातील सर्वोत्तम प्रतीचे हशीश हे हिमाचल प्रदेशमधील एका लहानशा खेडय़ात पिकवले जाते. जगभरातील नशाप्रेमींमध्ये ‘मलाना क्रीम’ म्हणून प्रसिद्ध असलेले हे हशीश ‘काला सोना’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या, ९००० फूट उंचीवरील मलाना या गावात भांगेची लागवड केली जाते आणि त्यापासून तयार केलेले काळ्या रंगाचे हशीश हे जगातील अतिशय महाग हशीश म्हणून ओळखले जाते..

eid al fitr 2024 chand raat ramadan eid 2024 know the date and timings of eid al fitr moon sighting
१० की ११ एप्रिल, भारतात कधी दिसणार ‘ईद’चा चंद्र? भारतासह परदेशात कशाप्रकारे ठरवली जाते ‘ईद’ साजरी करण्याची तारीख?
Central Government Launches Dekho Apna Desh People s Choice 2024 Survey
देशातलं कोणतं पर्यटनस्थळ ठरणार सर्वांत लोकप्रिय? होणार ऑनलाइन मतदान!
trees Thane-Belapur industrial city
हरित पट्ट्याच्या मुळावर एमआयडीसी, २०० झाडांची कत्तल होणार, पर्यावरणवादी संस्थेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
India is the third most polluted country in the world What are the potential dangers of this
विश्लेषण : भारत जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश! यातून कोणते धोके संभवतात?

‘व्हिलेज मलाना रिपब्लिक’ म्हणून ओळखले जाणारे हे गावसुद्धा त्याच्या आगळ्यावेगळ्या पाश्र्वभूमीमुळे ‘कु’प्रसिद्ध आहे.. काही वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशमधील पार्वती नदीच्या खोऱ्यातील एका ट्रेकदरम्यान या गावाची माहिती मिळाली.. या गावाचे वैशिष्टय़, तिथे पिकवला जाणारा गांजा, त्यासाठी जगभरातून येणारे नशाबाज, तस्कर, त्या भागातील निसर्गरम्य, परंतु अतिशय लहान लहान खेडय़ात येऊन महिनोन्महिने मुक्काम ठोकणारे तरुण गांजाबहाद्दर हे सर्व काही स्वतच्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले.. त्यावेळी आपल्या देशातील कुणाला नावही माहीत नसलेले हे गाव भारताबाहेरच्या गंजेडी मंडळींना चांगलेच परिचयाचे होते.. कदाचित त्यावेळी आपल्याकडे ही विषवल्ली इतकी फोफावली नव्हती बहुधा.. पण या ट्रेकदरम्यान मलाना गावाबद्दल जी मिळेल ती माहिती गोळा केली होती.. कारण आमच्या ग्रुपबरोबर गाईड म्हणून काम करणारी दोन मुलं मलाना गावातील होती.

पार्वती नदीच्या काठावर, साधारणत: ६५०० फूट उंचीवर वसलेल्या कसोल गावात यूथ हॉस्टेलचा मोठा बेस कँप होता.. चंडिगढहून मनाली आणि मनालीहून भुंतर असा बसचा प्रवास केल्यानंतर पुढे लोकल बस पकडून कसोल या गावातील बेसकॅम्पवर पोहोचले होते. पार्वती नदीच्या खळाळत्या पाण्याचा प्रचंड जलौघ इतक्या वेगानं वाहत होता, की तिच्या घनगंभीर आवाजाचं पाश्र्वसंगीत सदैव कानावर पडत राहायचे. युथ हॉस्टेलच्या ‘मलाना किकसा यांकर पास’ या ट्रेकची सुरुवात या कसोल गावातून होणार होती.. हे मलाना गाव कसोलपासून १६ कि.मी. अंतरावर आहे. ‘मलाना नाला’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका ओढय़ाच्या काठावर गाव वसले आहे.. या मलाना नाल्यावर आता धरण बांधलेले आहे आणि मलाना गावापर्यंत सडकही झाली आहे..परंतु आम्हाला मलाना गाव ओलांडून चालतच आमच्या पहिल्या कॅम्पवर पोहोचायचे होते.. पण ट्रेक सुरू होण्यापूर्वीच युथ हॉस्टेलच्या कॅम्प कमांडरनी या खेडय़ाबद्दल इतक्या सूचना दिल्या होत्या, की ‘व्हिलेज रिपब्लिक’ म्हणून ओळखलं जाणारं मलाना गाव माझ्या मनात घर करूनच राहिलं होतं.

हे गाव स्वतला ‘स्वतंत्र, सार्वभौम खेडं’ मानतं.. भारतीय हद्दीत असूनही स्वतला भारतापेक्षा वेगळं आणि स्वतंत्र मानणारं हे लहानसं खेडं आहे.. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गावातील लोक भारताचे कायदेकानू पाळत नाहीत.. भारतीय पोलीस या गावात जाऊन कुठलीही कारवाई करू शकत नाहीत.. त्यांचे अधिकार वापरू शकत नाहीत. आपल्या कायद्याअंतर्गत भारत सरकार त्यांच्यावर कुठलीही कारवाई करू शकत नाही. भारतीय न्यायदानाच्या प्रक्रियेला ते जुमानत नाहीत. या गावातील अपवाद वगळता बहुतेक सर्व माणसं शिक्षण घेत नाहीत. त्यांची पंचायत, त्यांचे कायदेकानू, त्यांची भाषा, त्यांचा पेहराव हे सगळं काही वेगळं आहे. साधारण ९००० फूट उंचावर असणाऱ्या मलाना गावातील हे मलानी लोक स्वतला इतकं वेगळं मानतात, की इतर कुणीही त्यांना, त्यांच्या गावातल्या घरांना, मंदिरांना स्पर्श जरी केला तरी या लोकांना चालत नाही. चुकून असं काही घडलं तर ते त्यांच्या कायद्यानुसार त्या व्यक्तीला पकडून कैदेत ठेवतात.. त्याच्याकडून हवा तसा दंड वसूल करतात किंवा शिक्षा देतात. मलाना गावाबद्दल ही अशी माहिती कानी आल्यानंतर हे गाव पाहण्याची उत्सुकता अर्थातच वाढली होती.

आमच्या ट्रेकचा बेसक्रॅम्पसोल येथे असल्यामुळे या ठिकाणी अ‍ॅक्लमटायझेशनसाठी तीन दिवस मुक्काम होता. सर्व बाजूनी पहाडांनी वेढलेलं कसोल गाव अतिशय निसर्गरम्य आहे. घनदाट जंगल, उंच पर्वतराजी यामुळे शिवालिक पर्वतरांगांमधील एक थंड हवेचं ठिकाण म्हणूनही कसोल ओळखलं जातं. कुलू जिल्ह्यातील ‘मणीकरण’ या गरम पाण्याच्या नसíगक झऱ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणापासून कसोल केवळ पाच कि.मी अंतरावर आहे. मणीकरण येथे शिखांचा प्रसिद्ध गुरुद्वारा असल्यामुळे तसेही हे गाव शिखांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहेच, शिवाय तेथे शंकरपार्वतीचंही महत्त्वाचं मंदिर आहे.

कसोल गावातील या मुक्कामात मला काही गोष्टी ठळकपणे जाणवल्या.. या लहानशा गावात परदेशी तरुणतरुणींची प्रचंड गर्दी होती.. ही परदेशी तरुण मंडळी लहान लहान खोल्या भाडय़ाने घेऊन या गावात महिनोन्महिने मुक्काम करून राहतात. त्या चिमुकल्या गावात येऊन राहणारे हे आडदांड वाटणारे गोरे तरुण, त्यांचे एकंदरीतच हिप्पींना साजेसे बिनधास्त वागणे, त्यांच्याबरोबर असलेल्या अत्यंत कमी कपडय़ात वावरणाऱ्या तरुणी, हे सगळं पाहून त्यावेळी विचित्रच वाटले होते.. मात्र मलाना गावाबद्दल आणि तिथं पिकणाऱ्या काळ्या सोन्याबद्दल माहिती मिळाली आणि परदेशातून तरुण-तरुणींचे ग्रुपच्या ग्रुप इथे येऊन का राहतात त्याचा उलगडा झाला..

विशेष म्हणजे पर्यटक म्हणून येणाऱ्या या मंडळींवर कुणाचाही अंकुश नसल्याचे लक्षात आले होते. मात्र ही मंडळी केवळ आणि केवळ कसोलमध्ये सहजगत्या उपलब्ध असलेल्या काळ्या गोळीसाठी तिथे येत होते. हिमाचल सरकारचे या संदर्भात कुठल्याही प्रकारचे लक्ष नसावे असेच त्यावेळी स्पष्टपणे दिसून आले.

या गावात या परदेशी मंडळींना चरस, गांजा या गोष्टी हव्या तशा आणि स्वस्तात उपलब्ध होतात. इथे त्यांच्यावर कुणाचाही र्निबध नव्हता हे स्पष्टपणे जाणवत होते. परदेशातील ही तरुणाई अतिशय स्वस्तात खोल्या, घरं किंवा हॉटेलमधील रूम भाडय़ाने घेतात.. आणि मग दिवसरात्र चरसचा चस्का लावून पसे संपेपर्यंत राहतात. इतर देशांच्या मानाने भारतातील या लहानशा खेडय़ात राहणे त्यांना खूप कमी पशात शक्य होते. शिवाय हे खेडेगाव इतके दुर्गम आहे की भारत सरकारचे या गोष्टीकडे दुर्लक्षच होते.. त्यामुळे मादक पदार्थाचे सेवन केल्यानंतर अटक होण्याची त्यांना कसलीही भीती वाटत नाही.. चरस आणि गांजा कसोलमध्ये येते कुठून हा प्रश्न मनात येण्यापूर्वीच त्याचे उत्तर मिळाले होते.. ‘मलाना’ हे गाव..!

