भक्ती बिसुरे – response.lokprabha@expressindia.com
आजवर कधीही कल्पना न केलेले जग करोना महासाथीमुळे आपल्याला पाहावे लागले. कामधंदा बंद, मुलांच्या शाळा, मैदाने, बागा बंद, बाजारपेठा, उद्योग, वाहतूक सगळं काही ठप्प. करोना महासाथीतून मार्ग काढण्यासाठी नाइलाजाने किंवा मनाविरुद्ध का होईना, आपण र्निबध स्वीकारले. सरकारने घालून दिलेले नियम पाळले. रुग्णसंख्येतील चढउतारांसह कधी सैल तर कधी घट्ट होत जाणारा र्निबधांचा फास संयमाची परीक्षा पाहणारा ठरला. पण, जीव वाचवण्याच्या काळजी आणि भीतीने ते र्निबध सर्वानीच आपलेसे केले. ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या प्रकारामुळे आलेली तिसरी लाट आली तशीच वेगाने ओसरलीसुद्धा. त्यामुळे नाही म्हटले तरी सर्वसामान्य माणसांसह सरकार, यंत्रणा आणि प्रशासन या सगळय़ांना दिलासा मिळाला. तशातच, आता केंद्र सरकारने करोना प्रतिबंधासाठी घालून दिलेले र्निबध मागे घेण्याच्या सूचना राज्य सरकारांना दिल्या आहेत. दोन वर्षे सतत कमी- अधिक र्निबधांच्या सावटाखाली जगल्यानंतर र्निबध उठवले जाण्याची साधी शक्यताही अत्यंत चैतन्यदायी वाटावी, अशी स्थिती आहे. मात्र, संसर्ग आटोक्यात आलेला असला तरी करोना विषाणूतील उत्परिवर्तनांची प्रक्रिया ही पुढील काही काळ सातत्याने सुरू राहण्याची शक्यता आहे. वरवर पाहता अत्यंत सौम्य असलेला ओमायक्रॉनचा संसर्ग लसीकरण न झालेल्या आणि जोखीम गटातील रुग्णांसाठी गंभीर रूप धारण करणारा ठरला हे तिसऱ्या लाटेच्या काळात आपण पाहिले.

देशात सध्या असलेले करोना र्निबधही आता उठवण्यात यावेत अशा सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारांना दोनच दिवसांपूर्वी दिल्या आहेत. आसाम, तेलंगाणा, हरयाणा येथील राज्य सरकारांनी राज्यातील सर्व करोना र्निबध हटवले आहेत. त्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रात राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वाचे, विशेषत: व्यापार उद्योग क्षेत्राचे लक्ष लागलेले असणे साहजिक आहे.

यूपीएससीमध्ये मराठी यशवंतांच्या संख्येत घट
heat stroke patients maharashtra,
राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ७७ वर, मागील चार दिवसांमध्ये ३६ रुग्ण वाढले
Heat stroke, Maharashtra
राज्यावर उष्माघाताचे संकट! जाणून घ्या सर्वाधिक धोका कुठे वाढला…
maharashtra heatstroke marathi news, risk of heatstroke in maharashtra
उष्माघाताचा धोका वाढला! राज्यात १३ रुग्णांची नोंद; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक प्रकोप

या पाश्र्वभूमीवर खरोखरच र्निबधमुक्त होणे शक्य आणि सुरक्षित आहे का, याबाबत राज्यातील तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधला असता, स्वयंशिस्त असेल तरच र्निबध हटवणे योग्य असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. करोना महासाथीचा जोर ओसरला तरी त्याच्या संसर्गासह जगण्याची सवय करून घेणे यास आता पर्याय नाही. त्यामुळे लसीकरण आणि इतर प्रतिबंधात्मक उपाय अवलंबत आपले जगणे पूर्ववत करणे हाच उपाय सध्या दृष्टिपथात आहे.

मात्र, इतर राज्यांशी तुलना करता महाराष्ट्रातील करोना संसर्गाची तीव्रता सातत्याने गंभीर राहिली आहे. त्यामुळे इतर राज्यांतील निर्णय आणि महाराष्ट्रातील निर्णय यांची तुलना करणेही योग्य नाही, त्यामुळे राज्यात र्निबधमुक्तीची घाई नको , अशी भूमिका राज्यातील तज्ज्ञांनी घेतली आहे.  मुखपट्टीची सक्ती रद्द न करता, सर्व प्रतिबंधात्मक वर्तन कायम ठेवण्याचा आग्रह धरून  इतर र्निबध मागे घेणे हा पर्याय असू शकेल, असे तज्ज्ञांकडून सुचवण्यात आले आहे. राज्याचे करोनाविषयक तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले, इतर राज्यांनी केले म्हणून आपण आपल्या राज्यात तेच करावे असे नाही. महाराष्ट्रातील करोना साथीचे चित्र इतर राज्यांच्या तुलनेत कायम वेगळे राहिले आहे. त्यामुळे इतर राज्यांनी पत्करला म्हणून आपण धोका पत्करावा असे नाही. विषाणूचे संक्रमण अद्यापही आहे. डेल्टा हा दुसरी लाट निर्माण करणारा करोनाचा गंभीर प्रकार अद्याप अस्तित्वात आहे. लसीकरण न झालेल्यांमध्ये ओमायक्रॉनही गंभीर ठरल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संपूर्ण र्निबध उठवणे फार योग्य ठरणार नाही. संपूर्ण र्निबध उठवल्यास मास्क आणि इतर प्रतिबंधात्मक वर्तनाकडेही दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी र्निबध कमी करावेत पण संपूर्ण उठवू नयेत. त्याऐवजी मास्क वापरणे, लसीकरण, वर्धक मात्रा यांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. अमेरिका, युरोप येथे ओसरलेली लाट पुन:पुन्हा डोके वर काढताना दिसते. तसे होऊ नये म्हणून साधारण जूनपर्यंत, म्हणजे पँडेमिक एंडेमिकमध्ये रूपातंरित होईपर्यंत आपण सावध राहणे योग्य ठरेल. रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांचे सर्वेक्षण, त्यांच्या चाचण्या यांवरील भर थोडा कमी झाला आहे. त्यास हरकत नाही. मात्र विषाणूजन्य आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांना स्वत:च्या चाचण्या करणे, विलगीकरणात राहणे यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. कामकाजाची ठिकाणे, चित्रपटगृहे अशा बंद जागांच्या ठिकाणी शेकडो माणसे एकत्र येतात. अशा जागांमध्ये हवा खेळती राखणे, मास्क वापराचा आग्रह करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून संक्रमणाचा वेग आटोक्यात ठेवणे शक्य होईल.

