चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com, @chaijoshi11
अक्षय्यतृतीयेला आंब्याची खरेदी आणि तिथपासून पुढे मनसोक्त आंबा खाणं हे चित्र या वर्षी दिसत नाही. कारण डिसेंबरमधल्या ओखी वादळाचा फटका यंदा आंब्याच्या उत्पादनाला बसला आहे. त्याचे दुष्परिणाम अर्थातच आंबाप्रेमींना सहन करावे लागत आहेत.

आंबा खायला मिळतो या एकमेव कारणामुळे कडक उन्हाळा सहन करणारेही अनेक जण आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही आंब्याच्या आगमनाची उत्पादक, व्यापारी, ग्राहक असे सगळेच आतुरतेने वाट बघत होते. पण त्यांच्या पदरी निराशा पडली. गेल्या वर्षी आंब्याला चांगला मोहोर आल्याची चर्चा असतानाच यंदा आंब्याचं उत्पादन कमी असल्याची माहिती येऊ लागली आहे. सर्वसाधारणपणे अक्षय्यतृतीयेपासून आंबा बाजारपेठेत यायला सुरुवात होते. या दरम्यान आंब्याची खरेदी मोठी असते. पण यंदा हे सगळे गणित चुकलेले आहे. या वर्षी बाजारात उपलब्ध असलेल्या आंब्याचे कमी प्रमाण आणि त्यामुळे वाढलेले दर यांमुळे अनेक जण आंब्याचा आस्वाद घेण्यापासून वंचित राहिले आहेत.

खरे तर गेल्या वर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात आलेला मोहोर बघता या वर्षी आंब्याचे चांगले उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त होत होता. व्यापारांनी बाजारपेठेत तशी गुंतवणूकही केली होती. पण डिसेंबरनंतर झालेल्या वातावरणातील बदलामुळे संपूर्ण चित्रच पालटून गेले. डिसेंबरमध्ये आलेले ओखी वादळ, अकाली पाऊस, जानेवारी महिन्यात वाढलेली थंडी अशा अनेक कारणांमुळे जवळपास ६५ टक्के मोहोर गळून पडला. यामुळे आंब्याचे उत्पादन कमी झाले आणि त्याचे भाव वाढले. हे केवळ महाराष्ट्रातील आंब्यांबाबत नसून ज्या-ज्या राज्यांमधून आंब्याचे उत्पादन होते अशा कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांमध्येही आंब्याचे उत्पादन कमीच आहे. गुजरात येथील हापूस आंब्याचे प्रमाण यंदा खूपच कमी असल्याचे दिसून येत आहे. तर दक्षिणेतून होणारी आंब्याची आवक या वर्षी तुलनेने बरीच कमी आहे. आंब्याचे उत्पादन कमी होण्यामागे वातावरणातील बदल हे प्रमुख कारण आहे, असं आंबा उत्पादकांचं मत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संजय पानसरे आंब्याची आवक आकडेवारीत सांगतात, ‘गेल्या वर्षी या महिन्यात महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील काही राज्यांमधून आंब्याच्या एकूण सव्वा लाख पेटय़ा आल्या होत्या. या वर्षी मात्र महाराष्ट्रातून ५० हजार तर दक्षिणेकडील राज्यांतून २५ हजार पेटय़ा अशा एकूण ७५ हजार पेटय़ा वाशी-नवी मुंबईच्या घाऊक बाजारात आल्या. आंब्याच्या पेटय़ांचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने साहजिकच त्याचा परिणाम बाजारभावावर झाला. अक्षय्यतृतीयेपर्यंत कमीत कमी ३०० रुपये आणि जास्तीत जास्त ८०० रुपये प्रति डझन या भावाने घाऊक बाजारात आंब्याची विक्री झाली. रिटेलमध्ये मात्र ५०० ते १५००-१६०० रुपये प्रति डझन या भावाने आंब्याची विक्री झाली. अक्षय्यतृतीयेला ग्राहकांनी आंब्याची खरेदी केली. पण त्यांना जास्त किमतीत आंबा विकत घ्यावा लागला.’ आंब्याची आवक घटल्याने बाजारात आंब्याचं अस्तित्व फारसं जाणवत नाही. एप्रिल अखेपर्यंतची ही परिस्थिती निराशाजनक म्हणायला हवी.

आंब्याची आवक घटल्याने आपल्या देशातून इतर देशांमध्ये केल्या जाणाऱ्या हापूस आंब्याच्या निर्यातीलाही चांगलाच फटका बसला आहे. आपल्याकडून दरवर्षी युरोप, सिंगापूर, अमेरिका, स्वित्र्झलड तसंच आखाती देशांमध्ये आंबा निर्यात केला जातो. पण या वर्षीची आवक बघता निर्यात व्यवसायातही नुकसान होण्याची चिन्हं दिसून येत आहेत. त्यातही आता आखाती देशांमधली स्पर्धा सध्या डोकं वर काढताना दिसत आहे. आखाती देशांमध्ये दुबई हे आंबा निर्यात करण्याचं प्रमुख ठिकाण आहे. येथूनच इतर आखाती देशांना आंबा पुरवला जातो. पण यंदा अबुधाबी, ओमान, कतार या देशांनी दुबई येथून आंबा खरेदी करण्यास नकार दिला आहे. दुबईहून आंबा खरेदी न करता थेट भारतातून आयात करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. पण आपल्या देशाकडून इतर आखाती देशांमध्ये आंब्याची थेट निर्यात कितपत केली जाईल याबाबत प्रश्नचिन्ह आहे. दुबईकडूून आंबे खरेदी न करण्याच्या इतर आखाती देशांच्या निर्णयामुळे दुबईकडून होणारी आंब्याची मागणी घटेल; हे निश्चित आहे. शिवाय आपल्या देशातून आखाती देशांमधील दुबई वगळता इतर कोणत्याही देशात निर्यात केली जाणार नाही. आपल्या देशातून आंब्याची सर्वाधिक निर्यात आखाती देशांमध्येच केली जाते. त्यामुळे या वेळी त्या देशांतील निर्यातीचे चित्र बदलले तर साहजिकच आपल्याकडील निर्यातव्यवसायावर मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आखाती देशांमध्ये आयात केलेल्या मालावर याआधी कधीही कर लावत नसे. पण यावर्षीपासून आयात केलेल्या मालावर पाच टक्के व्हॅट आकारण्यात येणार आहे. या सगळ्याचा परिणामही दुबई बाजारपेठेवर दिसून येतोय. म्हणूनच हे वर्ष दुबई बाजारपेठेसाठी मंदीचे वर्ष असल्याचे म्हटले जातेय. दुबई बाजारपेठेवर आंब्याच्या निर्यातीच्या संपूर्ण घटनेमुळे संक्रात आली असेच म्हणावे लागेल.

आंब्याची निर्यात करताना त्यावर केली जाणारी प्रक्रिया महत्त्वाची भूमिका बजावत असते. विकिरण (इरॅडिएशन), हॉट वॉटर आणि व्हेपरी अशा तीन प्रक्रिया आंब्यांवर केल्या जातात. युरोप, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया येथे आंबे निर्यात करताना त्यावर हॉट वॉटर किंवा व्हेपरी प्रक्रिया आणि अमेरिका येथे निर्यात करताना त्यावर विकिरण (इरॅडिएशन) प्रक्रिया अनिवार्य असते. या प्रक्रियांसाठी बराच खर्च असतो. सध्याची आंब्याची आवक आणि निर्यातीसाठी कराव्या लागणाऱ्या प्रक्रियांचा खर्च बघता निर्यातदार मोठय़ा प्रमाणावर आंबे निर्यात करत नाहीयेत. विकिरण, हॉट वॉटर आणि वेपरी ००० या तिन्ही प्रक्रियांमध्ये बरेचसे आंबे खराब होतात. विकिरणांमुळे तापमान वाढते आणि आंबा मऊ (स्पाँजी) होतो. हॉट वॉटर प्रक्रियेतही आंबा एक तास गरम पाण्यात ठेवावा लागतो. हापूस आंबा निर्यात करताना त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. केसर, तोतापुरी आणि बदामी या प्रकारचे आंबे निर्यातीसाठी कराव्या लागणाऱ्या प्रक्रियांमध्ये खराब होत नाहीत. त्यामुळे त्याची निर्यात जास्त होते. थोडक्यात, आंब्याची निर्यात करण्यासाठी आर्थिक बाजू भक्कम असणेही तितकेच गरजेचे आहे. या वर्षी आंब्याची उपलब्धता कमी असल्याने त्यासाठी तितका खर्च करायचा का, अशी संभ्रमावस्था निर्यातदारांमध्ये दिसून येत आहे.

आंब्याची आवक घटली असे म्हणतानाच केवळ महाराष्ट्राचा विचार करून चालणार नाही; तर संपूर्ण देशातील चित्र समजून घ्यावे लागेल. या वर्षी देशभर आंब्याचे उत्पादन ४० टक्क्यांनी कमी झाले आहे. ग्राहकांचे आंबे खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे, हे प्रामुख्याने लक्षात येत आहे. एखाद्या विक्रेत्याने घाऊक बाजारपेठेतून तीन हजार रुपयांना आंब्याची पेटी विकत घेतली तर रिटेल बाजारात त्याला त्याचे तीन हजारसुद्धा मिळत नाहीत, अशी परिस्थिती सध्या बाजारात आहे. कारण किंमत वाढल्यामुळे आंब्यांचा तेवढा खपच होत नाही. एप्रिल-मे महिन्यात महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात अशा सर्व भागांतून आंब्यांची आवक होत असते. त्यामुळे बाजारात आंब्याचे प्रमाण या काळात नेहमीच जास्त असते. पण यंदा परिस्थिती काहीशी वेगळी आहे. अक्षय्यतृतीयेनंतर घाऊक बाजारपेठेत आंब्याचे दर २००-३०० रुपयांनी कमी झाले आहेत. असे असले तरी अजूनही आंब्यांची आवक कमीच आहे. ५ मेनंतर ती आवक वाढेल, असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे. तोवर मात्र आंब्याचे प्रमाण कमीच असेल. तुलनेने गेल्या वर्षी आंब्यांची आवक लवकर झाली होती. गेल्या वर्षी केरळच्या आंब्याची मोठी आवक डिसेंबर महिन्यापासूनच सुरू झाली होती. त्या आंब्यामुळे आपल्याकडच्या आंब्याचे भाव गडगडले होते. केरळसह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यांमधूनही आंब्याची आवक चांगलीच होती. त्यामुळे तिथल्या आंब्याची महाराष्ट्रातील आंब्यांशी मोठी स्पर्धा होती. या वर्षी ही तुलनादेखील करता येणार नाही; कारण दक्षिणेकडील राज्यांमधून येणारे आंब्यांचे प्रमाणही कमीच आहे. पण केरळ, कर्नाटक या राज्यांमधील आंब्यासाठी आवश्यक असणारा भाग आता विकसित झाला आहे. गेल्या दहा वर्षांत आपल्याकडची हापूसची कलमे तिथे लावून तिथे आता बागा तयार झाल्या आहेत. यामुळेच तिथे आंब्याचे उत्पादन जास्त होताना दिसते आणि तेथील आंबा महाराष्ट्रात येऊन आपल्याकडील आंब्याशी स्पर्धा करतो. कर्नाटकातले ७५ टक्के आंबे मुंबईत आणि २५ टक्के देशातील अन्य राज्यांमध्ये विक्रीस जातात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एका पेटीत किंमतीत एक ते दीड हजार रुपये जास्त आहेत. केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या चार राज्यांमध्ये आंब्याची चांगल्या प्रकारे लागवड झालेली आहे. हे फक्त हापूस आंब्याबद्दल नाही, तर तिथे बदामी, लालबाग, तोतापुरी, नीलम, गोळा असे आंब्याचे अन्य प्रकारही आहेत. त्यापैकी बदामी, लालबाग, नीलम, तोतापुरी हे आंबे मोठय़ा प्रमाणावर निर्यात होतात. एकूणच आवक घटल्याने ठिकठिकाणी झालेले परिणाम दिसून येत आहेत. पण उपलब्ध असलेल्या आंब्यांच्या किमती खूप आहेत. या किमतीविषयी प्रसिद्ध आंबा उत्पादक डॉ. बाळासाहेब भेंडे सांगतात, ‘‘गेल्या वर्षी डिसेंबर आणि या वर्षी जानेवारीमध्ये झालेल्या हवामानबदलामुळे आंब्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्याच्या बाजारभावातही फरक दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा आंब्याचे ६० ते ६५ टक्के इतके नुकसान झाले आहे. कच्चा आंबा प्रतिडझन सरासरी २००, २५० ते ७०० रुपये असा विकला जातो. तर तयार आंबा प्रतिडझन ३००, ३५० ते १२००, १४०० रुपयांपर्यंत विकला जातो. १००, १५०, ३०० ग्रॅम अशा आंब्याच्या वजनानुसार त्याची किंमत बदलत जाते. ही किंमत यंदा दुपटीने वाढलेली आहे. हे केवळ हापूसपुरते मर्यादित नसून ते तोतापुरी, बदामी, पायरी अशा आंब्याच्या सगळ्याच प्रकारांमध्ये दिसून येत आहे.’

आंबा हा फळांचा राजा. त्याचा थाट दरवर्षी मोठा असतो. हा थाट करणारे आणि उपभोगणारे असे दोघेही त्याचा आनंद घेत असतात. पण या वर्षी हा थाटच होत नाही. याचं कारण म्हणजे आंब्याच्या उत्पादनात झालेली घट. यामागे असलेल्या वेगवेगळ्या कारणांपैकी हवामान बदल हे एक कारण असल्याचं आंबा उत्पादकांकडून सांगितलं जात आहे. त्याचा संबंध डिसेंबरमध्ये आलेल्या ओखी वादळाशी असू शकतो. म्हणजे या वादळाचा परिणाम होऊन आंबा उत्पादन घटल्याची शक्यता असू शकते. कोणत्याही अडचणीशी सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित होत असतं. पण वातावरणातील बदलापासून आंब्यांना वाचण्यासाठी असे कोणतेही तंत्रज्ञान अजून तरी विकसित झालेले नाही. त्यामुळे वातावरणापुढे काहीच होऊ शकत नाही असे आंबा व्यावसायिक तसंच आंबा अभ्यासकांचं मत आहे. बाजारात आंबा कमी आल्यामुळे तो महाग आहे, तो भरपूर खायला मिळत नाही, त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात मात्र कोकणचा राजा रुसल्याचीच भावना आहे.

आंब्यासाठी प्रतिकूल वर्ष
यंदाचं वर्ष आंब्यासाठी प्रतिकूल असल्याचं मला जाणवलं. माझ्या आजवरच्या आंबा उत्पादनाच्या अनुभवात आंब्याची आवक इतकी कमी असल्याचं हे पहिलंच वर्ष आहे. आंब्याचा बाजारभाव साधारणपणे मार्चमध्ये सर्वाधिक आणि नंतर एप्रिल-मे महिन्यात कमी झालेला दिसून येतो. एप्रिलपासून त्याची आवकही वाढते. पण यंदा उलट चित्र दिसलं. मार्च महिन्यात आंब्याची आवक वाढली. एप्रिलच्या दहा तारखेनंतर ती पुन्हा कमी झाली. त्यामुळे आंब्याचे भाव वाढले.
– डॉ. बाळासाहेब भेंडे, आंबा बागायतदार

निर्यातदारांचं नुकसान
मार्चच्या पहिल्या आठवडय़ात मुंबई आणि कोकण परिसरातील वातावरण खराब होतं. काही ठिकाणी पाऊसही झाला. या दिवसांमध्ये आंब्यावर सातत्याने मोठय़ा प्रमाणावर दव पडत होते. त्याचा परिणाम आंब्यांवर झाला. त्यावर अँथ्रॅग्नो हा रोग जडू लागला. मार्च महिन्यापासून विक्रीसाठी आलेले आंबे काळे पडले होते. या गोष्टीचा स्थानिक बाजारपेठेला १५ दिवस त्रास झाला. तर दुबई बाजारपेठेला मात्र हीच गोष्ट महिनाभर सहन करावी लागली. अँथ्रॅग्नो साधारण तापमानात वाढत नाही. पण थंड स्टोरेजमध्ये तो कैक पटीने वेगाने वाढतो. दुबईमध्ये निर्यात केले जाणारे आंबे नऊ डिग्री तापमानात एका स्टोरेजमध्ये ठेवले जायचे. त्यातील आंबा स्टोरेजबाहेर काढला की तो काळा पडायचा. असा काळा पडलेला आंबा फेकून दिला जायचा. अशा प्रकारे ५० टक्के आंबे फेकून द्यावे लागले. त्यामुळे निर्यातदारांना मोठय़ा नुकसानाला सामोरं जावं लागत आहे.
– संजय पानसरे, माजी संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती

छायाचित्रे : संतोष परब, नरेंद्र वासकर