scorecardresearch

करोनाकाळात क्षयरोगाचे आव्हान…

करोना आणि क्षयरोग (टीबी) हे साधर्म्य असलेले आजार. दोन्ही आजार श्वसनाशी संबंधित असून प्रामुख्याने फुप्फुसावर आघात करतात.

lungs
करोना आणि क्षयरोग (टीबी) हे साधर्म्य असलेले आजार. दोन्ही आजार श्वसनाशी संबंधित असून प्रामुख्याने फुप्फुसावर आघात करतात.

शैलजा तिवले – response.lokprabha@expressindia.com
करोना आणि क्षयरोग (टीबी) हे साधर्म्य असलेले आजार. दोन्ही आजार श्वसनाशी संबंधित असून प्रामुख्याने फुप्फुसावर आघात करतात. रोगप्रतिकारशक्ती कमी झालेल्या रुग्णांना जसा करोनाचा धोका तसाच क्षयरोगाचाही. त्यामुळे दोन्ही आजार असलेल्या रुग्णांमध्ये अधिक गुंतागुंत होऊ नये म्हणून आता करोनाचा धोका असणाऱ्या जोखमीच्या आजारांमध्ये क्षयरोगाचाही समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या या नव्या निर्णयामुळे करोनासोबत फोफावणाऱ्या क्षयरोगाला रोखण्यास निश्चितच मदत होईल अशी अपेक्षा आहे.

क्षयरोग हा मुळातच रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यावर डोके वर काढणारा आजार. क्षयरोगाचे साम्राज्य असलेल्या भारतासारख्या देशामध्ये क्षयरोगाचे जंतू हे बहुतांश नागरिकांच्या शरीरात सुप्त अवस्थेत आहेत. याला ‘लेटंट टीबी’ असे म्हटले जाते. रोगप्रतिकारशक्ती कमी झाली की हे जंतू जागृत होतात आणि कार्यक्षम होऊन शरीर पोखरायला सुरुवात करतात. करोनाबाधित झाल्यानंतर तीव्र लक्षणे असलेल्या आणि अधिक काळ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना उपचारदरम्यान दिलेली विविध औषधे, प्रतिजैविके यामुळे प्रतिकारशक्ती क्षीण होते आणि अशा काही रुग्णांमध्ये क्षयरोग कार्यक्षम होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळेच करोनामुक्त झाल्यावर रुग्णांमध्ये खोकला, ताप येणे अशी लक्षणे तीन आठवडय़ांहून अधिक काळ दिसत असल्यास तातडीने क्षयरोगाच्या चाचण्या करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य विभागाने सोमवारी जाहीर केलेल्या नियमावलीत दिल्या आहेत.

करोना आणि क्षयरोगातील साधर्म्य

करोनाच्या विषाणूचे वर्तन, स्वरूप काही प्रमाणात क्षयरोगाप्रमाणेच आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांवर करोना तीव्रतेने आघात करतो आणि जखडून घेतो. क्षयरोगाप्रमाणेच हा विषाणू शरीरात नाकावाटे प्रवेश करतो आणि थेट फुप्फुसांवर परिणाम करू लागतो. त्यामुळेच अगदी सुरुवातीला ज्या वेळी आरटीपीसीआर चाचण्याही फारशा उपलब्ध नव्हत्या. त्या वेळी क्ष-किरण(एक्स-रे) चाचणी करोनाचे निदान करण्यासाठी वापरली जात होती. नंतर सिटी स्कॅनच्या माध्यमातून फुप्फुसावर कितपत परिणाम झाला आहे याची तपासणी केली जाऊ लागली. क्षयरोगामध्येही पहिल्या टप्प्यात एक्सरे आणि नंतर सिटी स्कॅनचा वापर निदानासाठी केला जातो. क्षयरोगाचा प्रसार हवेमार्फत होतो. त्यामुळे या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला क्षयरोग होण्याचा धोका अधिक असतो. करोनाच्या विषाणूचा प्रसारही हवेमार्फत होत असल्यामुळे बाधिताच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला करोना होतो. क्षयरोगामध्ये प्रसाराचा वेग करोनाच्या तुलनेत कमी आहे. क्षयरोगाचे जंतू शरीर हळूहळू पोखरतात तर त्या तुलनेत करोना मात्र वेगाने आक्रमण करतो. या दोन कारणांमुळे क्षयरोग हा करोनापेक्षाही घातक असूनही समाजामध्ये आणि व्यवस्थेमध्ये या आजाराला गांभीर्याने घेतलेले नाही. 