मलाना गावातील मलानी लोक या भांगेच्या झाडांची शेती करतात.. त्यापासून चरस आणि गांजा तयार केला जातो. भांगेच्या झाडांच्या परिपक्व पानांपासून चरसची गोळी तयार करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. त्यासाठी  या पानांचा रस हातावर चोळत राहावे लागते.. बराच वेळ पाने हातावर चोळल्यानंतर काळपट रसाचा चिकट काळा थर तळव्यांवर तयार होतो. तो सुकल्यावर हातावर जो काळ्या रंगाचा पदार्थ तयार होतो, तो म्हणजे चरस किंवा हशीश.. ‘हॅश’..! अगदी छोटय़ा छोटय़ा गोळीच्या स्वरूपात चरस तयार केला जातो. मात्र त्या छोटय़ाशा गोळीला प्रचंड मोठी किंमत मिळते.. कसोल हे गाव या चरसच्या विक्रीमुळे आता जगातील चरसींच्या परिचयाचे झालेले आहे..

मुबलक पसा मिळत असल्यामुळे या छंदीफंदी पर्यटकांना हव्या त्या सुविधा पुरवण्यासाठी इथली स्थानिक मंडळी आता तत्पर असतात. या परदेशी मंडळींच्या वास्तव्यामुळे साध्यासुध्या गोष्टींच्या किमतीसुद्धा कसोलमध्ये  पाचपट जास्त असल्याचे माझ्या लक्षात आले होते. बाहेरून येणाऱ्या या नशाबाज लोकांच्या येथील वास्तव्यामुळे आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये अत्यंत वाईट परिणाम दिसू लागले आहेत.. आजूबाजूच्या लहान लहान खेडय़ातील तरुण मुली देहविक्रीसारख्या गोष्टींना बळी पडताहेत.. परंतु त्यावर सरकारकडून काय कारवाई केली जाते याची कल्पना नाही..

कसोल गाव जगातील लोकांच्या नजरेत आलं, त्याला कारण ९००० फूट उंचीवर असलेल्या मलाना या गावात होणारी भांगेची शेती आणि त्यापासून बनणारे चरस..म्हणजेच ‘काला सोना’.. मलानी लोकांच्या ताब्यातील जमिनीवर हे लोक भांगेची शेती करतात.. सरकारदरबारी यावर बंदी आहे. पण हे मलानी लोक सरकारला जुमानतच नाहीत.. चोरून म्हणा किंवा बिनदिक्कतपणे म्हणा, भांगेची लागवड होतेच.. त्यातूनच चरस आणि गांजा याची बिनबोभाटपणे निर्मिती होते. भारत सरकारचे कायदे न मानणाऱ्या मलानींना पोलीस काही करू शकत नाहीत.. मात्र भारतीय सन्यातले जवान कधीमधी येऊन ही भांगेची शेती उद्ध्वस्त करून जातात.. पण हे काम फक्त नजरेसमोर दिसणाऱ्या शेतीच्या बाबतीत होते ..! वास्तवात घनदाट जंगलामध्ये डोंगररांगांच्या अत्यंत अवघड उतारावर, जिथे केवळ शेळ्या बकऱ्याच जाऊ शकतात अशा ठिकाणी हे मलानी खरी भांगशेती करतात.. त्याचा ठावठिकाणा त्यांच्याशिवाय इतर कुणालाच ठाऊक नसतो.. भांगेची शेती करून ‘काला सोना’ पिकवणारे मलानी परकीयांकडून हजारो डॉलर्सची घरबसल्या कमाई करतात.. परदेशी तरुण पर्यटक म्हणून येतात आणि जाताना डॉलर्स देऊन हे चरस खरेदी करून बरोबर घेऊन जातात.. कारण त्यांच्या देशात गेल्यानंतर हेच चरस त्यांना दसपट भाव देऊन विकता येते.. आणि आपल्या सरकारचे या गोष्टीकडे दुर्लक्षच होते आहे.. कारण हिमाचल प्रदेशच्या एका कोपऱ्यात वसलेले कसोल आणि दुर्गम उंचीवरील मलाना इथे घडणाऱ्या गोष्टी सरकापर्यंत पोहाचतच नाहीत.. चरस आणि गांजा ज्याला वीड असेही म्हणतात, याची निर्मिती अगदी राजरोसपणे चालते.. आणि ‘मलाना क्रीम’ म्हणून ओळखले जाणारे हे हशीश अतिशय उच्च दर्जाचे असल्यामुळे भारताबाहेर त्याची किंमत खूप जास्त आहे

आमच्या ट्रेकमधील योंगसो आणि दार्दू हे दोन कॅम्प मलानींच्या जागेतच होते. मला असे सांगण्यात आले होते, की मलानी लोक स्वतला ग्रीक योद्धा  ‘अलेक्झांडर दी ग्रेट’ याचे वंशज समजतात.. दिसायलाही ते भारतीयांपेक्षा थोडे वेगळे, कॉकेशीयन वाटतात. खुबुराम आणि बलराम ही मलानी मुलं युथ हॉस्टेलसाठी गाईडचं काम करत होती.. या मुलांशी बोलण्याचा मी प्रयत्न केला.. त्यांना मी अलेक्झांडरबद्दल विचारलं असता त्यांना काहीच सांगता आलं नाही.. त्यामुळे ही मंडळी खरोखरच अलेक्झांडरची वंशज आहेत की नाही याबद्दल काहीच कळले नाही.. या मलानी लोकांच्याबद्दल अनेक कथा-दंतकथा प्रचलित आहेत. त्यापकी एक जमदग्नी ऋषींशी संबंधित आहे. तुमचा देव कोणता असा प्रश्न या मलानींना विचारला असता  ‘जमदग्नी आणि रेणुकामाता’ यांची पूजा करतो असंच उत्तर सर्वाकडून मिळालं.. सुरुवातीला हे ‘जमलू’ किंवा ‘जमदग्नी’ म्हणजे काय प्रकार आहे तेच मला कळत नव्हते.. मग लक्षात आलं की जमदग्नीचा उच्चार हे लोक जदमग्नी असा करत होते..रेणुकामातेच्या संदर्भावरून हे लोक जमदग्नी ऋषी आणि रेणुकामाता यांना आपले पूर्वज मानून त्यांची पूजा करतात असा अंदाज काढता आला.. या लोकांची लग्न करण्याची पद्धतही वेगळी आहे. मलाना, रूमशू आणि रशोल या तीन खेडय़ांमध्ये हे मलानी विखुरलेले आहेत..यांचे बेटीव्यवहार या तीन खेडय़ांपुरते मर्यादित आहेत. मुली बाहेर दिल्या जात नाहीत व बाहेरून मुली आलेल्या चालत नाहीत.. पण आजकाल तरुण मुलं हिमाचली मुलींशी लग्न करतात. गावाबाहेरच्या मुलीशी लग्न करायचं असेल तर तिला पळवून आणावं लागतं.. तिला गावातच कुठंतरी दडवून तिच्याबरोबर रात्र घालवल्यानंतर मग गावचे पंच, मुखिया या लग्नाला मान्यता देतात.

ट्रेकवर जाताना वाटेत मलाना गाव लागते.. मात्र मलाना गाव ओलांडून जाताना ‘काय करायचे नाही..!’ याच्याबद्दल कॅम्पलीडरनी इतक्या सूचना दिल्या होत्या, की त्या सर्व सूचनांचे पालन करीत आम्ही सर्वजण अक्षरश मुकाटपणे, इकडे तिकडे न पाहता या गावची हद्द ओलांडली होती.. पण तसेही हे गाव इतकं गलिच्छ होतं, की तेथे क्षणभरही रेंगाळणं आम्हाला सोयीचं वाटलं नाही.. महिनोन्महिने आंघोळ न करणाऱ्या आणि सदैव ‘चरस’चा चस्का लावून वेगळ्या दुनियेत वावरणाऱ्या मलानींना स्पर्श करण्याची आमची कुणाचीच इच्छा नव्हती हा भाग वेगळाच..!

‘स्वतंत्र प्रजासत्ताक खेडं’ या संकल्पनेखाली हे मलानी लोक मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोगच करत आहेत असं या ठिकाणी नमूद करावं वाटतं.. चरस-गांजासारख्या नशिल्या पदार्थाचा व्यापार करणाऱ्या मलानींना खरंतर कायद्याच्या सोटय़ानेच वठणीवर आणायला हवे.. पण ते करण्यासाठी सरकार कधी पावलं उचलेल कुणास ठाऊक. पण काळ्या सोन्याच्या बळावर या लोकांच्याकडे अमाप पसा येतो.. हल्ली शिक्षण, सुविधा यांसाठी ते भारतसरकारची मदत घ्यायला तयार असतात, पण त्यांचे जगणे मात्र त्यांच्या स्वतच्या मर्जीनुसार आणि त्यांच्या पंचायतीच्या आदेशानुसारच चालते..!

हिमाचलमधील, कुल्लू जिल्ह्यातील कसोल आणि मलाना या गावांची ही ओळख मात्र माझ्या मनावर कायमची कोरली गेली होती हेच खरे.