अर्जुन नलवडे – response.lokprabha@expressindia.com

नवरात्रीमध्ये केवळ उत्साहपूर्ण वातावरण किंवा तरुणाईचा जोश पाहायला मिळतो असे नाही, तर त्याच्याही पलीकडे मोठी आर्थिक उलाढाल होताना दिसते. गरबा महोत्सव, गरबा क्लासेसकर्ते, प्रत्यक्ष बाजारपेठा, ऑनलाइन शॉपिंग, विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल्स यांमधून होणाऱ्या उलाढालीतून ‘गरब्याचे अर्थकारण’ दिसून येते, त्याचा आढावा..

गरब्याच्या माध्यमातून नवरात्रीच्या नऊ दिवसांत किती मोठी आर्थिक उलाढाल होऊ शकते, याची कल्पना मुंबईमध्ये येते. खरे तर मुंबईच कशाला मोठमोठय़ा शहरांमध्ये लाखो-करोडो रुपयांचे प्रायोजकत्व स्वीकारून गरबा-दांडियाचे केले जाणारे आयोजन, गुजराती व राजस्थानी पारंपरिक कपडय़ांनी ओसंडून वाहणाऱ्या बाजारापेठा, लाखोंची कमाई करणारे गरबा क्लासेसकर्ते, नवरात्रीच्या दिवसांत करोडो रुपयांची दागिन्यांची होणारी खरेदी, भल्यामोठय़ा मैदानात व सेलेब्रिटींसोबत गरबा खेळण्यासाठी आकारले जाणारे हजारो रुपये, या आणि अशा अनेक गोष्टींमधून गरब्याचे अर्थकारण समजून घेता येऊ शकते.

पूर्वी गुजराती समाजापुरता मर्यादित असणारा ‘रास-गरबा’ आता देशाच्या अनेक भागांत खेळला जातो. रास-दांडिया खेळण्याचे आकर्षण लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वानाच असल्याचे दिसून येते. म्हणून शहरांपासून गावखेडय़ांतल्या गल्लीबोळांमध्येसुद्धा रास-दांडियाचे आयोजन करण्याचे प्रमाण मोठे आहे. खेडय़ांमध्ये गरबा खेळण्यासाठी पैसे मोजावे लागत नसले, तरी शहरांमध्ये मात्र त्यासाठी हजारो रुपये मोजावे लागतात. केवळ मुंबईमध्ये नवरात्रीच्या पाश्र्वभूमीवर गुजराती समाज असलेल्या खेतवाडी, भुलेश्वर, ठाकूरद्वार, घाटकोपर आणि मालाड या ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या रास-गरबाच्या कार्यक्रमांतून कोटय़वधींची उलाढाल होताना दिसून येते. आता तर या गरबा आयोजकांनी आपल्याकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी विविध संकेतस्थळे, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, यांसारख्या समाजमाध्यमांवरून गरबा महोत्सवाची जाहिरात करायला सुरुवात केली आहे. सध्या अशा गरबा महोत्सवांची तिकीट विक्री जोमात सुरू आहे.

मुंबईतील गरबा आयोजकांमध्ये गायिका फाल्गुनी पाठक यांचा ‘गरबा उत्सव’ अत्यंत लोकप्रिय ठेरलेला आहे. ज्याची लोकप्रियता जास्त त्याची किंमतही जास्त. १९९८ साली सुरू झालेल्या फाल्गुनी पाठक यांच्या ‘गरबा उत्सवा’चे तिकीट आज सर्वात जास्त असल्याचे दिसत आहे. मुंबई, पुणे आणि दुबईत होण्याऱ्या फाल्गुनी पाठक यांच्या गरबा कार्यक्रमांचे दर ऑनलाइन जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये प्रत्येक दिवशी एका व्यक्तीला गरबा खेळण्यासाठी ७०० रुपयांपासून ११०० रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागत आहेत. (अर्थात हे अधिकृत दर नवरात्रोत्सवाच्या दरम्यान अवाच्या सवा वाढतात. या रंगीबेरंगी दुनियेला वाढलेल्या दरांची ‘काळी किनार’ चढते). त्यानंतर प्रसिद्ध असणाऱ्या नायडू क्लबच्या गरबा महोत्सवाचीही दरपत्रिका जाहीर झाली आहे. त्यांनीही तिकिटांच्या किमती आणि ऑनलाइन बुकिंग सुरू केलेली दिसत आहे. त्यामध्ये २९ सप्टेंबरपासून ८ ऑक्टोबपर्यंत प्रत्येक दिवसाचे प्रवेशशुल्क देण्यात आले आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी ६१० रुपयांपासून ८१० रुपयांपर्यंत तिकिटांचे दर जाहीर केलेले आहेत. सेशन पास ३३००, ग्रुप पास १६, ६५० आणि व्हीआयपी पास ४५०० रुपये असे दर जाहीर करण्यात आले आहेत. अशी उदाहरणे घेतली आणि त्यांची गणिते मांडली की, साधारणपणे एका व्यक्तीसाठी हे आयोजक सरासरी ६०० रुपये प्रत्येक दिवसासाठी घेत असतात. दरवर्षी कोरा केंद्र मैदान किंवा प्रमोद महाजन स्टेडियममध्ये एकाच वेळी २० हजारांहून जास्त लोक गरबा खेळण्यासाठी येतात. याचे गणित मांडले तर, दीड-दोन करोडोंच्या घरात आयोजकांची तिजोरी दररोज भरते. असे दहा दिवस चालते.

गरब्याची महागडी तिकिटे शिल्लक राहतात, असे कधी होत नाही. उलट या तिकिटांचादेखील काळाबाजार मोठय़ा प्रमाणात चालतो. प्रसिद्ध दांडियांमध्ये काही हजारांची तिकिटे लाखोंच्या किमतींमध्ये ब्लॅकने विकली जातात. अशा गरबा महोत्सवांकडे प्रमोशनाच्या आणि जाहिरातीच्या दृष्टीनेदेखील पाहिले जाते. लोकांच्या गर्दीचा विचार करून मोठमोठय़ा कंपन्या, राजकीय व्यक्ती, चित्रपट निर्माते आपली जाहिरात करण्यासाठी अशा महोत्सवांतून प्रायोजकत्वाची संधी साधतात. यातून मोठय़ा प्रमाणात केल्या जाणाऱ्या जाहिरातबाजी आणि फ्लेक्सबाजीतून गरबा आयोजकांना लाखो रुपयांचा फायदा होत असतो. सध्या वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून अशा संधी मिळविण्यासाठी आणि आपल्याकडे लोकांची गर्दी खेचण्यासाठी गरबा आयोजकांनी सोशल मीडियाला हाताशी धरलेले दिसत आहे. हे झाले गरबा आयोजकांचे. सलग दहा दिवस गरबा महोत्सवात लाखो लोक दांडिया खेळत असतात. अशा महोत्सवाच्या परिसरात उभारल्या जाणाऱ्या विविध स्टॉल्समधून खाद्यपदार्थ, पाण्याच्या बाटल्या अशा तत्सम वस्तूंमधूनही मोठी उलाढाल राहते.

एकसारख्या वाजणाऱ्या संगीतामध्ये वेगवेगळ्या गाण्यांवर ठेका धरायला प्रत्येकालाच आवडते. त्यात प्रत्येकाला नाचण्याचा मोह होतो. पण, गरबा विशिष्ट पद्धतीनेच खेळायचा असतो. असा गरबा आपल्यालाही खेळता यावा म्हणून हौशी लोक महिनाभर आधीपासूनच गरबा शिकायला सुरुवात करतात. लोकांची ही मानसिकता लक्षात घेऊन दादर, मालाड, विलेपार्ले, भांडुप, घाटकोपर, ठाणे, गिरगाव, कांदिवली, अंधेरी, बोरिवली, चेंबूर अशा अनेक ठिकाणी या काळात गरबा नृत्याचे क्लासेस सुरू होतात. यामध्ये दहा दिवसांपासून दोन तासांपर्यंत गरबा शिकविण्याचे क्लासेस असतात. तसेच शनिवार आणि रविवार अशा दोनदिवसीय रास-दांडियाचे वर्कशॉप किंवा गरबा शिकविण्याचे क्लासेसदेखील घेतले जात आहेत. या क्लासेसकर्त्यांनी लहान मुले, तरुण, महिला आणि वयस्क लोक अशी वर्गवारी कलेली दिसून येत आहे. त्यानुसार प्रवेशशुल्कदेखील वेगवेगळे आकारलेले दिसत आहे. यामध्ये १० दिवसांसाठी शिकविण्यात येणाऱ्या क्लासेसची फी तीन हजारांपासून सहा हजारांपर्यंत, फक्त शनिवारी आणि रविवारी या आठवडा सुट्टीत शिकविण्यात येणाऱ्या क्लासेसची फी हजार रुपयांपासून तीन हजारांपर्यंत, तर एक आणि दोन तासांसाठी शिकविल्या जाणाऱ्या क्लासेसची फी ३०० रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंत असल्याचे निदर्शनास येत आहे, अशा प्रकारे गरबा क्लासेसच्या माध्यमातून वेगळे अर्थकारण उभे राहिल्याचे दिसून येते.

नवरात्रीला सजण्या-धजण्यासाठी  पारंपरिक कपडे, चपला, दागिने, देवीच्या पूजेचे साहित्य, टिपऱ्या यांची खरेदी अपरिहार्य. त्यासाठी बाजारपेठा फुलू लागतात. अशा उत्साहपूर्ण वातावरणात बाजारपेठा आणि ऑनलाइन शॉपिंगमध्ये अक्षरश: करोडोंची उलाढाल होते. रंगीबेरंगी तोरणे, पुजेच्या थाळ्या, नवरात्री स्पेशल चनिया-चोली, घागरा, ज्वेलरी, गुजराती पगडी, फुटवेअर आदी वस्तू खरेदी करण्यासाठी झुंबड उडालेली दिसते. बाजारात पारंपरिक चनिया चोलीसोबत काही नवीन ट्रेण्ड्स नव्या किमती घेऊन दाखल झालेले दिसतात. यंदाचे मुख्य आकर्षण आहे नऊ  मीटरचा घेर असलेला पारंपरिक राजस्थानी घागरा. ५०० रुपयांपासून सहा हजारांपर्यंत तो बाजारात उपलब्ध आहे.

त्याचबरोबर तरुणींच्या पसंतीस उतरलेला सर्वात लोकप्रिय फॅशन ट्रेण्ड म्हणजेच ‘मयुरी चनिया-चोली’. तिची किंमत १८०० रुपयांपासून १५ हजारांपर्यंत आहे. तसेच कच्छी बॉर्डर आणि मिरर वर्क असलेल्या चनिया-चोलीनेदेखील ग्राहकांना खिशात हात घालण्यास भाग पाडले आहे. या चनिया-चोलीच्या किमती १५०० पासून १० हजारांपर्यंत आहेत. पुन्हा एकदा नव्याने लेहरिया पॅटर्नमधील घागरे आणि साडय़ादेखील नव्या ट्रेण्डमध्ये दिसून येत आहेत. ऑनलाइन संकेतस्थळांवर थ्री-इन-वन चनिया-चोली आणि बांधणी स्कर्टही बाजारात उपलब्ध आहेत. लहान मुलींसाठी रंगीबेरंगी राजस्थानी चनिया-चोली ३०० रुपयांपासून उपलब्ध आहे. हॉल्टर नेक असलेली चनिया-चोली ४५० ते दीड हजार रुपयांच्या किमतीत मिळत आहे.

या फॅशनेबल ड्रेसेस आणि चनिया-चोलीसोबत दागिन्यांनीदेखील आपली हजेरी लावली आहे. सध्याच्या लेटेस्ट ट्रेण्डमध्ये सोन्या-चांदीच्या पारंपरिक दागिन्यांपेक्षा ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी तरुणींची गर्दी खेचत आहे. त्याचबरोबर आर्टिफिशियल, फंकी ज्वेलरीलाही खूप मागणी आहे. कर्णफुलांमध्ये लटकन आणि स्टड तर चनिया-चोलीसोबत झुमके आणि चांदबालीचा क्रेझ तरुणींमध्ये दिसून येत आहे. त्याची किंमत २०० पासून सुरू होऊन ५०० पर्यंत आहे. तसेच काठीयावाडी नेकलेस १५० रुपयांपासून ५०० पर्यंत उपलब्ध झालेले आहेत. सध्या नवरात्रीत मांग टिक्क्यांची मागणीही बाजारात खूप दिसत आहे. खासकरून पोम पोम मांग टिक्के आणि राजस्थानी स्टाइल मांग टिक्कादेखील ऑनलाइन व बाजारपेठांमध्ये मोठय़ा प्रमाणात खरेदी होताना दिसत आहेत. त्याच्या किमती २५० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत आहेत.

फुटवेअरमध्ये खास गरब्यासाठी डिझाइन केलेली मोजडी अगदी ४०० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. पुरुषवर्ग आणि मुलेही या नवरात्रीच्या जल्लोषाचा आनंद घेण्यासाठी बाजारात खरेदीसाठी गर्दी दिसत आहे. पुरुषांसाठी जॅकेट स्टाइल धोती, केडिओ स्टाइल, अंगरखा पॅटर्न तसेच पारंपरिक कुर्ता आणि चुडीदार बाजारात उपलब्ध झालेले आहेत. ज्यांची किंमत ४०० रुपयांपासून आठ हजारांपर्यंत आहे. तसेच तरुणांसाठी एक विशिष्ट प्रकारची नवरात्री पगडीदेखील बाजारात दाखल झालेली आहे. अशा पगडय़ा आणि फेटे कवडय़ा, आरसे आणि पॉम पॉमनी सजवल्या आहेत. यांच्या किमती ७०० रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत आहेत. गरबा-दांडिया खेळण्याच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या खरेदीमध्येही मोठे अर्थकारण दडलेले आहे. कारण, केवळ नवरात्रीमध्ये अशा वस्तूंना मोठी मागणी असते आणि त्यातून मोठमोठय़ा शहारांतील बाजारपेठांमध्ये करोडो रुपयांची उलाढाल होते. त्याचबरोबर अ‍ॅल्युमिनियम, स्टेनलेल स्टील, लाकडी आणि फायबरच्या टिपऱ्यांची खरेदी मोठय़ा प्रमाणात होताना दिसते. त्याच्या किमती १०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत दिसून येतात. गरबा खेळणाऱ्या एका हौशी व्यक्तीच्या एकूण खरेदीचे गणित मांडले तर असं लक्षात येतं की, दहा हजारांपासून लाखो रुपयांपर्यंतचा (ज्याच्या त्याच्या आर्थिक कुवतीनुसार) खर्च केवळ नवरात्रीच्या पाश्र्वभूमीवर होतो.

गुजराती समाजातून आलेल्या गरब्याला केवळ सांस्कृतिक महत्त्वच नाही तर आर्थिक महत्त्वही आहे. त्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोटय़वधींची उलाढाल होते. तिची आकडेवारी नेमकी सांगणे कठीण असले तरी लोकांच्या हौसेला मोल नाही हेच खरे.