करोनाची साथ मार्च २०२० मध्ये पसरायला सुरुवात झाली आणि हाहा म्हणता वेगाने पसरणाऱ्या या विषाणूमुळे सारेच भयभीत झाले. साथीच्या सुरुवातीच्या काळात तर करोनाची बाधा झालेल्या रुग्णाचा द्वेष करत समाजाने त्यांना वाळीत टाकले. आप्तेष्टांनी तर करोना मृतांच्या शवाला हात लावण्यासही नकार दर्शविला. या आजाराने माणसाला जवळच्यांपासून परके केले, याचे सर्वाना अतीव दु:खही होत होते. परंतु आता करोनाच्या तिसऱ्या लाटेपर्यंत म्हणजे अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत समाजाने या आजाराला स्वीकारले आहे. परंतु क्षयरोगाचे रुग्ण समाजाकडून मिळणारी ही घृणास्पद वागणूक गेली कित्येक वर्षे सहन करत असूनही आजमितीलादेखील या आजाराचा समाजाने स्वीकार केलेला नाही.

साथीच्या काळात क्षयरोगाची स्थिती

करोनाची साथ सुरू झाल्यामुळे सर्व आरोग्य व्यवस्था करोना नियंत्रणासाठी एकवटल्यामुळे क्षयरोगाच्या नियंत्रणासाठी सुरू असलेले प्रयत्न मागे पडले. यामुळे नव्या रुग्णांच्या निदानावर परिणाम झालाच यासोबतच उपचार सुरू असलेल्या रुग्णांनाही टाळेबंदीमुळे औषधे वेळेत मिळाली नाहीत, अनेक रुग्णांनी उपचार अर्धवट सोडले. रुग्ण शहरे सोडून त्यांच्या गावी परतल्यामुळे औषधांसाठी पाठपुरावाही करणे अवघड झाले. भारतात २०१९ मध्ये सुमारे २६ लाख क्षयरोगरुग्णांचे नव्याने निदान झाले होते. साथीच्या काळात निदानावर परिणाम झाल्यामुळे यात सुमारे ४१ टक्क्यांनी घट झाली आणि या काळात १८ लाख रुग्णांचे निदान झाले. राज्यातही हेच चित्र कायम असून २०१९ मध्ये सुमारे २ लाख १७ हजार क्षयरोगाचे रुग्ण नव्याने आढळले होते, तर करोना साथीमध्ये हे प्रमाण १ लाख ६० हजारांपर्यत घसरले. २०२१ मध्येही दुसऱ्या लाटेमध्ये राज्यातील क्षयरोग रुग्णांच्या निदानाचे प्रमाण ४१ टक्क्यांनी घटले. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, करोना साथीच्या काळात, २०२० मध्ये जगभरात क्षयरोगाच्या निदानात सर्वाधिक घट भारतात झाली आहे. तसेच या काळात क्षयरोगाच्या मृतांमध्येही जगभरात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून एका दशकानंतर क्षयरोगाच्या मृतांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे क्षयरोगाच्या आजाराची स्थिती जवळपास एक दशकापूर्वीच झाली असून या आजाराचे निर्मूलन करायचे असल्यास पुन्हा वेगाने निदान आणि उपचारावर भर देणे गरजेचे आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले.

करोनासह क्षयरोग उपचारातील अडचणी

क्षयरोगरुग्णांना करोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्या क्षयरोगाच्या उपचारांकडेही प्राधान्याने लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे या काळात अनेक करोनाबाधित क्षयरोग रुग्ण करोनामुक्त झाले तरी त्यांच्या क्षयरोगाच्या आजाराने मात्र गंभीर स्वरूप धारण केले. उपचारातील अडचणी उलगडून सांगताना शताब्दी रुग्णालयातील एमडीआर टीबी क्लिनिकचे डॉ. विकास ओसवाल म्हणतात, ‘क्षयरोगाच्या रुग्णांना सुरू असलेली औषधे आणि करोनामध्ये दिली जाणारी काही औषधे यांचा एकमेकांवर दुष्परिणाम होण्याचा धोकाही असतो. विशेषत: स्टिरॉइड. क्षयरोगामुळे रुग्णांच्या फुप्फुसावर आधीच परिणाम झालेला असतो. या रुग्णांना करोनाची बाधा झाल्यानंतर फुप्फुसांवर आणखी परिणाम होतो. अशा रुग्णांमध्ये स्टिरॉइडचा वापर केल्यास क्षयरोगाच्या आजाराची तीव्रता वाढते. त्यामुळे या रुग्णांमध्ये करोनाचे उपचार करताना विशेष काळजी घ्यावी लागते. याबाबतची नियमावली करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये पुरेशी स्पष्ट नसल्यामुळे सुरुवातीला शहरांमध्ये याकडे मोठय़ा प्रमाणात दुर्लक्ष झाले. परंतु कालांतराने करोनाबाधित क्षयरोगरुग्णांच्या उपचारांबाबत नियमावली आली आणि करोनासह क्षयरोगाच्या उपचारांकडे लक्ष दिले जाऊ लागले. आता क्षयरोगाच्या रुग्णांना करोनाच्या उपचारामध्ये क्षयरोगाची औषधेही पुरविली जात आहेत. त्यामुळे क्षयरोगाचे उपचारही सुरू असल्यामुळे क्षयरोगही नियंत्रणात राहत आहे.’

क्षयरोग आणि करोना संभ्रमच

क्षयरोग आणि करोनाची सुरुवातीची लक्षणे सारखी असल्यामुळे संभ्रम निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. साथीच्या सुरुवातीच्या काळात करोनाबाबत अधिक स्पष्टता नसल्यामुळे अनेक रुग्णांबाबत हा संभ्रम निर्माण झाला आणि निदान होण्यासही उशीर झाला. क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये ताप, खोकला ही करोनासदृश लक्षणे दिसली तरी क्षयरोगाचीही हीच लक्षणे असल्यामुळे यांच्या करोना चाचण्या केल्या गेल्या नाहीत. परिणामी अशा रुग्णांमध्ये करोनाचे निदान उशिराने झाले. याउलट ताप, खोकला अशी लक्षणे आलेल्या रुग्णांमध्ये तातडीने करोनाच्या चाचण्या केल्या गेल्या. परंतु क्षयरोगाच्या चाचण्या करण्यासाठी प्राधान्य न दिल्यामुळे या रुग्णांचेही निदान वेळेत होऊ शकले नाही. साथीच्या पहिल्या लाटेमध्ये हळूहळू या बाबी लक्षात आल्यावर केंद्रीय आरोग्य विभागाने क्षयरोगाच्या रुग्णांच्या करोना चाचण्या, तर क्षयरोगसदृश लक्षणे दिसणाऱ्या करोनाबाधितांच्या क्षयरोग चाचण्या करण्याचे आदेश दिले. यामुळे क्षयरोगाच्या अनेक रुग्णांमध्ये करोनाचे निदान झालेच परंतु या काळात दुर्लक्ष झाल्यामुळे निदान होऊ न शकलेले क्षयरोगाचे रुग्णही आढळले आणि त्यांच्यावर तातडीने उपचारही सुरू केले गेले.

क्षयरोगाच्या रुग्णांसाठी करोना धोकादायक

केंद्रीय आरोग्य विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह यासोबतच आता क्षयरोगही जोखमीचा आजार असून या रुग्णांवर प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे, असे स्पष्ट केले आहे.

क्षयरोगाच्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती आधीच कमकुवत असते. अशा रुग्णांचा करोनाची बाधा झाल्यास दोन आजार एकाच वेळी झाल्यामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर होण्याचा धोका अधिक असतो. तसेच उपचारामध्येही अनेक अडचणी असल्यामुळे औषधांचा वापरही योग्यरितीने करणे आवश्यक आहे. या दोन्ही आजारांच्या उपचारांवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत साथरोगतज्ज्ञ आणि करोना कृती दलाचे सदस्य डॉ. ओम श्रीवास्तव यांनी व्यक्त केले.

केंद्राच्या या नियमावलीमुळे निश्चितच करोनाबाधितांमध्येही क्षयरोगाचे निदान होण्यास मदत होईल. यामुळे क्षयरोगाच्या निदानाचे प्रमाण तर वाढेलच, परंतु याशिवाय या रुग्णांचे निदान लवकर झाल्यामुळे उपचार वेळेत सुरू होतील. शिवाय निदान लवकर झाल्यामुळे या रुग्णांना अन्य करोनाबाधितांमध्ये क्षयरोगाचा होणारा संभाव्य प्रसारही रोखण्यास मदत होईल, असे मत डॉ. ओसवाल यांनी व्यक्त केले.

करोनामुक्तांना क्षयरोगाची लागण

करोनाबाधित जे रुग्ण बराच काळ कृत्रिम श्वसनयंत्रणेवर होते, किंवा उपचारादरम्यान ज्या रुग्णांना टोसिलीझुमॅब किंवा स्टिरॉइडसारखी औषधे दिली गेली, अशा काही रुग्णांमध्ये दोन ते तीन महिन्यांनतर क्षयरोगाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. स्टिरॉईड किंवा अन्य औषधांमुळे रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. राज्यात किंवा मुंबईत बहुतांश रुग्णांच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू सुप्त अवस्थेत आहेत. रोगप्रतिकारशक्की कमकुवत झाल्यामुळे यांच्यातील ‘लेटंट टीबी’ कार्यक्षम झाल्याचे आढळले आहे. हे प्रमाण तुलनेने कमी आहे. परंतु असे काही रुग्ण निश्चितच आढळले आहेत, असे श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. अरिवद काटे यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना केईएमच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की दुसऱ्या लाटेनंतर प्रामुख्याने असे क्षयरोगाचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये विशिष्ट वयोगटातील रुग्ण आहेत असे आढळलेले नाही, परंतु करोनापश्चातही बराच काळ खोकला, ताप, थकवा येणे अशी लक्षणे या रुग्णांना प्रामुख्याने दिसून आली. त्यामुळे यांच्या चाचण्या केल्यावर क्षयरोग असल्याचे निदान झाले.

बहुतांश रुग्णांमध्ये क्षयरोगाचा आजार सौम्य स्वरूपाचा असल्याचे प्राथमिक पाहणीमध्ये तरी आढळले आहे. हे रुग्ण आता क्षयरोगाचे सहा महिन्यांचे औषधोपचार घेत आहेत, असे डॉ. काटे यांनी सांगितले.

दुसऱ्या लाटेनंतर करोनामुक्त झालेल्या काही रुग्णांमध्ये क्षयरोगाची लागण झाल्याचे आढळले. परंतु तिसरी लाट मुळातच सौम्य असल्यामुळे सध्या करोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये क्षयरोग आढळलेला नाही, असे डॉ. श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.

करोनापश्चात तपासणी गरजेची

करोनापश्चात तीन आठवडय़ांहून अधिक काळ खोकला, ताप येणे, वजन कमी होणे इत्यादी लक्षणे आढळल्यास रुग्ण करोनामुळे त्रास होत असल्याचा समज झाल्याने तपासणीसाठी जात नाहीत. यामुळे आजाराचे स्वरूप तीव्र होण्याची शक्यता आहे.  अशी लक्षणे बराच काळ असल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे, असे मत डॉ. काटे यांनी व्यक्त केले.

स्वतंत्र नोंद करणाऱ्या यंत्रणेचा अभाव

करोनापश्चात क्षयरोग झाला आहे का याची स्वतंत्र नोंद क्षयरोग झालेल्या रुग्णांमध्ये करण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे अशी यंत्रणाच नसल्यामुळे करोना झाल्यानंतर किती रुग्णांना क्षयरोग झाला याची आकडेवारी उपलब्ध नाही, असे मुंबई पालिकेच्या क्षयरोग विभागाच्या प्रमुख डॉ. प्रणिता टिपरे यांनी सांगितले. क्षयरोगरूग्णांच्या नोंदीमध्ये करोना झाला होता अशी माहिती घेण्याची कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे दिलेली नाहीत. त्यामुळे ही माहिती स्वतंत्रपणे घेतली जात नाही, असे राज्याचे क्षयरोग विभागाचे प्रमुख डॉ. रामजी अडकेकर यांनी सांगितले.

‘टीबी हारेगा देश जीतेगा’ असा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत देशातून क्षयरोगाचे निर्मूलन करण्याची घोषणा केली होती. करोनाच्या साथीमुळे क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम जवळपास एक दशक मागे पडला आहे. केंद्राने या दृष्टीने सकारात्मक पावले उचलून निदान, उपचारावर भर देण्यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत. एमडीआर आणि एक्सडीआर क्षयरोगाच्या उपचारासाठी नव्याने आलेली बेडाक्युलीन, डेलामनाइडसारखी प्रभावी औषधे अजूनही पेटंटमुळे रुग्णांसाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेली नाहीत. फुप्फुसाव्यतिरिक्त आता शरीराच्या अन्य अवयवांवरही क्षयरोग परिणाम करू लागला आहे, परंतु याबाबत जनजागृतीचा मोठा अभाव आहे. करोनावर जगभरात अनेक प्रकारच्या लशींचे संशोधन झाले. देशातही दोन लशींचे उत्पादन सुरू झाले. परंतु गेली अनेक वर्षे पोखरत असलेल्या क्षयरोगाच्या प्रतिबंधासाठी लस संशोधनाकडे अजूनही दुर्लक्ष केले जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अद्याप या आजाराचा स्वीकार समाजाने केलेला नाही. या सर्व स्तरांवर प्रयत्न केले तरच क्षयरोग निर्मूलनाचे ध्येय गाठणे भारताला शक्य आहे.

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी ( Coverstory ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Coronavirus covid 19 tb coverstory dd

ताज्या बातम्या