र्निबध हटवण्यासारखी परिस्थिती नाही

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य शाखेचे माजी अध्यक्ष, जनरल फिजिशियन डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, राज्यातील रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे हे मान्य, मात्र र्निबध हटवले जावेत अशी परिस्थिती आहे का, या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. २५ डिसेंबर २०२१ च्या सुमारास राज्यात ओमायक्रॉनच्या प्रसाराचा वेग वाढण्यास सुरुवात झाली. त्या दरम्यान १७५०-१७८० च्या आसपास असलेली दैनंदिन रुग्णसंख्या वाढून ती दैनंदिन ४० हजारांपर्यंत गेलेली आपण पाहिली. १० जानेवारीच्या सुमारास ती कमी होण्यास सुरुवात झाली, मात्र दैनंदिन रुग्णसंख्या आजही चार साडेचार हजारांच्या घरात आहे. र्निबध उठवण्याच्या सूचनांचे आताचे कारण वेगवेगळय़ा भागांतील निवडणुकांचा प्रचार करणे सोपे जावे हा असण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने जी मोकळीक मिळेल त्या काळात संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. अमेरिका, ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचा बीए-१ हा प्रकार नियंत्रणात आल्यानंतर बीए-२ प्रकाराने डोके वर काढले आहे. ज्यांना बीए-१ संसर्ग होऊन गेला आहे, त्यांनाही बीए-२ संसर्ग होत आहे. महाराष्ट्रात रुग्णसंख्या कमी झाली तरी संसर्गाचा दर अद्याप १० टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व र्निबध मागे घेतले जावेत अशी परिस्थिती नाही. मधल्या काळात नियोजित असलेल्या निवडणुका झाल्यानंतर रुग्णसंख्येच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन संपूर्ण र्निबध हटवण्याबात निर्णय घेतला जावा. सध्या दिसत असलेली रुग्णसंख्या काही प्रमाणात फसवी आहे, याचाही र्निबधांबाबत निर्णय घेताना विचार करणे आवश्यक आहे. चार ते पाच दिवस ताप आणि इतर लक्षणे दिसत असली तरी करोना चाचणी न करण्याकडेच रुग्णांचा कल आहे. त्यामुळे त्यांच्या संसर्गाचे निदान होत नाही. घरगुती टेिस्टग किट्स वापरून केल्या जाणाऱ्या चाचण्यांची संख्या लक्षणीय आहे. त्या चाचण्यांच्या अहवालाची नोंद सरकारी यंत्रणेत होत नाही. त्यामुळे सरकारी आकडेवारीत दिसणाऱ्या रुग्णसंख्येशिवाय किमान ३५-४० टक्के रुग्णसंख्या अधिक आहे, हे गृहीत धरून कोणताही निर्णय घेणे योग्य ठरेल, असेही डॉ. भोंडवे यांनी स्पष्ट केले.

निवडणुकांदरम्यान ठेवा करोनाचे भान

राज्याचे निवृत्त आरोग्य महासंचालक आणि करोनाविषयक तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले, देशात पाच राज्यांच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान करोना प्रतिबंधात्मक वर्तन किती पाळले जाते हे आपण पाहतोच. महाराष्ट्रातही काही महापालिकांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. मात्र, निवडणुकांच्या नंतर आपल्याला पुन्हा करोनाच्या लाटेचा धोका नको असेल तर निवडणुका आणि प्रचार कार्यक्रमांदरम्यानही महासाथीचे भान असू द्या, अशा शब्दांत डॉ. साळुंखे यांनी इशारा दिला आहे.

मास्कमुक्ती अद्याप दूर

राज्याच्या करोनाविषयक कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले, राज्यातील साथरोगाची परिस्थिती नियंत्रणात आली आहे. तिसरी लाट जेवढय़ा झपाटय़ाने आली तेवढय़ाच झपाटय़ाने ती ओसरली आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे. र्निबध हटवण्यास हरकत नाही, मात्र स्वयंशिस्त आणि प्रतिबंधात्मक वर्तन आवश्यक आहे. विशेषत: मास्कबाबत अद्याप कोणताही निर्णय घेणे योग्य नाही. जनजीवन पूर्वपदावर, म्हणजे सर्व र्निबध हटवून जनजीवन पूर्वपदावर यायला हवे असेल तर मास्कचा वापर कायम ठेवणे आवश्यक आहे. विशेषत: कार्यालये आणि अन्य बंद जागा, जेथे मोठय़ा संख्येने माणसे एकत्र येतात तेथे मास्कचा वापर कायम राहणे गरजेचे आहे. गर्दी टाळणे, अंतर राखणे, लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे या बाबी महत्त्वाच्या असल्याचे डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले.