scorecardresearch

दसरा विशेष : सोन्याहून अनमोल कोल्हापूरचा शाही दसरा

महाराष्ट्रातील दसऱ्याला राजेशाही रूप मिळालं आहे ते कोल्हापूरमध्ये साजऱ्या होणाऱ्या पारंपरिक आणि देखण्या सोहळ्यामुळे.

कोल्हापूर शाही दसरा

दयानंद लिपारे – response.lokprabha@expressindia.com

महाराष्ट्रातील दसऱ्याला राजेशाही रूप मिळालं आहे ते कोल्हापूरमध्ये साजऱ्या होणाऱ्या पारंपरिक आणि देखण्या सोहळ्यामुळे. हा दसरा पाहायला लोक आवर्जून गर्दी करतात.

कोल्हापूरची ओळख नानाविध रूपांनी झाल्याचे पाहावयाला मिळते. प्राचीनता, स्थानमाहात्म्य, इतिहास, खवय्ये, खरेदी अशी त्याची काही प्रमुख वैशिष्टय़े आहेत. त्यांपकी दोन घटकांना- घटनांना विशेष महत्त्व आहे आणि तो म्हणजे कोल्हापूरचा शाही दसरा. कोल्हापूरचे शारदीय नवरात्र हेही आणखी एक वैशिष्टय़. करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या नवरात्रीची सांगता याच शाही दसऱ्याच्या दिवशी होते. कोल्हापुरात शाही पद्धतीने दसरा साजरा केला जात असल्याने राजघराण्यातील श्रीमंत शाहू महाराजांसह त्यांचे कुटुंबीय तसेच इतर मान्यवर सोहळ्यात सहभागी होतात. ऐतिहासिक दसरा चौक परिसरात हा सोहळा संपन्न होतो. म्हैसूरनंतर संस्थानकालीन दसरा परंपरेची साक्ष देणारा कोल्हापूरचा हा शाही दसरा असतो. म्हैसूर, ग्वाल्हेर, कोल्हापूर संस्थान या राजघराण्यांना देवीच्या उपासनेशी जोडण्यात आल्याने येथील शाही दसरा देशभरातील भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रिबदू असतो.

पराक्रमाची जन्मभूमी

मराठेशाहीच्या इतिहासात कोल्हापूरचे स्थान महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याहीपूर्वी कोल्हापूर शहराचा इतिहास वैभवशाली असल्याचे दिसून येते. कोल्हापूरला मराठेशाहीची राजधानी ही ठळक ओळख मिळाली; पण त्याहीपूर्वी कैक वष्रे आधी कोल्हापूरच्या इतिहासात महत्त्वाच्या नोंदी आढळतात. इ.स.पूर्व पहिल्या शतकापासून ते नवव्या शतकापर्यंत ऐतिहासिक कालखंडात कोल्हापूर येथील वसाहत आजच्या ब्रह्मपुरीच्या टेकडीवर होती. सातवाहन काळात या परिसरात समृद्ध व सुसंस्कृत लोकसमुदाय वस्ती करून राहात होता. इ.स. २२५ ते ५५० पर्यंत वाकाटक, कदंब, शेद्रक व मौर्य या प्राचीन राजघराण्यांचे राज्य होते. त्यानंतर ७५३ पर्यंत बदामीच्या चालुक्य घराण्याची सत्ता येथे प्रभावी होती. इ.स. ६३४ मध्ये या घराण्यातील राजा कर्णदेव याने महालक्ष्मी मंदिराच्या उभारणीस प्रारंभ केला. बहुतेक सर्व चालुक्य सम्राट कोल्हापुरास ‘दक्षिण काशी’ व ‘महातीर्थ’ संबोधितात. नंतर ८५० पर्यंत राष्ट्रकुटाची सत्ता प्रस्थापित झाली तेव्हा कोल्हापूरसुद्धा त्यांच्या सत्ताक्षेत्रात आले. १२१० पर्यंत शिलाहारांनी राज्य चालविले. १२१० नंतर देवगिरीच्या यादवांच्या एका प्रांताची राजधानी म्हणून कोल्हापूर अग्रेसर राहिले. १२९८ मध्ये देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर मुस्लीम सत्तेचा अंमल स्थापन झाला. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगड जिंकल्यानंतर (१६६९) पुनश्च कोल्हापूर परिसर स्वराज्यात समाविष्ट झाला. पुढे स्वातंत्र्ययुद्धात व कोल्हापूर शहराने मोलाचा इतिहास घडविला आहे. महाराणी ताराबाईंच्या काळात कोल्हापूर शहरास राजधानीचे स्वरूप प्राप्त झाले. इ.स. १७८२ साली करवीर राज्याच्या स्थापनेनंतर कोल्हापूर शहराचा विस्तार झपाटय़ाने होऊ लागला. पराक्रमाचा इतिहास असलेल्या कोल्हापुरात दसऱ्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पूर्वीच्या काळी विजयादशमीला शस्त्रपूजा करून युद्धभूमीवर पाऊल टाकले जात असे. मात्र, मराठेशाहीच्या काळात कोल्हापुरातील दसरा अधिक प्रभावीपणे साजरा केला जाऊ लागला.

शानदार शाही सोहळा

कोल्हापूरचा दसरा शाही असतो. कालानुरूप त्यात काही बदल घडले आहेत, मात्र उत्सवाची परंपरा आणि त्याचे मूळ यामध्ये बदल झाला नाही. दसऱ्याला राजा आणि प्रजा यांच्यातील अंतर दूर होऊन भावबंध जुळतात. पूर्वी हा सोहळा अतिभव्य प्रमाणात साजरा होत असे.  विजयादशमी दिवशी सायंकाळी भवानी मंडपातून शाही मिरवणुकीला सुरुवात होई. बंदुकीचा कानठळ्या बसवणारा आवाज ऐकू येऊ लागला की, मिरवणूक जवळ येऊ लागल्याचा अंदाज लोकांना येत असे. याच वेळी सनई, सुंदरी, डफडे या वाद्यांचा आवाज येत असे. अग्रभागी असणारा मोती हत्ती नखशिखान्त सजवलेला असे. हत्तीवर रुबाबदार माहूत बसलेला असे. त्याच्या मागे-पुढे दोन्ही बाजूस सावधगिरी म्हणून भालाईत असत. मिरवणुकीचा मार्ग नागरिकांनी फुलून गेलेला असे. हत्तीच्या मागे लष्करी वाद्यमेळा असे. मागोमाग मामलेदार, प्रांत दिवाण वगरे नोकरदार चालत येत असत. त्यामागे पोलिसांचा बॅण्ड वाजत असे. नजर हटणार नाही असे शोभिवंत घोडदळ असे. मोलाबक्ष हत्तीवर चांदीचा हौद असे. खडखडय़ावर पोवाडे म्हणणारे शाहीर असत. अश्वदलामागे उंट असे. त्याच्या पाठीवर नगारा ठेवलेला असे. यानंतर शृंगारलेला भवानी शंकर हत्ती डुलत डुलत येई. त्याच्यावर सुवर्णाची अंबारी विराजमान झालेली असे. यानंतर क्रम लागे पायदळाचा. संपूर्ण लष्करी वाद्याचा आणि इंग्रजी चालीचा हा बॅण्ड असे. लोक मंत्रमुग्ध होऊन हा आविष्कार अनुभवत असत. त्यामागे अंबाबाई, भवानी देवी आणि गुरू महाराज यांची पालखी असे. पालखीमागे छत्रपती महाराज, मानमानकरी, सरदार, इनामदार, जहागीरदार, प्रतिष्ठित नागरिक, अधिकारी, पलवान वगरे असत. सर्वात शेवटी दोन उंटांवर युद्धभूमीवर वाजवले जाणारे शहाजने वाजवले जात असत. अशा प्रकारे सायंकाळी सहा-साडेसहा वाजेपर्यंत मिरवणूक दसरा चौकात येई. तेथे शामियाना घातलेला असे. मोकळ्या जागेवर आपटय़ांच्या पानांची रास घातलेली असे. पुरोहित मंत्रोच्चारात शमीची पूजा करीत. महाराजांना विडे देण्याचा मान जिवाजीराव जाधव यांचा असे. महाराजांनी सोने घेताक्षणी तोफांचे पाच बार दणादण उडत. त्याच क्षणी लोकांची सोने लुटण्यासाठी झुंबड उडे.

चौपाळ्याचा माळ ते दसरा चौक

पूर्वी कोल्हापूरची हद्द टाऊन हॉलपर्यंत होती. तिथून पुढे न्यू पॅलेसपर्यंत माळ होता. तो चौपाळ्याचा माळ म्हणून ओळखला जात असे. येथे पूर्वी मोठय़ा प्रमाणात चाफ्याची झाडे होती, त्यामुळे त्याला चौपाळ्याचा माळ असे म्हणत, अशी माहिती दसरा महोत्सवाचे निवेदक पंडित कंदले यांनी दिली. या माळावर उत्सव होण्यापूर्वी शहराबाहेर टेंबलाई मंदिर परिसरातील माळावर कार्यक्रम होत असे. नंतर तो आता दसरा चौकात भरतो. येथेच राजर्षी शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. त्यांनीच दिलेल्या जागांवर नानाविध जाती-जमातींची वसतिगृहे आहेत.

आजही शाही परंपरेचे जतन

काळ बदलला, इंग्रज गेले. देश स्वतंत्र झाला. संस्थान विलीन झाली. मात्र आजही कोल्हापुरात शाही दसरा पूर्वीच्या परंपरेला साजेसा होतो. साडेतीन पीठात महालक्ष्मीचा समावेश असल्याने घटस्थापनेपासूनच कोल्हापुरात दसरा सणाचा उत्साह पाहायला मिळतो. कोल्हापुरातील दसऱ्याचे ऐतिहासिक महत्त्व विशद करताना इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार सांगतात, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर पावसाळा संपल्यानंतर युद्ध मोहिमांना सुरुवात केली. त्यासाठी दसऱ्याचा मुहूर्त गाठून ‘प्रस्थान ठेवण्यास’ सुरुवात केली. पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली. नंतर इंग्रजांनी भारतावर कब्जा केल्यावर युद्ध मोहिमा ठप्प झाल्या. पण कोल्हापुरात शाही दसरा सुरू राहिला. पूर्वी दसऱ्याच्या वेळी हत्ती, घोडे, उंट, चित्ता यांच्यासह लवाजमा घेऊन भव्य मिरवणूक निघत असे’.

नवरात्रीतील अखेरचा महत्त्वाचा सोहळा म्हणजे विजयादशमी. करवीरचा हा सोहळा देशातील एक प्रमुख सोहळा म्हणून ओळखला जातो. संध्याकाळी पाचच्या दरम्यान श्री महालक्ष्मी, तुळजाभवानी व गुरुमहाराज पालखी लवाजम्यासह दसरा चौकात वाद्याच्या गजरात पोहोचतात. निमंत्रितांसह मानकरी व नागरिकांना बसण्यासाठी आलिशान शामियाना उभारला जातो. याच वेळी ‘मेबॅक’ या विदेशी बनावटीच्या मोटारीतून न्यू पॅलेसवरून शाही घराण्यातील श्रीमंत शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, युवराज मालोजीराजे, शहाजीराजे व यशराजे शाही लवाजम्यासह येतात. त्यांचे बॅण्डपथकाने स्वागत करण्यात येते. त्यांच्या हस्ते चौकातील शमीच्या पानांचे पूजन होते. त्यानंतर सोने लुटण्याचा थरार दसरा चौक अनुभवतो. मावळत्या सूर्याच्या साक्षीने करवीरनगरीचा पारंपरिक शाही दसरा सोहळा मोठय़ा उत्साहात हजारोंच्या उपस्थितीत संपन्न होतो. लुटलेले सोने एकमेकांना देत ‘सोने घ्या, सोन्यासारखे राहा’ अशा शुभेच्छांची देवाणघेवाण सुरू होते. श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांसह सारे करवीरवासीयांकडून सोने स्वीकारत महालक्ष्मी मंदिराकडे जातात. देवीचे दर्शन घेऊन राजवाडय़ात परत जातात.

संपूर्ण छत्रपती घराणे पारंपरिक वेशात सहभागी होऊन सोहळ्याची उंची वाढवतात. शाही घरण्यातील मंडळींना भेटून सोने देण्यात लोकांना धन्यता वाटते. शाही रुबाब राखत शाही घराणे सर्वसामान्य जनतेशी ऋणानुबंधाचे नाते आंतरिक आस्थेतून जपताना दिसते. लोकशाही मूल्यांचे जतन करतानाही सोन्याइतकेच अमूल्य नाते जनता छत्रपती घराण्याशी जपू पाहते. लोकशाही – राजेशाहीच्या इतका नितळ संगम अन्यत्र आढळणे आज दुर्मीळ झाले आहे. पंचगंगेच्या काठी आणि महालक्ष्मीच्या छायेत हा सुसंवाद फुलत-फळत असल्याची प्रचीती वर्षांनुवष्रे येतेच आहे.

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी ( Coverstory ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dasara vishesh shahi dasara celebration in kolhapur

ताज्या बातम्या